विभाग अकरावा : काव्य - खतें
किमेदिजमीनदार- हल्लीं गंजमजिल्ह्यांमध्यें पर्ल किमेदि, पेद्द किमेदि व चिन्न किमेदि अशा तीन जमीनदारी आहेत. येथील जमीनदार एकाच वंशांतले आहेत. यांचा वंश फार प्राचीन असून ते आपणांस ओरिसाच्या केसरी राजांचे वंशज म्हणवितात. पण यांच्याबद्दल विशेषत: पेद्द किमेदि व चिन्न किमेदि यांबद्दल मुळींच माहिती मिळत नाहीं. मि. सी. एफ. मॅककार्टि यांनीं या जमिनदारीबद्दलच्या कागदांवरून तयार केलेली पर्ल किमेदि घराण्यांतील पुरुषांची यादी पुढें दिली आहे. [ द. हिं. घराणीं ].
कपिलदेव ( १२२७-१२४५ ) |
नरसिंहदेव (१२४५-१२६५) |
मदनदेव (१२६५-१२९०) |
नारायणदेव (१२९०-१३०९) |
आनंददेव (१३०९-१३१७) |
अनंदरुद्रदेव (१३१७-१३२५) |
जयरुद्रदेव (१३२५-१३६७) |
लक्ष्मीनरसिंह भानुदेव (१३६७-१३९२) |
मधुकर्णदेव (१३९२-१४२३) |
मृत्यूंजय भानुदेव ( १४२३-१४५७ ) |
माधवमदनसुंदर भानुदेव ( १४५७-१४९४ ) |
चंद्रबेताल भानुदेव ( १४९४-१५२७ ) |
सुवर्णलिंग भानुदेव ( १५२७-१५६६ ) |
शिवलिंग नारायणदेव ( १५६६-१५९० ) |
सुवर्णकेसरी नारायणदेव ( १५९०-१६३० ) |
मुकुंदरुद्र नारायणदेव ( १६३०-१६५६) |
मुकुंददेव ( १६५६-१६७४ ) |
अनंत पद्मनाभ नारायणदेव ( १६७४-१६८६ ) |
सर्वज्ञ जगन्नाथ नारायणदेव ( १६८६-१७०२ ) |
नरसिंहदेव दुसरा ( १७०२-१७२९ ) |
वीरपद्मनाभ नारायणदेव ( १७२९-१७४८ ) |
वीरप्रतापरुद्र नारायणदेव ( १७४८-१७६६ ) |
जगन्नाथ नारायणदेव ( दत्तक ) (१७६६-१८०६) |
गौरचंद्र गजपति नारायणदेव ( १८०६-१८३९ ) |
पुरुषोत्तम गजपति नारायणदेव (१८३९-१८४३) |
जगन्नाथ गजपति नारायणदेव ( १८४३-१८५० ) |
वीरप्रतापरुद्रगजपति नारायणदेव ( १८५० ) |
गौरचंद्र गजपति नारायणदेव ( मृ. १९०५ ) |
श्रीकृष्णचंद्र गजपति नारायणदेव ( विद्यमान ) |
प र्ल कि मे दि.- हें घराणें प्राचीन कलिंगराज घराण्याचें वंशांतील आहे हें वर सांगितलेंच आहे गंगा ते कृष्णा यांच्या दरम्यानचा पूर्वेकडील प्रदेश एकेकाळीं ( कमजास्ती प्रमाणानें ) यांच्या ताब्यांत होता. या घराण्याचा जो वंशवृक्ष ९१ व्या शतकांत तयार झाला त्यांत यांचा वंश उत्तरहिंदुस्थानांतील चंद्रवंशी एका रजपूत राजपुत्रापासून सुरू झाल्याचें दिलें आहे. या राजपुत्रास गंगेच्या प्रसादानें एक पुत्र झाला, त्यामुळें त्याचें नांव पडलें. पुढें या वंशांतील एका धाडशी पुरुषानें पश्चिमहिंदुस्थानांत गंगवाडी नांवाचें राज्य स्थापून त्याची राजधानी कोल्हालपूर ही केली. कांहीं पिढ्यांनंतर कामार्णवदेव नांवाच्या राजानें आपलें राज्य आपल्या चुलत्याच्या स्वाधीन करून आपल्या चार भावांसह तो मुलुखगिरीस निघाला. देश जिंकीत जिंकीत तो महेंद्र देशास आला व तेथील बालादित्यराजाचा पराभव करून त्यानें त्या कलिंगदेशावर आपलें गंगराज्य स्थापिलें. ही गोष्ट आठव्या शतकाच्या प्रारंभीची आहे. या राज्याची राजधानी कलिंगनगर म्हणून पुष्कळजण समजतात; परंतु ती चूक असून हल्लीं हें गांव म्हणजे या गंगवंशांतील पर्लकिमेदि या जमीनदारांच्या ताब्यांतील वामस्तधारा नदीच्या कांठावरील मुखलिंगम् नांवाचें लहान खेडें व त्या भोंवतालची जागा होय. कलिंगनगर ही राजधानी पुढें तीन शतकें होती. तेथें त्या काळांत मोठमोठ्या, सुंदर व कलाकुसरीच्या इमारती बांधल्या गेल्या; त्यांपैकी हल्लीं तीन जीर्णावस्थेंत उभ्या आहेत; पैकीं एक नवव्या व दोन दहाव्या शतकांत बांधलेल्या आहेत. याशिवाय, राज्यांत दुसरीकडेहि त्यांनीं इमारती बांधल्या. या गंग राजांनीं जे पराक्रम केले, ऐश्वर्य भोगलें, देव व ब्राह्मणांचा जो सत्कार केला व दानें दिलीं त्यांची माहिती, त्या भागांत सांपडणार्या या राजांच्या शिलालेखांवरून व ताम्रपटांवरून बरीच समजते. या घराण्यांतील राजराजदेव या राजानें इ.स. १०७५ मध्यें राजेंद्र चोल व वेंगीराज विमलादित्य यांचा पराभव केला आणि किमेदि, कोसल व ओड्डदेस यांच्या राजांनां जिंकिलें. याचा मुलगा अनंतवर्मा चोड गंगदेव यानें ११ व्या शतकाच्या अखेरीस ओरिसा प्रांत काबीज केला. हाच कलिंगनगर येथील शेवटचा अभिषिक्त राजा होय.
यानंतर राजधानी ओरिसा प्रांतांत गेली; यावेळची बहुतेक हकीकत, सर. डब्ल्यू. हंटर यांच्या अनॅलिसिस् ऑफ ओरिसा या पुस्तकांत आढळते. तेथील सर्व राजे गजपती हें उपपद धारण करीत असत व आजहि पर्लकिमेदीचा जमीनदार आपणास गजपति म्हणवीत असतो. बाराव्या शतकांत या वंशांतील कपिलेंद्रदेव नांवाच्या राजानें किमेदि प्रांतावर स्वारी केली. पुढें त्याच्या नरसिंह नांवाच्या वडील मुलानें भावांच्या भांडणामुळें ओरिसा सोडून किमेदी येथें स्वतंत्र राज्य स्थापिलें.
ही वरील सारी हकीकत दंतकथेच्या आधारानें दिलेली आहे. परंतु किमेदीचें गजपती घराणें ही ओरिसाच्या मुख्य गंगवंशाची शाखा आहे याबद्दल, प्रतापरुद्राच्या मुलाच्या खुनानंतर ओरिसा शाखेचें तेथलें अस्तित्व नाहींसें झाल्याबद्दल व तें राज्य गोविंदविद्याधर या प्रधानानें काबीज करून इ. स. १५४३ त स्वत: राज्यपद स्वीकारल्यानंतर, हें किमेदीचें घराणेंच काय ती गंगवंशाची अवशिष्ट शाखा राहिल्याबद्दलचा कांहीं पुरावा आढळतो. या किमेदि घराण्यानें तीनचार शतकें गंजम व विजगापट्टम् या प्रांतावर स्वतंत्रपणें राज्य केलें. पुढें विजयानगरकर व मुसुलमान यांनीं यांना मांडलिक बनविलें. यावेळीं त्यांच्याकडे जो थोडा प्रांत राहिला तो अत्यंत डोंगराळ असल्यामुळें शत्रूंचा उपसर्ग तेथें त्यांना झाला नाहीं. पुढें इंग्रजी झाल्यानंतर, या राजांनीं व त्या प्रांतांतील कांहीं जमीनदारांनीं इंग्रजांच्या विरूद्ध थोडीशी उचल केली होती. परंतु इंग्रजांनीं ती दाबून टाकून व राजाला पदच्युत करून जवळ जवळ एक शतकपर्यंत तेथील कारभार आपल्या एजन्सीमार्फत चालविला.
श्रीकृष्णचंद्र गजपती नारायणदेव ( गजपती नारायणदेव हें या घराण्याचें बिरुद आहे ) हे हल्लींचे जमीनदार राजे आहेत. यांचा जन्म ता. २६ एप्रील १८९२ रोजीं झाला. यांचे वडील गौरचंद्र हे इ. स. १९०५ मध्यें वारले. कृष्णचंद्र यांचें शिक्षण मद्रासेस झालें. संस्थान ६१४ चौरस मैल क्षेत्रफळाचें व सहा लाख रुपये उत्पन्नाचें आहे. विद्यमान राजे हे २६ एप्रिल १९१३ रोजीं गादीवर बसले. संस्थानांत एक सेकंड ग्रेड कॉलेज ( वसतीगृहासह ), दोन मुलींच्या शाळा, एक संस्कृत पाठशाळा, एक सराई असून पर्लकिमेदी लाईट रेल्वे आहे. हा आगगाडीचा रस्ता गौरचंद्र यांनीं बांधला. तो बंगालनागपूर रेल्वेच्या नौपाडा स्टेशनपासून सुरू होऊन पर्लकिमेदीस संपतो; याला आठ लाख रुपये खर्च आला. या घराण्याचें ब्रीदवाक्य “विश्वास व बळ” असें आहे. महायुद्धांत संस्थानानें इंग्रजांनां शक्तीप्रमाणें पैशाची मदत केली. विद्यमान राजांनां, मल्लविद्या, शिकार व मैदानी खेळ यांची आवड आहे. [ रा. नित्यानंद पट्टनाईक, पर्लकिमेदीचे राजवाड्याचे व्यवस्थापक यांनीं पाठविलेल्या माहितांवरून ].