विभाग अकरावा : काव्य - खतें
किलहार्न डॉ. एफ्.- एक प्राच्य- विद्या-विशारद जर्मन पंडित. किलहार्न इ. स. १८६२ मध्यें पुण्याच्या “डेक्कन कालेजात” पौरस्त्य भाषांचा प्रोफेसर म्हणून आला. हिंदुस्थानांत असतांनां त्यानें येथील पंडितांची मैत्री संपादन केली. त्यानें मॅक्समुल्लरला सायणटीकेसह ऋग्वेदाची पहिली आवृत्ति काढण्याच्या कामीं मदत केली. हिंदुस्थानांत याने पंडिताजवळ व्याकरणाचा अभ्यास केला याच्या पुस्तकावरून हा चांगला वैय्याकरणी होता असें दिसतें. यानें “पंतजलीचें महाभाष्य” व नागोजीभट्टाचें “परिभाषेंदुशेखर” ह्या पुस्तकांच्या विद्वत्तापूर्ण आवृत्या काढल्या व व्याकरणविषक निबंधहि बरेच लिहिलें.
हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास उपलब्ध करणार्या अंकित लेखांचा अर्थ लावण्याच्या कार्मीहि यानें बरीच मेहनत घेतली व याच्याच अविश्रांत व नि:स्वार्थी श्रमामुळें प्राचीन हिंदुस्थानचा बराच इतिहास उपलब्ध झाला आहे.
हा हिंदुस्थानातून जर्मनींत गॉटिनजन् विश्वविद्यालयांत संस्कृतचा प्रोफेसर म्हणून गेला. व इ. स. १९०८ च्या मार्च महिन्यांत ख्रिस्तवासी झाला.