विभाग नववा : ई-अंशुमान
उमरावती (जिल्हा) – वर्हाडांतील एक जिल्हा. उत्तर अ. २०० २५’ ते २१० ३७’ व पूर्व रे. ७७० १६’ ते ७८० २९’ यांच्या दरम्यान. क्षेत्रफळ ४७५४ चौरस मैल. उत्तरेस मध्यप्रांतांतील बैतुल जिल्हा; पूर्वेस वर्धा नदी; दक्षिणेस यवतमाळ, दारव्हा आणि मंगरूळ तालुके; पश्चिमेस अकोला.
प्रदेश सपाट असून समुद्रसपाटीपासून सुमारें ८०० फूट उंचीवर आहे. गाविलगड डोंगरात उगम पावलेली पूर्णा नदी या जिल्ह्यांतून वाहते. वन्य प्राणी फार कमी आहेत. वाघ क्वचितच दिसतो. येथें उन्हाळा फार भासतो. पावसाची सरासरी २९ इंच आहे.
इ ति हा स.- या जिल्ह्याचा स्वतंत्र असा इतिहास नाहीं. इ. स. १८५३ त वर्हाड निजामानें ब्रिटीशांकडे लावून दिल्यावर त्याचे पूर्व वर्हाड व पश्चिम वर्हाड असे दोन भाग करण्यांत आले. पूर्व वर्हाडाचें मुख्य ठिकाण उमरावती असून त्यांत उमरावती, इलिचपुर आणि वणी हे जिल्हे होते. इ. स. १८६४ सालीं वणी जिल्हा उमरावतीपासून निराळा करण्यांत आला. इ. स. १८६७ मध्यें इलिचपुर जिल्ह्यांतील मोरशी तालुका उमरावतींत घालण्यांत आला.
यांत शहरें २० व खेडीं १६२ क्षेत्रफळ ४७३३ व लोकसंख्या (१९२१) ८२८३८४. या जिल्ह्याचे सध्यांचे तालुके उमरावती, मोरशी, चांदूर, एलिचपूर, दर्यापूर आणि मेलघाट असे आहेत. मुख्य पिकें ज्वारी व कापूस. या जिल्ह्यांत जंगल फारसें नाहीं. या जिल्ह्यांत सरकी काढण्याचे कारखानें पुष्कळ आहेत. इ. स. १९०३-४ सालीं जमीनमहसूल २१ लाख रुपये होता. इ. स. १९०५ सालीं वर्हाडांतील जिल्ह्याच्या सरहद्दी बदलण्यांत आल्या. त्यावेळीं इलिचपुर जिल्हा अजीबात कमी करून तो उमरावती जिल्ह्यांत घालण्यांत आला व मूर्तिजापुर तालुका अकोला जिल्ह्याकडे देण्यांत आला.
ता लु का. – वर्हाडांतील उमरावती जिल्ह्याचा एक तालुका. उ. अक्षांश २०० ४१’ ते २१० १२’ व पू. रे. ७७० ३२’ ते ७८० २’. क्षेत्रफळ ६७२ चौरस मैल. लोकसंख्या (१९०१) १५४९०२. या तालुक्यांत ४ गांवें व २६४ खेडीं आहेत. इ. स. १९०३-४ सालीं जमीनमहसूल ६२१ हजार रुपये व करांबद्दल ४९ हजार रुपये उत्पन्न होतें. वर्हाडच्या सुपीक खोर्यांत हा प्रदेश वसलेला आहे.
गां व. – वर्हाड. उमरावती जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. समुद्रसपाटीपासून हें १११८ फूट आहे. उ. अ. २०० ५६’ व पू. रे. ७७० ४७’. पूर्वीं दक्षिण हैद्राबादचा रेसिडेंट याचा कारभार पहात असे. येथून हैद्राबाद दक्षिणेकडे २५० मैल आहे. उमरावती जी. आय. पी. रेल्वेच्या मुख्य मार्गावर नाहीं. पण बडनेराहून उमरावतीस एक ६ मैलांचा फांटा गेलेला आहे. या शहरानें तारखेड, राजापेठ, गांभ्रीपूर व महाजनपूर या खेडेगांवाचे कांहीं भाग व्यापलेले आहेत. क्षेत्रफळ ३६१ एकर ३८ गुंठे. लोकसंख्या (१९११) ३४२७०.
उमरावतीस पुष्कळ हिंदुंचीं व दोन जैनांचीं देवालयें आहेत. कांहीं मशिदीहि आहेत. बडे नालसाहेबाच्या मशिदीला अजून इनाम आहे. सर्वांत महत्त्वाचें देऊळ अंबा देवीचें व बालाजीचें हीं होत. बालाजीचें देऊळ व यात्रेकरूंचा मठ यांचा खर्च याच तालुक्यांतील जामगांव नांवाच्या इनामी खेडेगांवाच्या उत्पन्नांतून चालतो. उमरावतींत अंबेचें देवालय सर्वांत जुनें आहे असें म्हणतात. याच देवळांत आपला भाऊ रुक्मी याबरोबर रुक्मिणी दर्शनास आली असतांना तिची व कृष्णाची भेट झाली. हा समारंभ पहाण्यास बरेच वर्हाडी अथवा वरहारी आले होते. हे लोक येथें स्थाईक झाल्यावर या प्रदेशाला त्यांनीं वरहार असें नांव दिलें. त्याचेंच पुढें वर्हाड झालें असें सांगतात. रुक्मी व कृष्ण यांची पुढें लढाई झाली. तींत रुक्मीचा पराजय झाला. तेव्हां तो तेथूनच पश्चिमेकडे १४ मैलांवर असलेल्या भातकुली गांवीं राहिला. याचें स्मरण म्हणून तेथें एक त्याच्या नांवाचें देऊळ आहे. या शहराशीं कृष्णाचा संबंध असल्यामुळें त्या गांवास अमरावती असें नांव पडलें आहे व उमरावती हा त्या शब्दाचा अपभ्रंश आहे, असा कित्येकांचा समज आहे. परंतु या शहराचें नांव अमरावती नसून उमरावती आहे व तें उदुंबरावतीचा अपभ्रंश आहे असें राजवाडे म्हणतात (भा. इं. सं. मं. १८१२ पृ. ५८). आश्विन शुद्ध ८, ९, व १० या दिवशीं येथें मोठी जत्रा भरते. देवस्थानाचें वार्षिक उत्पन्न (लोकांकडून देवापुढें ठेवण्यांत आलेलें व व्यापारी लोकांनीं फंड म्हणून जमा केलेलें ६००० रु.) आहे. यांतून सदावर्त व दुसरीं परोपकाराचीं कामें चालतात. देवस्थानाची व्यवस्था येथील पेढीवाले व वजनदार गृहस्थांच्या कमेटीमार्फत चालते. हें देऊळ सोडून दिल्यास उमरावंती गांव अगदी अलीकडेच वसविलेलें आहे. उमरावती रघूजी भोंसला यानें वसविली असें म्हणतात.
अकोल्याच्या तालुकदारानें अठराव्या शतकाच्या अखेरीस लोकांवर फार जुलूम केला. त्यामुळें तेथील लोक उमरावतीस रहावयास गेले व त्यामुळें उमरावतीची भरभराट झाली. त्यामुळें येथें नागपूर व हैद्राबाद येथील राजांची सत्ता होती. नागपूरकर येथील उत्पन्नापैकीं शेंकडा ६० व हैद्राबादकर शेकडा ४० घेत असत व दोघेहि लोकांवर जुलूम करीत. या वेळच्या दोन गोष्टी अजून पाहण्यास मिळतात. एक राजा बिसनचंद याची हवेली. हींत प्रेक्षणीय कोरींव काम आहे. शिवाय दुसरी गांवासभोंवतीं असलेली भिंत. ही भिंत पेंढार्यांचा उपद्रव होऊं नये म्हणून इ. स. १८०४ सालीं निजामनें बांधण्यास सुरुवात केली. ती पुरी होण्यास १७ वर्षें लागलीं व चार लाख रुपये खर्च लागला. भिंतीचा घेर सवादोन मैल असून उंची २० पासून २६ फूट आहे. ही इतकी भक्कम आहे कीं, ती अजून नवीनच आहे असें दिसतें. या भिंतीस पांच मोठे दरवाजे आहेत (अंबा, भुसारी, नागपूर, खोलापूर, महाजन वेस) आणि चार लहान दरवाजे आहेत. त्यांनां खिडक्या म्हणतात त्या (खुनारी, छत्रपुरी, माता आणि पटेलची खिडकी). इ. स. १८१६ सालीं झालेल्या मोहरमच्या दंग्यांत जी खून मारामारी झाली तीवरून एकीस खुनारी असें नांव पडलें. या दंग्यांत ७०० माणसें मेलीं असें म्हणतात. वर दिलेल्या दरवाजांखेरीज आणखी दोन नवीन मार्ग अलीकडे पडले आहेत.
रस्ते अतिशय अरुंद असून नागमोडीचे आहेत. सांडपाणी जाण्याची सोय चांगली नाहीं. बाजारचे दिवस रविवार आणि बुधवार. हा बाजार भिंतीच्या बाहेरच भरतो. नमुना म्हणून गांवाचा एक चांगला भाग आहे. या भागांत सरकारी कचेर्या, वकील व गांवातील मोठमोठे लोक राहतात. याच भागांत निकोलेट पार्क व जोगांचा चौक ह्या खुल्या जागा आहेत. याच्या आसपास हमालपुरा, मसनगंज, रतनगंज इत्यादि आहेत. यांत गरीब लोकांची वस्ती आहे. इ. स. १८६९ सालीं येथें म्युनिसिपालिटी आली.
वार्षिक उत्पन्न (सरासरी) रुपये ६४४०८. वार्षिक खर्च (सरासरी) ६४७१६ रुपये. घंटाघर, मुलांची शाळा नं.३ व म्युनिसिपालिटीचा एक हॉल इतक्या चांगल्या इमारती म्युनिसिपालिटीच्या आहेत. प्रवाशांकरिता एक सराई बांधलेली आहे. इतर सरकारी इमारतीहि आहेत.
कापसांतील सरकी काढण्याचे कारखाने व तो दाबण्याचे करखाने ५० वर आहेत. पहिला कारखाना इ.स. १८७२ सालीं निघाला. येथें एक दोन तेल काढण्याचे कारखाने आहेत. त्यांत एक रामजी कान्नव आणि कंपनीचा आहे. उमरावती हें वर्हाडांतील कापसाच्या व्यापाराचें मुख्य ठिकाण आहे. हंगामांत सरासरी एक लाखपर्यंत कापसाच्या गाड्या येतात.
येथें उर्दू वर्तमानपत्रें व शाळा आहेत. मराठी भाषेंत कर्तव्य व उदय ही पत्रें प्रमुख होत. तीन इस्पितळें व तीन ख्रिस्ती सांप्रदायिक संस्था आहेत.
हिंदु – मुसुलमान व मुली यांकरितां निराळीं हायस्कुलें आहेत. दोन मराठी व उर्दू शिक्षक तयार करण्याच्या शाळाहि दिसतात. एक म्युनिसिपालिटीचें स्कूल, एक खासगी हायस्कूल व कॉलेज यांची भरती नवीन झाली आहे. हायस्कुलें व कॉलेजें नागपूर युनिव्हर्सिटीस जोडण्यांत आलीं आहेत.
कँ प – उमरावतीच्या पूर्वेस थोडी उंचवट्याची जागा आहे त्या ठिकाणीं हा कँप आहे. समुद्रसपाटीपासून हें ठिकाण १२८३ फूट उंच आहे. क्षेत्रफळ १२ चौरस मैल. या कँपची जागा फार चांगली असून हवा कोरडी आहे. मृत्युसंख्येचे प्रमाण फारच कमी आहे. म्युनिसिपालिटी १८८९ त स्थापना झाली. १९०७-०८, मध्यें उत्पन्न १७७२६, खर्च १२८६२.
पाणीपुरवठा:- या सर्व भागांत विहिरीचें पाणी मुबलक असून, सरकारी कचेर्यांनां वडाळी तलावाचें पाणी आणलें आहे.
येथें‘मालटेकडी’ नांवाची एक टेंकडी असून तेथें पेंढारी लोकांच्या स्वार्यांच्या वेळीं उमरावतीच्या श्रीमंत सावकारांनीं आपली संपत्ति पुरून ठेविली होती असें म्हणतात. हल्लीं येथें तोफ असून तिचा सलामीकरिता उपयोग करतात. याच्या पूर्वेस चिलमशहा वली नांवाचा एक लहानसा पीर आहे. येथें उन्हाळ्यांत उरूस होत असतो. (उमरावती जिल्हा गॅ. इं. गॅ. अर्नोल्ड गाईड वगैरे).