विभाग अकरावा : काव्य - खतें
किलार्ने- हें आयर्लडच्या केरी परगण्याचें बाजारचें शहर पूर्व पार्लमेंटरी विभागांत डब्लिनपासून नैर्ऋत्येस सुमारें १८५ मैलांवर ग्रेट सदर्न अँड वेस्टर्न रेल्वेवर आहे. या शहराची लोकसंख्या (१९०१) ५६५६ होती. या शहराजवळील देखावा फार मनोरम असल्यामुळें येथें प्रवासी लोक बरेच येतात. येथें रोमन क्याथोलिक प्रार्थनामंदिर व बिशपचा महाल ही सर्वात उत्तम इमारत आहे. शहराजवळ केनमेरच्या अर्लचा राजवाडा आहे. येथें शिल्पकलेची व हस्तकौशल्याची शाळा आहे. येथें मजेदार (फॅन्सी) जिनसा तयार करण्यात येतात. किलार्नें सरोवर शहरापासून सुमारें ९।। मैलावर आहे. लॉफलीनजवळ रॉस दुर्गाचे अवशेष व ‘स्वीट इनिसफालनचे’ अवशेष प्रेक्षणीय आहेत. यांशिवाय मॅक् गिलीकुडीज रीक्स व टार्क आणि पर्पल पर्वत, हुनलोची खिंड, टोके आणि डेरीकुनिहीचे धबधबे वगैरे फार मनोरम देखावे आहेत. डनलोच्या ओघाम गुहेंत शिलालेख आहेत. जवळच्या नदींत ट्राउट व सालमन मासे सांपडतात. येथील वनस्पती वनस्पतिशास्त्रदृष्ट्या फार प्रेक्षणीय आहेत. ओडानोघे या पौराणिक वीराचा या गांवाशीं पुष्कळसा संबंध लावितात.