विभाग अकरावा : काव्य - खतें
कुचबिहार, संस्थान- हें उत्तर बंगाल्यांतील एक संस्थान आहे व यांत कोच जातीचें वास्तव्य असल्यामुळें या संस्थानास हें नांव मिळालें आहे. याचें क्षेत्रफळ १३०७ चौरस मैल आहे याच्या उत्तरेस जलपायगुडी जिल्हा असून पूर्वेस गोलपाडा जिल्हा आहे व दक्षिणेस रंगपूर असून पश्चिमेस रंगपूर व जलपायगुडी हे जिल्हें आहेत. या संस्थानांतील प्रदेश सखल मैदानाचा असून त्यामधून पुष्कळ नद्या वहात जातात, परंतु या नद्यांचा कालव्याकडे उपयोग होत नाहीं. या नद्यांपैकीं मुख्य म्हटल्या म्हणजे, तिस्ता, संकोश, धर्ला, तोरसा, कालजानी, रईदाक वगैरे होत. या सर्व नद्या हिमालयांत उगम पावून ब्रह्मपुत्रेस जाऊन मिळतात.
या संस्थानांतील जमीन नद्यांतून वाहून आलेल्या मळीची बनलेली असल्यामुळें तीत उत्तर बंगालमधील सर्व पिकें होतात. जेथें पीक काढीत नाहीं तेथें थोडीशीं नैसर्गिक झाडी आहे. या प्रदेशांत फारशीं झाडें नसून त्याचा बहुतेक भाग गवतानें व्यापिला आहे. या प्रदेशांतील झाडांपैकीं मुख्य आंबा, शिसू, बांबू, ताड व सुपारी हीं झाडें होत. या प्रदेशांत चित्ते, अस्वल, हरीण, डुकर वगैरे रानटी जनावरें आहेत.
याचें उष्णमान ९३० अंशापेक्षा कधीं अधिक नसतें, उष्णतेचें प्रमाण अगदीं कमी म्हटलें म्हणजे ४९० असतें व मध्यम ७८० असतें. येथील हवा फार दमट असल्यामुळें प्रकृतीवर तिचा अनिष्ट परिणाम होतो. या संस्थानांत दरवर्षी १२३ इंच पाऊस पडतो.
या संस्थानांत १८८७ सालीं तुफान होऊन बरेंच नुकसान झालें. पुढें १८९७ त धरणीकंप झाला. मधून मधून पावसाळ्यांत पुरानेंहि गांवांचा थोडाबहुत नाश होतो.
इतिहास.- पुरातन काळीं या संस्थानाचा कामरूप राज्यांत समावेश होत असे. १५ व्या शतकांत याच्यावर सेन घराण्याचें राज्य होतें. या घराण्याचा शेवटचा राजा नीलांबर याला गौरचा नबाब अल्लाउद्दीन हुसेन यानें १४९८ त गादीवरून काढून आपल्या मुलास गादीवर बसविलें. पण त्याचा तेथें फार दिवस टिकाव लागला नाहीं. यानंतर कांहीं दिवस या प्रदेशांत सर्वत्र अंदाधुंदी माजून राहिली होती; व जिकडे तिकडे लहान जहागिरी दृष्टीस पडत होत्या. पुढें १५१० त या संस्थानावर चंदन नांवाच्या कोच घराण्यांतील पुरुषानें आपलें राज्य स्थापन केलें. चंदनाच्या पाठीमागून त्याचा चुलतभाऊ विसवासिंग गादीवर आला. यानें करतोया नदीपासून बर्नादीपर्यंतचा सर्व मुलुख काबीज केला. पुढें १५४० त नरनारायण हा गादीवर बसला. यानें सिलराय नांवाच्या आपल्या भावाच्या मदतींनें पूर्व व दक्षिणेकडील सर्व देश काबीज करून मुसुलमानांवर स्वारी केली. सिलरायाच्या मरणानंतर नरनारायणानें आपल्या राज्याचे दोन भाग करून, संकोश नदीच्या पूर्वेकडील भाग सिलरायाचा मुलगा रघुनाथ यास दिला. यापुढें कोच घराणें लवकर लयास गेलें. नरनारायण १५८४ त मरण पावला; व त्याचा मुलगा लक्ष्मीनारायण हा गादीवर बसला. यानें रघुनाथाचा मुलगा परीक्षित याच्या विरुद्ध लढाई पुकारून मोंगलांची मदत मागितली व त्यामुळें तो पुढें दिल्लीच्या बादशहाचा अंकित बनला. याप्रमाणें कोच घराण्यास उतरती कळा लागल्यावर राज्याचा पूर्वभाग अहोम लोकांनीं बळकाविला व पश्चिम भाग मोंगलांनीं व भूतानमधील भूतिया लोकांनीं आपल्या घशांत टाकण्यास सुरुवात केली. कांहीं दिवसांनीं विसवासिंगाच्या वंशजाच्या ताब्यांत फक्त कुचबिहार प्रदेश राहिला. याच सुमारास राजकुळांतील नाझिरदेव, दिवाणदेव व वैकुंठपूरचा रईकत या तीन इसमांत अधिकाराबद्दल तंटा उपिस्थत झाला. १७७२ त नाझिरदेवाला त्याच्या शत्रूंनीं राज्यांतून हाकून लाविलें. त्यावेळीं त्यानें वॉरन हेस्टिंग्ज याजपाशीं कुमक मागितली. इंग्रजांनीं मदत करून नाझिरदेवास पुन्हां अधिकारावर नेऊन बसविलें. यावेळीं (१७७३) इंग्रज व कुचबिहारचा राजा यांच्यात तह होऊन राजानें कंपनींचें स्वामित्व कबूल केलें व आपल्या उत्पन्नाचा अर्धा हिस्सा कंपनीस खंडणीदाखल देण्याचें ठरविलें. १७८० त या खंडणीची रक्कम ६७,७०० रु. ही कायमची ठरविण्यांत आली. १७८८ त संस्थानच्या बिघडलेल्या राज्यकारभाराची चौकशी करण्याकरितां इंग्रजांनीं एक कमिशन नेमलें व त्याच्या सल्ल्यानें एका रेसिडेंटाची योजना झाली. पुढें याच रेसिडेंटास गव्हर्नर जनरलचा एजंट हा किताब मिळाला. सध्याचे महाराज हे अज्ञान आहेत. त्यांची मातोश्री राणी इंदिरादेवी या बडोद्याचे श्री. सयाजीराव महाराज यांच्या कन्या (इंदिराराजा) होत. यांच्या पतीचें (गत महाराजांचें) नांव जितेंद्र नारायण भूप बहादुर असें होतें. हे दोन वर्षांपूर्वीं इंग्लंडमध्यें वारले. संस्थानिकास १३ तोफाच्या सलामीचा मान आहे. या संस्थानांतील कमातापूर येथें राजा नीलध्वजानें वसविलेल्या शहराचे अवशेष आहेत. खास कूचबिहार हें राजधानींचें गांव तोरसा नदीच्या कांठीं असून तें टुमदार शहर आहे. येथें कॉलेज आहे.
१९२१ सालीं संस्थानची लो. सं. ५९२४८९ होती. संस्थानचें उत्पन्न ३२,६१,११० रु. आहे. संस्थानांत एक आर्ट कॉलेज व ४ हायस्कुलें आणि २७२ देशी शाळा आहेत. रात्रीच्याहि शाळा ४०।५० पर्यंत व मुलींच्या शाळा १०।२० पर्यंत आहेत. तुरुंग, दवाखाने वगैरे चांगले व व्यवस्थित आहेत. येथील लोकांची भाषा बंगालीची एक शाखा असून तिला रंगपुरी अथवा राजवंशी असें म्हणतात.
शे ती.- संस्थानांतील जमीन मळईची असून पश्चिमेकडे ती कठिण होत जाते. उंच जमींनीत तंबाखू व उन्हाळ्यांतील भाताचें पीक होतें व सखल जमीनींत पावसाळ्यांतील साळीचें पीक होतें. मुख्य पीक म्हटलें म्हणजे तांदूळ, ताग व तंबाखू हें होय. याशिवाय, ऊंस, चणे, मका, मूग, मसूर, मोहरी व इतर गळिताचीं धान्यें यांचें उत्पन्न होतें. संस्थानांतील मूळचीं गुरेंढोरें लहान बगींची असून ती जातिवंत नाहींत. संस्थानांत बैल वगैरे बाहेरून आणवावे लागतात. संस्थानांत पुष्कळ तलाव व विहिरी आहेत. पर्जन्यवृष्टीहि बरीच होते. राज्यांत दुष्काळ सहसा पडत नाहीं.
व्या पा र व द ळ ण व ळ ण- येथें हलक्या प्रतीचें सुती व रेशमी कापड निघतें. मेखलीगंज येथें उत्तम (पोत्यांचीं) तरटें होतात. पूर्वी रंगीत सतरंज्या व गालिचे यांच्याकरितां या राज्याची प्रसिध्दी होती. परंतु आतां हा धंदा बुडत चालला आहे. संस्थानाच्या पश्चिम व दक्षिण भागांत तूप, मोहरीचें तेल व काकवी तयार होते. या संस्थानांतून बाहेर जाणारे सुख्य जिन्नस म्हटले म्हणजे तंबाखू, ताग, तांदूळ, मोहरी, मोहरीचें तेल, साखर, काकवी, मीठ व तांबें, पितळ आणि मातीचीं भांडीं हे होत. संस्थानाच्या मालकीचा ५० मैल लांबीचा आगगाडीचा रस्ता आहे. संस्थानांत नद्या बर्याच असल्यानें जलमार्गांचा प्रवास व वाहतुक नावांच्या योगें होते. या नावांतून ३ ते ११ टन पर्यंत ओझें जातें.
रा ज्य व्य व स्था.- राज्यकारभार पाहण्यास (माजी राजाच्या वेळचें) एक मंडळ नेमलें असून त्याचा महाराजा हा अध्यक्ष असतो व दिवाण, एक सुपरिंटेंडेंट, फडणीस, मुलकी व फौजदारी न्यायाधीश, न्यायमंत्री वगैरे हे सभासद असतात. संस्थानचे कुच बिहार, दिवहात, माताभंग, मेखलीगंज व तुपावगंज असे ५ विभाग केले आहेत. वरील मंडळास हायकोर्टाचा अधिकार असून जमीनमहसुलीसंबंधीं प्रश्नांचा विचारहि तेंच करितें. याशिवाय कायदे करून ते अमलांत आणण्याचा हक्कहि या मंडळास आहे.
सुपरिटेंडेंट या अधिकार्याची नेमणूक इंग्रज सरकाराकडून होत असून त्याच्या ताब्यांत फौजदारी न्याय, पोलिस, शिक्षण, तुरुंग व इतर किरकोळ खातीं असतात. दिवाणाकडे सारा व इतर कर वसूल करण्याची व त्यासंबंधीं प्रत्येक हालचालींवर देखरेख करण्याची जबाबदारी असते. त्याचा दर्जा इंग्रजी कलेक्टर व कांही बाबतींत कमिशनर यांच्या बरोबर असतो. पोटविभागावर नायब अहलकार (अधिकारी) हा दिवाणाचा मदतगार असतो व त्याच्या ताब्यांत खजिना असतो. नायब अहलकाराच्या हाताखालीं सब(नायब) अलहकार असतात व यांच्या मदतीकरितां कानगोची नेमणूक केलेली असते. वरील अहलकार व सेशनजज्ज हे न्यायनिवाडे करतात. अखेरचा निकाल संस्थानिक मंडळ देतें.
या संस्थानांत जोतदारामार्फत जमीनीचा सारा वसूल करण्याची वहिवाट आहे पण हल्लीं संस्थानांतील कांहीं भागांत सारा कायमचा ठरविण्यांत आला आहे. यांतील अबकारी खात्याची व्यवस्था इंग्रजी अमलखालील प्रदेशाप्रमाणें आहे. संस्थानांत आयात मालावर व मिठावर पूर्वी जकात नव्हती. कुचबिहार येथें व इतर विभागाच्या मुख्य ठिकाणीं सरकारी व बिनसरकारी सभासदांच्या गांवसभा असून त्यांच्याकडे म्युनिसिपालिटीचें काम असतें. या सभांवर मंडळाची (कौन्सिलची) देखरेख असतें. [इंपी. ग्या. भाग १०; बंगाल अॅडमिनि. रिपोर्ट. १९२१-२२]