विभाग अकरावा : काव्य - खतें
कुमारिलभट्ट- पूर्वमीमांसा शास्त्रावरील वार्तिककार व कर्ममार्गाचा प्रवर्तक विद्वान गृहस्थ. यानें बौद्ध मतास विरोध करून वैदिक धर्माचें पुनरुज्जीवन केलें. विद्यारण्य कृत शांकर दिग्विजयांत हा स्कंदाचा अवतार म्हणून पृथ्वीवर येऊन त्यानें सौगताचें म्हणजे बौद्धाचें खंडन केल्यावर प्रत्यक्ष शिव शंकराचार्य या रूपानें अवतार घेईल इत्यादि वर्णन उपोद्धातांत केलें आहे. यानें बौद्धांचा पराजय करून कर्ममार्गाचें प्रवर्तन केलें. याचाचा फायदा घेऊन पुढें प्रख्यात आद्य शंकराचार्यांनीं अद्वैत मताचा प्रसार केला. भट्टांच्या चरित्राची खरी माहिती फारच अल्प आहे. यांनां भट्टपाद असेंहि म्हणत. यांच्या कालाबद्दलहि एकवाक्यता नाहीं. याचें ग्रंथ उपलब्ध आहेत. परंतु त्यांत त्यांचे स्वत:विषयीं चरित्रपर असे उल्लेख आढळत नाहींत इतकेंच नव्हे तर हे आपल्या मतविवेचनांत इतके गढून गेलेले दिसतात कीं, तत्कालीन सामाजिक, नैतिक व राजकीय परिस्थितीचा गंधहि त्यांच्या लेखांत स्पष्ट आढळून येत नाहीं. तत्कालीन शिलालेख, ताम्रपटादिकाचें आधारहि यांच्या बाबतींत सांपडत नाहींत म्हणून त्यांच्या असामान्य कामगिरीची खरी कल्पना आणून देतां येत नाहीं. यांची अतिशय महत्वाची कामिगरी म्हणजे, बौद्ध मताचा पाडाव व वैदिक मताची पुन्हा स्थापना होय. शंकराचार्यांपेक्षां वरील कामगिरीचें खरें श्रेय भट्टांनांच दिलें पाहिजे. एका दंतकथेप्रमाणें खुद्द शंकराचार्यांनीं भट्टांची भेट, ते अग्निप्रवेश करीत असतांनां घेतली असतां, त्यांना “श्रुत्यर्थधर्मविमुखान् सुगतान् निहन्तुं’’ (वैदिक धर्मोच्छेदिक पाखंडी बौद्धांचा नाश करणारे) असें विशेषण दिलें आहे. हर्षवर्धनाच्या काळीं बौद्धधर्माचा र्हास होण्यास प्रारंभ झाला होता. तो पुरा करण्याचें श्रेय भट्टांनीं घेऊन पुढील वैदिक धर्मस्थापनेच्या कामगिरीचा मार्ग आचार्यांस सुलभ करून ठेविला. वेद व वेदविषयक आचारांवरील समाजाचा उडालेला विश्वास भट्टांनीं पुन्हां बसविला; या कारणांवरून त्यांचा काल हर्षानंतर (इ. स. ७००) मानतात व तो बरोबर असावा. रा. चिंतामणराव वैद्यांच्या मतें भट्ट व आचार्य हे समकालीन नसून त्यांच्यांत एका शतकाचें अंतर होतें; आणि इ. स. ७०० हा भट्टांचा निधनकाल होय. भट्टांच्या कालाप्रमाणें त्यांच्या वसतीच्या देशाबद्दलहि भिन्न मतें आहेत. आसाम, द्रविड व आर्यावर्त हे तीन देश त्यांची जन्मभूमि सांगण्यात येतात. त्यांच्या तंत्रवर्तिकांत फक्त आर्यावर्त देशाचीच महती जास्त गायिली आहे व इतर प्रांतांची निंदा केली आहे. यावरून ते तिकडचे रहाणारे होते असें वाटतें. आर्यावर्त म्हणजे भट्टांच्या मतें, हिमालय व विन्घ्य यांमधील प्रांत होय. त्यांनां संस्कृताखेरीज द्राविडादि इतर भाषा अवगत होत्या. द्राविड, पारसिक, बर्बर, रोमक आणि यवन इत्यादि भाषांच्या त्यांनीं केलेल्या उल्लेखावरूनहि ते ७ व्या शतकांत झाले असावेत असें दिसतें. कारण द्राविडीशिवाय बाकीच्या वरील भाषांचा लोप, हिंदुस्थानांत ७ व्या शतकानंतर झालेला आहे. तत्पूर्वीं ह्युएनत्संगासारखें बाह्यदेशीय इकडे येत व आपल्या देशची भाषाहि बोलत. असल्या परकीय बौद्धांच्या परकीय म्लेच्छ भाषा त्यावेळीं इकडे बर्याच प्रचलित होत्या; अर्थात् दुभाष्येहि बरेच असत. भट्टांनीं या दुभाष्यांचा (द्वैभाषिक) उल्लेख केला आहे. त्यांनीं बौद्ध धर्माचा अभ्यास बौद्ध भिक्षूंपाशीं केला होता. महाराष्ट्रांतील मातुलकन्याविवाहाचा त्यांनीं निषेध केला असल्यानें ते महाराष्ट्रीय नसावेत असें म्हणतात; तसेंच त्यांनीं स्त्रियांच्या पोषाखाच्या बाबतींत अन्तरीय व उत्तरीय अशा दोन वस्त्रांचा निर्देश केला आहे तो महाराष्ट्रीय स्त्रियांनां लागू पडत नसून उत्तरेकडील स्त्रियांनां अनुरूप आहे; त्याशिवाय यज्ञक्रियेंतील ब्राह्मणांच्या पशुहिसेंचा त्यांचा उल्लेखहि उत्तरेकडील ब्राह्मणांचा वाचक खात्रीपूर्वक नाहीं. दक्षिणेंत पशुहिंसा (यज्ञांतील) कधींच बंद झाली नव्हती. सारांश, भट्ट हे उत्तरेकडील रहिवासी होते. त्याच वेळीं राजे लोक चारहि वर्णाचे होते, असें भट्ट म्हणतात. साधारणत: इ. स. ६५० ते ७५० हा भट्टांचा काल असावा. हे न्यायमीमांसाशास्त्रांत अत्यंत पारंगत होते. वार्धक्यांत त्यांनीं आपला देह अग्नीस समर्पण केला. यावरून त्यावेळीं बुद्धपणीं अग्निकाष्ठें भक्षण करण्याचा प्रघात असावा असें दिसतें. पुढें पुढें तो मोडल्यामुळें या भट्टांच्या कृतीला पुढील भ्रामक कारण सांगण्यांत येऊं लागलें: त्यांनीं छद्मवेषानें परधर्मीय बौद्ध भिक्षूंजवळ परधर्माचा (बौद्ध धर्माचा) अभ्यास केला, म्हणून पुढें त्याची निष्कृति म्हणून त्यांनीं स्वत:स जीवंतपाणीं जाळून घेतलें. यांचें कर्मप्राधान्य पुढें शंकराचार्यांनीं मोडून काढिलें. यांची सारी भिस्त वेदांवर असून अग्निहोत्र व यज्ञादिकर्में हेच उपासनामार्ग ते प्रवर्तन करीत. त्यांनां संन्यासमार्ग मुळींच पसंत नसे. परंतु लोकांत जैन-बौद्धधर्मानें हिंसेविषयीं तिटकारा व संन्यासाविषयीं आवड उत्पन्न झाल्यामुळें भट्टांचा हिंसक्रियान्वित कर्ममार्ग फारसा रूढ झाला नाहीं. त्यांतल्या त्यांत दक्षिणेंत हीं मतें मुळीच रुजलीं नाहींत. ज्या दाक्षिणात्यांनीं पुष्कळ काळापासून मांसाशन वर्ज केलें होतें त्यांच्यांतूनच शंकराचार्य निर्माण होऊन त्यांनीं भट्टांचा आनुयायी जो मंडनमिश्र त्याचा पराभव करून त्याला आपला शिष्य केले; येथें यज्ञसंस्थेच्या उत्कर्षासाठीं शेवटचा प्रयत्न लुप्त झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं.
माधवाचार्यांनीं शंकरदिग्विजयांत यांचा उल्लेख केला आहे. आत्मपुराणाच्या प्रस्तावनेंतहि यांच्याबद्दल थोडीशी माहिती आहे. यांनीं प्रथम जैमिनिसूत्रभाष्य व मग जैनमतभंजन हे ग्रंथ लिहिले असें म्हणतात.
जैन लोकांच्या ग्रंथांत यांची माहिती पुढीलप्रमाणें मिळते असें अर्वाचीन कोषकार ग्रंथाधार न देतां सांगतात. “आंध्र व उत्कल या देशांच्या सरहद्दीवर महानदीकांठच्या जयमंगल गांवीं, तैत्तिरीय यजुर्वेदी घराण्यांत, तैलंग जातीच्या यज्ञेश्वरभट्ट नांवाच्या ब्राह्मणाच्या पोटीं यांचा जन्म झाला. यांच्या आईचें नांव चंद्रगुणा असून, यांचा जन्म वैशाखी पौर्णिमेस रविवारीं, माध्यान्हीं, युधिष्टिर शक २११० या वर्षीं झाला. हा कार्तिकस्वामीचा अवतार होता व वेदोक्त कर्मकांडाचा वादी, श्रुत्यभिमानी व जैन लोकांचा साक्षात यम होता. यांनीं निकेतन या जैनाचार्य (बौद्धाचार्या)जवळ छद्मवेषानें राहून जैनमत समजावून घेतलें, व पुढें त्या गुरूचा घात केला. यांचा साह्यकर्ता सुधन्वा राजा हाहि प्रथम जैन होता, परंतु पुढें यांच्या शिकवणीवरून त्यानें जैनांचा फार छळ केला. कुमारीलभट्ट यांनीं अग्निप्रवेश केला. तो प्रमाथी संवत्सरीं माघी पौर्णिमेस वयाच्या ६३ व्या वर्षीं केला.’’ या जैनकथेवरून आचार्यांनीं सुधन्व्याकडून वैदिक कर्ममार्गाचा स्वीकार व प्रसार करविला असावा. शांकरविजयांत जी कथा आहे, तिचा सारांश असा:- सुधन्व्याच्या सभेंत भट्टांनीं बौद्ध व जैन पंडितांचा पराभव केला, व राजानें सांगितल्यावरून पर्वतावरून ‘जर वेद खरे असतील, तर मला कांहीं एक होणार नाहीं’ असें म्हणून उडी मारली; परंतु ते सुखरूप राहिले. पुढें आणखी परीक्षा घ्यावी म्हणून एका घागरींत सर्प घालून राजानें प्रश्न केला असतां, बौद्ध जैनांनीं आंत सर्प आहे असें सांगितलें, परंतु भट्टांनीं शेषशायीची मूर्ति आहे असें सांगून देवाची प्रार्थना केली. घागर मोकळी केल्यावर आंतून शेषशायीचीच मूर्ति निघाली. त्यामुळें राजानें आपल्या पदरच्या व राज्यांतील बौद्ध व जैन या पंडितांचा व धर्मानुयायांचा नाश केला (विद्यारण्यकृत शां. दि. सर्ग १). भट्टांच्या तामिळ भाषेशीं परिचयाबद्दल बर्नेलनें एका आधार दिला आहे. तंत्रवार्तिकांत एकें ठिकाणीं म्हटलें आहे की, ‘आन्ध्रद्राविड भाषायाम्’ या शब्दांतील सप्तभ्यंत प्रत्ययावरून गोंधळून, हा तामीलभाषानिदर्शक कांहीतरी शब्द असावा, असा त्यानें शेरा मारला आहे. डॉ. स्टेन कोनो म्हणतो कीं, हा शब्द आन्ध्र व द्राविड या दोन्हीं भाषांकरितां घातला असावा. परंतु हा सारा व्यर्थ वाद आहे. कारण तंत्रवार्तिकाच्या (हस्तलिखित व छापीलहि) तेलगु प्रतींत ‘अथ द्राविडादि भाषायाम्’ असा प्रयोग आहे.
म्लेच्छाशब्दग्रहणाबद्दल भट्ट म्हणतात:- आर्य लोक जेव्हां म्लेच्छ शब्द संस्कृतांत घेतात, तेव्हां त्याचें मूळ रूप बदलून व त्याला नवीन स्वर जोड़ून किंवा असलेला स्वर गाळून दुसरें रूप देतात. याचीं पुढील पांच उदाहरणें त्यांनीं दिलीं आहेत.
मूळ तामीळ | भट्टमतें तामीळ | संस्कृतीकरण | अर्थ |
चोरू, शोरु | चोर | चोर | अन्न |
पांबु | पाप् | पाप | सर्प |
वयिरु | वैर | वैरि | पोट |
अम्माळ | माल् | माला | स्त्री |
अदर | अतर | अतर | रस्ता |
यावर पी. टी. श्रीनिवास आय्यंगार (विजगापट्टणकर) यांचें म्हणणें असें आहे की कुमारिलांनीं घेतलेले हे तामीळ शब्द बरोबर नाहींत अदर हा जुन्या तामीळ भाषेंत आहे. हल्लीं तो प्रचारांत नाहीं. माल् शब्दहि चुकीचा घेतला आहे. बर्नेलच्या उतार्यांत अतर शब्दाऐवजीं नडै शब्द आहे. द्रविडादिभाषा या पदांतील आदि हा उपसर्ग कुमारिलांनीं कोठून घेतला हें अय्यंगार यांनां समजत नाहीं. [शांकरदिग्वि; आत्मपुराण; अर्वाचीनकोश; मध्य. भारत; लिंग्वीस्टिक सर्व्हे. इंडिया. व्हा. ४; इंडि. अँटि. व्हा. ४२]