विभाग अकरावा : काव्य - खतें
किंग्जटाउन- आर्यंलड. डब्लिन परगण्यांतील बंदर ; हें दक्षिण पार्लमेंटरी विभागांत डब्लिन उपसागराच्या आग्नेय टोंकाकार डब्लिनपासून डब्लिन अॅन्ड साउथ ईस्टर्न रेल्वेनें मैल आग्नेयीस आहे. या शहराची लोकसंख्या ( १९०१ ) १७३७७ होती. हें मोठें बंदर व समुद्रकिनार्यावरील आरोग्यकारक ठिकाण असून इ. स. १८२१ मध्यें चौथा जॉर्ज आयंर्लडमधून परत जातांना येथें उतरला होता म्हणून याचें किंग्ज टॉउन असें नांव पडलें. यापूर्वी या शहरास डनलेरी असें नांव होतें. किंग्जटॉउन हें डब्लिन स्टीम पॅकेट कंपनीच्या होलीहेडला जाणार्या मेल आगबोटीचें बंदर व लंडन अॅन्ड नॉर्थ वेस्टर्न रेल्वेचें स्टेशन आहे. येथून ग्रेट ब्रिटन व दुसर्या देशांशीं निर्गत व आयात व्यापार बराच चालतो. येथून गुरें बाहेर देशीं फार जातात, तसेंच धान्य वगैरेहि माल बाहेरून येतो.
येथें समुद्रांत मासे धरण्याचा मोठा धंदा चालतो येथें रॉयल आयरिश, रॉयल सेंट जॉर्ज व रॉयल ऑलफ्रेड हे तीन क्लब आहेत.