विभाग नववा : ई-अंशुमान

उरिया, उडिया – ओरिसांतील आर्य भाषा, अंदमान, निकोबार बेटें, आसाम, बंगाल, बिहार व ओरिसा, ब्रह्मदेश, वर्‍हाड व मध्यप्रांत, मद्रास, हैदराबाद व म्हैसूर संस्थानें या भागांत उडिया भाषा बोलणारे लोक आहेत. उडिया बोलणारांची एकंदर संख्या (१९११) १०१६२३२१ असून बिहार, ओरिसा व मद्रास या प्रांतांतून ती फार दिसते.  

या भाषेंतला पहिला लेख इ. स. १६ व्या शतकांतला आहे. उरिया लिपी बोजड व चमत्कारिक असल्यानें, ही भाषा वाढावीं तशी वाढत नाहीं. ही लिपि मूळांत देवनागरीप्रमाणेंच आहे पण स्थानिक लेखक ती ताडपत्रावर लिहितात. ताडपत्रावर खिळ्यासारख्या लेखणीचे उठलेले ओरखाडे स्पष्ट वाचतां येतात. पण ते अधिक स्पष्ट दिसण्याकरितां पानाला शाई फांसण्यांत येते. ताडाचें पान अतिशय लवकर फाटणारें असल्यानें त्यांतील रेषांना समांतर असे ओरखाडे ओढले तर पान फाटतें. त्यामुळें देवनागरींतल्याप्रमाणें डोक्यावरच्या रेषा अक्षरांनां काढतां येत नाहींत व उभें लिहावें तर पान अरुंद असतें. म्हणून उरिया लेखक प्रत्येक अक्षराभोंवतीं वाटोळ्या रेघा काढतो. छापील उडिया पुस्तक वाचणें म्हणजे डोळेफोड होय. कारण टाईप बारीक असून प्रत्येक अक्षराचा स्थूल आकार वाटोळा असतो. त्यामुळें वर्तुळमध्यांत असलेलीं बारीक अक्षरें पहाण्यास फार त्रास पडतो. उडिया पुस्तक उघडतांच पहिल्यानें आपणांस सर्वच वर्तुळें दिसतील; पण पुन्हां एकदां बारीक दृष्टि फिरविल्यास प्रत्येक वर्तुळांत कांहीं तरी अक्षर आहे असें दिसेल.

उडिया व्याकरणपद्धति कांहींशीं बंगालीसारखी असल्यानें ती बंगालीची एक पोटभाषा आहे असें कलकत्त्याचे पंडित म्हणत आले आहेत, पण तें चुकीचें होय. बंगाली व उडिया या भाषा सारख्या आहेत हें खरें पण एक दुसरीपासून निघालेली नसून दोन्ही प्राचीन मागध अपभ्रंशापासून निघालेल्या आहेत. उडिया व बंगाली यांचा संबंध ग्रीयर्सननें चांगला दाखविला आहे (सेन्सन ऑफ इंडिया, १९०१ पु. १. भा. १). भट्री पोटभाषा उडिया व मराठी यांमधली असून ती मराठी लिपींत लिहिली जाते.

प्रथम तेलंगी राजे, नंतर मराठी राजे (भोंसले) यांचें वर्चस्व पूर्वी ओरिसांत असल्याने उडिया भाषेंत बरेच तेलगु व मराठी शब्द आणि म्हणी आलेल्या आहेत. यांखेरीज तींत कोणत्याहि भाषेचें फारसें मिश्रण होत नाहीं. या भाषेंतलें वाङ्‌मय बरेंच मोठें असून, तें बहुतेक धार्मिक व पद्यमय आहे.

सुमारें शंभर प्रसिद्ध ग्रंथकारांच्या कृती या भाषेंत आहेत. त्यांपैकीं कांहींचीं नांवें व त्यांचे ग्रंथ पुढें अनुक्रमानें दिले आहेत. अच्च्युतानंद दास याचे अच्च्युतानंद मालिका व सप्त भागवत हे दोन ग्रंथ आहेत. अभिमन्यु सामंतसिंह याचे विदग्ध चिंतामणि, प्रीति-चिंतामणि असे राधाकृष्णांच्या लीलावर्णनपर ग्रंथ आहेत. गुमसारचा राजा उपेंद्रभंग यानें चंद्ररेखा, चित्रलेखा, हेममंजरी, कामकला, मनोरमा, प्रेमलता वगैरे अद्‍भुतरसयुक्त, अभिनवरसतरंग, सुभद्रापरिणय वगैरे पौराणिक कथानकांवर रचलेले व चित्रकाव्य बंधदाय, रसपंचक, षड्ॠतु (कालिदासाच्या ॠतुसंहाराचें रूपांतर ) संगीतकौमुदी, पुरुषोत्तम माहात्म्य वगैरे अनेक भिन्न भिन्न विषयांवर सुमारें ४२ ग्रंथ केले आहेत. कृष्णमिश्राचा साहित्यरत्‍नाकर अलंकारटीका नांवाचा ग्रंथ व कांहीं संस्कृत ग्रंथ आहेत. कृष्णसिंह यानें भारत, रामायण व भागवत यांचीं भाषांतरें केलीं आहेत. गोपिनाथ कविभूषण याचे रामचंद्रविहार या नांवाचा रामवनवास वर्णनात्मक व कविचिंतामणि नांवाचा छंदःशास्त्रावरील ग्रंथ हे प्रसिद्ध आहेत. चक्रदत्त याचा त्याच नांवाचा वैद्यशास्त्रावरील ग्रंथ प्रमाण मानला जातो तर जगन्नाथदास याचें भागवताचें भाषांतर विशेष लोकप्रिय आहे. याचाच पाषंड दलन नांवाचा एक ग्रंथ आहे. त्रिपुरारिदास यानें रामकृष्ण केलिकल्लोल, राधाकृष्ण केलिकल्लोल व केरलगीता नामक ज्योतिषग्रंथ केले आहेत. दीनकृष्णदास उर्फ सिंधु हा इतका लोकप्रिय ग्रंथकार होता कीं त्यास प्रत्यक्ष जगन्नाथाचा पुत्र असें मानीत. यानें कृष्णदासावलि, माधवकरगीता असे वैद्यकविषयक, रसकल्लोल, चक्रधरविलास, मधुसुदनविलास, गुणसागर, उज्वल नीलमणिकारिका वगैरे राधाकृष्णांच्या क्रीडावर्णनपर, प्रतापसिंधु नांवाचा वसिष्ठरामचंद्रांच्या संवादपर असे बरेच ग्रंथ केले आहेत. धरणीधर यानें जयदेवाच्या गीतगोविंद काव्याचें भाषांतर केलें आहे. नारायण पुरोहित याचा वृत्तरत्‍नाकर, नीलांबर भंज याचें कृष्णलीलामृत व पंचसायक, पद्मनाभपरीक्ष याचा गीतताल प्रबंध नांवाचा संगीतविषयक, असे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. पीतांबरमिश्र कविचंदन यानें नारायणशतकटीका, जातकालंकार टीका, पीतांबरी चंडी वगैरे टीकाग्रंथ केले आहेत. बलभद्र भंज हाहि गुमसरचा राजा असून प्रसिद्ध कवि होता. बलरामदास यानें वेधापरिक्रम ( जगन्नाथाच्या प्रदक्षिणेचें विस्तृत वर्णन), अर्जुनगीता, भवसमुद्र, भगवद्‍गीता, भक्तिरसामृतसिंधु, गौरवगीता, गुप्तगीता, गीतासार, रामायणाचें भाषांतर वगैरे अनेक ग्रंथ केले आहेत. महादेवदास यानें पद्‍मपुराण, मार्कंडेयपुराण, माघमहात्म्य, रामायण वगैरे संस्कृत ग्रंथांचीं भाषांतरें केलीं आहेत. लोकनाथ विद्याधर यानें चित्रकला, सर्वांगसुंदरी, चित्तोत्पल वगैरे प्रेमविषयकच ग्रंथ रचले आहेत. वसुदेवशर्मा यानें साहित्यदर्पणटीका, प्रभास्मृति या नांवाचे ग्रंथ केले आहेत. विश्वनाथदास कवि उर्फ पुरुषोत्तम विश्वनाथ यानें केलेल्या विचित्र रामायणांतील उतारे लोकांनां मुखोद्गत असतात, व रामायणांतील कांहीं प्रसंग नाटकरूपानें दाखविण्याच्या वेळी ते म्हणूनहि दाखवितात. श्रीपतिदास नांवाच्या ब्राह्मण कवीनें आपल्या नांवाचा ज्योतिषविषयक ग्रंथ केला असून तो मान्य गणला जातो. सदानंद   सूर्यब्रह्म नांवाच्या ग्रंथकाराचे विस्तार नीलमणी, नामाचिंतामणि, प्रेमतरंगिणी, प्रेमलहरी, जुगलरसामृतलहरी, वगैरे भक्तिरसपर ग्रंथ आहेत. सरलदास कवीनें महाभारताचें भाषांतर उरिया भाषेंत केलें आहे. हलधरदास याचें अध्यात्मरामायणाचें भाषांतर असून तें विचित्ररामायणाची बरोबरी करणारें आहे.

या खेरीज ज्यांचे कर्ते निश्चित माहीत नाहींत असे अनेक महत्त्वाचे ग्रंथ या भाषेंत आहेत. त्यांपैकीं कांहींचीं नांवें पुढीलप्रमाणें:- अर्थकेलि, अश्वत्थक्षेत्रमाहात्म्य, वसंतकेलि, भक्तिरसामृतसिंधु, ब्रह्मज्ञान, चैतन्यचरितामृत ज्ञानचंद्र चूडामणि व इतिहासलेखन (अध्यात्मिक), शिवपुराण, शिवलीलामृत. इ.