विभाग अकरावा : काव्य - खतें
कीटस् जॉन- (इ. स. १७९५-१८२१) एक इंग्रजी कवि. कीट्स या इंग्लिश कवीचा जन्म लंडन येथें झाला. त्यानें लहानपणीं थोडाबहुत वैद्यकीचा अभ्यास केला. परंतु काव्याकडे त्याचा तेव्हांपासूनच फार कल होता. त्याच सुमारास त्याची लीहंट व शेले या कवींशीं ओळख झाली व या ओळखीनें त्याला काव्यस्फूर्ति होऊन तो कविता करूं लागला. त्यानें प्रसिद्ध केलेलीं पहिलीं दोन पुस्तकें लोकांनां पसंत पडलीं नाहींत. परंतु त्याच्या तिसर्या पुस्तकाच्या प्रसिद्धीपासून त्याची उत्तम इंग्लिश कवींत गणना होऊं लागली. तरी ‘एंडिमियन’ वरच ब्लॅक वुड् व क्वार्टलीं रिव्ह्यू या नियतकालिकांतून फार कठोर टीका झाली. त्यानें लिहिलेलें ‘लॅमिआ’ हें काव्य त्यांतील लहान सहान दोषांकडे दुर्लक्ष केल्यास इंग्लिश भाषेंतील काव्यांत फारच उत्तम ठरतें. हायपेरिअन हें काव्यहि लॅमिआइतकेंच सरस आहे. त्यानें लिहिलेल्या चतुर्दश चरणात्मक काव्यांत ‘ऑर्न फर्स्ट लुकिंग इन्टु च्यापमन्स् होमर’ हें सर्वांत उत्तम आहे. ‘ऑटम’ ‘नायटिंगेल’ व ‘मेलँकली’ हीं त्याच्या बोधपर लघुकाव्यांत चांगलीं समजतात. त्यांच्या ‘ओथो दि ग्रेट’ या खेळांत असलेल्या कांहीं ओळीवरून या कवीला शेक्सपियरच्या बरोबरीचा म्हणण्यांत फारशी अतिशयोक्ति होणार नाहीं. रसात्मक काव्यें या जगांत पुष्कळ आहेत, परंतु कीटसचीं काव्यें या सर्वांत फारच मनोवेधक आहेत. हा कवि निसर्गसौंदर्यप्रिय असून ग्रीक भाषेंतील काव्याप्रमाणें याच्या काव्यांतील विषयलोलुपता मर्यादित आहे.
त्याच्या काव्यांतील वैशिष्ट्यें म्हणजे प्रबल वैषयिक कल्पना आणि सौंदर्यप्रेम फार चांगल्या रीतीनें वर्णन करण्याची हातोटी आणि अतिशय कर्णमधुर अशी पद्यरचना हीं होत. गरीबी प्रेमसंबंधांत झालेली निराशा व आनुवंशिक क्षयरोग यांमुळें लहान वयांतच त्याला मृत्यु आला. त्याचा कविमित्र शेले यानें त्याच्या मृत्यूवर एक अॅडोनिस नांवाचें काव्य लिहिलें आहे.