विभाग अकरावा : काव्य - खतें
कुंभार- मातीचीं भांडीं घडविणारी ही धंदेवाईक जात हिंदुस्थानांतील सर्व प्रांतांतून व संस्थांनांतून आढळते. इ. स. १९११ च्या खानेसुमारींत यांची एकंदर संख्या ३४,२४,८१५ भरली. सर्वांत जास्त संयुक्तप्रांतात (७,२६,३६१), त्याखालीं पंजाबांत, त्याच्या खालोखाल बिहार- ओरिसामध्यें, त्याहून कमी राजपुतान्यांत (३,०९,२३४) अशी ती उतरत गेलेली संख्या दृष्टीस पडते. कुंभारांत सर्व धर्माचे लोक सांपडतात. सुमारें ३० लाख हिंदू व ४ लाख मुसलमान कुंभार आहेत व २५००० पर्यंत शीख असून जैन सारे दहा वीस सांपडतील.
संस्कृत कुंभकार शब्दावरून कुंभार, कोहार व कोनहार असे शब्द बनले आहेत. मातीचीं भांडीं करणार्या या जातीच्या कुळांसंबंधीं अनेक दंतकथा प्रचलित आहेत. ब्रह्मवैवर्तपुराणांत त्यांची उत्पत्ति वैश्य स्त्री व ब्राह्मणपिता यांपासून झाली आहे असें लिहिलें आहे. पराशरसंहितेवरून मालकार (माळी) पुरुष व चमार (चांभार) स्त्री यांकडे त्यांचें जनकत्व जातें. कुंभारांची उत्पत्ति, तेली स्त्री व पट्टिकार (विणकर) यांच्यापासून झालेली आहे असें पराशरपद्धति सांगते. मॉनियर विल्यम्सच्या संस्कृत कोशावरून पाहतां ब्राह्मण व क्षत्रिय स्त्री हेच या जातीचे उत्पादक मांडलेले दिसतात. प्रचलित असलेल्या अनेक दंतकथा सोडून दिल्या तरी ऋग्वेदांत मातीच्या भांड्यांचा उल्लेख आहे त्यावरून कुंभारांचा धंदा अत्यंत प्राचीन काळीहि होता एवढी गोष्ट सिद्ध आहे. महाराष्टांतील कुंभार अनेक प्राचीन राष्ट्रांतून आले आणि त्यांचें पूर्वींचें राष्ट्रीय पृथक्त्व हल्लीं भिन्नपोटजाती या स्वरूपांत आहे. यांची मुंबई इलाख्यांतील लोकसंख्या सुमारें २ लाख ४० हजार आहे. यांच्यांत पुढील २३ कुळ्या आहेत. अहीर किंवा लहानचाके, बळदे, भांडु, चागभैस, गरेते, गुजर, गोरेमराठे, हातघडे, किंवा भोंडे किंवा भोंडकर, हातोडे, कडु, कन्नड, कर्नाटक अथवा पंचम किंवा लिंगायत, खंभाटी, कोंकणी, लाड किंवा थोरचाके, लाडभुजे, माळवी, मराठा किंवा घाटी, परदेशी, रजपूत, सोराठिआ, वरिआ आणि वाटलिआ. हे मराठा, कोंकणी, गुजराथी, व परदेशी या चार प्रकारांत समावतात. २३ कुळांत आपापसांत रोटीबेटीव्यवहार मुळींच होत नाहीं. कांहींचीं नांवें कोंकणी, खंबाटी इत्यादि प्रांतांवरून पडलीं आहेत. परदेशी, रजपूत व माळवी हे त्या त्या प्रांतांतून इकडे आले आहेत. लहान चाकावर काम करणारे म्हणून अही कुंभारांनां (अहीर हे मोठ्या अहीर जातींतील होत) लहानचाके म्हणतात. हातानें जे काम करितात (चाकानें नव्हे) ते हातघडे होत. दक्षिण गुजराथचे (लाट देशचे) ते लाड. हे थोर (मोठ्या) चाकावर काम करतात. पंचम हे गळ्यांत लिंग बाळगतात व लिंगायतपंथी आहेत; हे बहुधा कर्नाटकी असतात. वाटलिआ हे ब्राह्मण बाप व कुंभार आई या जोडप्यापासून उत्पन्न झाले असें म्हणतात. कडिया म्हणजे गवंडीकाम करणारे. मराठा कुंभार हे बहुतेक सार्या दख्खनमध्यें पसरलेले आहेत. कोंकणी हे कोंकण व कानडा, लिंगायत हे सोलापूर, धारवाड व बेळगांव येथें; खानदेशांत अहीर व लाड; कानड्यांत कन्नड व परदेशी हे पुणें, नाशिक, सोलापूर आणि बेळगांव येथें; भांडु हे कोल्हापूर- पन्हाळा व बाकींचें गुजर, कडिया वगैरे जाती गुजराथ व कोंकणांत आढळतात. यांचा मुख्य धंदा म्हणजे कौलें, विटा, मडकीं व प्राण्यांचीं चित्रें वगैरे करणें हा होय. कानडा जिल्ह्यांत मातीच्या देवांच्या मूर्ती हे लोक करितात. पुण्याकडे हे लहान मुलांचीं मातीचीं खेळणी बनवितात. अहमदाबाद- पाटण येथील मडकीं, लाखलोटे फार सुरेख, चकचकीत, नकशीदार व निरनिराळ्या नमुन्यांचे असतात. कुंभार हा एक बारा बलुत्यांपैकीं असून तो ग्रामसंस्थेस मडकीं वगैरे पुरवितो व ह्याबद्दल त्याला इनाम जमीन असते, अगर कापणीच्या वेळीं धान्य मिळतें. हल्लीं यांचे उपाध्याय ब्राह्मण आहेत. पूर्वीं कोकणीं व कानडी कुंभार उपाध्याय होते व अद्यापिहि कांहीं ठिकाणी आहेत. कांहीं स्थानिक देवतांचे हे पूजारी आहेत. अस्पृश्यांशिवाय बाकीच्या सार्या शूद्रांचें अंत्येष्टिकर्म कानडी कुंभार करितात, त्यास कुंभारक्रिया म्हणतात.
हिंदुस्थानांत पुढीलप्रमाणें निरनिराळ्या प्रांतांतून कुंभार आढळतात:-
पं जा ब.- येथील कुंभार हिंदु, शीख व मुसुलमान आहेत. ते पंजाबांत सर्वत्र आढळतात व विटा तयार करणें वगैरे कुंभारांचीं कामें करितात. पश्चिम व मध्य पंजाबांत ज्या ठिकाणीं जमिनीला पाणी मुबलक आहे त्या ठिकाणीं रहाटाकरितां हे मातीचीं भांडीं पुरवितात व म्हणून तेथें शेतकी कामाकरितां यांची फार जरुरी आहे.
सं यु क्त प्रां त.- येथें त्यांच्या अनेक पोटजातींपैकीं बर्डिया व बर्ढिया या मुख्य जाती आहेत. चाकबैस, गधेरे, गोला, कनौजिया, कासगर, महार व माथुरीय या पोटजाती प्रसिद्ध आहेत. याशिवाय, सौरिह, चुरिह, अधारिह, हातेलिया चौहनियमिश्र, परोडिय, पहारिय, दक्षिणाह, चमारिय इत्यादि पोटजाती आहेतच. अशा तर्हचे हिंदूंचे व मुसुलमानांचे पोटवर्ग सपाटून आढळून येतात.
आपआपल्या वर्गांतच लग्नें करण्याची त्यांची चाल असून ते एकपत्नीव्रतावर जोर देतात. कांहीं अटीवर विधवाविवाहास मोकळीक असून दोळा, सगाई वगैरे लग्नविधी पाळण्यांत येतात. पांचोनपीर, भवानी व हर्दिया वगैरे त्यांच्या देवता असून त्यांस निरनिराळ्या महिन्यांत प्रसाद पुष्पें अर्पण करण्यांत येऊन अजापुत्रांचें बलीहि देण्यात येतात. लगनकार्यांत व मुहूर्त पाहाण्यास ब्राह्मणांनां बोलावण्यांत येतें. पितृपक्ष व पिंडदान बगैरे त्यांच्यांत करण्याची चाल आहे. चक्र हें श्रीकृष्ळाचें व प्रजापतीचें निदर्शक असून उत्पत्तीचें तें एक चिन्हच होय असें श्रद्धेनें मानण्यांत येतें. कोपाभगत् नांवाच्या साधूला ते मान देतात व सीतळा, समाई वगैरे देवतांनां भजतात.
खेडेगांवांतील कुंभार मडकीं देऊन धान्य वगैरे मोबदला घेतात. गाढवें पाळून ते सामानाची नेआण करितात. त्यांचा सामाजिक दर्जा चांभारांच्या वरचा व लोहारांच्या खालचा असा असतो.पावसाळ्यांत काम नसल्यामुळें ते शेती वगैरे इतर किरकोळ धंदेहि करतात. कांहीं कुंभार भांडी करण्यांत मोठे कसबी असतात. बकर्याचें मांस व मासे हे लोक खातात. कुंभार हे मोठें उद्योगी व शांतताप्रिय असल्यानें कोर्टाची पायरी ते क्वचितच चढतात.
आ सा म.- येथें याजातीची लो. सं. (१९११) २७,९१३ आहे. या लोकांचा धंदा बहुधा कुंभारकामाचा असून बंगालमधील या जातीचे लोक नवशा लोकांपैकीं आहेत. सिलहट व कामरूप येथें ह्याचीं वस्ती दाट असून तेथील त्यांची लोकसंख्या अनुक्रमें १२,१४६ व ७४४१ होती. ब्रह्मपुत्रा खिंडींत मातीची भांडीं करणार्या कलिता जातीच्या लोकांनांच कुम्हार म्हणत असावेत असें गेट साहेबांचें मत आहे.
म ध्य प्रां त.- यांच्यात निरनिराळ्या उपजातींचीं नांवें स्थानावरून पडलीं आहेत. याच्यांतील कांहीं जाती केवळ धंद्यावरूनच झाल्या आहेत. जसें:- कोणी केवळ हातानेंच मडकें करणारांची हातघडिया जात. पांढरी किंवा लाख मडकीं करणारांची गोरिया जात व चाकावर भांडीं करणारांची चक्रे जात असे ते भेद झाले आहेत. लुटकिया व रखोटिया हे गोलक वर्ग आहेत. मुलींचीं लग्नें लहानपणींच करतात. चांदा येथें ऋतु प्राप्त झाल्यावर लग्नें करतात. लग्नें ब्राह्मणांकडूनच करवितात. पण वेतूलांत वधूच्या आतेचा नवरा लग्न लावतो. लग्न झाल्यावर वधूवरांच्या हातांत कणकीचे गोळे देतात व ते एकमेकांस हिसकण्यास सांगतात.
कुंभारांत घटस्फोट व पुनर्विवाह होतात कुमारिकेनें स्वजातीयाबरोबर व्याभिचार केला तर सवा रुपया दंड, ५ केस तोडण्याची शिक्षा आणि जातीस जेवण घालतात.
हे लोक गाढवें पाळतात म्हणून नीच समजले जातात. पण बंगाल्यांत यांची इतकी नीच स्थिति नाहीं. सागर जिल्ह्यांत लग्नाच्या वेळीं वधू कुंभाराकडे जाते व कुंभारीण तिला चाकावर बसवून सात वेळा फिरविते आणि सात नवी भांडीं देते. या भाड्यांचा विवाहांत उपयोग करतात. उत्तर संस्काराच्या वेळीं कुंभारानें १३ मडकीं स्मशानांत आणलीं पाहिजेत. यांच्यांपैकीं कांहीं जाती डुकर पाळतात व त्यामुळें ते फार अपवित्र समजले जातात.
म रा ठा कुं भा र.- हे दिसण्यांत मराठा कुणब्यांप्रमाणें असून तसाच पोषाख करितात; यांची भाषा मराठी. बेकायदेशीर संततीला ते कडू असें म्हणतात. यांच्यांत बरेचसे कडू आहेत. यांच्यांत पुढील आडनांवें आहेत. अढाव, भालेराव, बुद्धिवान, चौगुले, दळवे, देशमुख, देवत्रासे, दिवटे, गाढवे, गाईकवाड, जाधव, जगदळे, जोंधळे, जोरवेकर, काळे, कापडे, लोणकर, मानमोडे, म्हेत्रे, पवार, रोकडे, सासवडकर, शिरसाट, शिंदें, सोनवणे, वागचौरे, वागुळे, वाघमारे इ. यांचीं देवकें प्रांतवारीनें पुढीलप्रमाणें आहेत:-
पुणें जिल्हा:- मर्यादवेल, कुंभाराचें थापटणें किंवा फळ, कुदळ. सातारा जिल्हा:- आंबा, जांभूळ, वड. सोलापूर जिल्हा:- थापटणें, पांचपालवी नगर, खानदेश व नाशिक हे जिल्हें:- पांचपालवी. पांचपालवी पूर्वीं यांचें एकच देवक असे. परंतु ही जात जशी सुधार गेली व एकच आडनांवाची सोयरीक जसजशी बंद होत गेली तसतशी ही पाचपालवीची रीत पडली. अहीर कुंभारांत प्रत्येक कुटुंबांचें देवक स्वतंत्र असते. उदा. हिवरकरांचें हिवराचें झाड; मोर्यांचें मोराचें पीस व वाघांचें अंजनाचें झाड होय. एकाच देवकवाल्यांत सोयरीक होऊं शकते. परंतु एकाच आडनांववाल्यांत होत नाहीं. मुलांचें लग्न ५ ते २० व मुलींचें ५ ते १२ वर्षांच्या आंत करितात. पाटाची चाल आहे. विधवेला आतेभाऊ, मावसभाऊ व मामेमावशीं पाट लाविता येत नाहीं. प्रथमवराला विधवेशीं पाट लावावयाचा असेल तर प्रथम रुईशीं लग्न लावावें लागतें. यांचीं कुलदेवतें, शिंगणापुरचा महादेव, सातारा किल्ल्यांतील जगदंबा, सोनारीचा भैरोबा, तुळजापुरची देवी व जेजुरीचा खंडोबा हीं आहेत. सोलापूर जिल्ह्यांतील कुंभार आपलीं प्रेतें लिंगायत पंथाच्या धर्तीवर पुरतात. यांचे बाकीचे (जन्म-लग्न-और्ध्वदेहिकादि) संस्कार मराठा कुणब्यांप्रमाणेंच असतात. हे मद्यमांससेवक असून कोष्टी, धनगर, न्हावी, कोळी, मराठे व कुणबी यांच्या हातचें खातात व हें वरील लोकहि या मराठा कुंभाराच्या हातचें जेवतात असें म्हणतात.
कों क णी कुं भा र.- हे आपणास मूळचे मराठे म्हणवितात. यांच्यांपैकीं पुष्कळजण पूर्वीं ग्रामदेवतांचे पुजारी असत. अशीं देवळें (हल्लीं हि) कारवार जिल्ह्यांतील असनोटी गांवचे रामनाथाचें व दुसरें कट्टिनबिर गांवांतील हीं होत. ठाणें जिल्ह्यांत खालच्या वर्गांत कुंभारांनां देवर्षींचा व चेटक्यांचा मान आहे. तसेंच एखादा कुणबी आपल्या नातलगापासून दूरच्या गांवीं मेला असेल तर त्याची और्ध्वदेहिक क्रिया हा कुंभार करतो. हा वैद्यकीचाहि धंदा करतो. या लोकांची आंबा; उंबर, जांभूळ (ठाणें जिल्हा), कळंब, कोच, वारुळाची माती, मोराचीं पिसें (रत्नागिरी जिल्हा) हीं देवकें आहेत. यांच्यांत अष्टीकर, कल्याणकर व निगवेकर हीं आडनांवें आहेत. रत्नागिरी जिल्ह्यांत एकाच गांवीं राहणार्या कुंभाराचा एक एक गट मानतात. त्यांच्या परस्परांत सोयरीक होत नाहीं. सख्ख्या बहिणी सवतीसवती होऊं शकतात. ठाणें जिल्ह्यांत घटस्फोटाची चाल नाहीं; दुसरीकडे आहे. मात्र घटस्फोट झालेल्या स्त्रियांस पहिल्या घरचा नवरा जिवंत असेपर्यंत पाट लावितां येत नाहीं. व्यभिचारास जातिबहिष्कृत ही शिक्षा आहे. जातीचा मुख्य असेल त्याच्या परवानगीशिवाय पाट लावितां येत नाहीं. दरएक पाटामागें भावी नवर्याकडून सात रुपये कर वसूल करतात. गांवाबाहेर आंब्याच्या झाडाखालीं रात्रीं पाट लागतो. विधवा स्नान करून व पांढरें पातळ नेसून उपाध्यायाच्या मदतीनें गणपति व वरुण यांची पूजा करिते; नंतर एका पांढर्या कापडाच्या दुपट्ट्यांशीं तिचा पाट लावितात. नंतर तीं तो दुपट्टा भावी नवर्यास देते व नवरा तो आपल्या पागोट्याभोंवतीं गुंडाळतो. पुढें ती त्याच्या कपाळास कुंकू लावते व त्याला ओवाळते. नंतर उपाध्याय दोघांच्या पदरांस गांठ देतो. याप्रमाणें ही विधि येथें संपतो. हा ठाण्याकडील विधि झाला. रत्नागिरीकडे निराळी चाल आहे. प्रथम भावी नवर्यानें पाठविलेली साडीचोळी नेसून व बांगड्या लेऊन विधवा तयार होते. नंतर तिच्या मेलेल्या नवर्याच्या घरीं तिचा भावी नवरा १० ते १२ रुपये पाठवितो. व मग तिच्या मेलेल्या नवर्याची भूतबाधा तिला होऊं नये म्हणून तिच्या तोंडावरून एक कोंबडा ओवाळतो व मग ती दोघे शेजारी बसतात. नंतर दुसरी एक विधवा त्या विधवा नवरीच्या कपाळी व नवरदेवाच्या गुडघ्याला कुंकू लाविते म्हणजे हा विधी संपतो. यांच्या सुतकानंतरच्या ११ व १२ व्या दिवशींच्या क्रियांमध्यें ठाणें व रत्नागिरी जिल्ह्यांतील रीतींत फरक आहे. या क्रियेला डाकक्रिया म्हणतात. डाक म्हणजे एक ढोलासारखें वाद्य. ठाण्याकडे पुढील रीत आहे:- एका खुंटीस एक फुलांचा हार टांगतात, त्याच्या खालीं पाण्यानें भरलेली व तोंडावर नारळ ठेवलेली एक तांब्याची घागर ठेवतात. तिच्या शेजारीं कापसाच्या झाडाच्या काट्या (पळहकांठ्या)ची एक लहान तिरडी करून तीवर मेलेल्या माणसाची एक कणिकेची प्रतिमा ठेवतात. नंतर दुसरा एक कुंभार जवळ बसून तें डाकवाद्य वाजवून गणपति व इतर साधूसंतांचें भजन करतो. नंतर तिरडी नेऊन नदींत बुडवितात. रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील रीत आढळतें:- तिकडे हा विधि बाराव्या रात्रीं होतो. ज्याच्या घरीं मार्तिक झालें असेल त्याच्या घरीं सहा सात कुंभार जमतात. माजघरांत गाईच्या शेणानें जागा सारवून, तेथें एक केळीचें पान मांडतात. त्यावर तांदूळ पसरून वर पाण्याची घागर ठेवतात. तिच्या तोंडांत आंब्याचीं पानें व त्यावर नारळ ठेऊन त्यावर फुलांची माळ लोंबती बांधतात. घागरीशेजारीं तेरा विड्याचीं पानें व १३ सुपार्या मांडतात. शेजारीं दुसरें एक केळीचें पान मांडून त्याच्यावर पंडु, गणपति, नारायणस्वामी (दोन प्रतिमा), हरिण, वैतरणा (गाय), मोर, गरुड, फूल, चंद्रसूर्य नाग इत्यादि कणिकेचें केलेले लहान पुतळें ठेवितात. या प्रतिमांच्या चार्ही दिशांनां कणकीचे चार दिवे लावितात. नंतर जमलेल्यांपैकीं एक कुंभार त्या घागरीची व प्रतिमांची पूजा करून कांहीं मंत्र म्हणतो. त्याला पंडुक्रिया असें म्हणतात. हें आटोपल्यावर मेलेल्याचा मुलगा किंवा क्रिया करणारा हा तेथें जवळच ठेवलेल्या मेलेल्या माणसाच्या कणिकेच्या प्रतिमेच्या तोंडांत पाणी सोडतो व ती प्रतिमा वैतरणा पुतळ्याच्या शेंपटीकडे सरविकतो. त्यावेळीं तो तोंडानें वैतरण नांवाचें गाणें म्हणतो व दुसरीकडे डाक वाद्य वाजविलें जातें. ही वैतरणा (गाय) त्या मेलेल्या माणसाला स्वर्गांत नेते असा याचा अर्थ आहे. यानंतर त्या सर्व प्रतिमा नदींत किंवा समुद्रांत विसर्जन करतात. कोंकणी कुंभारांचे उपाध्याय ब्राह्मण असतात. कुणबी, न्हावी, आगरी, ठाकूर व कोळी वगैरे लोक यांच्या हातचे खातात.
क न्न ड कुं भा र.- हे कानडा जिल्ह्यांत मुख्यत: आहेत यांची राहणी व आचारविचार बहुतेक कोंकणी कुंभाराप्रमाणें आहेत. अम्मा(माता) व जतग किंवा जत्तिग(एक मल्ल) यांची हे फार करून पूजा करतात. यांच्या कुलदेवता कुमठे येथील दुर्गा व हळदीपूरची देवी या होत. यांचे उपाध्याय हविक ब्राह्मण असतात. हे मद्य पीत नाहींत; मांशाशन मात्र करतात.
गु ज रा थी कुं भा र.- यांनां घडघडे, ओझा किंवा प्रजापति असेंहि म्हणतात. हे आपल्याला दक्षप्रजापतीचे वंशज म्हणवितात. कांहींजण स्वत:स क्षत्रिय समजात. हे तिकडील कणब्यांसारखे दिसतात. यांच्यांत यादव, चुडासमा, चोहान, भट्टी, राठोड वगैरे रजपुतांसारख्या कुळ्या आहेत, यांच्यापैकीं सोराठिया कुळींत धाकट्या दिराशीं पाट लावितात. यांच्यांत नवरदेव लग्नाच्या वेळीं कट्यार किंवा खंजीर हातांत घेतो. हे बहुतेक सारे वैष्णवपंथी आहेत. यांच्यापैकीं कांहीं कुळींत अकालीं मेलेल्या माणसाची पिंपळाच्या लाकडाची प्रतिमा करून घरांत एका कोनाड्यांत ठेवितात. त्याला सुरधन म्हणतात. सोरठिया यांच्यांत लाकडांऐवजीं एक खंबी नांवाचा दगड ठेवितात.
प र दे शी कुं भा र.- यांना गवंडी असें दुसरें नांव आहे. यांच्यापैकीं पुष्कळजण गवंडी काम करितात. हे पुणें, सातारा व नगर जिल्ह्यांत बरेच आहेत. हे उत्तरेकडून २० वर्षांपूर्वी इकडे आले. हे घरांत हिंदी भाषा बोलतात व उपाध्याय उत्तर हिंदुस्थानीं ब्राह्मण नेमतात यांच्यांत वलदे गरे वगैरे चार पोटभेद असून बसनीवाल, वलवाल, जलिंद्रे करोळे पिपुडे इं. ११ आडनांवें आहेत. प्रत्येक कुळाची निरनिराळी कुलदेवता असून तिला धीरदी असें म्हणतात. हीच धीरदी त्यांचें देवकहि असते. शेंदरानें माखलेला मातीचा नाग, बेलफळ, नारळ, सुपारी, वगैरे या धीरदी होत. या देवांत ठेऊन त्यांची पूजा करितात. दरवर्षीं दसर्यास व लग्नकार्यांत या बदलतात. मुलीचें लग्न ९६ वर्षांच्या आंत करितात. कुमारीनें जातींतील माणशाशीं जारकर्म केल्यास दंड किंवा जातीस जेवण दिलें व त्या व्यभिचारी माणसानें त्या कुमारीशींच लग्न लाविलें कीं, तिची शुद्धि होते. बहुपत्नीत्वाची चाल यांच्यांत आहे. लग्नापूर्वीं गांवांतील ५सवाष्णी गांवाबाहेर जाऊन उकिरड्याची पूजा करून त्यातील माती आणतात. व मग लग्नमंडप घालतात आणि त्यांत ती माती मंडपांत फेंकतात. मांडवाच्या मुहूर्तमेढीस गुरू असें म्हणतात. मांडवाला लांकडी पांच चिमण्या बांधतात. यांचीं लग्नें रात्रीच होतात. वर हा वधूच्या मांडवांत गेल्यावर व सासूनें त्याला ओंवाळल्यावर, तो त्या लांकडीं चिमण्यांनां काठीनें मारतो. मग होम करतात आणि त्याभोंवतीं वधूवर प्रदक्षिणा घालतात म्हणजे लग्न आटोपलें. यांच्यात घटस्फोटाची चाल नाहीं. [एन्थॉवेन- ट्राइब्ज अँड कास्टस ऑफ बाँबे व्हा. २] महाराष्ट्रांतील परदेशी कुंभार आपणांस कुमावत क्षत्रिय म्हणवितात. रजपूत चव्हाण शाखेपैकीं राजकुमार नांवाची जी शाखा तीच पुढें कुंभार या अपभ्रष्ट नांवानें ओळखण्यांत येऊं लागली असें सांगतात. किंवा मेवाडच्या कुंभ राण्याचें वंशज ते कुंभोज. कुंभोजपासून कुंभावत व नंतर कुमावत अशी कुमावत जाति नामांची व्युत्पत्ति लावण्यांत येते. आपण अस्सल रजपूत असल्या विषयीं कुमावत सिद्ध करूं पाहतात (रा. नाइक यांचें ‘आमची जात’ हें पुस्तक पहा. पा. ५२ ५ ६). कुंभापासून वंशवृद्धि होऊन आज माणसें किती होतील याचाहि हिशोब असली कल्पना मांडतांना केला नाहीं. कुमावतांतील कांहीं आडनांवें व रजपूत कुलनामें सारखी आहेत. लग्नांतल्या कांहीं चालीहि रजपुती दिसतात. या ज्ञातींतील कै. जी. बी. नाईक यांनीं आपल्या ज्ञातीसबंधानें पुढील माहिती थोडक्यांत दिली आहे. जातीची मुख्य वस्ती मेवाड व राजपुताना. मुख्य ठिकाण जय पूर व त्याच्या आसपास. या ठिकाणीं सुमारें ३५००० वस्ती आहे. जातींत ठिकठिकाणीं स्थानिक पंचायती आहेत. सर्वसामान्य अशी मुख्य पंचायत नाहीं. पंचायतीचा अध्यक्ष साधारणत: वंशपरंपरेन असतो परंतु अलीकडे कोठें कोठें निवडणुकीची प्रवृत्ति दिसत आहे. मेवाड, राजपुताना व डेक्कन वगैरे ठिकाणीं मिळून जातींतील गृहस्थांनीं सुमारें ५० देवळें बांधिलीं आहेत. त्यांस खर्च अजमासें रु.१,५०,००० वर जहाला असावा. वरील देवालयांची मालकी सार्वजनिक आहे. कांहीं ठिकाणीं जातीच्या ताब्यांत कांहीं कांहीं घरें आहेत पण उत्पन्न म्हणण्यासारखें नाहीं. जातीचा कर लग्नावर ठरविलेला आहे व तो लग्नप्रसंगीं वसूल केला जातो. पंचायतीचे निवाडे लिहून ठेवण्याची वहिवाट नाहीं. पंचायतीचे निकाल अगलांत आणण्यासाठीं वाळीत टाकणें हेंच शासन आहे. पंचायतीतींल नित्य प्रश्न म्हटले म्हणजे खाण्यापिण्यासंबंधानें, रढिबाह्य आचरण अगर एखाद्यानें दुसर्याचें आमंत्रण बंद करणें हे होत. महत्त्वाच्या नैमित्तिक प्रश्नांचा दाखला नाहीं. स्वजातीशिवाय अन्य वर्गांशीं अन्नोदक व्यवहाराची वहिवाट नाहीं. या जातींत पोटजाती नाहींत. जातींतील विवाहादि संस्कार राजपुतान्यांकडील गौड ब्राह्मण चालिवतात. परंतु त्यांच्या अभावीं स्थानिक ब्राह्मणांकडून ही ते चालविले जातात. साधारणत: सामाजिक प्रश्न पूर्व रुढीनुरूप जातच सोडविते व धर्मसंबंधीं प्रश्न ब्राह्मणाचा सल्ला घेण्यांत येतो. या जातींत मोठमोठे बांधकाम करणारे कांट्राक्टर झाले आहेत.
म द्रा स इ ला खा.- यांनां तेलगूंत कुमार, उरियांत कुंबारो व कानडींत कुंबार म्हणतात. यांचें समाजांत स्थान उच्च शूद्र म्हणून आहे. तेलगू कुम्मर प्राचीन राजांजवळ स्वयंपाकी म्हणून असत. अद्यापहि शूद्रांच्या घरांतून पुष्कळसे कुम्मर स्वयंपाकी आहेत. कुम्मरांनांच कुसवन म्हणतात. उरिया कुंबारो शुद्ध वैष्णव आहेत. यांच्यातच फक्त विधवाविवाह निषिद्ध नाहीं. कुंबारांत कानडी व तेलगू असे दोन भेद आहेत. तेलगू कुंबार हे आपणाला शालिवाहनचे वंशज समजतात व गळ्यांत जानवें घालतात. हे मांस खात नाहींत. यांच्यांत शैव व वैष्णव असे दोन्ही पंथ आहेत. लिंगायत कुंबारांचे उपाध्याय जंगम असतात. म्हैसुरी कुंबारांत नीलवर (रंगारी जात) ही पोटजात येतें. दक्षिण कानडांतील कुंबारांत पुष्कळसे तुलुभाषा बोलतात वारसा अलियसंतान (मातृकन्यापरंपरा) पद्धतीनें जातो. तामिली कुंभारांप्रमाणें हे लोक जानवें घालीत नाहींत. [क्रूक; रसेल व हिरालाल. थर्स्टन: एन्थावेन; सेन्सस रिपोर्ट; जी. बी. नाईक- आमची जात; कुमावत- क्षत्रिय-मित्र मासिक वगैरे].