विभाग अकरावा : काव्य - खतें
कुंभकोणस्, ता लु का.- मद्रास इलाख्यांतील तंजावर जिल्ह्यांतील एक पोटविभाग व तालुका. याचें क्षेत्रफळ २११ चौरस मैल असून लोकसंख्या १९२१ सालीं ३६९५६५ होती. तालुक्याचें मुख्य ठाणे कुंभकोणम् आहे. खेड्यांची संख्या ३०७ आहे. तालुक्याचा बराच भाग कावेरी नदीमुळें सुपीक झाला असून लोक सुस्थितींत आहेत. या तालुक्यांत तांदूळ, केळीं व सुपारी हीं मुख्य पिकें असून तांबें पितळेची भांडीं आणि रेशमी व सुती कापड तयार होतें.
श ह र.- मद्रास इलाख्यांत तंजावर जिल्ह्यामध्यें कुंभकोणम् तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें कावेरीं नदीच्या कांठीं मद्रासपासून १९४ मैलावर साउथ इंडियन रेल्वेवर आहे. १९२१ सालीं याची लोकसंख्या ६०७०० होती. उत्तरोत्र कुंभकोणम् आकारानें वाढत असून हल्लीं तें मद्रास इलाख्यांत ६ वें शहर आहे. कुंभकोणम् हें दक्षिण हिंदुस्थानांतीस अगदीं जुन्या शहरांपैकीं एक आहे. सातव्या शतकांत चोलांची राजधानी कुंभकोणम् येथें होती. हें ब्राह्मणाधर्माचें व संस्कृतींचें माहेरघर होतें. शंकराचार्यांनी येथें एक मठ स्थापन करून हस्तलिखित संस्कृत ग्रंथांचा मोठा संग्रह येथें ठेवलेला आहे. नागेश्वर व सारंगपाणी यांचीं देवालयें प्राचीन असून प्रेक्षणीय आहेत. येथें दरवर्षी होणार्या `महामधम्’ उत्साहाच्या वेळेस गंगेचें पाणी जमिनींतून महामघम् टांक्यांत येतें असें म्हणतात.
शिवाची १२ व विष्णुची ४ अशीं १६ मोठीं देवळें कुंभकोणास आहेत. व्यवस्था पहाण्यास देवस्थान कमिटी आहे. येथें इंग्रजी शाळा, संस्कृत शाळा, वेदशाळा, औद्योगिक शाळा व कॉलेज या शिक्षणसंस्था आहेत. दोन नियतकालिकें निघतात.
तांबे, पितळ, शिसें यांचीं भांडी, रेशमी व सुती कापड, त्याप्रमाणेंच साखर, नील व मातीची भांडीं वगैरे जिन्नस येथें तयार होतात. पैकीं धातुकाम जास्त प्रसिद्ध आहे.