विभाग अकरावा : काव्य - खतें
कुत्बमिनार- ही गगनचुंबित इमारत दिल्लीपासून ११ मैलांवर आहे. या इमारतीस भूकंप व विद्युतघात यांच्या योगानें थोडासा धक्का पोहोंचला आहे. पॅरिस येथें ‘एफेल टॉवर' नामक जो प्रचंड लोखंडी मनोरा पॅरिस प्रदर्शनाच्या वेळीं तयार करण्यांत आला होता तो सोडून दिला असता जगामध्यें इतका उंच मनोरा दुसरा कोणताहि नाहीं. ही इमारत जमीनीपासून २३८ फूट व १ इंच आहे. तिच्या पायाचा व्यास ४७ फूट २ इंच आहे आणि शिरोभागाचा व्यास ९ फूट आहे. या मनोर्याचा अगदीं तळमजला दोन फूट उंचीच्या जोत्यावर असून मधली इमारत २३४ फूट १ इंच आणि शेवटचा घुमटाचा पाया दोन फूट उंच मिळून वर लिहिलेली एकंदर उंची येते. हा मनोरा पूर्वीं ३०० फूट असून त्यावर एकंदर सात मजले होते असें म्हणतात. परंतु सांप्रत त्याच्या अगदीं शेवटच्या मजल्यासह एकंदर पांच मजले आहेत.
‘कुत्बमिनार' ही इमारत मुसुलमान बादशहांनीं बांधली हें खरें, परंतु तिचें अवाढव्य काम मुसुलमान कारागिरांनीं केलें किंवा हिंदू कारागिरांनीं केले हा मोठा प्रश्न आहे. मिनारचें पुष्कळ नकशीकाम हिंदूच्या देवालयाचें असण्याचाहि फार संभव आहे. कलकत्याचे प्रसिद्ध पुराणवस्तुसंशोधक पंडित डॉ. राजेंद्रलाल मित्र यांनीं याबद्दल मागें वाद उपस्थित केला होता, व त्यांनीं ही लोकोत्तर इमारत हिंदू लोकांचें स्मारक आहे असें सिद्ध केलें होतें. या मिनारवर कांहीं नागरी भाषेंत अक्षरें कोरलेलीं आहेत. त्यांवरून या इमारतीच्या रचनेंत हिंदू शिल्पकारांचा हात होता असें म्हणण्यास पुष्टि येते.
कुत्बमिनार इ. स. १३२५ मध्यें पूर्ण झाला. कुत्बमिनार या अत्युच्च मनोर्यावर उभें राहून त्याच्या समंतात भागीं दृष्टि फेंकली म्हणजे दहा कोस विस्ताराचें जें प्राचीन दिल्ला शहर होतें, त्यांतील विध्वंस पावलेल्या सहस्त्रावधि इमारती दृष्टीस पडतात. सर्व जगांतील कबरींमध्यें ज्याप्रमाणें ताजमहाल सर्वश्रेष्ठ, त्याप्रमाणें सर्व मनोर्यांमध्यें कुत्बमिनारहि सर्वश्रेष्ठ आहे.
याचा पहिला (तळ)मजला मात्र कुत्ब-उद्दीन ऐबक यानें बांधला व त्यावरील सर्व मजले इलतुंतमिश (अलतमश) यानें बांधले (१२३२) असें स्मिथ म्हणतो. कांहींच्या मतें (मिनारवरील शिलालेखांवरून) सर्व मिनार कुत्ब ऐबक यानेंच बांधला. [स्मिथ-ऑ. हि. इं.].
हा मनोरा जरी इतका उंच आहे तरी त्याच्या आंतील जिना फार चांगला आहे. पाच मजल्यांपर्यंत मिळून त्यास एकंदर ३७६ पायर्या आहेत. आंतील बाजूस हवा व उजेड यांची सोय चांगली असल्यामुळें व प्रत्येक मजल्यावर वेगवेगळी ग्यालरी असल्यामुळें प्रेक्षकांस जागोजाग विश्रांति घेण्याची सोय आहे. प्रत्येक मजल्यावरील ग्यालरीच्या योगानें ह्या इमारतीच्या सभोंवती जागोजाग कंबरबंद बांधले आहेत असें वाटतें. त्यामुळें इमारतीस अप्रीतम शोभा आली आहे. ह्याशिवाय ह्या इमारतीवर अनेक शिलालेख असून त्यांमध्यें कुराणांतील वाक्यें व परमेश्वराची नाममालिका लिहिलेली आहे [पारसनीस- दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ.].