विभाग नववा : ई-अंशुमान
उमाजी नाईक – दक्षिणेंत इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यावेळीं कोळ्यारामोश्यांनीं बरीच बंडाळी माजवून सरकारला त्रास दिला. देवबाराव दळवी, कोंडाजी नाईक, उमाजी नाईक, भर्गाजी नाईक वगैरे बंडवाल्यांच्या पुढार्यांना पकडण्याकरितां सरकारनें मोठमोठीं बक्षिसें लाविलीं होतीं. उमाजी व त्याचे रोमोशी पुरंदरभोंवतीं धुमाकूळ घालीत होते. पुढें १८२७ त उमाजी नाईकानें घोडे, तंबू व ३०० रामोशी यांसह सह्याद्री ओलांडून पनवेलच्या पूर्वेस १६ मैलांवर प्रबल डोंगराच्या पायथ्याशीं तळ दिला. प्रबलहून त्यानें असा जाहीरनामा काढिला कीं, कोणीहि इंग्रज सरकारला सारा वगैरे न देतां तो पैसा आपणांस द्यावा. असें न केल्यास लुटालुट जाळपोळ केली जाईल. याची खूण म्हणून गवत लांकूड व कोळसे लोकांत वाटले. याच वर्षीं उमाजीच्या सशस्त्र लोकांनीं मुरबाडचा खजीना लुटून बारातेरा हजार रुपये लांबविले. इ. १८२८-२९ सालीं तर जास्तच दंगेधोपे होऊं लागले. तेव्हां इंग्रज सरकारने कॅप्टन मॅकिन्टॉशला या कोळ्यारामोश्यांचा अजीबात नायनाट करण्याच्या कामावर नेमिलें. त्यानें पेंढार्यांप्रमाणें यांचा सर्वत्र पाठलाग करून पकडिलें (१८३४). उमाजी गोरगरीबांना न छळतां उलट त्यांना फार मदत करी. कंजूष बेपर्वा व जुलुमी माणसांना तो योग्य शिक्षा लावी, अशी त्याची ख्याति आहे. म्हणून त्याचें नांव लोकांच्या तोंडीं अद्याप आहे. त्याचा पोवाडा (ले. यसू १८८७) मोठ्या प्रेमानें ऐकिला जातो. त्याचें एक चरित्र रा. अनंत नारायण भागवत यांनीं लिहिलें आहे (१९१०).