विभाग नववा : ई-अंशुमान
उमरी – मध्य हिंदुस्थान एजन्सींतील एक लहानसें संस्थान. हे ग्वाल्हेर रेसडेंटाच्या देखरेखीखालीं असतें. याचें क्षेत्रफळ ६० चौ. मै. असून १९०१ सालीं लो. सं. २४६९ होती. उमरी व भदौराचे संस्थानिक सिसोदिया रजपूत असून साग्रावत शाखेपैकीं आहेत. उदेपूर शहरचा स्थापनकर्ता राजा उदेसिंग याचा धाकटा मुलगा सागरजी नांवाचा होता. त्यापासून उमरीच्या संस्थानिकांची उत्पत्ति आहे. सागरजीनें अकबराची मदत घेऊन मेवाड आपल्या भावापासून परत घेण्याचा एकदां यत्न केला होता. सागरजीपासून पांचवा पुरुष प्रतापसिंह यानें १६३६ नहरगडच्या राठोड रजपूत नबाबाची मदत घेऊन उमरी घेतली. या वेळेस उमरी ठाकूर पहछादसिंग याच्याकडे असून प्रतापसिंहाचा जांवई कोठ्याचा राजा रामसिंग जाजूच्या लढाईंत ठार मारला गेल्याकारणानें साग्रावतांकडून उमरी परसत्तेंत गेली. नंतर प्रतापसिंहाचा नातू जगत्सिंग यानें भदौरी व आसपासचीं खेडीं संपादन केलीं. त्यांत उमरीचा समावेश होतो. मराठ्यांच्या अमदानींत उमरी व भदौराचा भाग बराच कमी झाला. सांप्रत पृथ्वीसिंग गादीवर असून त्यांना राजा ही पदवी पिढीजाद आहे.
संस्थानची जमीन सुपीक असून लोक संपन्न आहेत. उत्पन्न ६००० असून खर्च ३५०० रुपये आहे. १८९७ पर्यंत सारा फुलशाईंत वसूल करीत. हल्लीं इंग्रजी नाण्यांतून वसूल घेतात. उमराची लो. सं. १९०१ सालीं ५८१ होती.
ज मी न दा री - जिल्हा भंडारा. साकोली तहशिलींतील नवे गांव येथील तलावाच्या पूर्वेस, पश्चिमेस व दक्षिणेस ही जमीनदारी असून तिचें क्षेत्रफळ १७ चौरस मैल आहे. अर्धा भाग जंगल आहे. इ. स. १७७५ सालीं नागपूरच्या राजांनी या घराण्याच्या उत्पादकास (नजकराम) त्याच्या मल्लविद्येंतील नैपुण्याबद्दल व एका रानटी हत्तीला शिकविल्याबद्दल हीं जमीनदारी दिली होती. जमीनदारीस कर्ज आहे; व त्याची हप्त्यांनीं फेडण्याची व्यवस्था झाली आहे. हींत एकंदर १३ खेडीं आहेत. इ. स. १९०१ सालीं १६९७ लोकसंख्या होती. उत्पन्न २००० रुपये; टाकोळी १००० रुपये.