विभाग अकरावा : काव्य - खतें
किरात- ही एक प्राचीन अशी अनार्य जात होय. ही डोंगराच्या पायथ्याशीं रहात असे. किरात जातीसंबंधीं वैदिक माहिती विभाग ३ पृ. २५८ मध्यें पहा. हल्लींचें टिपरा संस्थान हा पूर्वीचा किरात देश होय असें म्हणतात. आर्यावर्ताच्या नैर्ऋत्येस व ईशान्येस हा प्रदेश असून तेथें या नांवाची जाति रहात असे. व त्यांच्या राजाचें नांवहि किरातराज होतें असें बृहत्संहितेंत म्हटलें आहे. विष्णुपुराणांत हे लोक भरताच्या पूर्वेस रहात असा पुरावा मिळतो. ( विष्णुपुराण ७.३० ). महाभारतांत यांनां जांगला बरोबर उल्लेखिलें आहे. या लोकांचा मुख्य धंदा पारध हा असे. अर्जुन पाशुपतास्त्र मिळविण्याकरितां तपश्चर्या करीत असतां शंकरांनीं किराताचें रूप घेऊन त्याच्याशीं लढाई केली होती हें प्रसिद्धच आहे. भारत व भागवत यांमध्येंहि किरातांचा उल्लेख येतो. इंद्रप्रस्थ मध्य धरून त्याच्या पूर्वेस, पश्चिमेस व उत्तरेस तीन किरात देश होते असें म्हणतात व त्यांपैकीं उत्तर किरातांत धवलगिरी व चंदगिरी अशीं हिमायाचीं दोन शिखरें येत आणि पूर्वकिरातांत त्रिपुरी ( टिपरा?) शहर येई असा एके ठिकाणीं उल्लेख आहे. [ बृ. संहि. अ. ९ ११,१४: भागवत स्कं. २, ९; इंडि. अँटि. पु. ५, अर्वा. कोश. प्रा. कोश. ].