विभाग अकरावा : काव्य - खतें
कुकरमुंडे- मुंबई. इलाखा पश्चिम खानदेश जिल्हा तळोदें तालुका तळोद्याच्या नैर्ऋत्येस ४ कोसांवर साधारण २००० वस्तीचें गांव असून पूर्वीं खानदेश व राजपिंपला संस्थान यांच्या हद्दीवरचें मजबूत ठाणें होतें. खानदेश प्रांत इंग्रजाच्या ताब्यांत आल्याबरोबर (१८१८) येथें भील लोकांवर वचक बसविण्याकरितां कॅ. ब्रिग्ज याच्या हाताखालीं एक तुकडी ठेवण्यांत आली होती. नंतर हें पेठ्याचें ठाणें केलें होतें. पुढें येथील रोगट हवेमुळें येथील ठाणें मोडलें. पूर्वीं येथें भील लोकांस शिकविण्याकरितां एक शाळा चालविण्यांत आली होती. तींत डांग संस्थानांतील भील राजांचे मुलगे शिकत असत. ही शाळ १८५७ च्या सुमारास बंद करण्यांत आली. हल्लीं येथें मराठी शाळा आहे. येथील जोडे फार प्रसिद्ध होते. येथें एक तट असलेली पडकी गढी असून तींत जुनें देवींचें देऊळ आहे. पेशवाईंत येथें ठाणेदार रहात असे. त्रिंबकजी डेंगळे या प्रांतांत आला असतां येथें कांहीं दिवस मुक्कामास होता. रघुनाथरावदादासाहेब इंग्रजांस मिळाले असतां त्यांच्या तर्फेच्या सरदारांचा मुक्काम नंदुरबार प्रांतांत स्वारी करतांना येथें होता. संतोजी महाराज या नांवाचे एक वारकरी संप्रदायाचे साधू येथें रहात असून त्यांचा आधुनिक काळास अनुसरून हिंदू समाजाची व धर्मशास्त्राची रचना घडवून आणण्याचा प्रयत्न चालू आहे. हा गांव तापी नदीवर सातपुड्याच्या पायथ्याशीं वसलेला आहे [खानदेश. गॅ.; इति. संग्र; महेश्वर-दरबार पत्रें.].