विभाग अकरावा : काव्य - खतें
कीर्तन- भक्तीच्या ज्या नऊ पायर्या (‘श्रवणं कीर्तनं विष्णो’ इत्यादि) सांगितल्या आहेत. त्यापैकीं कीर्तन ही दुसरी पायरी आहे. कीर्तन करणें ही एक उपासनाच आहे असें ‘सततं कीर्तयंतोमां’ या वाक्यावरून म्हणण्यास हरकत नाहीं. हें जरीं कीर्तनाचें मुख्य अंग असलें तरी जगाला सन्मार्गाला लावणें, त्याला यथायोग्य उपदेश करून हें प्रवर्तित झालेलें अनादि चक्र यापुढेंहि तसेंच चाललें पाहिजे अशी व्यवस्था करणें, हाहि कीर्तनाचा एक प्रधान हेतु आहे. तो हेतु साधण्याकरितां म्हणून कीर्तनांत देवाच्या व भक्तांच्या निरनिराळ्या कथांचा आदर्श पुढें ठेवण्याची रीत पडली आहे.
हा संप्रदाय फार प्राचीन आहे. याचे आद्यगुरू नारद होत. प्रख्यात भगवद्भक्त ध्रुव, प्रल्हाद इत्यादिकांचे नारद हे गुरू होत. कीर्तनपरंपरा महाराष्ट्रांत जितकी रुजली इतकी ती इतरत्र हिंदुस्थानांत रुजलेली आढळत नाहीं. भजन करण्याची रीत मात्र सर्वत्र आहे. वारकरी संप्रदायानें ही चाल जास्त जोरानें उचलून धरिली. तत्पूर्वीं मध्यकालांत ती असल्याचा ऐतिहासिक दाखला आढळत नाहीं. या संप्रदायांतील ज्ञानेश्वर, नामदेव, भानुदास हे पहिले कीर्तनकार होत. नामदेवाचें कीर्तन फार प्रेमळ असे. ‘नामदेव कीर्तन करी, पुढें नाचे पांडुरंग’ हा अभंगचरण यास आधार आहे. नामदेवाच्या पुढें तुकारामानें कीर्तनाचा प्रसार जास्त केला. श्रीसमर्थ रामदास व त्यांचे बहुतेक शिष्य कीर्तन करीत असत. इतर शिष्यांचें असो, पण खुद्द शिवछत्रपति यांनीं एकदां कीर्तन केल्याचा उल्लेख आढळतो. मराठी मुत्सद्यांत कांहींनीं कीर्तन केल्याचा दाखला सांपडतो. महादजी शिंदे, परशुरामपंत प्रतिनिधि, सदाशिव माणकेश्वर यांनीं कीर्तन केले होतें.
बंगालमध्यें “कीर्तन” म्हणजे एक निराळीच चीज आहे. एक पुढारी दोन चार शब्द उच्चारतो व इतर मंडळी त्यांचा पुनरुच्चार करतात. महाराष्ट्रांतील कीर्तनांत ईश्वरस्तुति, भक्ति व वेदांत यांचें विवेचन व विशिष्ट कथेचें निरूपण हे विषय असतात. कीर्तनानें स्वत: पवित्र होऊन जगास वळण लावितां येतें. सामान्य जनसमूहाला स्वकर्तव्याची जाणीव करून देण्यास उत्तम कीर्तन करणार्या हरिदासांची फार जरुरी असते. कीर्तन हें एक लोकजागृतीचें अत्यंत सुलभ व सद्य: फलदायी असें साधन आहे. सांप्रत वर्तमानपत्रें, मासिकें, व्याख्यानें हीं जीं लोकांनां ज्ञान करून देण्याचीं साधनें आहेत तसें पूर्वीच्या काळीं कीर्तन हें एक प्रमुख साधन होतें. हल्लींहि त्याचा उपयोग वरील वर्तमानपत्रादि साधनांपेक्षां जास्त होतो. वर्तमानपत्र वगैरेंचा उपयोग सुशिक्षित (परंतु अत्यंत अल्प) समाजाला होतो; परंतु अशिक्षित समाजाला कीर्तनासारख्या व पूर्वींपासून आपल्यांत असल्यामुळें परिचयाच्या असलेल्या कीर्तनसंस्थेचा फार उपयोग आहे.
हरिदास मात्र बोलण्याप्रमाणें वागणारा पाहिजे, नव्हे आधीं वागून मग तसा बोलणारा पाहिजे, म्हणजे त्याच्या सांगण्याचा परिणाम श्रोत्यांवर होतो. तो अल्पसंतुष्ट असावा. व वर्तनानें अत्यंत निर्मळ असावा. ‘अंतरीं निर्मळ वाचेचा रसाळ’ असा तो असावा. त्यानें मोलानें कीर्तन करूं नये विष्णुभक्ताला कीर्तनांतील बिदागीची जरुरी नसावी. कारण मोल घेऊन केलेल्या उपदेशाला महत्व रहात नाहीं असें सांगण्यांत येतें. पेशवाई नष्ट होण्यापूर्वी हरिदासांची साधारण प्रवृत्ति मोलाशिवाय कीर्तन करण्याकडे होती. हल्लीं परिस्थितीभेदामुळें हरिदास बिदागी घेऊं लागले आहेत. पण त्यामुळें निस्पृहता सुटते व दात्याच्या कलाप्रमाणें उपदेश करावा लागतो.
कीर्तनाला कोणत्या उपांगांची जरुरी आहे, ती अंगें समर्थांनीं सांगितलीं आहेत: ‘कथा अन्वय लापणिका। नामघोष करतालिका” तसेंच “ताळमृदंग हरिकीर्तन। संगीत नृत्य तानमान। नाना कथानुसंधान । तुटोंचि नेदावें” म्हणजे कीर्तन सर्वांगपूर्ण असावें. त्यांत सर्व रसांचा यथायुक्त परिपोष करावा. शृंगाररस असल्यास हरकत नाहीं, मात्र तो तारतम्य सांभाळून सभ्य रीतीचा असावा. पूर्व व उत्तर रंगांची जुळणी बेमालुम असावी. श्रोते तल्लीन होतील असा रंग भरला पाहिजे. ‘श्रोत्यांचीं श्रवणपुटें, आनंदें भरावीं’ असा समर्थांचा आदेश आहे. तालसुराचें ज्ञान नसणार्यानें कीर्तन करूं नये. तसेंच संस्कृत भाषा, न्याय, व्याकरण, वेदांत, अलंकार, पुराणें, मराठी कवींच्या कविता, थोडेंबहुत हिंदी काव्य (आणि आधुनिक हरिदासास तर) कार्लाइल, कान्ट, स्पेन्सर वगैरे पाश्चात्य तत्त्वज्ञांचें तत्वज्ञान, बायबल, कुराण वगैरे धर्मग्रंथांची माहिती व प्रचलित सामाजिक, राजकीय व धार्मिक विषयांची ओळख, इतिहासाचें- विशेषत: स्वदेशाच्या- ज्ञान इत्यादि बाबींची माहिती हरिदासाला आज अवश्य पाहिजे. यावरून हरिदासाचा अधिकार मोठा आहे हें उघड दिसतें. ‘वक्तृत्वाचा अधिकार, अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार, अनुभवाचा’ असें हरिदासवर्णन समर्थांनीं केलें आहे. हरिदास हा या प्रकारें एक देशाचा सेवकच असल्यानें त्यानें देशपर्यटण करण्यासाठीं स्वत:चें शरीर मजबूत ठेवलें पाहिजे. जुन्या ऐतिहासिक गोष्टी सांगून व त्या वर्तमान परिस्थितींत कोठें व कशा लागू पडतात हें दाखवून चालू स्थिति कशी पालटली पाहिजे हें सुलभपणानें हरिदासानें श्रोत्यांच्या मनावर बिंबविलें पाहिजे.
श्री. बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे (शके ४३ तील) सहाव्या कीर्तनसंमेलनाचे अध्यक्ष असतांना त्यांनीं केलेली ‘सार्वजनिक हितासाठीं सार्वजनिक खर्चानें प्रत्येक जिल्ह्यांत निदान चार तरी हरिदास नियोजित करून त्यांच्या द्वारां जिल्ह्यांमध्यें सर्वत्र उपदेशाचें काम करविल्यास फार मोठें कार्य होईल,’ ही सूचना लक्षांत घेण्यासारखी आहे.
गेल्या शतकांत महाराष्ट्रांत पुढील नामांकित कीर्तनकार होऊन गेले. अनंतफंदी, रामजोशी, विठोबा अण्णा दफ्तरदार, श्रीपतीबुवा, ब्रह्मनाळकर, सांगलीकर, नाशीककर व अगदीं अलीकडील प्रसिध्द हरिदास गणेशशास्त्री मोडक, रामचंद्रबोवा काशीकर, रामदीक्षित अफळे माहुलीकर, नारायणबोवा फलटणकर व काशीनाथबोवा मसूरकर व चाफेकर हे होत. रामदीक्षितांचें प्रासादिक कीर्तन, नारायणबोवांचे श्रवणमधुर कीर्तन व काशीकरांचें जोड आख्यानी कीर्तन हीं महाराष्ट्रीय श्रोत्यांच्या दृढपरिचयाचीं आहेत. ब्रह्मनाळकर या हरिदास घराण्यांपैकीं यशवंतबोवा ब्रह्मनाळकर यांनीं मुंबईस ‘हरिकीर्तनालय’ नावाची एक संस्था स्थापन केली होती व कीर्तन नांवाचें एक मासिकहि चालू केलें होतें. परंतु यशवंतबोवा वारल्यामुळें तें बंद पडलें.
सध्यां महाराष्ट्रांत एक कीर्तनसंस्था असून तिचीं संमेलनें बहुधा दरवर्षीं भरत असतात. कीर्तन हें लोकसमाजास उपयुक्त कसें होईल या प्रकारचें शिक्षणहि सदर संस्थेंत देण्यांत येतें. दक्षिणेकडे तेलंगणांत व कर्नाटकांतहि कीर्तनांची चाल आहे. ती तिकडील आळवार या पंथांतील साधूंनीं प्रचलित केली असें म्हणतात.