विभाग अकरावा : काव्य - खतें
कुरसेंग, पो ट वि भा ग.- बंगाल इलाख्यांत दार्जिलिंग जिल्ह्यांतील एक पोटविभाग व तालुका. याचें क्षेत्रफळ १८५ चौ. मै. असून १९११ सालीं लो. सं. एक लक्ष १५ हजारांवर होती. खेड्यांची संख्या ४९ आहे. यांत कुरसेंग हें एकच शहर आहे. याठिकाणीं पूर्व बंगाल रेल्वे व दार्जिलिंग हिमालय रेल्वे मिळतात.
श ह र.- कुरसेंग पोटविभागाचें मुख्य ठिकाण. दार्जिलिंगच्या दक्षिणेस २० मैलांवर हें असून समुद्रसपाटीपासून ४८६० फूट उंच आहे. १९११ सालीं येथील लोकसंख्या ५५७४ होती. हें दार्जिलिंगसारखें पाहाडी स्थळ असून येथील हवा उत्तम नसते. दार्जिलिंग-हिमालय रेल्वेवर कुरसेंग ह एक स्टेशन असून येथें चहाचा व्यापार फार मोठा चालतो. १८७९ सालीं येथें म्यु. कमिटी स्थापन झाली. येथें मामुली सार्वजनिक कचेर्या आहेत, शिवाय एक लहान तुरुंग, दवाखाना, यूरोपियन व युरेजियन मुलांकरितां व मुलींकरितां शाळा आहेत, सेंट मेरीज कॉलेज व डौहिल ट्रेनिंग कॉलेज येथें आहे.