विभाग अकरावा : काव्य - खतें
कासेगांव (१)- मुंबई इलाखा. सोलापूर जिल्हा. हें सोलापूरच्या ईशान्येस ८ मैलांवर आहे. गांवांत कासेश्वराचें हेमाडपंती देवालय आहे. येथें ता. २६।३।१७७४ रोजीं रघुनाथराव दादासाहेब व बारभाईतर्फे त्र्यंबकराव मामा पेठे यांची लढाई होऊन तींत मामांचा पराभव झाला व मामा हे अतिशय जखमी झाले. मामांची फौज १८ कोसांची मजल चालून आल्यानें थकली होती. ‘घोडीं, माणसें मांदी झालीं होतीं, ( परंतु ) गांठ पडल्यावर मागें सरूं नये ( सरतां येत नव्हतें ).’ कासेगांवच्या माळावर ही लढाई झाली. दादासाहेबांकडील गारद्यांनीं व हुजरातीनें मामांच्या हुजरातीला पळवून लाविल्यानें व त्यांची फौज दमल्याभागल्यानें त्यांचा मोड झाला. जरीपटक्याचा हत्ती, नौबती वगैरे दादासाहेबांनीं काबीज केलें. मामांनां तीन जखमाहि झाल्या होत्या; ते पाडाव झाले आणि लगेच दुसर्या दिवशीं वारले. या अपजयाचें कारण बहुतेकांच्या मतें ‘मामांनीं उतावळी केली, यामुळें यश त्यांस ( दादासाहेबांस ) आलें असें आहे [ खरे-ऐ. ले. सं. भा. ५; राजवाडे खंड. ८.१०.११ ].