प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें

काश्मीर संस्थान- काश्मीर हें हिंदुस्थानांतील एक पहिल्या प्रतीचें संस्थान असून तें हिमालय पर्वताच्या पश्चिम भागांत वसलेलें आहे. याच्या उत्तरेस चीनच्या ताब्यांतील तुर्कस्तानचा भाग व कारकोरान पर्वत असून दक्षिणेस पंजाबचा प्रदेश आहे. पूर्वेस तिबेटचें संस्थान असून पश्चिमेस ‘सरहद्दीवरील प्रांत’ आहेत. चिनाब, झेलम व सिंधु या नद्यांच्या खोर्‍यांत हें संस्थान वसलेलें आहे असें ठोकळ रीतीनें म्हणतां येईल.

काश्मीर संस्थानचा बहुतेक भाग डोंगराळ आहे. हिमालय पर्वताचें पश्चिम टोंक, शिवालिकपर्वताच्या रांगा, पंजाल पर्वत, ननकन, कजनग, हरमुख, नंगा, कारकोरान, इत्यादि अनेक लहान मोठे पर्वत या प्रदेशांत आहेत. सपाट मैदान फारच थोडें आढळून येतें. काश्मीर संस्थानचा आकार साधारण चौकोनी असून त्याचे जम्मू, काश्मीर, लहान तिबेट व गिलजीत हे मुख्य चार प्रांत आहेत. काश्मीर संस्थान हें अनेक मजली घरासारखें आहे असें पुष्कळ लेखकांनीं म्हटलें आहे तें अगदीं खरें आहे. दुसर्‍या तर्‍हेनें हें संस्थान म्हणजे चिनाब, झेलम व सिंधु या नद्यांच्या एकावर एक उंच असणार्‍या दर्‍यांनीं बनलेलें आहे असें म्हणतां येईल. कारण संस्थानच्या खालच्या पायरीमधून चिनाब नदी गेली आहे. दुसर्‍या पायरीमधून झेलम (वितस्ता) नदी व तिसर्‍या पायरीमधून सिंधु नदी गेली आहे. या तीनहि नद्या संस्थानच्या पूर्वभागांतील दक्षिणेकडच्या हिमालयाच्या प्रचंड पर्वतराजींमधून उगम पावून प्रथमत: उत्तरेकडे वहात जाऊन नंतर दक्षिणेकडे वहात जातात. व अशा रीतीनें पश्चिमभागाकडून खालीं उतरत येत पंजाबच्या सपाट प्रदेशांत वहात येतात. अनेक मजली घराची उपमा घेतल्यास असें म्हणतां येईल कीं, जम्मू हा पहिल्या मजल्याच्या घराचा दरवाजा आहे. त्यांतील कांहीं भाग सपाटींवर बसलेला आहे. त्यानंतर दुसर्‍या मजल्यावर जाण्याकरितां ८,००० फूट उंचीची हिमालयपर्वताची पहिली रांग ओलांडावी लागते. हा प्रदेश समशीतोष्ण असून ओक, देवदारू इत्यादि वृक्षांचीं बनेंच्या बनें आहेत. या टप्प्यांत भदरवाह किस्तवार हे प्रांत आहेत. तिसर्‍या मजल्यावर जाण्याकरतां, हिमालयाची पीरपंजाल नांवाची शाखा ओलांडावी लागते. या ठिकाणींच काश्मीरची सुंदर दरी आहे. या दरीलाच कोणी ‘नंदनवन’ म्हणतात. या दरीच्या चारी बाजूंनां शुभ्र मोत्यासारख्या बर्फानें आच्छादिलेल्या पर्वतांची शिखरें आहेत व अशा मुक्ताहारांता काश्मीरची दरी म्हणजे पाचूप्रमाणें शोभते. त्याच्याहिवर चौथ्या मजल्यावर जाण्याकरितां १४।१५ हजार फूट उंच पर्वताची ओळ ओलांडावी लागते. ही ओळ ओलांडून गेल्यावर उत्तरेस अस्तर व बाल्तिस्तानचा प्रांत व पूर्वेस लडखचा प्रांत लागतो. वायव्येस गिलजित प्रांत असून त्याच्या आसपास हिंदुकूशपर्वताच्या रांगा पसरल्या आहेत. त्यानंतर सर्वांत वरचा मजला चढून जावयास बरीच चढ चढून जावें लागतें. त्यानंतर सर्व जगांत उंच असलेले २८००० फूट उंचीचे काराकोरान पर्वत लागतात.

काश्मीर संस्थानची भौगोलिक दृष्ट्या सविस्तर रीतीनें माहिती देणें अत्यंत अवघड आहे. कित्येक भाग असे आहेत कीं, त्या ठिकाणी जाणेंहि अवघड आहे; व खुद्द काश्मीर सरकारनेंहि अद्यापि अशा प्रदेशांचें पूर्ण संशोधन केलें नाहीं. काश्मीर हा डोंगराळ प्रदेश असल्याकारणानें तेथें अनेक पर्वत असून कित्येक पर्वतांचीं शिखरें फारच उंच आहेत. उत्तरेस पर्वतांची माळच्या माळ पसरली असून सर्वांत नंगीं पर्वत हा एखाद्या भल्या धिप्पाड राक्षसाप्रमाणें उभा राहिला आहे. या पर्वताची उंची २६६५६ फूट आहे. जगांतील पर्वतांमध्ये याचा चौथा नंबर लागतो. पूर्वेस हरमुख नांवाचा पर्वत असून त्याची उंची १६९०३ फूट आहे. दक्षिणेस महादेव, ग्वाश बारी ( १७८०० फूट ) व अमरनाथ ( १७३२१ ) हे पर्वत आहेत. काश्मीर संस्थानांतील सर्वांत उंच असें पर्वतशिखर म्हटलें म्हणजे गॉडविन ऑस्टेन हें होय. या शिखराची उंची २८२६५ फूट असून याचा जगांतील पर्वतांत दुसरा नंबर लागतो.

न द्या व स रो व रें.- नद्या व सरोवरें यांची काश्मीरमध्यें समृद्धि आहे. किंबहुना, काश्मीर हें निरनिराळ्या लहान मोठ्या नद्यांचे व सरोवराचें जाळेंच आहे असें म्हटलें असतां वावगें होणार नाहीं. सर्व नद्यांची नांवें सांगणें देखील अशक्य होईल. सर्वांत महत्त्वाच्या नद्या म्हणजे, चिनाब, रावी, झेलम व सिंधु या होत. रावीनदी काश्मीरच्या आग्नेयभागाला चिकटून वहात गेली आहे. चिनाब ही किस्तवार परगण्यांतून वहात जाऊन वळणें घेत, रामबन, उधमपूर, रैसी इत्यादि परगण्यांतून पंजाबमध्यें गेली आहे. झेलम नदी व्हरनागजवळ उगम पावून काश्मीर दरीमधून वहात गेली आहे. व सिंधु ही लडख व गिलजित प्रांतांमधून शेंकडों मैल वहात जाऊन नंतर पंजाबमध्यें गेली आहे. याशिवाय, नुब्रा, शियाक, झंस्कर, सुरू, द्रस, गिलजीत, कृष्णगंगा, सिंध, लिद्दर, पंच, तवी, उझ इत्यादि किरकोळ नद्या आहेत.

नद्यांप्रमाणेंच सरोवरांनांहि काश्मीरमध्यें तोटा नाहीं. हीं सरोवरें निरनिराळ्या आकाराचीं व प्रकाराचीं आहेत. त्यांपैकीं सर्वांत मोठीं सरोवरें म्हणजे दल व उलर हीं होत. याशिवाय मंसबल, अंचर, शिवसंगर, कंसनाग, पथ्री, शतपूर इत्यादि छोटीं सरोवरें आहेत. लडखच्या पूर्वेस, पंगकाँग, पंगूर, सोमोरिरी, हीं मोठालीं खार्‍या पाण्याचीं सरोवरें आहेत. व्हरनाग, कोकारनाग, अचबल इत्यादि झरे प्रसिद्ध आहेत. अनंतनाथ हें स्थान तर तेथें असलेल्या अगणित झर्‍यांबद्दल विख्यात आहे. कोकारनाग व चष्मशाही हे झरे उत्कृष्ट पाण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. मलिकनाग नांवाचा झरा गंधकयुक्त पाण्याचा असून त्याचें पाणी बागांनां फार मानवतें.

व न स्प ती.- काश्मीरमध्यें पुष्कळ दर्‍या व विपुल पाणी असल्यामुळें त्या ठिकाणी  हरर्‍हेचीं झाडेंझुडपें आहेत निरनिराळे रंग ज्यांपासून तयार करतां येतील अशा वनस्पती, पुष्कळ आहेत. अस्टर तहसिलीमध्यें हिंगाचीं झाडें मुबलक आहेत. भृर्जवृक्षांच्या राया पसरलेल्या आहेत. भांग वनस्पतीचीहि समृद्धि आहे. सुगंधी वनस्पतींचीहि येथें पैदास होते. निरनिराळ्या प्रकारचीं फळें काश्मीरमध्यें विपुल सांपडतात. देवदारू, अक्रोड, तुती इत्यादि झाडांचीं जंगलेंच्या जंगलें आहेत. निरनिराळीं मनोहर कमळेंहि या ठिकाणी उगवतात.

प क्षी व प्रा णी.- काश्मीरच्या डोंगराळ प्रदेशात निरनिराळ्या प्रकारचे प्राणी आढळून येतात. हंगळ नांवाचे काळवीट, काळीं अस्वलें, कस्तुरीमृग, इत्यादि प्राणी या ठिकाणीं पुष्कळ आढळतात. त्याचप्रमाणें, पांढर्‍या कोंबड्या, कृकण पक्षी, काळे तित्तिरपक्षी, लावीपक्षी, बदकें, कोकिळा, राघू, कावळे इत्यादि अनेक प्रकारचे पक्षी काश्मीरमध्यें सांपडतात. सर्पांच्या अनेक जाती येथें असून त्यांत गुण व पेहर या जातीचे सर्प विषारी आहेत.

भू स्त र:- वायव्य व आग्नेय भागांत पर्वतांच्या रांगांनां समांतर असे पाषाणांचे थरच्या थर पसरले   आहेत. नैर्ऋत्य भागांत तृतीय युगांतील पाषाणथर उपलब्ध आहेत. झन्स्कर, धौलधर व परिपंजाल पर्वतांच्या रांगांत, वज्रतुंड, जंबूर इत्यादि दगड सांपडतात. बाल्तिस्तान व लडख  या प्रांतांतील पर्वतांच्या रांगांतहि वज्रतुंड दगड सांपडतात. सरपदरींत, खडूच्या दगडाचे थरच्याथर आहेत. श्रीनगरच्या दरींत फ्लीस्टोसीन युगांतील पाषाणांचे थर सांपडतात.

ह वा मा न व प र्ज न्य.- काश्मीरची दरी पीरपंजाल ओळींच्या योगाने संरक्षित असल्यानें, या दरीमध्यें पर्जन्य नियमित पडत नाहीं. बर्फ वितळल्यामुळें, उन्हाळ्यामध्यें या ठिकाणीं पर्जन्य पडतो. काश्मीर दरीच्या आसपासच्या पर्वतराजीमध्यें ऑक्टोबर ते मार्च महिन्यांत अतोनात बर्फ पडतें. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर अर्धा या महिन्यांत काश्मीरमध्यें बराच उन्हाळा असतो. विशेषत: श्रीनगरमध्यें तर उष्णमान ९५० इतकें असतें. जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांत कडक थंडी पडते.

नै स र्गि क सं क टें.- दुष्काळ, पूर, धरणीकंप, आगी इत्यादि नैसर्गिक संकटें काश्मीरला सोसावीं लागतात. जम्मू प्रांतांत दुष्काळाची बाधा वरचेवर होते;  पण त्याच्या उलट काश्मीरमध्यें पुरानें पिकांची खराबी फार होते. इ. स. १८९३ १९०३, १९०७, व १९०९ या सालीं मोठा पूर आल्यामुळें पिकें नासून गेलीं. १८९३ च्या पुरामुळें तर झेलमनदीवरील सात पूल वाहून गेले व त्यामुळें अतोनात नुकसान झालें. धरणीकंपहि मधून मधून असतातच. लडख प्रांतांत या धरणीकंपाची नेहमीं बाधा होते. तसेंच काश्मीरमध्येंहि या धरणीकंपाची भेट वरचेवर होते. इ. स. १९१० मध्यें काश्मीरला दोन वेळां धरणीकंपाचे धक्के बसले व १९१३ साली तर पांच धक्के बसले.

प्रे क्ष णी य स्थ ळें.- काश्मीरमध्यें प्रेक्षणीय स्थळें पुष्कळच आहेत. काश्मीरला हिंदुस्थानचें ‘नंदनवन’ असें जें नांव देण्यांत येतें तें अगदीं यथार्थ होय. सोनामार्ग, गुलमार्ग, यांसारखीं शीतल निवासस्थानें;  नंगापर्वत, हरमुख, शंकर, अमरनाथ वगैरेसारखीं पंधरा हजार फुटांवर असलेलीं हिमाच्छादित शिखरें; उलर, मानसबल, डाल यांसारखीं रमणीय सरोवरें; वनिहल, पीरपंजाल, झोझिला यांसारखे नयनरम्य घाट; सुखनाग, नीलनागासारखे मन शांत करणारे झरे, निसर्गरम्य वनराजि अशीं एक ना दोन, हजारों स्थळें काश्मीरमध्यें पहाण्यासारखीं आहेत व तीं सर्व पहाण्याला निदान सहा महिने तरी लागतील. सर्व काश्मीरच एकजात पहाण्यासारखें आहे. पण त्यांतल्या त्यांत काहीं प्रेक्षणीय स्थळें विशेष पाहण्यासारखीं असल्याकारणानें त्यांचा थोडक्यांत परिचय करून देणें अत्यंत जरूर आहे.

श्रीनगरमध्यें व त्याच्या आसपास अनेक बाग पहाण्यासारखे आहेत. त्यांपैकीं शालीमार, निषात व चष्मशाही ऊर्फ बादशाही बाग हे विशेष प्रसिद्ध आहेत. शालीमार बाग प्रचंड असून त्याची लांबी ५९० यार्ड व रुंदी २६० यार्ड आहे. याचे एकावर एक असे चार टप्पे आहेत. बागेच्या मधोमध प्रत्येक टप्प्यांत एकेक तलाव असून हे तलाव पाटानें जोडलेले आहेत. चवथ्या मजगीवर एक सुंदर ६५ फूट लांब व रुंद असा चबुतरा असून त्यावर दगडी मंडप उभारला आहे. याचे खांब काळ्या संगमरवरी दगडाचे असून त्यावर सुबक नक्षीकाम केलेलें आहे. या बागेसभोंवार पाण्याची पुष्करणी असून त्यांत १४० कारंजीं आहेत. ही बाग १६१९ सालीं जहांगीर बादशहानें बांधविली.

निषातबाग ही डाल तलावाच्या अगदीं नजीक असल्यामुळें, येथील देखावा फारच रमणीय आहे. या बागेला सात टप्पे असून या बागेची लांबी ५९५ यार्ड व रुंदी ३६० यार्ड आहे. ही बाग नूरजहानचा भाऊ असफशहा यानें बांधविली. चष्मशाही बागहि याच धर्तींची असून तीं-तील झर्‍यांतील पाण्यासारखें पाचक पाणी सर्व जगांत नाहीं असें म्हणतात.

श्रीनगरच्या उत्तरेस ११ मैलांवर हारवान नांवाचा एक तलाव आहे. या तलावाच्या तीन बाजूंनां प्रचंड पर्वत आहेत. या पर्वतांवरील बर्फाचें वितळलेलें पाणी या तलावांत सांठतें. येथील देखावा फारच सुंदर आहे. या ठिकाणीं अनेक प्रकारच्या गुलाबांच्या रांगाच्या रांगा असलेल्या दृष्टीस पडतात. श्रीनगरमध्यें जुम्मामशीद ही फार प्रेक्षणीय आहे. ही मशीद शिकंदर, लोदीनें १४०४ सालीं बांधलीं. ही मशीद तनिदां अग्नीच्या भक्ष्यस्थानीं पडलीं, पण ही मशीद पुन्हां दुरुस्त करण्यांत आली. ही सर्व मशीद लांकडी आहे. व त्यावरील नक्षीकाम फारच सुंदर केलेलें आहे. श्रीनगरच्या ईशान्येस शंकरपर्वत असून त्या पर्वतावर शंकराचें देऊळ आहे. हें देऊळ विशेष मोठें नसलें तरी त्याचें काम फार सुबक आहे. या देवळांत शंकराची पिंडी असून ती काळ्या दगडाची व कमरेइतकी उंच आहे. या ठिकाणचा देखावा फारच रमणीय आहे. हें देऊळ अशोकाचा पुत्र जलौक यानें ख्रिस्तपूर्व २७ सालीं बांधलें असें म्हणतात. शंकरपर्वताच्या बाजूनें दक्षिणेस उतरून बरेंच लांब चालून गेल्यावर पनरतन नांवाचें देवालय आहे. हें अति जुनें पुराणें देवालय असून, हें हिरवट- निळसर रंगाच्या दगडांनीं बांधलेलें आहे. देवळाच्या चारहि  बाजूंनां कमानीचे दरवाजे असून देवळावर जिकडे तिकडे घडीव मूर्ती आहेत. या मूर्तीकडे पाहिल्यावर त्या मूर्ती मोठ्या कौशल्याने घडविलेल्या आहेत हें चटकन ध्यानांत येतें. हें देऊळ पार्थ नांवाच्या काश्मीरच्या राजाच्या कारकीर्दींत त्याचा प्रधान मेरू यानें ९१३-९२१ च्या दरम्यान बांधलें असें म्हणतात. श्रीनगर येथील अजबखानहि पहाण्यासारखा आहे. या अजबखान्यांत जुनीं नाणीं, हत्यारें, जुन्या मूर्ती व शिल्पकलेचे नमुने पहावयाला मिळतात. काश्मीरसंस्थानांतील उत्कृष्ठ शालींचे नमुनें या ठिकाणीं दृष्टीस पडतात.

अवंतिपूर नांवाच्या गांवांत बराचशा जुन्यापुराण्या इमारती होत्या; पण त्या सर्व काळाच्या ओघांत, लुप्तप्राय झाल्या आहेत. अद्यापीहि अवंतीश्वर व अवंतिस्वामी या देवांचीं देवळें मोडक्यातोडक्या स्थितींत शिल्लक आहेत. हीं दोन्हीं देवळें हिरवट काळसर दगडांचीं असून देवळाच्या मुख्य दरवाजावर सुबक नक्षींचे काम केलेलें दृष्टीस पडतें. या देवळांवरून एक वेळ काश्मीर हें मूर्तिकलेच्या व शिल्पकलेच्या बाबतींत किती पुढें होतें हें दिसून येतें.

वितस्ता उर्फ झेलम नदीच्या उगमापाशीं व्हरनाग नांवाचा एक झरा आहे. या झर्‍याच्या आसपासचा प्रदेश फारच प्रेक्षणीय आहे. या ठिकाणीं जहांगीर बादशहानें एक सुंदर बाग बांधविली. या बागेंत अष्टकोनी पुष्करिणी असून या पुष्करिणींत एक झरा आणून सोडलेला आहे. या पुष्करिणीभोंवती अष्टकोनाकृति इमारत असून, त्या इमारतीवर दोन फारसी भाषेंतील शिलालेख आहेत.

या झेलमच्या दरींत एका लहानशा उंचवट्याच्या टेंकडीच्या पायथ्याशीं मार्तंड देवाचें भव्य देवालय आहे. या देवालयाचें प्रवेशद्वार प्रचंड असून, त्यावरील नक्षीचें काम अवर्णनीय आहे. सात आठ फूट उंचीचे एकसंधी दगड दरवाजाला लावलेले आहेत. प्रवेशद्वारांतून आंत गेल्यावर एक मोठें चौकोनी पटांगण असून त्याच्या मध्यभागीं सूर्य देवतेचें देऊळ आहे. या पटांगणासभोंवती कमानदार दरवाजाच्या ओळी बांधल्या आहेत. देवळाच्या बाहेरच्या चौकाला दर्शनीखांब व कमानी यांची रांगच्या रांग आहे. हें देऊळ ललितादित्य नांवाच्या राजानें बांधलें असें म्हणतात. वास्तुकलेचा व मूर्तिकलेचा एक उत्कृष्ट मासला म्हणून हें देवालय प्रसिद्ध आहे व या शास्त्रांतील तज्ज्ञ गृहस्थांनीं या देवालयाची फारच तारीफ केली आहे.

झेलम नदीला सात पूल असून ते दृष्टिपथांत घालण्यासारखे आहेत. यांपैकी तिसर्‍या व चौथ्या पुलांच्या दरम्यान शहामहादन नांवाची लांकडी प्रचंड इमारत आहे. ही ज्या साधूनें काश्मीरमध्यें मुसलमानी धर्माचा प्रसार केला त्या साधूच्या स्मरणार्थ बांधलेली आहे. याच्या समोरच नूरजहाननें बांधलेली मोठी दगडी मशीद आहे. चवथ्या पुलाच्या खालीं महाश्री नांवाचें पांचमजली देवालय आहे. सहाव्या पुलाच्या नजीक स्कंदभवन नांवाचें जीर्ण देवालय आहे. सातव्या पुलाच्या खालीं दूधगंगा व झेलम नदीचा संगम असून त्याठिकाणीं क्षेमगौरीश्वर नांवाचें एक देवालय आहे.

यांशिवाय, अनंतनाग, अच्छाबल, चिनारबाग इत्यादि कित्येक स्थळें व कितीतरी रम्य देखावे काश्मीरमध्यें पहाण्यास सांपडतात. सृष्टिदेवतेनें आपलें सर्व कौशल्य खर्च करून काश्मीर देश निर्माण केला आहे कीं काय असें मनाला वाटल्यावांचून रहात नाहीं. व मोठमोठ्या धिप्पाड व अजस्त्र पर्वतांचीं बर्फानें श्वेत बनलेलीं शिखरें, प्रचंड दर्‍या, भयंकर घाट वगैरेचें अवलोकन केलें असतां, परमेश्वरी कर्तृत्वाची अंधुक कल्पना कां होईना, मनाला पटल्यावांचून रहात नाहीं.

का श्मी र म धी ल लो क.- काश्मीर संस्थानचें क्षेत्रफळ ८४,४३२ चौरस मैल आहे. हिंदुस्थानांतील इतर कोणत्याहि संस्थानापेक्षां काश्मीरचें क्षेत्रफळ अधिक आहे. १९११ सालीं केलेल्या खानेसुमारींत काश्मीर संस्थानची लोकसंख्या ३१,५८,१२६ इतकी भरली. त्यापैकीं १६,७४,३६७ पुरुष व १४,८३,७५९ स्त्रिया होत्या. १९०१ च्या लोकसंख्येच्या मानानें १९११ मधील लोकसंख्या जवळजवळ शेंकडा ९ या प्रमाणांत वाढली. प्रांतवार खानेसुमारी पुढीलप्रमाणें आहे. जम्मू प्रांत १५,९७,८६५; काश्मीर प्रांत १२,९५,२०१; सरहद्दीवरील प्रांत २,६५,०६०. जिल्हेवार खानेसुमारींत दक्षिणकाश्मीरचा नंबर पहिला लागतो. त्याची लोकसंख्या ६,३९,२१० असून, उत्तर काश्मीर ४,६०,७८६, जम्मू ३,२६,६९१ मिरपूर ३,२४,९३३ गिलजित २३,९५९ अशी आहे. सर्व तहशिलींत उत्तर मच्छिपुर तहशीलीची लोकसंख्या मोठी आहे ( २,००,६०९ ). काश्मीर संस्थानांत मोठीं शहरें अशीं दोनच आहेत. एक श्रीनगर ( लो.सं.१२४२४० ) व दुसरें जम्मू ( लो.सं. ३१७२६ ). बाकी शहरें लहान लहान आहेत. अशा लहान शहरांची संख्या ५९ आहे. त्यापैकीं सात शहरें ५००० वर वस्तीचीं आहेत; वीस शहरें २-५ हजार लोकसंख्येचीं आहेत. तीस ५०० ते १००० इतक्या लोकसंख्येचीं आहेत. काश्मीर हा कृषिप्रधान देश असल्याकारणानें त्यामध्यें खेड्यांची संख्या फार आहे. १९११ च्या खानेसुमारींत काश्मीरमध्यें ८८६५ इतकीं खेडीं होतीं. काश्मीरचा प्रदेश डोंगराळ असल्यानें सपाट व शेतीला उपयोगी अशी जमीन एकसारखी आढळून येत नाहीं. त्यामुळें ज्या ज्या ठिकाणीं शेतीला उपयुक्त अशी जमीन असेल त्या त्या ठिकाणीं चार पांच खोपट्या अशा तर्‍हेनें या खेडेगांवाची स्थिति असते.

काश्मीरमधून बाहेर वस्ती करण्यास जाणार्‍या लोकांची संख्या फार आहे. जुलमी राजांच्या जुलुमाला कंटाळून, काश्मीरमध्यें जन्मलेले कित्येक लोक बाहेर जात असत. पण शांतता प्रस्थापित झाल्यापासून हा ओघ थांबत चालला आहे. बाहेर गेलेले लोक परत येत चालले आहेत. तरी पण अद्यापिहि बाहेर जाणारे लोक बरेच आहेत. १९०१ सालीं काश्मीरमधून ८६,१५७ लोक बाहेर गेले तर १९११ सालीं ८१,९४८ लोक बाहेर गेले. १९०१ सालीं ८५,५९७ लोक काश्मीरमध्यें रहाण्यास आले तर १९११ सालीं ७६,२७५ लोक आले.

ध र्म जा ती व पं थ.- काश्मीर संस्थानांत मुख्यत: हिंदु, बौद्ध, इस्लाम हे धर्म प्रचलित आहेत. फारशी व ख्रिश्चन या धर्मांचे विशेष विचारात घेण्याजोगें प्रबल्य नाहीं. या तीन धर्मांच्या दृष्टीनें काश्मीरांतील लोकसंख्येचें वर्गीकरण केलें असतां असें आढळून येतें की हिंदु ( शीख धरून ) ७,२१,९४३; मुसुलमान २३,९८,३२०, बौद्ध ३६,५१२ अशी लोकसंख्येची वर्गवारी होती. त्याशिवाय जैन लोकांची संख्या ३४५, पारशी ३१, ख्रिस्ती ९७५ अशी होती. हिंदुधर्मातील पोटभेद, ब्राह्मणी, आर्य, शीख असे पाडले असतां, ब्राह्मण धर्मीयांची संख्या ६,८९,३४२, आर्यांची १०४७ व शीखांची ३१५५३ इतकी होती. ब्रह्मोपंथाचा एकच माणूस आढळून आला. अशा रीतीनें काश्मीरमध्यें शेंकडा ७६ मुसुलमान, व २२ हिंदु हें प्रमाण पडतें.

जाती.- जातीसंबंधानें समग्र विवेचन करतां येणें शक्य नाहीं. तरी पण हिंदूमध्यें जातिभेदांचें अतिशय महत्त्व असल्याकारणानें त्यासंबंधानें थोडें विवेचन करणें जरूर आहे. काश्मीर संस्थानचे जम्मू, काश्मीर, व सरहद्दीवरील प्रांत असे तीन भाग पडतात; व त्या प्रांतांस अनुसरून जातीचें विवेचन केल्यास सोईचें होईल. यासाठीं तशा रीतीनें विवेचन करीत आहे.

जम्मू- जम्मू प्रांताचे दुगर, चिभल, पूर्व पर्वतप्रदेश व पश्चिम पर्वतप्रदेश असे चार पोटभेद आहेत. जम्मू प्रांतामध्यें जे हिंदू आहेत त्यांमध्यें, मुख्यत: ब्राह्मण, रजपूत, खत्री व ठक्कर अशा चार जाती आहेत. या जातींच्या उपजाती पुष्कळच आहेत. डोम, गुजर, जाट, डोग्रा इत्यादि प्रमुख पोटजाती आहेत. चिभल इलाख्यांत चिभ नांवाची एक रजपुतांची पोटजात आहे. ही जातच्या जात बाटून मुसलमान झालेली आहे. तरी पण तिच्यामागें अद्यापिहि जातिभेदाचें बरेंच प्रस्थ आढळून येतें. विवाहविषयक निर्बंध यांच्यामध्यें पुष्कळच आढळून येतात. पूर्व टेंकडीवरील मुलुखांत ब्राह्मणधर्माचा व्हावा तितका प्रसार न झाल्यानें तेथील लोकांनां धर्मर्निबंधाचें नांव देखील ठाऊक नाहीं असें म्हटलें तरी चालेल. या लोकांमध्यें देखील ब्राह्मण, रजपूत, क्षत्रिय इत्यादि जाती आहेत. पण काश्मीर अगर जम्मूच्या इतर भागांतील लोक यांनां कमी लेखून यांच्याशीं रोटीबेटीव्यवहार करीत नाहींत. अगदीं खालच्या जातींत मेघ नांवांची एक जात असून ती शरीराच्या ठेवणीवरून आर्यन वंशाची दिसते. येथील बटबल नांवाची एक जात मात्र अनार्य असावी असें आढळून आलें आहे. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशांत राहणार्‍या लोकांत मुसुलमान झालेले लोक फार आहेत. तरी पण त्यांच्यांतहि हिंदू चालीरीती आढळून येतात. यांत भट्टी, बुधान, धुंड, डोमल इत्यादि जाती मूळच्या रजपूत असून बाटलेल्या दिसतात. यांशिवाय बंब व खख याहि पोटजाती मूळच्या रजपूतच आहेत. खोजा, मोची, इत्यादि जाती मात्र मुसलमान आढळतात.

काश्मीर.- ज्या ज्या परकीय लोकांच्या स्वार्‍या काश्मीरावर झाल्या, त्या त्या लोकांचे वंशज काश्मीरमधील अनेक जातींच्या लोकांमध्यें आढळतात, तरी त्या सर्वांचा येथें उल्लेख करणें शक्य नाहीं. काश्मीरमध्यें मुख्यत: दोन भेद दृष्टीस पडतात. एक काश्मीरी ब्राह्मणांचा व दुसरा काश्मीरी मुसुलमानांचा; काश्मीरी मुसलमानांमध्यें शेख, सय्यद, मोंगल व अफगाण अशा चार मुख्य जाती आहेत. यांशिवाय आणखी डोम, गलवान, वाटत, भंड, डंगर, उर, मल, इत्यादि अनेक पोटजाती आहेत. मुसुलमानांची सत्ता काश्मीरावर पसरण्यापूर्वी या सर्व जाती ब्राह्मणच होत्या असें दिसतें. काश्मीरी ब्राह्मणांचे ज्योतिषी, गुरू व कारकून हे उपवर्ग आहेत.

स र ह द्दी व री ल प्रां त.- लदख प्रांतांत बुद्धांचा भरणा फार आहे. धंद्यावरून या बुद्धांच्या, अनेक जाती आहेत. रिगझंग, मंग्रिक व रिग्नन या तीन मुख्य जाती असून त्यांचे अनेक पोटभेद आहेत. लदख येथील मुसुलमानांमध्यें तरकछोस, मघमी व कामिन या जाती आहेत. गिलजित प्रांतांत मुसुलमान झालेल्या बौद्धांचाच भरणा अधिक आहे. या मुसुलमानांच्या या प्रांतांत शिन व यस्कन या दोन मुख्य जाती आहेत.

पं. थ.- काश्मीरमधील हिंदुधर्मीयांमध्यें कोणाच्या मतें शैव, वैष्णव व शाक्त असे तीन, तर कोणाच्या मतें ईश्वर, शैव, वैष्णव, शाक्त व गाणपत्य असे पांच पंथ आहेत. पण सर्वांत मुख्य पंथ म्हणून शैव पंथ होय. काश्मीरी पंडित हे एकजात शैव असून जम्मूमधील बहुतेक हिंदु शैवच आहेत. इतर पंथाचे लोक देखील थोडे फार आहेत, पण शैवांमध्यें व त्यांच्यामध्यें वैरभाव वगैरे आढळून येत नाहीं.

बौद्ध लोकांमध्यें लामांचा धर्म प्रचलित आहे. या लामांचेहि दोन पंथ आहेत. एक रक्तवस्त्री लामांचा पंथ व दुसरा पतिवस्त्री लामांचा पंथ. यांतला पहिला ग्रंथ हा मूळचा पंथ असून पीतवस्त्री पंथ हा त्यानंतरचा आहे. काश्मीर संस्थानांत रक्तवस्त्री पंथाचाच प्रसार अधिक आढळतो.

मुसुलमानांचे शिया व सुनी असे मुख्य दोन पंथ आहेत. पण काश्मीर संस्थानमध्यें उपपंथहि पुष्कळच आहेत. (१) वहाबी पंथ.- लदख प्रांतांत याचा प्रसार बराच असून जम्मू प्रांतांत या प्रांतांतींल लोक थोडे आहेत. महंमद हा अद्यापि जिवंत आहे हें तत्व या पंथाला मान्य नाहीं. (२) अहमदी:- या पंथाचा गुरू मिरझा गुलाम अहमद हा असून, हा शेवटचा इमाम होय व निकालाच्या शेवटच्या दिवशीं याचा अवतार होणार अशी मुसुलमानांची समजूत आहे. या पंथाचा प्रसार काश्मीरमध्यें फारच थोड्या ठिकाणीं झाला आहे. (३) नूरबक्षी:- या पंथाचा संस्थापक सय्यद नूरबक्षी खुरासानी हा होय. या पंथाचे लोक लदख प्रांतांत विशेष आढळतात. पण या पंथाच्या अनुयायाची संख्या हळुहळू कमी होत चालली आहे, व यांतील बरेच लोक वहाबी पंथाचें अनुयायित्व पत्करूं लागले आहेत. (४) मौलवी:- हे सर आगाखानाचे अनुयायी आहेत. या पंथाचा मूळ पुरुष हजरत इस्मायल होय. (५) नक्षबंदी:- या पंथाचा संस्थापक सय्यद जमत अली शाह असून अद्यापि हा जिवंत आहे. या पंथाचीं तत्वें वहाबी पंथाच्या अगदीं विरुद्ध आहेत.

शि क्ष ण.- शिक्षणाच्या बाबतींत मात्र काश्मीर संस्थान अगदीं मागसलेलें आहे. एकंदर ३१,०३,५०१ लोकसंख्येपैकीं ६३,२५१ पुरुष व १६८५ स्त्रिया मिळून ६८,२३६ इतकी संख्या शिकलेल्यांची आहे. म्हणजे शेंकडा २ हें प्रमाण पडत असून तें अगदींच कमी आहे यांत शंका नाहीं. यांत पंजाब अगर इतर प्रांत यांच्यामधून नोकरीकरतां आलेल्या लोकांचीच संख्या पुष्कळ आहे. खुद्द काश्मीरमधील लोकांत, काश्मीरी पंडितांचाच वर्ग काय तो सुशिक्षित दिसतो. लदख येथील बौद्धधर्मीय लोकांत कांहीं लोकांनां तात्पुरतें तिबेटी लिहितां बोलतां येतें. बाकी सर्व काश्मीर संस्थान शिक्षणाच्या दृष्टीनें पूर्ण अंधारांतच आहे असें म्हटलें असतां हरकत नाहीं. मुसुलमान लोकांत मुलांशिवाय ज्यांनां लिहितां वाचतां येतें अशांची संख्या फारच कमी आहे. मातृभाषेचें ज्ञान ज्यांनां आहे अशांचे वरील आंकडे पाहिले कीं, मग इंग्लिश जाणणारे लोक किती थोडे असतील हें सांगण्यास नकोच. शिक्षणाच्या बाबतींत काश्मीर सरकारानें थोडें अधिक लक्ष्य देण्यास सुरुवात केली आहे हें स्तुत्य आहे. १९०१ सालीं काश्मीरमध्यें एकंदर २८७ शाळा होत्या, त्या १९११ मध्यें ३७९ पर्यंत वाढल्या आहेत. त्यांपैकीं कॉलेजें २, हायस्कुलें ८, नॉर्मलस्कूल १, मिडलस्कुलें २७, प्राथमिक शिक्षणाच्या शाळा १९७, बायकांच्या शाळा ९ ब खासगी शाळा १३५ आहेत. अशा रीतीनें १९०१ पेक्षां १९११ मध्यें शिक्षणसंस्थांची वाढ बरीच समाधानकारक झाली यांत शंका नाहीं;  पण प्राथमिक शिक्षण काश्मीर सरकारनें मोफत व सक्तींचें केल्यास फार कायदेशीर होण्याचा संभव आहे. शिक्षणसंस्थांची प्रांतवार विभागणी केल्यास जम्मूमध्यें १६५, काश्मीरमध्यें १८५ व सरहद्दीवरील प्रांतांत २९ इतक्या शिक्षणसंस्था आहेत.

इतर शैक्षणिक चळवळींकडे लक्ष्य दिलें असतां हाच शोचनीय प्रकार आढळून येतो. काश्मीर संस्थानांत एकंदरींत ८ छापखाने आहेत. त्यांपैकीं जम्मूमध्यें चार, काश्मीरमध्यें तीन व सरहद्दीवरील प्रांतांत एक आहे.  या छापखान्यांत नांव घेण्याजोगा छापखाना म्हणजे जम्मू येथील सरकारी छापखाना होय. पण या छापखान्यांत सरकारी कामाशिवाय इतर खासगी छपाईकाम क्वचितच केलें जातें. ‘काश्मीर स्टेट गॅझेट’ हें एकच नियतकालिक असून त्याचा खप ३७५ आहे. १९०१-११ या कालांत १० उर्दू व १ इंग्लिश एवढींच पुस्तकें काश्मीरमध्यें प्रसिद्ध झालीं.

प्र च लि त भा षा.- ‘दर बारा कोसांवर भाषा बदलते’ असें म्हणतात व याचा अनुभव हिंदुस्थानांतील इतर भागांप्रमाणेंच काश्मीरमध्येंहि आढळून येतो. काश्मीरमध्यें अनेक प्रकारच्या भाषा प्रचलित आहेत. काश्मीरमध्यें बाहेरून आलेले लोक आपापल्या भाषा बोलतात;  त्या सोडून दिल्या तरी खुद्द काश्मीरच्या अशा भाषा दहा बारा आहेत व त्यांचेहि पोटभेद पुष्कळ आहेत. काश्मिरी, पहाडी व डोग्री या भाषा बोलणारे लोक पुष्कळ आहेत. काश्मिरी भाषा बोलणार्‍यांची संख्या ११,६५,००० असून पहाडी व डोग्री बोलणार्‍यांची संख्या अनुक्रमें ५,४४,००० व ५,१७,००० आहे. त्याशिवाय. गुजरी, पंजाबी, बाल्टि, पोथबारी, चिमलि, लदखी, शिन या भाषाहि प्रचलित आहेत. ल्हासी, नारकंदी, चंबा, कांग्रा, मंडी, दर्दी या भाषांचाहि प्रसार थोड्या ठिकाणीं आढळतो. यूरोपीय भाषांत इंग्लिश भाषेचाच प्रसार अधिक आहे. राजभाषा उर्दू असल्यामुळें त्या भाषेचें ज्ञान असणार्‍या प्रवाशाला काश्मीरमध्यें कोणत्याहि ठिकाणीं सहज जातां येतें. पण त्यांतल्या त्यांत पहाडी भाषा ही डोंगराळ प्रदेशांत विशेष प्रचलित आहे. झेलमच्या दरींत काश्मीरी व सिंधु नदीच्या दरींत तिबेटी या भाषा रूढ झाल्या आहेत. पंजाबीचाहि प्रसार बराच आढळून येतो. महाराजा रणबीरसिंह यांनीं आपल्या कारकीर्दींत डोंगरी ही दप्तरी भाषा करण्याचा प्रयत्‍न केला होता पण तो सिद्धीस गेला नाहीं.

लि. पि.- काश्मीरमध्यें ६।७ लिपी प्रचारांत आहेत. त्या म्हणजे उर्दू, फारशी, अरबी, डोग्री, हिंदी, बोधि, गुरुमुखी या होत. उर्दू ही दरबारभाषा असल्यामुळें व शाळेंत ऐच्छिक भाषा म्हणून तिचा प्रवेश असल्यानें तिचा प्रसार लेखनाच्या कामीं फार होतो. काश्मिरी भाषा पूर्वी शारदा लिपींत लिहिली जात असे पण ती हल्लीं फारसी लिपींतून लिहिली जाते. बोधि लिपी ही तिबेटियन लिपीचा एक प्रकार आहे व लदख येथील बौद्ध ही लिपी प्रचारांत आणतात. डोग्रा जातीचे हिंदू लोक डोग्री लिपी सामान्यत: वापरतात व जम्मू प्रांतांत गुरुमुखीचा प्रसार आढळून येतो. या निरनिराळ्या भाषांमध्यें फारच थोडें वाङ्‌मय आढळून येतें. महाराजा रणवीरसिंहाच्या कारकीर्दींत डोग्री भाषेंत जीं काय सरकारीं पुस्तकें प्रसिद्ध झालीं तेवढीच. त्यांशिवाय डोग्री भाषेंत व डोग्री लिपींत लिहिलेलीं अशीं पुस्तकें फारच थोडीं आहेत. बौद्ध लामांनीं बोधि भाषेंत जेवढीं कांहीं धर्मविषयक पुस्तकें लिहिलीं असतील तेवढींच. त्यांपलीकडे या भाषेंत दुसरें वाङ्‌मय आढळत नाहीं. उर्दू भाषेंत मात्र बरींच पुस्तकें आढळून येतात. काश्मीरी भाषा ज्यावेळीं शारदा लीपींत लिहिली जात असे त्यावेळीं काश्मीरी भाषेंत थोडे फार धार्मिक व इतर स्वरूपाचें वाङ्‌मय तयार झालें असेल पण त्यापलीकडे हल्लीं त्या भाषेंतील वाङ्‌मय विशेषसें आढळत नाहीं. पण त्या भाषेंत वाङ्‌मय निर्माण करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत काश्मीरी भाषेसंबंधाची विशेष माहिती ‘काश्मीरी भाषा’ या लेखांत दिलेली आहे. काश्मीरमधील लोक जात्याच शिक्षणाच्या बाबतींत मागसलेले असल्यानें वाङ्‌मयाची गोडी त्यांच्यामध्यें उत्पन्न झालेली नाहीं व त्यामुळें काश्मीरमध्यें वाङ्‌मयाचें दुर्भिक्ष आढळून येतें. कांही सुशिक्षित लोक, ज्यांनां पुस्तकांची व वाङ्‌मयाची हौस असेल ते पंजाबमधून उर्दू वर्तमानपत्रें व पुस्तकें विकत आणून तीं वाचतात.

सा मा जि क चा ली री ति.- सामाजिक चालीरीतींमध्यें, विवाहपद्धतीचा नंबर पहिला लागतो. तेव्हां त्यासंबंधीं प्रथमत: विचार करणें जरुर आहे. हिंदुस्थानामध्यें सर्वसाधारण जे विवाहविषयक निर्बंध दृष्टीस पडतात त्यांची छटा काश्मीरच्या बाबतींतहि आढळून येते. विवाहविधीच्या बाबतींतहि काश्मीर व हिंदुस्थानचा इतर भाग यांमध्यें पुष्कळच साम्य आहे. तरी पण देशाच्या विशिष्ट रचनेमुळें थोडे फार फरकहि आढळून येत नाहींत असें नाहीं. विवाहसंस्थेचा इतिहास पाहिल्यास आपल्याला असें आढळून येतें कीं, समाज बाल्यावस्थेंत असतांना विवाहविषयक निर्बंध कडक रीतींनें पाळले जात नाहींत. पण ज्या ज्या मानानें समाजाची सुधारणा होत जाते त्या त्या मानानें विवाहांनां एकप्रकारची नियमबद्धता प्राप्त होते. अशा प्रकारची नियमबद्धत प्राप्त होण्यापूर्वी विवाहसंस्थांनां कांहीं अवस्थांमधून संक्रमण करावें लागतें. अशा अवस्था म्हणजे बहुपतीत्वाची चाल, बहुपत्‍नीत्वाची चाल व एकपत्‍नीत्वाची चाल या होत. या सर्वहि अवस्था काश्मीरमध्यें अद्यापीहि आढळून येतात. उदाहरणार्थ, किस्तावर परगण्यांतील कांहीं डोंगराळ जातींत लग्न होण्याच्या अगोदरच एखाद्या कुमारीला जर मूल झालें तर तें मूल अनौरस ठरत नाहीं. लदख तालुक्यांतील व पदर इलाख्यांतील बौद्ध लोकांत बहुपतीत्वाची चाल अद्यापीहि आढळते. एखाद्या कुटुंबांतील चारपांच भावांनां मिळून एकच बायको असते. या सर्वांपासून त्या बायकोला जी संतति होईल ती थोरल्या भावाची समजली जाते. या चालीच्या अस्तित्वाचें एक कारण म्हणजे या प्रांतांत उपजीविकेचीं साधनें फार कमी असल्यामुळें, प्रत्येकानें स्वतंत्र बायको करून प्रजोत्पत्ति केल्यास त्यांनां खाण्यास पुरेसें अन्न मिळत नाहीं हें होय. एखाद्या घरांत एकच पुरुष असला तर तो एखाद्या पाहुण्याला आपल्या घरीं बोलावून त्याला भावासारखा मानतो व ते दोघेहि मिळून एकाच स्त्रीचा उपभोग घेतात. अर्थात या बहुपतित्वाचा परिणाम स्त्रिया धीट व निर्लज्ज होण्यांत होतो. या बौद्ध लोकांतील स्त्रिया एखाद्या मुसलमानावर त्यांचें प्रेम बसल्यास राजरोसपणें त्या धर्मांत जाऊन त्याच्याबरोबर लग्न लावतात. तरी पण अलीकडे या बौद्धांमध्यें एकपत्‍नीत्वाची व एकभर्तृत्वाची चाल हळू हळू रूढ होत चालल्याचें दिसतें. तसेंच लग्नानंतर एखाद्या स्त्रीचें दुसर्‍यावर प्रेम जडल्यास ती त्याच्याबरोबर लग्न करते व नूतन पति हा पूर्वीच्या नवर्‍याला कांहीं रक्कम नुकसानभरपाई म्हणून देतो. ही चाल जम्मू प्रांतांतील ठक्कर, मेघ, चमियार या खालच्या जातींत आढळून येते.

काश्मीरमध्यें मुसलमानांची लोकसंख्या अधिक असल्यानें येथें बहुपत्‍नीत्वाची चाल अतिशय रूढ असावी असें सकृद्दर्शनीं वाटतें;   पण तसा प्रकार विशेष आढळून येत नाहीं. याचें कारण येथील शेतकरी वर्ग फार गरीब असतो. दोन तीन बायकांचा सांभाळ करणें त्याला जड जातें. अर्थात विशेष अडचणींशिवाय येथील लोक एकाहून अधिक बायका करून घेत नाहीं. एखादी बायको वांझ असेल, अगर एखादीला जात्याच शरीरांत व्यंग असेल तर मात्र दुसरी बायको करण्याची चाल आढळते. उच्च जातींचा मात्र ही चाल प्राय: आढळते. सवर्णविवाह, असपिण्डविवाह इत्यादि निर्बंध काश्मीरी पंडीत अगर वरिष्ठ वर्णाचे लोक पाळतात. खालच्या वर्गांत हें बंधन पाळलें जात नाहीं. काश्मीरी मुसुलमानांमध्यें हीं बंधनें अजीबातच पाळलीं जात नाहींत. गिलजितमध्यें सजातीय विवाह होतात. मामेबहिण अगर चुलतबहिण यांच्याशीं विवाह करण्याची जी पद्धत आहे ती गिलजितमधील मुसुलमानांत विशेष रूढ आहे.

हिंदूधर्मशास्त्रांत आठ प्रकारचे विवाह सांगितले आहेत. तशाच स्वरूपाचे विवाह, थोड्या फार फरकानें इतर देशांतहि कोणत्या ना कोणत्या काळीं प्रचलित असत. पण त्याशिवाय प्रत्येक देशाच्या कांहीं विशिष्ट पद्धती म्हणून असतातच. काश्मीरमध्येंहि अशा कांहीं पद्धती आढळून येतात. जम्मूमध्यें अशी चाल आढळते कीं, एखाद्या मनुष्यानें आपल्या मुलाचें लग्न एखाद्याच्या मुलीशीं ठरविलें असेल तर त्या मनुष्यानें आपली मुलगी मुलीच्या भावाला दिली पाहिजे. याला दानप्रतिग्रहपद्धति असें म्हणतात. एखाद्याला फक्त मुलगा असला व मुलगी नसली तर दुसर्‍याची मुलगी विकत घ्यावी लागते अगर मुलगी नसल्याबद्दल आपल्या व्याह्याला पैशानें भरपाई करावी लागते. लदखमधील मुसुलमानांतहि ही पद्धत आढळून येते. उधमपूर जिल्ह्यांतील मेघ, ठक्कर, डोम वगैरे जातींत भावी वराला आपल्या सासर्‍याच्या घरीं मोफत चाकरी करावी लागते. या परिचर्येच्या अवधींत आपल्या भावी पत्‍नीशीं त्यानें प्रणयचेष्टा केल्या तरी त्यांनां बंदी करण्यांत येत नाहीं. उलट ती चांगलीच गोष्ट मानतात. हीच चाल या जिल्ह्यांतील पहाडी व जाट लोकांत व भदरवह येथील मेघ व गद्दी या लोकांत आढळते. पुढें होणार्‍या मुलीचें लग्न ठरवून ठेवण्याचीहि चाल क्वचित् आढळून येते. कृत्रिम विवाहाची एक चाल यांच्यांत आढळते. मुलीचें लग्न एका खांबाशीं अगोदर लावून नंतर तिचें नेहमींप्रमाणे लग्न करण्यांत येतें. पण हीच चाल विधवांच्या बाबतींतहि कांहीं ठिकाणीं आढळतें. एखाद्याच्या दोन बायका लागोपाठ मेल्या तर तिसरा विवाह अशुभ मानला जात असल्यानें तो करण्यापूर्वीं तो अक (अर्क) अगर मदर (मांदार) नांवाच्या झाडाशीं विवाह लावतो व नंतर चौथा विवाह म्हणून ( खरा विवाह तिसराच ) एखाद्या मुलीशीं लग्न होतें. सुमारें तीस चाळीस वर्षांपूर्वीं जम्मूप्रांतांतील रैसी, रामनगर, बसोली, किम्टवर, भदरवह इत्यादि ठिकाणीं मुलींचा व्यापार करण्याची चाल फार प्रचारांत होती. या ठिकाणच्या चांगल्या चांगल्या मुली, पंजाब, सिंध या ठिकाणीं नेऊन विकावयाच्या व नंतर त्या मुलींनीं एकदोन वर्षें आपल्या नवर्‍याच्या घरीं राहून पळून परत आपल्या मालकाकडे यावयाचें अशी पद्धत होती. पण हल्लीं त्या पद्धतीला आळा घालण्याचे प्रयत्‍न काश्मीर सरकार करीत आहे.

बौद्ध व मुसुलमान लोकांत व बाल्तिस्तानच्या लोकांत घटस्फोटाची चाल सरसहा आढळून येते. नवराबायकोनीं एक फडकें दोघांमध्यें धरून तें दोघांनीं ओढून फाढण्याची चाल आहे;  व त्या योगानें नवरा व बायको यांचे परस्परांचें नातें नाहींसें होतें. बायकोच्या अपराधामुळें हा घटस्फोट घडून आला असेल तर त्याबद्दल बायकोनें नवर्‍याला भरपाईदाखल, एक घोडा अगर २० रुपये द्यावयाचे व नवर्‍याकडे चूक असेल तर नवर्‍यानें १२ रुपये अगर एक गाय बायकोला द्यावयाची चाल आहे. अनेक नवर्‍यांपैकीं एका नवर्‍यानें बायकोशीं घटस्फोट करावयाचें मनांत आणलें तर तोच आपले चंबूगबाळें घेऊन दुसर्‍या घरीं रहावयास जातो.

काश्मीरसारख्या मागासलेल्या देशांत बालविवाहाची पद्धत जारीनें अमलांत असली पाहिजे असें सकृद्दर्शनीं वाटण्याचा संभव आहे, पण हिंदुशिवाय इतर धर्मीयांत व शिखांत ही चाल आढळून येत नाहीं. यांच्यामध्यें मुलींचे लग्न १६ ते २० च्या दरम्यान करतात व मुलाचें १८-२२च्या दरम्यान होतें. साधारणत: मुलापेक्षां मुलगी तीन चार वर्षांनीं तरी लहान असते. लदखमध्यें मुलीचें वय मुलापेक्षां अधिक असतें. एखादा बौद्ध इसम म्हातारा झाला असला व त्याचीं मुलें अज्ञान असलीं तर त्या अज्ञान मुलांचें तो एका वृद्ध बाईशीं लग्न लावतो व तीं मुलें सज्ञान होईपावेतों ती वृद्ध बाई त्यांचें परिपालन करते.

मूल जन्माला आलें म्हणजे कोणकोणते विधी करावयाचे, त्यांचा नामकरण विधि केव्हां करावयाचा इत्यादि विधींविषयीं निरनिराळ्या जातींत निरनिराळ्या जातींत निरनिराळ्या तर्‍हा आहेत. पण त्या विशेष महत्त्वाच्या नाहींत.

अ वि भ क्त कु टुं ब प द्ध ति- ही पद्धत, डुगर, लदख, झन्सकर इलाख्यांत व काश्मीरप्रांतात दिसून येते. चिमल, बाल्तिस्तान व सरहद्दीवरील टेकड्यांमधील प्रदेशांत हिचा मागमूसहि नाहीं. हिंदूमध्यें या पद्धतीचें अस्तित्व पूर्वापारच आहे व तें अद्यापीहि चालू आहे. चरक रजपुतामध्यें देखील हिचें अस्तित्व आहे, पण ठक्करलोकांत ही पद्धत विशेष रीतीनें पाळली जात नाहीं. ब्राह्मण व क्षत्रिय या वर्णांत ही पद्धत आढळते, तर मेघ, डोम, चमियर इत्यादि खालच्या वर्गांत विभक्त रहाण्याचीच चाल आढळून येते. शेतकरी वर्गामध्यें ज्या त्या माणसाच्या परिस्थितीप्रमाणें विभक्त अगर अविभक्त रहाण्याची पद्धत आहे. लडखच्या बौद्धांत अविभक्तकुटुंबाची पद्धत आहे. मुसुलमानांमध्यें या पद्धतीचें अस्तित्वच नाहीं. हल्लींच्या यूरोपीय संस्कृतीचा परिणाम हळू हळू येथेंहि दृग्गोचर होऊ लागला आहे व सुशिक्षित लोकांनां विभक्त रहाण्याची आवड लागत चालली आहे.

धा र्मि क चा ली री ती.- काश्मीरमध्यें हिंदूधर्मीयांत मूर्तिपूजेचें फारच स्तोम आहे. हिंदुधर्माच्या ज्या ज्या देवता आहेत त्यांची येथें पूजा होतेच पण जम्मूप्रांतांतल्या कांहीं कांहीं भागांत ग्रामदेवता व कुलदेवता यांचीहि पूजा करण्यांत येतें. ज्या घराण्यांतील बायका सति गेल्या असतील त्याचीहि देवता समजून पूजा करण्यांत येते. पण त्यांतल्यात्यांत जम्मू, जसोत्रा, रैसी, मिरपूर, इत्यादि प्रदेशांत शिव, रघुनाथ, कृष्ण, महावीर, भैरवनाथ, राम इत्यादि देवतांची प्रामुख्यानें उपासना करण्यांत येते. डोंगराळ प्रदेशांत नाग व काली यांची उपासना अधिक प्रचारांत आहे. काश्मीरप्रांतांत गणेशजी, गजधर, शारदादेवी यांची उपासना रूढ आहे. प्राचीन वीर व सग्दुणी पुरुषांचीहि देवता म्हणून पूजा करण्यांत येते. उदाहरणार्थ, मंडलीक राजा, मेर राजपुत्र, कलिवीरप्रधान, गोगराजा, बाबा जेनाथ, सिद्धगौरिया जोगी इत्यादि. देवतांच्या प्रीत्यर्थ असंख्य यात्रा व उत्सवहि साजरे करण्यांत येतात. पण त्यांतल्यात्यांत अमरनाथाची जत्रा, त्रिकूटतीर्थ अगर विष्णु देवीची जत्रा, चनेनीमधील शिवजीची जत्रा या जत्रा फार प्रसिद्ध आहेत. होळी, दिवाळी, दसरा या सणांचें महत्व जम्मू शहराशिवाय इतरत्र फारसें दिसून येत नाहीं. ऋतूत्सव सर्वत्र साजरे करण्यात येतात. उदाहरणार्थ लोहरी, वसंतोत्सव, वैशाखी उत्सव इत्यादि.

मुसुलमानांमध्यें साधूंची पूजा फार प्रचारांत आहे. सय्यद अबदुल कादर जिलानी हा काश्मीरी मुसुलमानांचा राष्ट्रीय संत होय. त्याशिवाय पीर, मिय्या, पंजापीर इत्यादि पीरांची पूजा जम्मूमध्यें थाटांत करण्यांत येते. येथें पुष्कळ मशीदी प्रसिद्ध असून श्रीनगरची जुम्मामशीद फार प्रसिद्ध आहे. मुसुलमानांतहि पुष्कळ यात्रा व सण साजरे केले जातात. महंमदाची जयंति फारच थाटानें साजरी करण्यांत येते. काश्मीरमधील बहुतेक मुसुलमान मूळचे रजपूत असल्यानें त्यांच्यामध्यें अद्यापि पुष्कळ हिंदू चालीरीतींचें अस्तित्व आढळतें.

पो षा ख.- काश्मीरी पंडित हे अंगांत पैरण घालतात. काश्मीरी मुसुलमान तशाच स्वरूपाचा पोषाख परिधान करतात. काश्मिरी पंडित पागोटें घालतात. काश्मिरी शियापंथाचे मुसुलमानहि अशाच प्रकारचें शिरोवस्त्र धारण करतात. बौद्ध लोक लोंकरी कानटोपी वापरतात. फक्त या कानटोपीचीं खालचीं टोकें वर वळविलेलीं असतात. काश्मिरी पंडितांच्या बायका, आपल्या झग्यावर कमरपट्टा बांधतात. सुनी जातीचे मुसुलमान फकीर पांढरा झगा व पांढरें पागोटें वापरतात तर शिया धर्मगुरू काळा झगा व काळें पागोटें वापरतात. हिंदू लोक शेंडी ठेवतात. शीख लोकांनीं लांब केस ठेवलेले आढळतात. बाल्तिस्तानामधील शियापंथी मुसुलमान लोक दाढी व मिशा राखतात व त्या नेहमीं विंचरून स्वच्छ ठेवतात. त्यांची प्रार्थना करण्याचीहि पद्धत निराळी आहे. सुनी व मौलवी बेंबीपाशी हात जोडून प्रार्थना करतात. नूरबक्षी लोक छातीजवळ हात जोडतात व शिया लोक यांपैकीं कांहींच प्रकार करीत नाहींत.

घ रें.- डोंगरपठारावरील प्रदेशांतील घरें, आपल्या इकडील माळवदी घरासारखींच असतात. घरें मातीचीं बांधलेलीं असून त्यांवरील छप्पर अगदीं सपाट असतें. उन्हाळ्यामध्यें या छपरावर निजण्याची पद्धत आहे. घराला एक धाकटासा दरवाजा असतो. डोंगरावरील प्रदेशांतील घरें थोडींशी प्रशस्त बांधलेलीं दिसतात. प्रत्येक घराला देवडी असून अंगणहि ठेवलेलें असतें. बाकी घराची रचना डोंगरपठारावरील घरांप्रमाणेंच असते. पावसाळ्यांत छपरावर मुद्दाम गवत वाढेल अशी तजवीज करण्यांत येते. काश्मीरमधील घरें लांकडांची बांधलेलीं असतात. या लांकडांच्या आंत माती भरलेली असते व त्यामुळें पावसाळ्यामध्यें घरांत पाणी शिरत नाहीं. काश्मीरमधील घरें एकजात तिमजली असतात. क्वचित् चौमजली, पांचमजलीहि असतात. तळमजल्यांत गुरेढोरें बांधण्याची सोय केलेली असते. दुसर्‍या मजल्यावर स्वयंपाकगृहाची सोय असते. तिसर्‍या मजल्यावर दिवाणखाना व इतर धान्य वगैरे ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. घराभोंवतीं बागबगीचा क्वचितच आढळून येतो. पायखाने श्रीमंतांच्या घरांतच दृष्टीस पडतात. काश्मीरमधील लोकांत विशेषशी स्वच्छता आढळून येत नाहीं. धान्य ठेवण्यासाठीं कांहीं लोक एक स्वतंत्र घरच बांधतात. लदख वगैरे सरहद्दीवरील प्रांतांत मातीचींच घरें बांधण्याची वहिवाट आहे तेथील घरांनां लाकूंड वापरलेलें आढळत नाहीं. प्रत्येक घराला एक पटांगण असतें. घरें फार लहान व खुजीं असतात. ही खेडेगांवांतील घरांची स्थिति झाली पण शहरांतील घरें मात्र विटांचीं, दगडाचीं व चुनेगच्ची बांधलेलीं असतात. श्रीनगर येथील श्रीमंत लोकांच्या घरांत बरेंच नक्षीकाम केलेलें दृष्टीस पडतें. काश्मीर व जम्मू येथील राजवाडे उत्कृष्ट तर्‍हेचे बांधलेले आहेत व त्या ठिकाणीं वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना पहावयास मिळतो.

शा स न प द्ध ति.- राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टीनें काश्मिर संस्थानाचे तीन भाग पाडलेले आहेत. जम्मू, काश्मीर व सरहद्दीवरील प्रांत आणि मांडलिक संस्थानें असे ते तीन भाग अगर सुभे होत. या प्रत्येक सुभ्याचा कारभार सुभेदाराकडे असतो. या तिन्ही सुभ्यांचे मिळून दहा जिल्हे पाडण्यांत आले आहेत. जम्मू प्रांताचे जम्मू, जसरोटा, उधमपूर, रैसी व मिरपूर हे पांच जिल्हे आहेत. काश्मीर प्रांताचे उत्तरकाश्मीर, दक्षिण काश्मीर व मुझफराबाद हे तीन जिल्हे आहेत व सरहद्दीवरील प्रांताचे लदख व गिलजित हे दोन जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यावर एक जिल्हाधिकारी नेमण्यांत आलेला आहे. यांशिवाय प्रत्येक जिल्ह्याचे पुष्कळ पोटविभाग उर्फ तहशीली केलेल्या आहेत. मांडलिक संस्थानांची संख्या ६ असून तीं संस्थानें म्हणजे पुनियल, इकोमन, यसीन, हुंझा, नगर व छिलस हीं होत. या संस्थानांवर ब्रिटिश सरकारनें नेमलेल्या एका अधिकार्‍याची देखरेख असते. पंच, भदरवह व चनेनि या तीन जहागिरी आहेत. तिबेट सरकारच्या ताब्यांत असलेल्या प्रदेशांतील मनसर नांवाचें एक खेडें हें काश्मीर संस्थानच्या सत्तेखालील असून लदखचा अधिकारी व ब्रिटिश कमिशनर हे दोघे मिळून त्याच्यावर देखरेख करतात.

महाराजा गुलाबसिंगांच्या कारकीर्दींत काश्मीर संस्थान अगदीं स्वतंत्र होतें म्हटलें तरी चालेल. पुढें महाराजा रणवीरसिंगाच्या कारकीर्दींत काश्मीरमध्यें जाऊं इच्छिणार्‍या युरोपीयन लोकांना पासपोर्ट देण्याकरितां एक खास अधिकारी ब्रिटिशसरकारनें नेमला व याच्याकडे काश्मीरदरबार व ब्रिटिशसरकार यांच्यामधील हितसंबंधांचे रक्षण करण्याचें काम देण्यांत आलें. इ.स. १८८५ मध्यें हल्लींचे महाराजा गादीवर बसल्यानंतर पासपोर्ट देणार्‍या अधिकार्‍याच्या ऐवजीं ब्रिटिश सरकारनें एका रेसिडेंटची नेमणूक केली. इ.स. १८८८ मध्यें महाराजांच्या खास इच्छेवरून काश्मीरची राज्यव्यवस्था महाराजांचे बंधु, राजा सर अमरसिंग व दोन गोरे सिव्हिलियन यांचें कौन्सिल नेमून त्यांच्याकडे सोंपविण्यांत आली. या कौन्सिलचा अध्यक्ष रेसिडेंट हा असावा असें ठरलें. १८९१ मध्यें या रेसिडेंटच्या बदली स्वत: महाराज हेच अध्यक्ष झाले. सन १९०५ सालीं कौन्सिल मोडण्यांत येऊन महाराजांनींच सर्व राज्यसूत्रें आपल्या हातीं घेतलीं. आपल्या हाताखालीं तीन अधिकारी व एक प्रधान नेमून त्यांच्याकरवीं त्यांनीं राज्यकारभार चालविण्याचा उपक्रम केला. पुढें तीन अधिकार्‍यांऐवजीं दोनच अधिकारी ठेवण्यांत आले व तीच व्यवस्था हल्ली चालू आहे.

न्यायखात्याच्या कामासाठीं प्रत्येक तहशिलीमध्यें एक कोर्ट स्थापण्यांत आलें आहे. १९००-१९०१ सालीं काश्मीरमध्यें ८१ कोर्टें होतीं. गुन्ह्यांच्या बंदोबस्तासाठीं व तपासासाठीं पोलिसखातें निर्माण करण्यांत आलें आहे.

१८८० पर्यंत सरकारी सारा पैशाच्या रूपानें देण्याची वहिवाट नव्हती. १८८७ मध्यें सर्व जमिनीची मोजणी होऊन सार्‍यांचा आकार ठरविण्यांत आला. काश्मीरमध्यें इतर ठिकाणांप्रमाणें रयतवारी पद्धतीच अस्तित्वांत आहे. संस्थानचें उत्पन्न सुमारें ९३ लाख रुपये आहे.

वै द्य क खा तें.:- श्रीनगर व जम्मू येथें दोन दोन दवाखाने असून शिवाय जम्मू येथें लष्करी लोकांसाठीं एक स्वतंत्र रुग्णालय आहे. सत्वारी कँटोनमेंट याठिकाणींहि एक लष्करासाठीं रुग्णालय आहे. श्रीनगर येथें एक महारोग्यासाठीं दवाखाना आहे. इ.स.१९०१ सालीं काश्मीरमध्यें एकंदरींत ६७ लहान मोठीं रुग्णालयें होतीं. यांची व्यवस्था जम्मू  व काश्मीर येथील वैद्यकखात्याच्या अधिकार्‍याकडे असते. देवी काढण्याचें खातेंहि येथें स्थापन झालें आहे. काश्मीरमध्यें पटकीची सांथ फार मोठ्या प्रमाणांत आढळून येते. एकदां का ही साथ आली कीं ती तीन चार महिने सारखी टिकून रहाते व अशा वेळीं मृत्यूचें प्रमाण फारच वाढतें. इ. स. १९११ सालीं १८,४४८ लोकांनां पटकीचा आजार होऊन ९,२१८ लोक मरण पावले. पटकीच्या खालोखाल प्लेगचाहि येथें बराच प्रसार आहे व काश्मीरच्या लोकसंख्येची खच्ची करण्याच्या कामांत त्याचा बराच वांटा आहे. उपदंश, खरूज, गलग्रंथि हे रोग काश्मीरी लोकांत मोठ्या प्रमाणांत आढळून येतात. इ. स. १९११ च्या खानेसुमारींत वेडे, आंधळे, मुके, बहिरे व कुष्टी यांचें प्रमाण लाखास अनुक्रमें ७८, ३०६, १९४ व ८५ असें पडलें. वेड्यांचें इस्पितळ काश्मीरमध्यें नसल्याकारणानें फार गैरसोय होते व अशा लोकांनां पंजाबमध्यें जावें लागतें.

द ळ ण व ळ ण.- काश्मीरमध्यें दळणवळणाची सोय चांगल्या तर्‍हेनें होणें फार अवघड काम आहे तरी पण काश्मीरसरकारनें या कमीं शक्य ती खटपट चालू ठेवली आहे. अद्यापिहि असे कित्येक भाग आहेत कीं, पावसाळ्यामध्यें ज्या ठिकाणीं दळणवळणाचें कोणतेंच साधन रहात नाहीं. श्रीनगरपासून बारमुळापर्यंत व तेथून झेलम दरींतून अबटाबादपर्यंत व पंजाबमधील मरी शहरापर्यंत बैल गाडीचा रस्ता असून आतां श्रीनगर ते उधमपूरपर्यंतहि रस्ता झालेला आहे. विष्णुदेवीच्या यात्रेला जाण्याकरतां काट्रापर्यंत टांगा जाण्याजोगा रस्ता झालेला आहे. झेलम नदींतून जलमार्गाची सोय करण्यांत आली आहे. इ.स. १९०१ सालीं काश्मीरसंस्थानांत जवळजवळ २,६०० मैल चांगला रस्ता तयार होता तो इ. स. १९११ सालीं,  ३,२०० मैलपर्यंत झाला आहे. काश्मीरसंस्थानच्या मालकीची आगगाडी अवघी १६ मैल असून ती नॉर्थवेस्टर्न रेल्वेच्या हद्दींत आहे. तारायंत्राची सोय सर्व काश्मीरभर झाली असून १३०० मैलांपैकीं जवळ जवळ ५७० मैल तारायंत्राची मालकी संस्थानची आहे. पोस्टखात्याची मालकी ब्रिटिशसरकारनें आपल्या हातीं ठेवली असून बहुतेक काश्मीरभर पोस्टांचें जाळें पसरलें आहे. तरी अद्यापि बर्‍याच ठिकाणीं पोस्टांची वाण भासत आहे.

उ द्यो ग धं दे.- काश्मीरमधील लोकांचा मुख्य धंदा म्हणजे शेतीचा होय. शेतीचा धंदा करणारे लोक, लोकसंख्येच्या १/३ वर आहेत. इ.स. १९११ मधील खानेसुमारींत ३१ लाख लोकसंख्येपैकीं केवळ शेतकीचा धंदा करणारे लोक जवळ जवळ ११ लाख आढळून आले. याशिवाय शेतांत मजुरी करणार्‍यांची संख्या निराळीच व हीहि कांहीं कमी नाहीं. काश्मीरसंस्थानांत निरनिराळ्या भागांत मोठमोठीं जंगलें आहेत. विशेषत: झेलम दरींतून तर फारच मोठीं व नयनरम्य जंगलें आहेत. या जंगलांमध्यें निरनिराळ्या प्रकारचीं झाडें व वनस्पती यांची समृद्धि असल्यानें या जंगलांमध्यें राबून पुष्कळ लोक आपली उपजीविका करतात. काश्मीरसरकारनें या जंगलांवर एक स्वतंत्र अधिकारी नेमला आहे. इ. स. १९११ सालीं या अधिकार्‍याच्या ताब्यांत ४,२१४ चौरस मैल इतकें जंगल होतें. जंगलसार्‍याचें उत्पन्न दरवर्षी १७ लाख पर्यंत होतें व खर्च वजा जातां या खात्यांत सरकारला चांगलीच बचत करतां येते. खानेसुमारीवरून पहातां काश्मीर प्रांतांत शेंकडा ८० व जम्मू प्रांतांत शेंकडा ५० लोक या जंगलांवर आपली उपजीविका करतात असें आढळून आलें. या जंगलांत इमारतीला लागणारें सागवानी लांकूड, मुबलक गवत व चारा शेतकीचीं औतें करण्याला व भांडीं करण्याला लागणारें लांकूड, औषधींनां उपयुक्त अशा वनस्पती, कोळशाला लागणारें लांकूड, तरवडीची साल, इत्यादि अनेक वस्तू उपलब्ध होतात. सागवानावर मात्र सरकारी कर आहे. बाकीच्या सर्व वस्तू वाटेल त्यानें सरकारी परवानगी घेऊन नेण्यास मुभा आहे.

शेतीचें उत्पन्न म्हणजे तांदूळ, मका, कापूस, केशर, तंबाखू, गहूं, कडधान्यें, तीळ इत्यादि जिन्नस हिंवाळ्यांत व गहूं, जोंधळा, इत्यादि धान्यें उन्हाळ्यांत होतात सर्वांत मुख्य पीक तांदुळाचें असून शेतकरी याकडे विशेष लक्ष पुरवतात. त्याच्या खालोखाल मक्याचें पीक होय. केशराचेंहि उत्पन्न दांडगे आहे. श्रीनगरच्या आसपास तंबाखूचें उत्पन्न होतें. डाल सरोवराच्या आसपास तर त्या बागांच्या रांगाच्या रांगा आहेत. या बागांमधून विविध प्रकारच्या भाज्या व वनस्पती पेरलेल्या आढळतात. नवलकोल ही काश्मीरी लोकांची आवडती भाजी होय. काश्मीरमध्यें अनेक प्रकारचीं फळें उत्पन्न होतात. काश्मीर हा फळांचा देश आहे असें म्हटलें तरी चालेल. अंब्रू नांवाचीं फळें या ठिकाणीं मुबलक  होतात व तीं काश्मीरबाहेर मोठ्या प्रमाणावर जातात. काश्मीर हे पूर्वी द्राक्षांसाठीं फारच प्रसिद्ध होतें पण हल्लीं येथें द्राक्षांची लागवड फारशी होत नाही.

काश्मीरमधील गुरें खुजीं पण मोठीं काटक असतात. त्यांचा रंग सर्वसाधारण काळा अगर करडा असतो. मेंढ्यांची येथे समृद्धि आहे. या मेंढ्यांपासून पुष्कळच लोंकर तयार होते. खेंचरेंहि पुष्कळ असून तीं फार खुरटीं पण दमदार असतात. लोलाब दरीमध्यें व इतरत्रहि कोंबडीं पुष्कळ आहेंत. बदकें, पारवे, हंस, हे पक्षी या ठिकाणीं आढळतात.

काश्मीर हे रेशमासाठीं फार प्रसिद्ध आहे. या ठिकाणीं हवें तितकें व उच्च प्रकारचें रेशीम उत्पन्न करतां येण्यासारखें आहे. या बाबतींत महाराजा रणवीरसिंगांच्या कारकीर्दींत सरकारनें लक्ष देण्यास सुरुवात केली व हल्लीं सरकारनें जवळ जवळ हा धंदा आपल्याच ताब्यांत घेतला आहे. श्रीनगर येथें सरकारी रेशमाचा कारखाना असून त्यात २४७६ माणसें काम करतात. काश्मीरची रेशमी शालीबद्दल अत्यंत प्रसिद्धि आहे. काश्मीरध्यें उत्पन्न शाली तयार करणारीं १४८ माणसें खानेसुमारींत आढळून आलीं. गालिचे तयार करण्याचा कारखाना श्रीनगरमध्यें असून तो यूरोपीयन लोकांच्या ताब्यांत आहे.

ख नि ज सं प त्ति.- काश्मीरमध्यें खनिज पदार्थांची वाण आहे अशी अगदीं अलीकडील काळापर्यंत समजूत होती पण ती समजूत चुकीची ठरून काश्मीरमध्यें पुष्कळ खनिज संपत्ति सांपडेल असें तज्ज्ञांनां वाटूं लागलें आहे. सोनें, तांबें व लोखंड या धातूंच्या खाणी लडख प्रांतांत आहेत असें तज्ज्ञांचें मत आहे. पण चांगल्या दळणवळणाच्या अभावीं अद्यापि या खाणीं खणण्याचें काम लांबणीवर पडलें आहे. गिलजितच्या आसपासच्या मुलुखांतून सोनें काढण्याचा धंदा सुरू झाला आहे. पदर इलाख्यांत नीलमण्याची खाण १८८२ मध्यें सांपडली असून ती सरकारनें आपल्या ताब्यांत ठेवली आहे. उधमपूर जिल्ह्यांतील लड व अंजी याठिकाणीं कोळशाच्या खाणी सांपडल्या असून तेथें ११ दशलक्ष टन कोळसा निघतो. दक्षिण काश्मीरमध्यें उत्तम लोखंड उपलब्ध होतें. येथें चुन्याच्या खाणीहि पुष्कळ सांपडल्या आहेत.

का र खा ने.- रेशीम, गालीचे तयार करण्याचे कारखाने, तेलाचे कारखाने व दारू तयार करण्याचे कारखाने काश्मीरमध्यें आहेत. लोंकरीच्या व ब्लँकेटें तयार करण्याच्या गिरण्याहि काश्मीरमध्यें निघाल्या आहेत. नक्षीकाम करण्याचे कारखाने काश्मीरमध्यें पुष्कळ आहेत.

आ या त व नि र्ग त.:- १९०४-०५ जच्या दरम्यान काश्मीरमध्यें ११५ लाख रुपयांची आयात झाली, तर १९११ मध्यें १,८७,०८,४६० रुपयांची आयात झाली. आयात मालामध्यें धातु ( २६००० ), मीठ ( ३१५००० ), साखर ( ६१६००० ), चहा ( १५३००० ), तंबाखु ( ११३००० ), कापूस व कापड ( १६४८००० ) हे जिन्नस होत. १९११ मध्यें १,५८,९३,४३ रुपयांच्या मालाची निर्गत झाली. निर्गत मालांत गुरेंढोरें ( १६५००० ), धान्य ( ४०१५०० ), लोंकर व लोकरी कपडा ( १४६००० ), सागवान ( २५२९००० ), अफू (८५००) व कातडीं ( २११००० ) रु. किं. हे जिन्नस होते.

प्रा ची न का ल चा इ ति हा स:- प्राचीन काळीं हिंदुस्थानांत सुसंगत रीतीनें इतिहास लिहिण्याची कला हिंदूंनां अवगत नव्हती असें आर्वाचीन विद्वानांचें म्हणणें आहे. त्या म्हणण्यांत किती तथ्यांश आहे हें पहाण्याचें आपल्याला प्रयोजन नाहीं; पण काश्मीरच्या बाबतींत मात्र तें म्हणणें लागू पडत नाहीं हें निर्विवाद आहे. काश्मीरचा प्राचीन-काळचा इतिहास कल्हण नांवाच्या एका १२ व्या शतकांतल्या पंडितानें आपल्या ‘राजतरंगिणी’ नामक सुप्रसिद्ध ग्रंथांत लिहिलेला आज उपलब्ध आहे. त्यावरून आपल्याला काश्मीरच्या प्राचीन इतिहासासंबंधींचीं बरीच विश्वसनीय अशी माहिती मिळते. राजतरंगिणीच्या प्रस्तावनेंत कल्हणानें आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या सुव्रत, क्षेमेंद्र, नीलमुनि, पद्यमिहिर व हेलराज या नृपावलीकारांचीं नांवें सांगितलीं आहेत;  व त्यांच्या ग्रंथांच्या व तसेंच दानलेख, शिलालेख व इतर प्रशस्ति-पत्रें यांच्या आधारें आपण ‘राजतरंगिणी’ उर्फ काश्मीरचा इतिहास हा ग्रंथ लिहिला असें म्हटलें आहे. अर्थात इतक्या परिश्रमानें लिहिलेला ग्रंथ विश्वसनीय मानण्यास मुळींच हरकत नाहीं. कल्हणानें या ग्रंथांत इ. स. ११४८ पर्यंतची काश्मीरची माहिति दिली आहे. त्याच्यानंतरचा १४२० पर्य़ंतचा इतिहास जोनराज नांवाच्या कवीनें लिहिला. श्रीधर कवीनें या इतिहासाचा धागा इ.स. १४८६ पर्यंत आणून भिडविला व प्रज्ञाभट्ट नांवाच्या कवीनें अकबरानें काश्मीर आपल्या तांब्यांत आणीतोपर्यंतचा म्हणजे १५८८ पर्यंतचा इतिहास आपल्या राजवल्लिपट्टक ग्रंथांत लिहिला. त्यानंतरचा इतिहास आपल्याला फारसी व इंग्लिश ग्रंथकारांच्या ग्रंथांतून वाचावयास मिळतो.

राजतरंगिणीच्या प्रारंभीं असें म्हटलें आहे कीं, काल्पारंभापासून सहा मन्वंतरांच्या काळांत हिमालयाच्या पोटांतील भूमि पाण्यानें तुडुंब भरली असल्यामुळें तिच्यामधून शंकरांची प्रिया पार्वती ही आपल्या करमणुकीसाठीं नेहमी नौका वल्हवीत असे. तिला हें स्थान फार प्रिय वाटल्यामुळें या सरोवराला ‘सतीसरोवर’ असें नांव पडलें. या सरोवरांत जलोद्भव नांवाचा राक्षस रहात असे. तो या सरोवराच्या आसपासच्या भागाला फार उपद्रव देऊं लागल्यामुळें प्रजापती कश्यपानें या जलोद्भवाचा वध करून त्या ठिकाणी काश्मीर हा देश निर्माण केला. पुढें या राक्षसाचा त्रास नाहींसा झाल्यामुळें त्या ठिकाणीं काश्मीर हा देश निर्माण केला. पुढें या राक्षसाचा त्रास नाहींसा झाल्यामुळें त्या ठिकाणीं लोकवस्ती होऊं लागली व नंतर छोटीं राज्यें निर्माण झालीं.

अशा या पवित्र व निसर्गरमणीय प्रदेशावर गोनर्द नांवाचा राजा फार प्राचीन काळीं राज्य करीत असे. या राजाच्या वंशजानीं काश्मीरावर कित्येक शतकें राज्य केलें. काश्मीरमध्यें यावेळीं नाग नांवाचे लोक रहात असत. हे नागांची म्हणजे सर्पाँची पूजा करीत असत. त्याचप्रमाणें गंधारी, खस, दरद इत्यादि लोकाचीही या ठिकाणी वस्ती असे. या ठिकाणीं ब्राह्मणीधर्म प्रचलित होता. पुढें ख्रि. पू. २४५  च्या सुमारास सम्राट अशोकानें काश्मीर येथें बौद्धधर्माचा उपदेश करण्याकरितां भिक्षुमंडळ पाठविलें. या भिक्षूंनीं त्या ठिकाणीं बौद्धधर्माचा बराच प्रसार केला. पण अशोकाच्या मरणानंतर बौद्धधर्माला उतरती कळा लागून काश्मीरमध्यें ब्राह्मणी धर्मानें पुन्हां वर डोकें वाढण्यास सुरवात केली. ख्रिस्ती शकाच्या आरंभीं काश्मीरवर कुशान घराण्याची सत्ता चालू होती. या कुशान घराण्यांतील हुविष्क, जुष्क व कनिष्क या राजांच्या अमदानींत काश्मीरमध्यें पुन: बौद्ध धर्माची चलती झाली. तरी पण ब्राह्मणी धर्महि एकसमयावच्छेदेंकरून या ठिकाणीं चालूच होता. अशीच स्थिति काश्मीरमध्यें बरीच शतकें चालू होती.

मध्यकाल कर्कोटक घराण्याचा उदय:- गोनर्दानें चालू केलेल्या गोनर्दीय वंशाचा बालादित्य नांवाचा शेवटचा राजा निपुत्रिक मरण पावल्यामुळें त्याचा वंश लयास गेला. त्याच्या पाठीमागून त्यानें ठरवून ठेवल्याप्रमाणें त्याचा जावई दुर्लभवर्धन हा ६०२ मध्यें गादीवर बसला. हा दुर्लभवर्धन कर्कोटक वंशाचा होता. या कर्कोटक घराण्याचें राज्य सुरू होण्यापूर्वी ( सु. २ रें शतक ) बौद्धधर्माला उतरती कळा लागली होती. गोनर्दीय वंशाचा राजा प्रवरसेन यानें हिंदुशाहीचें काश्मीरांत पुनरुज्जीवन करून शिवोपासनेची स्थापना केली होती. दुर्लभवर्धनाच्या कारकीर्दींत प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युएनत्संग हा काश्मीरांत आला होता. त्यावेळीं त्याला देखील बौद्धधर्माला उतरती कळा लागली असल्याचें आढळून आलें. अशीं स्थिति असल्यामुळें बौद्धधर्मांतील अहिंसादि तत्वांचा नायनाट झाल्यामुळें क्षात्रतेज लोकांत झळकूं लागलें होतें. या संधीचा फायदा घेऊन दुर्लभवर्धनानें आपल्या राज्याचा विस्तार वाढविण्यास सुरवात केली. हिमालयाच्या पायथ्यापासून तो मिठाच्या डोंगरापर्यंतचा पंजाबचा बहुतेक भाग त्यानें आपल्या सत्तेखालीं आणिला. दुर्लभवर्धन हा ६३७ त मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा दुर्लभक हा गादीवर आला. त्यानें प्रतापादित्य हें नवीन नांव धारण केलें. हा अत्यंत न्यायप्रिय व प्रजाहिततत्पर असा राजा होता. याच्यासंबंधीं राजतरंगिणीमध्यें पुष्कळच कथा आल्या आहेत. त्यानें आपल्या अमदानींत पुष्कळ मंदिरें बांधलीं. दुर्लभकाच्या निधनानंतर त्याचा वडील मुलगा चंद्रापीड हा राज्यावर आला. त्यानें सातआठ वर्षे राज्य केलें. पुढें त्याचा धाकटा भाऊ तारापीड यानें त्याचा वध करवून राज्य बळकाविलें. तारापीड हा फार जुलमी राजा होता. त्यानें अवघीं चार वर्षें राज्य केलें. त्याच्यानंतर चंद्रापीडाचा सर्वांत धाकटा भाऊ मुक्तापांड हा गादीवर आला.
 
राज्यारूढ होतांच मुक्तापीड आपणाला ‘ललितादित्य’ म्हणवून घेऊं लागला. तो अत्यंत महत्त्व कांक्षी असल्यामुळें त्यानें दिग्विजय करण्याचें ठरविलें. कनोजचा महापराक्रमी राजा यशोवर्मा याचा त्यानें पराजय केला. त्यानंतर त्यानें गौडराजावर स्वारी करून त्याला जिंकलें. त्याचप्रमाणें कलिंग, कर्णाट, कावेरी, कोंकण, सौराष्ट्र, द्वारका, अवन्ती इत्यादि प्रदेशांवर स्वार्‍या करून ते सर्व प्रदेश अंमलाखालीं आणिले. नंतर त्यानें उत्तरेकडे आपलें लक्ष्य वळावलें. उत्तरेकडील दरद व तिबेट हे देश त्यानें सहजरीतीनें जिंकून तुर्कांवर स्वारी केली व त्यांचा तीनदां पराभव केला ! अशा रीतीनें दिग्विजय केल्यामुळें त्याला अपार संपत्ति मिळाली व तिचा त्यानें फार चांगल्या रीतीनें उपयोग केला. आपल्या अमदानींत मोठमोठीं देवालयें बांधलीं. भूतेश नामक एका शिवमंदिरासाठीं त्यानें ११ कोट रूपये खर्च केले. अद्यापिहि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध असलेलें मार्तंडाचें (सूर्याचें) मंदिर, वितस्ता नदीवरील पूल, परिहासपूर नांवाचें नगर, ५४ हात उंचीच्या अखंड पाषाणाच्या स्तम्भावर उभारलेला गरुड इत्यादि अनेक मंदिरें त्यानें बांधल्याबद्दलचा राजतरंगिणीमध्यें उल्लेख आढळतो. त्याची शासनपद्धतिहि संस्मरणीय होती. आपल्या प्रचंड साम्राज्याच्या कारभारासाठीं त्यानें महाप्रतिहारी, महासंधिविग्राहक ( परराष्ट्रमंत्रि ), महाश्वबल, महाभाण्डागार व महासाधनिक असे पांच अधिकारी नेमले होते. त्यानें अनाथासांठीं अन्नछत्रें व पाणपोया जागोजागीं चालू केल्या होत्या. हा उत्तरेकडे स्वार्‍या करावयास गेला असतां मध्येंच मरण पावला.

ललितदित्यामागून त्याच्या गादीवर अनुक्रमें कुवलयापीड व वज्रादित्य हे राजे बसल्यानंतर जयापीड हा गादीवर आला. हा ललितादित्याचा नातू होता. आपल्या आजाप्रमाणेंच यानेंहि दिग्विजय करण्याचें ठरवून तो पार पाडला. जयापीड हा स्वत: मोठा पंडित असून विद्वानांचा आश्रयदाता होता अमरकोशाचा प्रसिद्ध टीकाकार क्षीरस्वामी, साहित्यग्रंथाचा कर्ता उद्भट, व्याकरण व साहित्यशास्त्रावरील टीकाकार वामन, कुट्टिणीमताचा कर्ता दामोदर गुप्त इत्यादि अनेक विद्वान् त्याच्या पदरीं होते. अशा रीतीनें आपल्या प्रथमारंभींच्या कारकीर्दींत तो फार चांगला राजा म्हणून प्रसिद्ध होता. पण कोणत्या कारणानें असेल तें असो, त्याच्या स्वभावांत पुढें फार फरक पडून त्यानें आपल्या प्रजेवर जुलूम करण्यास सुरुवात केली. त्यामुळें सर्व प्रजा त्याच्यावर फार असंतुष्ट झाली. तो ७८२ मध्यें मरण पावला. त्याच्या पाठीमागे त्याच्या घराण्यांत दोन तीन राजे होऊन, नंतर उत्पल घराण्याची सत्ता काश्मीरवर चालू झाली. कर्कोटक वंशाचे एकदंर १७ राजे काश्मीरच्या राज्यावर बसले व त्यांनीं एकदंर २५० वर्षे काश्मीरवर राज्य केलें. कर्कोटक घराणे शिवोपासक होतें. त्यांच्या अमदानींत काश्मीरच्या राज्याचा मोठा विस्तार होऊन काश्मीर हें बलाढ्य राज्य बनलें. तसेंच त्यांच्या कारकीर्दीत काश्मीरनें विद्येविषयीचा आपला नांवलौकिक कायम ठेवला. त्यांनीं आपल्या अमदानींत नाना प्रकारचीं देवालयें, विहार व इमारती बांधून काश्मीरला मनोहर सौंदर्य आणिलें.

उत्पल घराण्याची कारकीर्द:- कर्कोटक घराण्याची सत्ता नष्ट झाल्यानंतर उत्पल घराण्याची सत्ता काश्मीरवर सुरू झाली. या उत्पल घराण्याचा आद्यपुरुष अवन्तिवर्मा हा होय. हा मोठा पराक्रमी व कर्तृत्वशील होता. त्याचा स्वभाव फार परोपकारी व धर्मशील होता. सुम्म नामक बुद्धिमान मंत्र्याच्या मदतीनें त्यानें वितस्ता व काश्मीरांतील इतर नद्या यांनां बंधारे घालून त्यांपासून अनेक ठिकाणीं कालव्यांचीं कामें करून घेतलीं. त्यामुळें शेकडों गांवें नवीन अस्तित्वांत येऊन हजारों एकर पडीक जमीन लागवडीखालीं आली. याच्या कारकीर्दींत काश्मीरमध्यें सुकाळ झाला असें कल्हणानें म्हटलें आहे. भगवद्गीतेचें पारायण करीत असतां त्यानें आपला देह ठेवला. त्याच्यामागून त्याचा मुलगा शंकरवर्मा हा गादीवर बसला. त्यानें दिग्विजय करावयाचा निश्चय करून निरनिराळ्या देशांवर स्वार्‍या केल्या. गुर्जर, दार्वाभिसार, त्रिगर्त, इत्यादि देशांवर स्वार्‍या करून ते देश पादाक्रांत केले. दिग्विजयाच्या स्वारींत त्याच्याबरोबर ९ लक्ष पायदळ व ३०० हत्ती होते असें कल्हणानें म्हटलें आहे. शंकरवर्मा हा आपल्या बापाप्रमाणें न्यायी व उदार नव्हता. तो दुर्वर्तनी असून लोकांनां त्यानें फार त्रास दिला. तो ९०२ सालीं मरण पावला.

शंकरवर्म्याच्या मरणानंतर त्याच्या विधवा राणीनें आपल्या लहान मुलाच्या नांवानें राज्यकारभार चालविला. त्या कामीं तिनें तंत्री नामक सैनिकांचें साहाय्य घेतलें. या तंत्री नामक सैनिकांनीं पुढें शिरजोर होऊन चक्रवर्मा नांवाच्या एका राजाला काश्मीरच्या गादीवर बसविलें. पुढें या चक्रवर्म्यानें तंत्रींच्या त्रासाला कंटाळून डामर लोकांच्या मदतीनें त्यांना हांकून लाविलें. पण या डामर लोकांनीं त्याला जी मदत केली होती तबिंद्दल कृतज्ञ न रहातां त्यांनांहि त्रास देण्यास त्यानें सुरुवात केली. पुढें तो मरण पावल्यानंतर तंत्री व डामर या लोकांमध्यें यादवी माजून तंत्री लोक विजयी झाले. तंत्रींचा पुढारी कमलवर्धन यानें ब्राह्मणांनां काश्मीरच्या सिंहासनावर एक राजा निवडण्यास सांगितलें. तेव्हां सर्व ब्राह्मणांनीं मिळून यशस्कर नांवाच्या एका गृहस्थाला राज्यावर बसविण्याचें ठरविलें व तो राजा झाला.

यशस्कर हा कर्तृत्ववान् राजा होता. याच्या कारकीर्दीत प्रजेला फार सौख्य प्राप्त झालें. कल्हणानें याच्या कारकीर्दीचे फार वर्णन केलें आहे. याच्या राज्यांत कार्तांतिक, वैद्य, मंत्रि, गुरु, पुरोहितदूत, न्यायाधिकारी इत्यादि सर्व लोक चांगले शिकलेले असत व त्यामुळें, राज्यकारभार चांगल्या रीतीनें चालण्याला राजाला मदत होत असे, असें कल्हण म्हणतो. यशस्कर हा फार वर्षे जगला नाहीं. तो इ. स. ९४८ त मरण पावला त्याच्या मागूंन संग्रामदेव व नंतर क्षेमगुप्त हा गादीवर बसला. या क्षेमगुप्तानें सिंहराजनामक लोहाराधिपतीच्या दिद्दा नांवाच्या प्रसिद्ध मुलीशीं विवाह केला. क्षेमगुप्त मरण पावल्यानंतर या दिद्दा राणीनेंच राज्यकारभार चालविला. ही राणी फार वाईट चालीची होती. तिनें आपल्या भावाचा मुलगा संग्रामराज याला आपल्यामागें गादीचा वारसा ठरविलें व ती इ. स. १००३ त मरण पावली.
 
लोहर घराण्याची कारकीर्द:- लोहर घराण्याचा पहिला राजा संग्रामराज हा कर्तबगार असल्यामुळें त्याच्या कारकीर्दींत काश्मीरला भरभराटीचे दिवस लाभले. त्यानें तुर्कांविरुद्ध काबूलचा राजा त्रिलोचनपाल याच्या मदतीकरतां आपला सेनापति तुंग यास पाठविलें. पण त्रिलोचनपाल व तुंग या दोघांचाहि पराभव झाला. त्यामुळें तुर्कांनां प्रोत्साहन मिळून त्यांनी भरतखंडावर व काश्मीरवर स्वारी करण्याची महत्त्वाकांक्षा धरली. संग्रामराजानंतर हरिराज व त्याच्या पश्चात अनंतदेव हा राजा झाला. हा अनंतदेव व त्याची राणी सूर्यमती हीं फार धार्मिक होतीं. त्यांनीं आपल्या कारकीर्दींत पुष्कळ शिवालयें बांधलीं. अनंतदेवानें वानप्रस्थाश्रम स्वीकारून आपला मुलगा कलश यास राज्यावर बसविलें. पण या कलशानें त्यांनां त्यांच्या म्हातारपणीं अतिशय वाईट तर्‍हेनें वागविलें. कलशाच्या मागून हर्ष हा गादीवर आला. हा अत्यंत विद्वान असून विद्वानांचें आश्रयस्थान होता. पण अंत:स्थ यादवीमुळें त्याचे शेवटचे दिवस अत्यंत दु:खांत गेले. तो ११०१ मध्यें मरण पावला.

सातवाहन घराण्याची कारकीर्द.- हर्षानंतर सातवाहन घराण्याचा संस्थापक उच्छल हा गादीवर आला. त्यानें इ. स. ११०१ ते १११० पर्यंत काश्मीरावर राज्य केलें. त्याच्या मागून त्याचा भाऊ सुस्सल हा गादीवर आला. सुस्सलच्या कारकीर्दींत काश्मीरची पुन्हां भरभराट झाली. त्याच्यानंतर जयसिंह नांवाचा त्याचा मुलगा गादीवर बसला. हा फार सच्छील व सद्गुणी होता. याच्याच कारकीर्दीत राजतरंगीणीकार कल्हण हा झाला. या राजाच्या अमदानींत खान दलखा या तार्तर सरदारानें काश्मीरवर स्वारी करून श्रीनगर बेचिराख करून टाकलें होतें. जयसिंहाच्या मागून त्याच्या सैन्याचा अध्यक्ष रामचंद्र यानें गादी बळकाविली, पण थोड्या वर्षांनींच त्याच्या हाताखालील रैवछनशाहानें त्याचा वध करून काश्मीरचें राज्य हिरावून घेतलें. रामचंद याच्या कोटाराणी नामक मुलीशीं त्यानें लग्न केलें. त्यानें इस्लामी धर्माची दीक्षा घेतली होती. त्याच्या मरणानंतर जयसिंहाचा भाऊ उदयनदेव यानें काश्मीरवर आपली सत्ता स्थापन केली. त्यानें कोटाराणीशीं पुनर्विवाह लावला. उदयनदेवानें काश्मीरवर १५ वर्षें राज्य केलें. त्याच्या मरणानंतर कोटाराणीनें कांहीं काळ काश्मीरचा राज्यकारभार चालविला. पण त्यानंतरहि सुलतान इ काश्मीर या घराण्याच्या शमसुद्दिन नांवाच्या एका शूर पुरुषानें काश्मीरचें तख्त बळकावलें. अशा रीतीने इ. स. १३३९ पासून काश्मीरवर मुसुलमानी घराण्याची सत्ता चालू झाली. इ. स. १३९४ मध्यें सुलतान शिकंदर नांवाचा एक जुलमी राजा काश्मीरवर राज्य करीत होता. हा मूर्तिभंजक असल्यामुळें आपल्या धर्मवेडाच्या भरात काश्मीरच्या हिंदू राजांनीं बांधलेल्या अनेक देवालयांचा व रमणीय स्थानांचा त्यानें उच्छेद केला. एवढेंच नव्हें तर त्यानें काश्मीरमधील प्रजेला जुलमानें बाटविण्यासहि सुरुवात केली. इ. स. १४२० मध्यें शिकंदराच्या मागून झैन उलआबिदीन हा गादीवर आला. हा धोरणी व धर्मसहिष्णु राजा होता. त्यानें ब्राह्मणांना फारशी भाषेचा अभ्यास करण्याला प्रोत्साहन दिलें व हिंदूंचीं नष्ट देवालयें दुरुस्त करून दिलीं. त्याच्या शांततामय कारकीर्दीनंतर चक्क नांवाच्या घराण्यांतील लोकांनीं काश्मीरवर अंमल चालविला. पण यांच्या हातूनहि शेवटीं अकबर बादशहानें काश्मीर प्रांत जिंकून इ. स. १४८६ मध्यें तो आपल्या राज्याला जोडला. अकबराच्या कारकीर्दीत तोडरमल्ल यानें काश्मीरची मोजणी केली. अकबराचा मुलगा जहांगीर याला काश्मीर देश फारच आवडत असे. त्यानें काश्मीरमध्यें ७७७ बागा बनविल्या. औरंगझेबाची स्वारी एकदांच या प्राताला आली होतीं. पण तेवढ्यांत त्यानें हिंदू लोकांनां बाटविण्याचें कार्य शक्य तितकें साधून घेण्याचा यत्‍न केला.

औरंगझेबाच्या पश्चात् मोंगलशाहीस उतरती कळा लागली. त्या समयीं १७५१ मध्यें काश्मीर हें पुन्हां स्वतंत्र झालें. पण थोड्याच काळांत त्यावर अफगाणी व दुराणी लोकांनीं आपला अंमल बसविला. त्यांच्या अंमलाखालीं काश्मीरच्या प्रजेवर फारच जुलूम झाला. तेव्हां तेथील लोकांनीं नुकतेंच उदयास येत असलेल्या शीख राज्याचा संस्थापक रणजितिसंग याच्याकडे मदत मागितली. रणजितसिंगानें त्यांनां मदत करण्याचें कबूल करून काश्मीरवर इ. स. १८१४ मध्यें स्वारी केली; पण ती सिद्धीस गेली नाहीं. पुन्हां १८१९ मध्यें त्यानें आपला सेनापति मिसर दिवाणचंद याला काश्मीरवर पाठविलें. या स्वारींत रणजितसिंगाला जय मिळून काश्मीर हें शीखांच्या सत्तेखालीं आलें.

इ.स. १८१९ पासून तों १८४५ पर्यंत काश्मीरवर पुष्कळ शीख सुभेदार येऊन गेले. १८४५ त इमामउद्दीन हा तेथील सुभेदार होता. याच सुमारास आणखी एक व्यक्ति उदयास आली होती. या व्यक्तीचें नांव गुलाबसिंग असें होतें. गुलाबसिंग हा डोग्रा जातीचा रजपूत होता. त्याचें जम्मू येथें लहानसें संस्थान होतें. तो अत्यंत कर्तृत्ववान असल्यानें त्यानें आसपासच्या डोंगराळ प्रदेशावर स्वार्‍या करून तेथील लहान लहान संस्थानें आपल्या अंमलाखालीं आणलीं होतीं. १८४० च्या सुमारास त्यानें किस्ताबर, लडख, बाल्तिस्तान इत्यादि परगणे ताब्यांत आणून काश्मीरच्या आजूबाजूस आपली सत्ता स्थापन केली होती. १८४५ सालच्या इंग्रज व शीखांच्या युद्धांत गुलाबसिंग तटस्थ राहिल्यानें इंग्रजांनां जय मिळाला. याबद्दल इंग्रजांनीं गुलाबसिंगाला काश्मीर प्रांत दिला. तरी पण काश्मीर संस्थानांतील गिलजित हा प्रांत अद्यापि शीखांच्या ताब्यांत होता. त्या प्रांतावर स्वारी करून तोहि प्रांत त्यानें आपल्या ताब्यांत आणला. नंतर त्यानें महाराजा हा किताब धारण केला. पण इ. स. १८५२ मध्यें त्याच्या सैन्यांत फितुरी झाल्यामुळें गिलजित प्रांत हा गुलाबसिंगाच्या ताब्यांतून गेला. पुढें गुलाबसिंग १८५७ मध्यें मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा रणवीरसिंग हा गादीवर आला. त्यानें १८५७ सालच्या बंडांत इंग्रजांनां मदत केली. १८६० मध्यें त्यानें गिलजित प्रांत पुन्हां ताब्यांत आणला. रणवीरसिंग हा १८८५ सालीं मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र प्रतापसिंग ( जी. सी. एस. आय. इत्यादि ) हा गादीवर बसला. हेच हल्लीं काश्मीर व जम्मू संस्थानचे अधिपति आहेत.

[ संदर्भग्रंथ- बर्नियर- व्हॉयेजेस ( १६९९ ); व्हिग्नेट्रॅव्हल्स इन काश्मीर, लदख, इस्कर्डो ( १८४२ ) ; कनिंगहॅमअ‍ॅन एसे ऑन दि ऑन दि अरियन ऑर्डर ऑफ आर्किटेक्चर, अ‍ॅज एक्झिबिटेड इन दि टेम्पल्स ऑफ काश्मीर ( १८४८ ) ; जे बिडुल्फ-ट्राइब्स ऑफ हिंदुकूश ( १८८० ) ; ड्रयू-जम्मू अँड काश्मीर टेरीटरीज ( १८७५ ) ; नाईट-व्हेअर थ्री एम्पायर्स मीट ( १८८३ ) ; लॉरेन्स-दि व्हॅली ऑफ काश्मीर (१८९५) ; लिडेक्केर-रेकार्डस् ऑफ दि जीऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ( १८९३ ) ; ड्यूक-काश्मीर हँडबुक ( १९०३ ) ; कल्हण- राजतरंगिणी ; गो. चिं. भाटे- हिंदुस्थानचें नंदनवन ( १९१९ ) ].

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .