विभाग नववा : ई-अंशुमान
उर – हें प्राचीन बाबिलोनी शहरांपैकीं एक प्रसिद्ध शहर होतें. सांप्रत ह्या ठिकाणीं मुधैर अथवा मुकेयरचें टेंकाड आहे. हें बॉबिलोनच्या आग्नेयीस १४० मैलांवर, उत्तर अक्षांश ३०० ९५’ व ४६० ५’ पूर्व रेखांश यांवर होतें. एननारचें प्रसिद्ध मंदीर येथें होतें व या ठिकाणीं ननार (नंतरची सिन) या चंद्रदेवतेची पूजा होत असे. खाल्डियन लोकांच्या अमलाखालील उर हें अब्राहामचें मूळ गांव होतें असा बायबलांत उल्लेख आहे. उर हें प्राचीन काळीं राजकीय व व्यापारी दृष्टीनें फार महत्त्वाचें होतें. सुमेरियन काळांत ( इ. स. पूर्वी ३ हजार) उर हें बाबिलोनियांत प्रमुख होतें. लवकरच सेमेटिक वर्चस्व व सत्ता सुरू झाली. सारगानच्या वंशजांनंतर राजा उरगुर अथवा उर-एनगर याच्या अमलाखालीं उर शहर फार पुढें आलें. त्या वेळीं याची सत्ता दक्षिण व उत्तर बाबिलोनियांवर होती. उरचें प्रामुख्य एलामाईट स्वारीपर्यंत होतें. खामूरबीनें बाबिलोनियन साम्राज्याची स्थापना केल्यामुळें (इ. स. पूर्वीं २७४०) उरचें राजकीय स्वातंत्र्य व महत्त्व कमी झालें. पुढें बाबिलोनी काळाच्या शेवटपर्यंत उर हें धार्मिक व वाङ्मयात्मक बाबतींत प्रसिद्ध होतें. एननार देवालयाचे अवशेष वायव्य भागांत सांपडतात. याशिवाय बरेच शिलालेख व कांहीं इमारतींचे अवशेष सांपडले आहेत.