विभाग अकरावा : काव्य - खतें
कुत्बशहा- (सन १४५१-१४५८)- गुजराथचा शहा महंमदशहा हा मरण पावल्यावर त्याचा पुत्र कुत्बउद्दीन तख्खनशीन झाला. माळव्याचा सुलतान महमंद खिलजी यानें कुत्बशहावर स्वारी करून त्याचा पराभव केला. पुढें उभयतांनीं तह करून दोघांनीं मिळून मुसुलमानी धर्म वाढविण्याची खटपट करण्याचें ठरविलें. परंतु हा ठराव अंमलांत आला नाहीं. मेवाडचा कुंभ राणा त्यावेळीं हिंदु राजांत अत्यंत शूर, प्रबळ व चतुर होता. त्यानें राजपुतान्यांत अनेक किल्ले बांधिले. कुंभराण्याच्या प्रतापापुढें या आसपासच्या मुसुलमानी राजकर्त्यांचें कांहीं चाललें नाहीं. तथापि कुंभराण्यास बुडविण्यास सर्व मुसुलमान टपून बसले होते. नागोर येथें कुत्बशहानें कुंभराण्याचा स. १४५८ त पराभव केला असें म्हणतात. नंतर कुत्बशहाहि त्याच वर्षी मरण पावला. (मे १४५९). [मु.रि. बील ३२२].