विभाग अकरावा : काव्य - खतें
काळाआजार- हा रोग हिंदुस्थान, चीन, आसाम या देशांत आणि ट्यूनिस, अल्जिरिया, अरबस्तान व मिसरदेश या देशांत पहाण्यास सांपडतो.
का र णें.- माशा, डांस, ढेंकूण यांच्या कोठ्यांत जे प्राणिज जंतू सांपडतात त्यांच्या शोधकांवरून नामाभिधान पावलेले लीशमन डोनोव्हन नामक जंतू या रोगाचा वरील कीटकांच्या सहाय्यानें प्रसार करतात.
ल क्ष णें.- अनियमित, सतत अशा कोणत्या तरी रीतीनें तापास सुरुवात होऊन पंडुरोग उत्पन्न होऊन शरीर फार फिकट होतें. शरीर कृश होऊन शक्ति फार कमी होते आणि यकृत व फ्लीहा मोठ्या होतात. नाक व हिरड्यांतून रक्त कधीं कधीं येतें व त्वचेखालीं ठिकठिकाणीं रक्त फुटलेलें आढळतें. हातापायांच्या हाडांच्या टेकाळांमध्ये दुखूं लागतें, तोंड व घोटे या ठिकाणीं कधीं सूज येते व संध्याकाळीं ती नाहींशी होते; व कधी तर रोग्यास जलोदर होतें, व अशा वेळीं रोग्याचें यकृत फार मोठें वाढलेलें असते. अतिसार, हगवण, कफ, श्वास, दमा, फुफ्फुसदाह यांपैकीं रोग बहुतकरून होतातच; व याच आगंतुक रोगांमुळें किंवा अन्य आगंतुक दोषांमुळें रोग्यास मरण येतें. रक्ताची एक ठरीव विकृतस्थिति होऊन बसते. त्यांतील लाल कण जवळ जवळ निम्मे नाहींसे होतात व त्यांतील लोहाचा अंश व पांढर्या कणांचें प्रमाणहि बरेंच कमी होतें.
रो ग नि दा न.- हात अगर पाय यांतील रक्तांतील पांढरे गोलक तपासावे पण या रीतीनें निदान करण्यास बराच वेळ लागतो. यकृतामधील रक्त सावधगिरीनें काढून तें तपासतात. या तपासामध्यें हा रोग हिंवताप अगर विषमज्वर नाहीं असें या रोगांच्या जंतूंच्या अस्तित्वावरून व त्या रोगजंतूंच्या अभावावरून खात्रीपूर्वक सिद्ध होतें.
सा ध्या सा घ्य वि चा र.- रोगी कित्येक महिने जगतो. नंतर शेकडा ९० रोगी दगावतात असें आकड्यांनीं सिद्ध झालें आहे.
उ प चा र.- कोयनेल जास्त प्रमाणांत दिल्यानें उपयोग होतो असें रॉजर्स या डॉक्टरचें मत आहे. पण दसरे कित्येक म्हणतात कीं, त्याचा उपयोग रोगप्रतिबंध करण्याच्या कामींच विशेष होतो व कित्येकांच्या मतें त्यानें बिलकुल उपयोग होत नाहीं. ट्यूनिसमध्यें व मॅनसन या डॉक्टरानें दुसर्या देशांत एटाक्सील हें औषध गुणावह आहे असा अनुभव घेतला आहे. अँटिमनी टार्ट्रेट या औषधाचा द्रव शिरांच्या मार्गे रक्तांत घालून गुण येतो याची प्रचीति रॉजर्स व दुसर्या डॉक्टरांनीं घेतली आहे. यासाठी १०० भाग पाण्यांत २ भाग अँटिमनी टार्ट्रेट या प्रमाणांत द्रव करून पहिल्या दिवशीं ४ क्यूबिक सेंटिमिटर टोंचून रक्तांत घालतात. नंतर दोनतीन दिवसांनीं ६ क्यूबिक सें. मी. औषध घालून पुन:दर दोनतीन दिवसांनीं एक एक क्यूबिक सें. मी. औषध वाढवून त्यांचें १० क्यू. सेंटिमीटर प्रमाण वाढेपर्यंत टोंचून घालतात. मध्येंच अँटिमनी जास्त झाल्यानें ओकारी वगैरे झाल्याचीं चिन्हें दिसलीं तर औषध वाढविण्याचें तहकूब ठेवावें. ताप बंद होऊन पाणथरी नेहमींच्या आकारांत येईतों औषध हळूहळू वाढवावें. २० क्यू. सेंटि. औषध त्रासाशिवाय पचल्याचीं उदाहरणें आहेत. ताप कमी होण्यास पांचसहा पासून दहाबारा आठवडे लागतात. परंतु पाणथरी कमी होण्यास मात्र तीन, सहा, अगर नऊ महिनेहि लागतात. यानंतर रक्तांतील तांबड्या व पांढर्या गोलकांचें वाजवी प्रमाण पूर्ववत् येतें. पाणथरींतील रक्तांत सापडणारे प्राणिज रोगजंतु नाहींसे होतात. हें औषध टोंचतांना तें शिरेंतच जाईल, बाहेर सांडणार नाहीं अशी खबरदारी घेतली नाहीं तर सांडलेल्या जागीं सूज व दु:ख मनस्वी होतें. म्हणून निदान मुलांच्या बाबतींत अँटिमनींची अतिबारीक केलेली पूड लॅनोलीन या मलमात खलून तें चोळावें म्हणजे बराच उपयोग होतो.