विभाग अकरावा : काव्य - खतें
किर्चाफ, गुस्टाब राबर्ट (१८२४-१८७५)- या जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रवेत्याचा जन्म प्रशियांतील कोनिग्स्बर्ग गांवीं झाला व तेथील विश्वविद्यालयांतील शिक्षण घेऊन त्यानें सन १८४७ सालीं पीएच्. डी. ची पदवी मिळविली. सन १८५० सालीं तो ब्रेस्ला येथें पदार्थविज्ञानशास्त्राचा प्रोफेसर झाला. पुढें त्यानें हायडलबर्ग आणि बर्लिन येथें प्रोफेसराचें काम केलें. तो बर्लिन येथें प्रोफेसराच्या जागेवर असतांनाच १८७५ त वारला. किर्चाफ यानें जे शोध लावले ते विशेषत: प्रयोगांवरून लावलेले नसून गणिताच्याच आधारावर लावले. त्यानें गणितात्मक पदार्थविज्ञानशास्त्रांत पुष्कळच भर घातली आहे. निरनिराळ्या आकाराच्या वाहकांतून कोणकोणत्या प्रमाणांत विद्युत् जाते याविषयीं त्यानें अनेक नियम बसविले आहेत. ओहमच्या नियमाविषयीं त्यानें बरीच नवीन माहिती उपलब्ध केली. सामुद्रिक तारायंत्र आणि चुंबकत्व यांच्या विषयींहि पुष्कळ नवीन माहिती त्यानें उपलब्ध केली. लोहांतून उष्णतावहन, स्फटिकांतून होणारें वक्रीभवन आणि परावर्तन, द्रावणासंबंधानें गत्युष्णतात्मक ज्ञान इत्यादि विषयांवर त्यानें नवीन माहिती उपलब्ध केली. विसर्जनासंबंधानें त्यानें जें काम केलें आहे त्यायोगानें त्याचें नांव जास्त प्रसिद्धीस आलें आहे. विसर्जनाकरितां गणित करीत असतांना त्यानें प्रकाशपृथक्करणशास्त्रांतील एक फार महत्त्वाचा शोध लावला. सूर्य व इतर तारे यांच्या प्रकाशाच्या पृथक्करणाच्या योगानें त्या खस्थ ज्योतींत पृथ्वीवरील कोणकोणतीं द्रव्यें असतात यासंबधाचें ज्ञान उपलब्ध करून देणारें साधन त्यानें तयार केलें. या दिशेनें दुसर्यानीं त्याच्या पूर्वी कांहीं कार्य केलें होतें. परंतु त्या झालेल्या कार्यासंबंधानें त्यालाज्ञान नसल्याकारणानें त्यानें हें सर्व ज्ञान स्वसामर्थ्यांवर उपलब्ध केलें व या योगानें त्याची बुद्धिमत्ता उत्तम प्रकारें दिसून आली.