विभाग नववा : ई-अंशुमान
उमेरिया – मध्य हिंदुस्थान. रेवा संस्थानांतील एक शहर व कोळशाच्या खाणींचें केंद्रस्थान, बंगाल नागपूर रेल्वेच्या कटनी-बिलासपूर फाट्यावर आहे. सन १९०१ सालीं लोकसंख्या ५३८१ होती. सन १८८१ सालापासून म्हणजे कोळशाच्या खाणी सुरू झाल्यानंतर उमेरिया येथें वस्ती होऊं लागली. गोंडवणाच्या बाराकर भागांत सदरहु खाणी लागलेल्या आहेत. सन १८८१ पासून १८८५ पर्यंत संस्थानच्या व्यवस्थेंत खाणींचें काम चाललें होतें. नंतर खाणीची व्यवस्था हिंदुस्थान सरकारनें आपल्याकडे घेतली. १९०० सालीं दरबारनें खाणी पुन्हां आपल्या वहिवाटीखालीं आणल्या.