विभाग नववा : ई-अंशुमान
उमरबिन खत्तब – महंमदाचा एक जिवलग स्नेही व सासरा. हा अबूबकर सादिकनंतर दुसरा खलीफ झाला. यानें सिरिया आणि फिनिशिया जिंकून मोठ्या निकराची लढाई देऊन इ. स. ६३७ मध्यें यरुशलेम घेतलें. त्याच्या सेनापतीनें ईराण आणि ईजिप्त पादाक्रांत करून महंमदाचे अनुयायी वाढविले. याच्या सैन्यानें अलेक्झांड्रिया काबीज केल्यानंतर जो तेथील सुप्रसिद्ध ग्रंथसंग्रहालयाचा नाश केला त्याची भरपाई म्हणूनच कीं काय त्यानें नाइल नदी आणि तांबडा समुद्र यांच्या मधला कालवा चालू केला. याच्या कारकीर्दीत मुसुलमानांनीं ३६ हजार शहरें जिंकून घेतलीं; चार हजार ख्रिस्ती देवळें उध्वस्त केलीं; आणि १४०० मशिदी बांधल्या. त्यालाच प्रथम अमीर-उल मोमीनीन ही खलिफांना असलेली पदवी मिळाली. त्यानें सात लग्नें केली. त्याची एक बायको अल्लीची मुलगी उम्म कुल्सूम ही होती. इ. स. ६४४ त एका इराणी गुलामानें तो सकाळचा नमाज पढत असतां त्याचा खून केला. त्याच्या मागून आफानचा मुलगा उस्मान हा खलीफ झाला. [बीलचा कोश].