विभाग अकरावा : काव्य - खतें
काश्मीरी- काश्मीर, पंजाब, व वायव्य सरहद्दप्रांत यांतून आढळणार्या मुसुलमानांची जात. यांची खुद्द काश्मीरमधील लोकसंख्या ७,६५,४४२ असून या जातींतील लोक मुसुलमानी धर्माचे आहेत. या जातीचें नांव जरी स्थलावरून पडलेलें आहे तरी निरनिराळ्या जातींतील व समाजांतील फरक इस्लामी धर्मानें नाहींसा केल्यामुळें ही एक निराळी जात बनली आहे. काश्मीरमध्यें जुन्या तर्हेचें समाजवैचित्र्य जरी असलें तरी काश्मीरच्या बाहेर येथील लोकांनां सरसकट ‘काश्मीरी’ म्हणतात आणि इतर कोणत्याहि जातींत न येणारे मुसुलमान ‘काश्मीरी’ याच सदराखालीं मोडतात. पंजाबांतील काश्मीरींची लो. सं. १,७८,२४१ आहे. पंजाबांत काश्मीरी लोक मुख्यत: मुसुलमान आहेत. हिंदू तेवढे काश्मीरी ब्राह्मण आहेत. काश्मीरी शीख हे मूळचे ब्राह्मण असून शीख लोकांचें राज्य असतांना काश्मीरमध्यें गेलेल्या पंजाबी लोकांशीं रोटीबेटीव्यवहार करून भ्रष्ट झालेले हे लोक होत. काश्मीरी मुसुलमान मुख्यत: सर्व पंजाबमध्यें पसरलेले आहेत. तथापि ते रावळपिंडी व लाहोर प्रांतांत जास्त प्रमाणांत आढळतात. वायव्य सरहद्द प्रांतांत काश्मीरांची संख्या १९११ ) २८,६३१ आहे. [ सेन्सस रिपोर्ट १९११. पु. १४ व २०; रोजची ग्लॉसरी, पु.२ ].