विभाग नववा : ई-अंशुमान
उमरेड, त ह शी ल. – मध्यप्रांत २०० ३५’ ते २१० ११’ उत्तर अ. व ७८० ५६’ ते ७९० ४०’ पू. रे. यांमध्यें. या तहशिलीनें नागपूर जिल्ह्याचा मध्य आणि ईशान्येकडील प्रदेश व्यापला आहे.
क्षेत्रफळ १०४० चौरस मैल. यांपैकीं ७३ चौरस मैल सरकारी संरक्षित जंगल आहे. लोकसंख्या १९११ त १४४९३० होती.
या तहशिलींत उमरेड एवढा एकच गांव असून २ हजारावर लोकवस्ती असलेलीं सात खेडीं आहेत.
या तहशिलींतील जमीन या जिल्ह्यांत चांगली आहे. जमीनीपैकीं चारपंचमांश जमीनींत गहूं पिकेल. परंतु ही तहशील सर्वांत मागासलेली आहे. हल्लीं पाहणी झाल्यापासून रबी पिकाचें प्रमाण कमी कमी होत चाललें आहे असें दिसतें. तरी वहीत असलेल्या जमींनीपैकीं निम्म्यापेक्षां अधिक जमीनीत रबी पीक घेतात.
या तहशिलींत उमरेड येथेंच फक्त म्युनिसिपालिटी व पोलिस कचेरी आहे.
बंगाल – नागपूर. रेल्वेची नागपूर ते उमरेड ही शाखा आहे. या तहशिलींत तीन खडी घातलेले रस्ते आहेत. (१) उमरेड ते बोरी (जी. आय. पी. रेल्वे स्टेशन), (२) नागपूर ते उमरेड, (३) उमरेड ते मूळ (चांदा जिल्हा).
गां व – मध्यप्रांत. २०० ५२’ उत्तर अ. व ७९० २०’ पूर्व रे. हें उमरेड तहशिलीचें मुख्य ठिकाण असून नागपूरच्या वायव्येस २९ मैलांवर आहे. येथें एक मराठ्यांचा मोडकळीस आलेला किल्ला असून आंत एक देऊळ आहे. त्याच्या भिंती १७ फूट जाड असून ते शिवाचें देवालय होतें. परंतु आतां त्यांत पिंडी नाहीं. देऊळ मुसुलमानी तर्हेवर बांधलेलें असल्यामुळें प्राचीन नाहीं. सोळाव्या शतकांत चांदा येथील गोंड राजांपैकीं राजा करणशहा यानें हा किल्ला बांधला असावा अशी कल्पना आहे. लोकसंख्या (१९११) सालीं १७६३० होती.
गेलीं तीस चाळीस वर्षें हा गांव सारखा भरभराटीस येत आहे. आसपासच्या खेडेगांवांतील कोष्टी लोकांची या गांवांत भरती झाली असून हल्लीं रेशीमकांठीं कापड हातमागावर विणण्याच्या धंद्याला येथें तेजी आहे. सुमारें १० हजार लोक या धंद्यावर अवलंबून असून सुमारें दोन लाख रुपयांचा माल बाहेर पाठविला जातो. कच्चें रेशीम गांवांत आणण्याकरितां कांहीं एक कर द्यावा लागत नाहीं. या धंद्यामुळें रेशीम रंगविण्याचा एक लहानसा धंदा उदयाला आला असून तो धंदा पटवेकरी करतात. येथें तेली लोकांचीहि वस्ती बरीच आहे.
म्युनिसिपालिटीची स्थापना सन १८६७ मध्यें झाली. इ. स. १९०५-६ सालचें उत्पन्न २१ हजार रुपये होतें. येथें माध्यमिक इंग्रजी शिक्षणाची शाळा, मुलांमुलींकरितां प्राथमिक शिक्षणाच्या शाळा, दवाखाना, एक खासगी उर्दू शाळा असून पोलिसकचेरी आहे. इ. स. १८९६ सालीं २५०० रुपये खर्च करून एक टाऊन हॉल बांधला आहे.
येथें गुरांचा बाजार दर रविवारीं भरतो. येथें पुष्कळ तलाव असून त्यांच्या पाण्यावर विड्याचीं पानें, व इतर बागाइती पिकें होतात. हा गांव नागपूरच्या मेहदी बाग जातीच्या मि. मलक यांच्या मालकीचा आहे. परंतु देशमुखी जमीनी निराळ्या असून खाण्याचीं पानें पिकविणार्या बागा बरिया जातींच्या लोकांच्या आहेत.