विभाग नववा : ई-अंशुमान
उमाबाई दाभाडे – सेनापति खंडेराव दाभाडे यांची स्त्री. ही कर्तृत्ववान, दक्ष व पराक्रमी होती. इचा मुलगा यशवंतराव हा व्यसनी व दुर्बल होता. त्यानें राष्ट्रसेवा कांहीं तरी करावी म्हणून तिनें फार शिकस्त केली परंतु उपयोग झाला नाहीं. कित्येक प्रसंगीं स्वतः तरवार घेऊन तिनें लढाया मारल्या. गायकवाडास आपले दुय्यम नेमून तिनें जातीनें गुजराथचा कारभार कांहीं काळ केला. (म. रि. ण. वि. २.) डभईच्या लढाईंत त्रिंबकराव मेले असतां बाजीराव पेशवे यांनीं स्वतः जाऊन बाईंची समजूत घातली (दा. ब.). शाहूची मर्जी संभाळून पेशव्यांशीं ती बाणेदारपणें वागे. इ. स. १७५० मध्यें पेशव्यांनीं छत्रपतीच्या आज्ञेवरून तिच्या कडून गुजराथ काढून घेतली. त्यावेळीं ती रागावली. यावेळीं तिचा शाहूचा आधारहि गेला होता. तेव्हां तिनें ताराबाईच्या भेटी घेऊन पेशव्याविरुद्ध एक कारस्थान उभें केलें. २० आक्टोबर १७५० रोजीं तिनें आपला वकील पेशव्यांकडे पाठविला; परंतु त्यांनीं त्याला धुडकावून लावलें; तेव्हां स्वतः बाईने २२ नोव्हेंबंर रोजीं आळंदीस पेशव्यांची भेट घेतली परंतु दाद लागेना. तिनें दमाजी गायकवाडास पेशव्यांवर पाठविलें. परंतु १७५१ च्या एप्रिलांत पेशव्यांनीं त्याचा पुरा मोड केला. ३० एप्रिल रोजीं वेणेच्या तहांत बाईनें निरुपायानें गुजराथ पेशव्यांस दिली. या वेळी ती पेशव्यांच्या हातांत सांपडली होती. तिचें मन दमाजी गायकवाडाबद्दल शुद्ध नव्हतें. तो आंतून पेशव्यांस सामील आहे व आपल्या सरदारीचा हा अपहार करतो अशी तिची ठाम समजूत होती. १७५१ चा एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंत उमाबाई पेशव्यांच्या कैदेंत होती. पुण्यास होळकरांच्या वाड्यांत दाभाड्यांची सर्व मंडळी नजरकैदेंत होती. श्रीमंत २९ जुलै १७५१ रोजीं थेऊरास गेले असतां बाई त्यांच्या बरोबर गेली होती. दाभाडे मंडळी १६ नोव्हेंबर १७५१ रोजीं कैदेंतून पळाली; तेव्हां श्रीमंतांनीं उमाबाई व तिची सून अंबिकाबाई यांनां सिंहगडावर कैदेंत ठेविले. (सासूसुनांचीं मनें परस्परांबद्दल शुद्ध नव्हतीं.) पुढें चर्होलीस बाईंची व श्रीमंतांची भेट झाली. बाईला १४ फेब्रुवारी १७५२ रोजीं पुण्यास आणून ठेविलें. मध्यंतरीं वाटाघाट होऊन ५ एप्रिल १७५२ रोजीं श्रीमंतांनीं पुन्हां बाईची गांठ घेतली व अखेर उभयतांत तह झाला. गायकवाड पूर्ववत दाभाड्यांची चाकरी करतील, दाभाड्यांनीं राज्यांत बखेडा करूं नये, रामराजाला अनुकूल होऊं नये व पेशव्यांचे विचारें चालावें, दाभाड्यांस खर्चास दरमहा ५० हजार रु. मिळतील, पूर्वींचे मोकासे त्यांच्याकडे चालतील वगैरे मुख्य कलमें या तहाचीं होतीं. या तहानंतर बाईंचा जप्त केलेला सरंजाम, श्रीमंतांनीं २ नोव्हेंबर १७५२ रोजीं सोडून दाभाड्यास वस्त्रें दिलीं. यापुढें पेशवे व दाभाडे यांचें सूत चांगलें जमलें. बाई वृद्ध झाली होती ती पुढें आजारी पडल्यामुळें श्रीमंतांनीं तिला उपचाराकरितां तळेगांवाहून पुण्यास आणलें. तिचा मुक्काम नडगेमोडीवर होता. ती दोन महिन्यानंतर २८ नोव्हेंबर १७५३ रोजीं वारली. मराठेशाहींतील अनेक पराक्रमी स्त्रियांत बाईची गणना केली पाहिजे. बाईनें जातीनें अमदाबाद (गुजरात) सर केल्याबद्दल खुद्द शाहूमहाराजांनीं तिच्या पायांत सोन्याचे तोडे घातले होते (दाभाडे बखर पृ २९८. पुढें) [ हिची साग्र हकीकत वाटसन्स हिस्टरी ऑफ गुजराथ, ३ या पुस्तकांत सांपडेल.]