विभाग अकरावा : काव्य - खतें
कुडवक्कल- मुंबई इलाख्यांतील एक शेतकरी जात. या जातीचे लोक विशेषत: बेळगांव, विजापूर, धारवाड, सोलापूर व दक्षिणमहाराष्ट्र या ठिकाणीं आहेत. १९११ सालीं त्यांची संख्या २१२०९ असून पैकीं १०७५४ पुरुष व १०४५५ स्त्रिया होत्या. कुडवक्कल हा कानडी शब्द असून ह्याचा अर्थ कुदळ वापरणारा शेतकरी असा आहे. कुडवक्कल हें एका मूळ पुरुषाचें नांव असून त्यांची मूळ वस्ती कुर्गांत होती असेंहि म्हणतात. रड्डी नांवाच्या एका शेतकरी वर्गाशीं या जातीचा पूर्वीं एकदा संबंध आलेला असावा हेंहि शक्य दिसतें.
हिंदु व लिंगायत असे दोन भेद कुडवक्कल जातींत आहेत. लिंगायत कुडवक्कलांचें पंचमसाली लिंगायतांशीं धर्म व चालीरीतींच्या बाबतींत ऐक्य असून फरक आहे तो एवढाच कीं, लिंगायत कुडवक्कल शेंडी ठेवतात व त्यांनां एखादा ब्राह्मण आपलीं लग्नें लावण्याकरितां जरुर बोलवावा लागतो. हिंदू व लिंगायत या दोन पंथांपैकीं लिंगायत कुडवक्कलांवर लिंगायत धर्माचा बराच पगडा बसलेला आहे. कां कीं, ते कोणत्याहि तर्हेचें अशौच पाळीत नाहींत. त्यांच्या चार जाती आहेत व या चार जाती परस्परांत रोटीव्यवहार करतात. परंतु प्रत्युद्वाह करीत नाहींत. या चार जाती म्हणजे दंडावती, मिनिगडीक, तद्देदि, (मूर्ख) व यत्तिराक अशा आहेत.
समान गोत्रजांमध्यें लग्नें करण्याची यांच्यांत मनाई आहे. कुडवक्कल जातींत बहुपत्नीत्वाची वहिवाट असून विधवाविवाह व काडीमोड या गोष्टींस प्रतिबंध आहे. वयांत येण्यापूर्वींच मुलींचीं लग्नें होतात. लग्नाचा मुहूर्त जंगम किंवा ब्राह्मण ठरवितो व लग्नांतील धार्मिक विधी ब्राह्मणाकडून करविण्यांत येतात. देवकार्य, सीमांतपूजन, लग्नकंकणधारण, वरात वगैरे सर्व समारंभ केले जातात. कुडवक्कल हिंदु व लिंगायत धर्माचे असून बसवण्णा, बीरभद्र व यल्लव्वा या त्यांच्या कुलदेवता आहेत. दयामाव्वा दुर्गाव्वा वगैरे त्यांच्या ग्रामदेवता आहेत. सर्व हिंदूसण पाळून तुळजापूर व विजापूर जिल्ह्यांतील गोलागिरिलिंग वगैरे ठिकाणीं हे लोक यात्रेला जातात. गुलकव्वा व चंगलकव्वा या देवींची पूजा मुख्यत: स्त्रियाच करतात. जेष्ठी पौर्णिमेस ‘करहनवी’ नांवाचा बैलांचा सण पाळला जातो. त्यावेळीं बैलांस सजवून व त्यांची मिरवणूक काढून शर्यतीनें ‘कर’ तोडण्यांत येते.
शेती हाच या जातीचा मुख्य धंदा असून कांहीं जण चांगले जमीनदाराहि असतात. त्यांच्या स्त्रिया दूध, लोणी, दहीं वगैरे विकतात. कुडवक्कल जातीचे लोक मद्यमांसाहार करीत नाहींत.