विभाग नववा : ई-अंशुमान
उमेदवारी – जेव्हां कोणी एखाद्या धंद्याचा मालक एखाद्या शिकाऊ इसमाला स्वतःच्या धंद्याचें ज्ञान शिकविण्याचें कबूल करतो आणि उलट तो शिकणारा इसम मोबदल्या दाखल त्या मालकाची कांहीं काल नोकरी करण्याचें कबूल करतो तेव्हां उभयतांमधील अशा प्रकारच्या बंधनाला उमेदवारीचा करार असें म्हणतात. हिंदुस्थानांत धंदेवाईक जाती कित्येक शतकें अस्तित्वांत असल्यामुळें धंद्याचें शिक्षण आनुवंशिक व घरच्याघरीं मिळण्याची व्यवस्था असते. पाश्चात्य लोकांची समाजरचना धंदेभेद व जातिभेद या तत्त्वांवर नसल्यामुळें कोणाहि मनुष्यास कोणताहि धंदा करण्याची मोकळीक असते. चालू काळांतल्या प्रमाणें धंदे व कला शिकविण्याच्या शाळा नसल्यामुळें पूर्वीं धंदेशिक्षण मिळविण्याचा उमेदवारी हा एकच मार्ग सर्वत्र रूढ होता.
पू र्व इ ति हा स. – तथापि ही पद्धति फारशी जुनी नाहीं. प्राचीन ग्रीक व रोमन काळीं ती अस्तित्वांत नव्हती. रोमन लोकांमध्यें कायद्यांची वाढ फारच परिणत स्वरूपास गेलेली होती पण उमेदवारीच्या करारासंबंधानें त्या कायदे पुस्तकांत मागमूसहि नाहीं. फार काय पण सदरहू अर्थवाचक असा शब्दसुद्धां ग्रीक किंवा लॅटिन भाषेंत आढळत नाहीं. ही पद्धति मध्ययुगांत उत्पन्न झाली. मध्ययुगांत सरंजामदारांच्या बलिष्ठ वर्गाचा (फ्यूडल लॉर्ड) प्रतिस्पर्धी असा दुसरा व्यापार उदीमी वर्ग पुढें आला व या वर्गांतील लोकांनीं आपली परस्परसहायकारी मंडळें व संघ अथवा श्रेणी (गिल्ड) स्थापले. मध्ययुगांतील हे असले संघ, तसेंच तत्कालीन कारागिरींतील हस्तकौशल्य, स्थानिक मागणी व पुरवठा, मजुरीचे समान दर, तेजीमंदी व चढउतार यांचा अभाव या अनेक कारणांनीं उमेदवारीपद्धतीला तत्कालीन परिस्थिति अत्यंत अनुकूल होती. शिकाऊ मुलाला त्याचे आईबाप उद्दिष्ट धंदेवाईकाच्या घरींच रहावयास ठेवींत. त्याच्या दुकानांत तो काम शिके, उमेदवारांचें जेवणखाण, राहण्यास जागा व कपडेलत्ते सर्व मालकाच्या अंगावर असे. उलट मालकाचा हुकूम पाळणें, धंद्यांतील गुप्त गोष्टींची परिस्फुटता न करणें, व कोणत्याहि परिस्थितींत आचरण योग्य ठेवणें वगैरे बंधनें उमेदवाराला पाळावीं लागत. इंग्लंडांत उमेदवारी ७ वर्षें, फ्रान्सांत ४ वर्षें ते ६ वर्षें, जर्मनींत २ ते ४ वर्षें वगैरे निरनिराळा काळ करावी लागत असे. मात्र कोणत्याहि कलेचें किंवा शास्त्राचें शिक्षण याप्रमाणें उमेदवारी करून मिळविल्याशिवाय कोणालाहि स्वतंत्र धंदा करण्याची परवानगी नसे. मग तो धंदा सोनारालोहाराचा असो, शिंप्याचा असो, किंवा विद्वान पंडिताचा असो. म्हणून‘अप्रेंटिस’ हा शब्द हलक्या धंद्यातल्या उमेदवाराला लावीत. त्याप्रमाणें वाङ्मय, वैद्यक वगैरे विषयांतील विद्यार्थी (अंडर ग्रॅज्युएट व स्कॉलर्स) यांनाहि लावीत असत. याप्रमाणें त्या काळांत उमेदवारी करणें खुषीचें नसून सक्तीचें असे. १६ व्या शतकांत व्यापारीसंघ व उमेदवारी यांच्या संबंधानें सरकारकडून कायदेहि करण्यांत आले. उमेदवारीचीं वर्षें तर ठरविण्यांत आलींच पण शिवाय शिकून तयार झालेल्या इसमांना पगार किती द्यावा, त्यांच्याकडून काम दररोज किती तास घ्यावें, प्रत्येक शिकलेल्या नोकराच्या हाताखालीं उमेदवार किती असावे वगैरे सर्व बाबतींत कायद्यानें बंधन घालण्यांत आलें.
सदरहू परिस्थितींत फेरबदल उत्पन्न करणारी गोष्ट म्हणजे वाफेच्या यंत्राची युक्ति व त्या योगानें घडून आलेली औद्योगिक क्रांति ही होय. फ्रेंच राज्यक्रांतीपासून‘यथेष्ट व्यवहार करण्याचा प्रजेचा हक्क’ या अर्थशास्त्रीय तत्वाचा पुरस्कार जोरानें सुरू होऊन उपर्युक्त बंधनांविरुद्ध जिकडेतिकडे ओरड सुरू झाली. यांत्रिक साधनें निघाल्यापासून हस्तकुशल कारागिरांचें महत्त्व कमी होऊन करखान्यांतून व गिरण्यांतून अशिक्षित, अल्पवयी स्त्रियाहि काम करूं लागल्या. त्यामुळें अधिक पगारावर कुशल कारागीर नेमण्यास मालकहि तयार नव्हते. यामुळें “उमेदवारी” संबंधाचे कायदे मोडण्यास मालक व नोकर दोघांकडून सुरवात झाली. या पद्धतीवर दुसरा जोराचा आक्षेप संघांनीं उमेदवारांच्या संख्येवर घातलेल्या नियंत्रणासंबंधानें होता. या नियंत्रणामुळें कुशल कारागिरांची संख्या अपुरी पडूं लागली म्हणून हें नियत्रंण नसावें अशी मागणी उत्पन्न झाली. तिच्याविरुद्ध संघाचें म्हणणें असें असे कीं, उमेदवारांची संख्या अमर्याद वाढल्यास चांगले कुशल कारागीर न तयार होतां अर्धे कच्चे लोक बाहेर पडतील व धंद्याची त्यामुळें अवनति होईल. तथापि उत्तरोत्तर उद्योगधंद्यांचा प्रसार फार वाढल्यामुळें कारागिरांची संख्या अधिकाधिक लागूं लागली व त्याकरितां धंद्याचें शिक्षण देण्याकरितां स्वतंत्र शाळा व कॉलेजें असावीं अशी मागणी सर्वत्र होऊं लागली. लवकरच या मागणीचें महत्त्व सरकार व समाज दोघांच्याहि लक्षांत येऊन वाङ्मयतत्त्वज्ञानादि विषयांच्या शिक्षणसंस्थांप्रमाणें औद्योगिक व व्यापारीशिक्षणाच्या स्वतंत्र संस्था स्थापन होण्यास सुरवात झाली.
याप्रमाणें १९ व्या शतकाच्या आरंभीं उद्योगधंद्याच्या बाबतींत नवीं यांत्रिक साधनें व स्वतंत्र शिक्षणसंस्था उत्पन्न होऊन औद्योगिक क्रांति घडून आली. त्यामुळें जुने व्यापारी संघ (गिल्डस) व उमेदवारी संबंधाचे नियम व सरकारी कायदे आपोआप रद्द पडत गेले व उमेदवारीची जुनी पद्धति नष्ट होत चालली. तथापि कांहीं विशिष्ट धंद्यांत हस्तकौशल्याचें महत्त्व कायम असल्यामुळें व त्यांत यंत्रसामुग्री फारशी उपयोगी पडत नसल्यामुळें त्या धंद्यांत उमेदवारीची जुनी पद्धति अद्यापहि चालू राहणें अपरिहार्य आहे. उदा:- दगडावरील खोदकाम, सुतार काम, गंवडी काम, व जवाहीर दुरुस्तीचें काम वगैरे कामें पूर्वींच्या उमेदवारी पद्धतीनेंच अद्याप शिकणें भाग आहे. तथापि हे अपवाद वगळल्यास हल्लीं प्रचलित झालेले मोठ्या प्रमाणावरील उद्योगधंदे, श्रमविभागणी, यांत्रिक साधनें व कार्यविभागप्रावीण्यपद्धति (स्पेशलायझेशन) या गोष्टींमुळें कोणत्याहि धंद्याचें सर्वांगीं व संपूर्ण ज्ञान मिळविण्याची जरूरीच पडत नाहीं. हल्लींच्या कोणत्याहि मोठ्या कारखान्यांत एक दोन माणसें फार तर सर्व कारखान्यांतील कामांची माहितगार असतात. बाकी सर्व इसम यंत्राजवळ उभे राहून त्यांत माल सारणारे साधे मजूर असतात, आणि सर्व कामें यंत्रांनीं होत असतात. शिवाय हल्लीं प्रत्येक धंद्यांत कार्यविभागणी फार झालेली असून प्रत्येक शाखेचा कारखाना स्वतंत्र असतो; त्यामुळें सर्व शाखांचें ज्ञान उमेदवाराला एका ठिकाणीं राहून मिळणें शक्य नसतें.
याप्रमाणें सर्व शाखांची माहिती मिळविण्याकरितां अनेक मालकांच्या कारखान्यांत राहणें जरूर असल्यामुळें पूर्वींची उमेदवारीपद्धति निरुपयोगी झाली आहे. शिवाय सर्व शाखांचें ज्ञान असलेला तज्ज्ञ कारागीर शिक्षक लाभणें दुरापास्त आहे. कारखान्याचा मालक स्वतः फक्त देखरेखीचें व सामान्य व्यवस्थेचें काम करीत असतो. धंद्यांतील प्रत्यक्ष कसब त्याच्या अंगीं मुळींच नसतें, कारखान्यातले कामकरी स्तःचें ज्ञान उमेदवाराला शिकविण्यास तयार नसतात. कारण त्याबद्दल त्यांनां स्वतंत्र वेतन मालकाकडून मिळत नसतें, म्हणून कोणत्याहि कारखान्यांत कोणी नवीन शिकाऊ इसम शिरल्यास त्याला केवळ दुसर्यांचें चाललेलें काम पाहून जें ज्ञान मिळेल तेवढ्यावर भागवावें लागतें, शिवाय कारखान्यांत शिरणारीं मुलें केवळ शिकण्याकरितां दोनदोन चारचार वर्षें मोडण्यास तयार नसतात. त्यांना लवकर पैसा हातीं येण्याची उत्सुकता असते. त्यामुळें कोणत्याहि एखाद्या यंत्रावर काम करतां येऊं लागतांच प्रत्येक इसम कारखान्यांत पगारी नोकर बनतो व धंद्याच्या सर्व अंगांची माहिती मिळविण्याची फिकीर करीत नाहीं. कारखानदार मालकालाहि हीच गोष्ट हितावह असते कारण यंत्रांतून पुष्कळसा माल भराभर तयार करून काढण्याकडेच त्याचें सर्व लक्ष असतें. उमेदवार इसमांनां चांगलें शिक्षण देऊन तयार करण्यांत धोका असा वाटतो कीं शिकलेले कुशल इसम मूळ मालकाची नोकरी सोडून इतर प्रतिस्पर्धीं कारखानादारांची नोकरी धरतील असा फार संभव असतो. वारंवार होणारे मजूरांचे संप, व धंद्यांत येणारी बूड यामुळें नोकरांनां वारंवार कारखाने बदलावे लागतात. त्यामुळें बरींच वर्षें उमेदवारी करून एखाद्या धंद्याचें संपूर्ण ज्ञान मिळविणें अशक्य असतें.
१९०४ मध्यें प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टावरून असें दिसतें कीं, युनैटेड स्टेट्समध्यें एकंदर धंद्यांपैकीं शें. १३४१ धंद्यांत उमेदवारीची पद्धति मुळींच अस्तित्वांत नव्हती, व उरलेल्या धंद्यांपैकीं शें. ३०.९ मध्यें मालकांवर या बाबतींत कोणतेहि निर्बंध घातलेले नव्हते. उमेदवारीचा काल दोन ते पांच वर्षांपर्यंत असून १६ ते १८ वर्षें वयाची मुलें उमेदवार घेण्यांत येत असतात.
फ्रान्समध्यें या बाबतींत १८५१ त १८९२ ह्या दोन सालीं झालेले कायदे हल्लीं अमलांत आहेत. उमेदवार किती घ्यावे याबद्दल कायद्यानें मर्यादा घातलेली नाहीं. परंतु उमेदवारांनां धंदेशिक्षण दिलें पाहिजे इतकेंच नव्हे, तर तो सोळा वर्षांवर असून निरक्षर असल्यास त्यास प्राथमिक शिक्षणहि दिलें पाहिजे, व चवदा व सोळा वर्षांच्या मुलांनां अनुक्रमें दहा व बारा तासापेक्षा अधिक काम सांगूं नये असा नियम आहे. फौजदारी गुन्हा केलेल्या मालकांनां मात्र मेयरच्या परवानगीशिवाय उमेदवार घेण्याची मनाई कायद्यानें केलेली आहे. स्वित्झर्लंडमध्यें साधारणतः अशाच प्रकारचे नियम असून शिवाय शिकून तयार झालेल्या उमेदवारांची परीक्षा घेणारें सार्वजनिक मंडळ (पब्लिक बोर्ड) असतें. जर्मनींत उमेदवारीसंबंधाचे करार लेखी व अगाऊ करावे लागतात व उमेदवारीची मुदत तीन वर्षांहून अधिक नसते. आस्ट्रियांत उमेदवारीची पद्धति निर्दोषपणानें चालू ठेवण्याचे प्रयत्न कायद्यानें चालू आहेत. बेल्जममध्यें मात्र या बाबतींत कांहींच कायदे अस्तित्वांत नाहींत.
तथापि एकंदरीनें व्यापारी संघामार्फत घातलेल्या उमेदवारांची संख्या मर्यादित करणारे निर्बंध पुष्कळ ठिकाणीं आहेत, व त्याविरुद्ध जनतेची ओरड चालू आहे. शिवाय अनेक धंद्यांत उमेदवारीची पद्धति अजीबात बंद पडूं लागली आहे तीहि पुन्हा चालू करण्यासंबंधानें सरकारमार्फत व सार्वजनीक रीत्या प्रयत्न चालू आहेत.
हिं दु स्था नां ती ल उ मे द वा री प द्ध त. – प्राचीनकाळीं उपनयन झाल्यावर गुरुगृहीं जीं मुलें रहात तीं गुरूकडून विद्या शिकून घेण्याकरितांच होय. वैद्य, गवयी, शिल्पकार इत्यादी धंदेवायीकांजवळहि शिष्य असत व ते पुढें गुरूचें नांव चालवीत. धंद्यांवरून जाती पडल्यामुळें बहुधां उमेदवार आपल्या जातीला योग्य तोच धंदा शिकत. व तो धंदा वंशपरंपरेनें घरींच चालत असल्यानें तिर्हाइताकडे उमेदवार राहण्याची जरूर पडत नसे. यामुळें धंदेवाईक उमेदवारांचें अस्तित्व स्पष्टपणें इकडे नजरेस येत नाहीं.
मराठेशाहींत शागीर्दपद्धति होती. कारकुनी शिकून सरकारी नोकरींत शिरण्यासाठीं, त्याप्रमाणेंच पंडितांजवळ किंवा वैद्यांजवळ संस्कृत पांडित्य किंवा वैद्यकीचा धंदा शिकण्यासाठीं शागीर्द असत ते गुरूची परिचर्या करीत. त्यामुळें स्वयंपाकाखेरीज इतर नोकरी करणार्या ब्राह्मणांस शागीर्द म्हणण्याचा प्रघात पडला. मेस्तकासारख्या पुस्तकांत शागीर्दानें काय करावें अशा प्रकारचे उल्लेख आहेत. दक्षिणेकडे माध्वब्राह्मण महाराष्ट्रीय अधिकार्यांकडे शागीर्दपणा करीत. तेथेंच ते मराठी शिकत आणि त्यामुळें मोडी शिकल्यानंतर तेथील दप्तर मराठींतच असल्यामुळें त्यांचा कारकुनींत प्रवेश होई. जे आज शागीर्द ते कांहीं दिवसांनीं जांवई होत. या प्रकारच्या परिस्थितीमुळें दक्षिणेकडे कानडी व तेलंगी माध्व मंडळी महाराष्ट्रीय ब्राह्मणांतील माध्व घराण्याशीं संबद्ध झाली आणि त्यांच्यामध्यें महाराष्ट्रीयत्वाचा अभिमान उत्पन्न झालेला दिसून येतो.
इंग्रजी अंमलापासून देशांत नवीन पद्धतीचे कारखाने सुरू झाले व धंदेशिक्षण घेण्याची लोकांनां आवश्यकता भासूं लागली. तथापि रेल्वेकंपन्यांखेरीज इतरत्र उमेदवारांना थारा नसे. त्यामुळें मोठमोठे धंदे चालविण्याची कुवत सुशिक्षितांतहि नव्हती व अद्याप नाहीं. हल्लीं सरकारच्या कानींकपाळीं ओरडून कांहीं धंद्यांतून उमेदवारांची सोय लावण्यांत आली आहे. १९२१ सालीं मुंबई सरकारनें धंदेशिक्षणासंबंधीं विचार करण्याकरितां सर विश्वेश्वर अय्याच्या अध्यक्षतेखालीं एक कमिटी नेमली होती. तिनें केलेल्या रिपोर्टांत उमेदवारांची सद्यःस्थिति त्यांच्या उन्नतीची दिशा दाखवून दिली असून ती चिंतनीय आहे. निरनिराळे धंदे व कला शिकण्याकरितां परदेशांत हिंदी उमेदवार गेले पाहिजेत याची जाणीव लोकांना होऊं लागली आहे. १९२२ सालीं रा. समर्थ यांनीं असेंब्लीमध्यें, नौकाबंधन, नौकाशिल्प, समुद्रशास्त्र, बीनतारी संदेश, शस्त्रास्त्रें तयार करणें, खनिखोदन वगैरे देशाच्या हिताचे अनेक कला व धंदे, हिंदी व आंग्लो-इंडियन यांनीं शिकण्याकरितां मध्यवर्तीं तिजोरींतून दरवर्षीं निदान सहा लाख रुपये खर्चीं पडावेत असा ठराव पुढें आणिला व तो पासहि झाला. त्याची अंमलबजावणी सरकार कसें करितें तें पहाणें आहे. सरकारपूर्वीं हिंदी कारखानदारांनीं या बाबतींत मन घालून उमेदवारांनां चांगलें उत्तेजन देणे हें त्यांचें कर्तव्य आहे.