विभाग नववा : ई-अंशुमान
उमापति शिवाचार्य. - शालिवाहन शकाच्या तेराव्या शतकांतील तामीळ ग्रंथकार. तामीळ चार तत्त्वज्ञानी आचार्यांपैकीं एक.
च रि त्र व ग्रं थ. – हा ब्राह्मण असून चिदंबरमूच्या देवळांतील पुजारी होता. याचा गुरु “मरइ गणसंबंध” (ब्राह्मणेतर) होता. गुरूच्या पानांतील उच्छिष्ट खाल्ल्यामुळें याला इतर ब्राह्मणांनीं गावांतून हांकलून दिलें, पण पुढें याच्या ग्रंथकर्तृत्वाची व साधुत्वाची ख्याति झाल्यामुळें याला देवाच्या वार्षिक जत्रेच्या प्रसंगीं परत बोलावलें. या वेळेस यानें कोदि कवि हा ग्रंथ लिहिला. शके १२३५ सालीं “अनि” उत्सवाच्या प्रसंगीं यानें जे वादविवाद केले ते ‘शंकर पनिरकरणं’ या ग्रंथांत ग्रथित केले आहेत. याचे मुख्य ग्रंथ येणेंप्रमाणें:- पुष्करागमावर संकृतभाष्य हें थिरुव वदुथुरै मठांत ठेवलें आहे. शिवाय‘फोइर पुराण’, चिदंबरम् देवळाचा इतिहास, शिवप्रकाशकं, व थिरुवारुत्पयन् या ग्रंथांत जीं वेदांततत्त्वें यानें पुढें मांडलीं त्यांचें संकलन आहे. तामीळामधील चौदा सिद्धांतशास्त्रग्रंथांत हें पुस्तक मोडतें. यांतील मुख्य विचार येणेंप्रमाणें:-
ईश्वर रूपी, अरूपी व रूपारूपी, आहे. ज्ञानवंतांस तो ज्ञानरूपी आहे. तो कल्याण करतो म्हणून त्यास शंकर म्हणतात. त्याकडे जो जात नाहीं त्याचें तो चांगलें करीत नाहीं. त्याच्याकडे जो जातो त्याचें तो कल्याण करतो तथापि तो पक्षपाती नाहीं. मल तीन प्रकारचे आहेत (१) मूल अथवा अनवमल, (२) कर्ममल, (३) मायामल. मूलमल हा सर्वांसच असतो, कित्येक आत्म्यांशीं संमत, कर्म व मूल हे दोनच मल असतात आणि कित्येकांच्या मध्यें तिन्ही मल असतात. यामुळें मनुष्याचे तीन वर्ग होतात. खालच्या (“तीन मलवाल्यानीं”) वरच्या वर्गात जाण्याचा यत्न करावा. जन्ममृत्यूच्या फेर्याचें दुःख, मुक्ति, व ईश्वरकृपा या तिन्हीं गोष्टी, मनुष्याच्या अंगच्या अनवमलानें झांकलेल्या असतात. हाच अज्ञानरूपी पाश होय. जो‘अरुल’ (ब्रह्य) ओळखीत नाहीं त्यास मुक्ति नाहीं. पंचाक्षर मंत्र पढावा म्हणजे मुक्ति मिळेल. “अरुल” शब्दाचें भाषांतर ईश्वरी कृपा असें नलस्वामी पिल्ले यानें केलें आहे पण या भाषांतराच्या सत्यतेबद्दल खात्री होत नाहीं. याचे भाग (१) ईश्वरस्वरूप, (२) आत्म्याचें स्वरूप, (३) पाशस्वरूप, (४)‘अरुल’ स्वरुप (५) सद्गुरु स्वरूप, (६) मार्गदीपिका, (७) आत्मप्रकाश, (८) मोक्षमार्ग, (९) पंचाक्षर सत्य, (१०) जीवनन्मुक्त लक्षण इ.