विभाग अकरावा : काव्य - खतें
कुत्स.- एक वैदिक ऋषि व सूक्तद्रष्टा. ऋग्वेदांत या द्रष्ट्याचें नांव पुष्कळदां आढळतें. पण त्यासंबंधीं कांहीं माहिती मिळत नाहीं. यावरून हा वेदकालापूर्वींचा असून वैदिक ऋषीनां बराच अज्ञात असावा. कुत्साला बर्याच वेळां आर्जुनेय म्हटलें असून (ऋ. ४. २६, १; ७. १९, २; ८. १, ११), शुष्ण दैत्याचा पराभव करण्याच्या कामीं व सूर्याला जिंकण्यांत हा इंद्राबरोबर आढळतो (१. ६३, ३, १२१, १९; १७४, ५; १७५, ४; ४. ३०, ४; ५. २९ ४; ६. २०, ५; ७. १९, २; १०. ९९. ९). स्मदिभ, तुग्र व वेतसू यांनां कुत्सानें जिंकिलें (१०. ४९, ४); पण अतिथिग्व आणि आयु यांच्याबरोबर इंद्रानें यालाहि जिंकिलें असें बरेच वेळां सांगितलें आहे (१. ५३, १०; २. १४, ७; ८. ५३, २.). तूर्वयाणामुळें कुत्साचा पराभव झाला असें एका ऋचेंत आहे (१. ५३, १०). इतर कांहीं स्थलांवरून अतिथिग्वाबरोबर कुत्सहि इंद्रमित्र होता असें दिसतें (१. ५१, ६; ६. २६, ३). याची आणखी माहिती ‘बुद्धपूर्व जग' या विभागांत (पा. ७२ आणि ४८०) आली आहे. पुढील वाङ्मयांतून कुत्साचा क्वचितच उल्लेख येतो. (अथर्व. ४. २९, ५; पंचविंशब्राह्मण १४. ११. २६). ब्राह्मण ग्रंथांतून कुत्सानें इंद्राला बांधल्याची कथा आढळते (पंचविंश ब्रा. ९. २, २३; जैमि. ब्रा. १.२२८). इंद्र व कुत्स यांच्या रुपांत इतकें साम्य होतें कीं, एकदां इंद्रानें याला आपल्या घरी नेलें असतां शचीला आपला पति कोणता हें ओळखितां आलें नाहीं.