विभाग अकरावा : काव्य - खतें
कुराण, प्रा स्ता वि क.- कुराण हा जगांतील कमींत कमी वीस कोट मुसुलमान लोकांच्या इस्लाम धर्माचा मूलभूत धर्मग्रंथ असून त्यास ते परमेश्वराची प्रत्यक्ष वाणीच समजतात व ख्रिस्ती राष्ट्रांतून होत असलेल्या बायबलच्या प्रसारालाहि मागें टाकणारा याचा सामाजिक प्रार्थनामंदिरांत व शाळांमधून होणारा व होत असलेला प्रसार पाहून या ग्रंथास जगांत सर्वांत जास्त वाचक लाधलेला ग्रंथ असें मानण्यांत येतें. निदान एवढ्या कारणासाठीं तरी तो आपल्या धार्मिक अगर तात्विक दृष्टीस कितपत उतरतो हा विचार बाजूस ठेवून देखील आपणांस त्याकडे लक्ष्य दिलें पाहिजे. शिवाय हा महंमदानें लिहिलेला असून त्या अत्यंत यशस्वी व धर्मसंस्थापक अशा सत्पुरुषाच्या अध्यात्मिक उन्नतीवर प्रकाश पाडणारा आहे. हा ग्रंथ जरी फारसा मोठा नाहीं तरी पहिल्या निरीक्षणाच्यावेळीं परक्या वाचकाला यांत सर्वत्र सांवळा गोंधळ आहेसें वाटतें यांत शंका नाहीं. परंतु अरबी संस्कृतीच्या साहाय्यानें याची पृथक्करणपूर्वक परीक्षा केली असतां हें मत थोडेसें बदलतें.
कुराणाला मुसुलमान लोक प्रत्यक्ष परमेश्वराचा शब्द मानतात व ग्रंथांतहि तोच प्रकार आढळतो. कारण स्वत: महंमदानें अगर देवदूतानें केलेल्या प्रथमपुरुषवाचक विवक्षित भाषणांखेरीज इतर सर्व ठिकाणीं स्वत: परमेश्वरच बोलणारा असून त्यानें काहीं ठिकाणीं `मी’ अशा एकवचनाचा तर दुसर्या कांहीं ठिकाणीं`आम्हीं’या बहुमानाच्या शब्दाचा उपयोग केला आहे ईश्वरी स्फूर्ति मिळालेल्या वेळीं मानवी व्यक्तित्वाची जाणीव ईश्वरी आदेशाच्या भावनेआड अदृश्य होते. पण मोठमोठ्या हिब्रु ज्ञानी पुरुषांची वाणी लवकरच मानवी ममत्वाचा आश्रय करिते, पण कुराणांत मात्र दैवी ममत्वच उमटलेलें दिसतें. एकंदरींत महंमदाला आपण ईश्वराचे प्रेषित आहों असें वाटत असे. ही त्याची भावना प्रथम जितकी स्पष्ट दिसते तितकी पुढें दिसत नाहीं हें खरें असलें तरी ती कायमची नष्ट कधींच झाली नाहीं. कसेंहि असलें तरी नैतिकदृष्ट्या त्याच्या कृत्यांत उणीव दिसून येणार्या स्थळांच्या बाबतींत देखील आपल्याला त्याच्या शुद्ध श्रद्धेविषयीं शंकां घेतां येणें शक्य नाहीं. सर्वांत महत्वाची सांगावयाची गोष्ट ही कीं, शेवटपर्यंत तो आपल्या ईश्वराविषयीं तसेंच आपल्या लोकांच्याच काय पण सर्व मानव जातीच्या मुक्तीविषयीं आस्था बाळगणारा होता व आपल्या दैवी अवतारकृत्याच्या अजिंक्य निश्चयापासून तो लवमात्रहि कधीं ढळला नाहीं. ग्रंथाच्या आविष्करणाची उपपत्ति कुराणांतच जी आहे ती अशी:-
``मूळ संहिता स्वर्गांत आहे (ग्रंथमाता,-गूढग्रंथ, संरक्षित पत्रिका). `अध:प्रवर्तनाच्या’ पद्धतीनें एकामागून एक उतारे प्रेषितास सांगण्यांत आले. मध्यस्थ एक देवदूत असून त्याला कधीं `पिशाच्च’ तर कधीं `जिब्रिल’ असें म्हटलें आहे. हा देवदूत ईश्वरी आदेश महंमदास कथन करीत असे. विचारांचा प्रादुर्भाव मनांत कसा झाला याच्या या घोंटाळ्याच्या वर्णनाचा वस्तुस्थितीशीं अगदीं पूर्ण मेळ बसत नाहीं यांत नवल नाहीं. हे नेहमीं लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, महमदाची ईश्वराविषयींची अत्युच्च कल्पना ही प्रेषिताच्या ईश्वराविषयीं प्रत्यक्ष मुलाखतीच्या विचारास सोडून आहे.
ईश्वरानें कुराण सर्व एकदम न सांगतां सावकाश थोडथोडें सांगितलें असें पुस्तकाच्या प्रत्यक्ष रचनेवरूनहि दिसतें. या प्रत्येक भागास कुराण (पाठ, वाचन अगर पाठसंग्रह ग्रंथ), किताब (लेखन) किंवा सुर (लेखमाला) असें म्हणत. यांपैकीं शेवटचें नांव हे महंमदाच्या ह्यातींतच संकलित ग्रंथापासून विवक्षित भागाचें पृथक्त्व दाखविण्याकरितां उपयोगांत येऊं लागलें व तें कुराणांतील भिन्न भिन्न अध्यायांचे वाचक होऊंन बसलें. यांपैकीं कांहीं अध्याय लहान व कांहीं मोठे आहेत. लहान अध्याय अथवा सुरांपैकीं कांहीं पूर्ण आहेत. यावरून जे मोठे आहेत ते अनेक प्रकटीकरणाच्या संमिश्रणानें बनलेले असावेत अशी साहजिक कल्पना होते. या कल्पनेस पुढील गोष्टींनीं बळकटी येत. निरनिराळ्या परंपरांतून मोठ्या सुरांतील विचारांची माला ठिकठिकाणीं तुटलेली दिसते. आणि वास्तविक मोठ्या सुरांतील अनेक भाग मुळांत वेगळे होते असें दाखवावयास पाहिजे. लहान सुरांत देखील कांहीं भाग मुळांत नसतांना आलेले आहेत. परंतु हें मत चोंहोकडे लावतां कामा नये. कारण १२ व्या अध्यायांत आरंभीं थोडी प्रस्तावना, नंतर जोसेफच्या इतिहासाचा भाग, त्यानंतर उपसंहारात्मक थोडासा भाग अशी सुंदर रचना व विसाव्या अध्यायांत मोझेसच्या इतिहासाविषयीं स्वयंपरिपूर्ण भाग पाहून हे अध्याय प्रथम पासूनच इतके लांब होते असे दिसतें. अठराव्या अध्यायांत प्रथम ``सात निद्रित’’ मोझेसची हकीकत वगैरे. निरनिराळ्या विषयांचा उपक्रम केलेला दिसतो. पण शेवटीं ते सर्व जोडले जातात. पृथक कथाभागांत देखील कुराणांत एका विषयावरून दुसर्यावर कशा उड्या मारलेल्या आहेत, विचारांचा संदर्भ राखण्यांत किती निष्काळजीपणा दाखविला आहे, अगदीं आवश्यक असलेले भागचे भाग कसे गाळलेले आहेत हे आपणांस चांगलें पाहतां येतें. यासाठीं कुराणांत कोठेंहि असंबद्धता दिसल्यास आपणांस असें म्हणतां येणार नाहीं कीं येथें तें तुटलें आहे व मागाहून कोणी तरी ठिगळ देण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या अरबी कवितेंत हा नेहमींचाच प्रकार आहे. नव्या विषयास सुरुवात केल्यानंतर मध्यें हळूच अगर एकाएकी जुन्या विषयावर येणें ही गोष्ट कुराणांत फार आढळते. थोडक्यांत सांगावयाचें तर रचनेच्या दृष्टीनें कुराणांत किती उणीवा असल्या तरी बहुतेक हल्लींचे सूर मूळ सुरांनां धरून आहेत.
महंमदाच्या मनामध्यें प्रकटीकरण कसें झालें याचा विचार करणें म्हणजे कवीच्या मन:प्रवृत्तीचें पृथक्करण करण्यासारखें आहे. त्याच्या प्रथम वयांत व क्वचितप्रसंगीं पुढेंहि हीं प्रकटीकरणें मनाच्या आवेगाबरोबर एकदम उसळून बाहेर आलीं असलीं पाहिजेत, व त्यामुळें तीं दैवी स्फूर्तीशिवाय अन्यथा असतीलसें त्याला वाटणें शक्य नसावें. शांत चित्तानें पद्धतशीर शुद्ध विचार करणारा तो नसून बौद्धिक वळण नसलेला व धर्मभोळेपणांत वाढलेला असा कल्पनाविहारी होता; शिवाय धाडशी वृत्तीची उणीव त्याच्या स्वभावांत नसल्यामुळें विरोध उत्पन्न हातांच, चिडणारा व ज्याचे नितांत विचारांमुळें विशिष्ट भावनांचें प्राबल्य वाढलें आहे असा होता. यामुळें धार्मिक कल्पनाचित्रें डोक्यांत भरतांच देव दूत आपणास अमुक अमुक म्हणावयास सांगतो आहे असें त्यास साहजिकच वाटे. कांहीं भाग त्याच्या खेरीज कोणीच ऐकिला नाहीं तर कांहीं तो विसरला असें कुराणांतच म्हटलें आहे. यांतील बराच मोठा भाग भावनाप्रधान आहे व कांहीं भाग शुद्ध बौद्धिक स्वरूपाचा आहे.
कु रा णा चें ले ख न- कुराण कसें लिहिलें गेलें हे निश्चित नाहीं. महंमदानें स्वत: कांहींच लिहिल्याचें माहीत नाहीं. त्यास आधीं लिहितां वाचतां येत होतें किंवा नाहीं याविषयीं मुसुलमान लोकांत अद्याप वाद चालतो. पण तो जरी लेखनाच्या बाबतींत अगदींच अज्ञ नव्हता तरी संवयीच्या अभावीं कोणी लेखक नेमणें सोयीच्या दृष्टीनें अधिक बरें असें त्यास वाटलें असावें असें मानण्याकडे लोकांचा कल हल्लीं होत आहे. इ. स. ६२२ मध्यें मदिनेस पळून जाण्याच्यावेळीं कांहीं तुकडे विशेषत: खटल्यांचे निकाल ताबडतोब मुद्दाम नेमलेल्या लेखकाकडून लिहिण्यांत आले. यावरून मक्केंत असतांनाच त्यानें आपलीं वचनें लिहिण्यास सुरुवात केल्याचा संभव दिसतो. तसेंच जुन्या अध्यायांत नवीन भर घालणें वगैरे गोष्टीवरून कुराणाचे मोठमोठे भाग पूर्वींपासून लिहिले गेले होते असें म्हणावयास हरकत नाहीं. कारण जरी कांहीं अध्याय त्यानें निरनिराळ्या प्रसंगीं थोड्याशा फरकानें निरनिराळ्या लोकांनां सांगितलें तरी सगळे लांब लांब अध्याय त्याला अगदीं बिनचुक पाठ येत असतील असें समजतां कामा नये. असे पाठभेद उत्पन्न करण्यांत जुन्यांत सुधारणा करण्याचा त्याचा हेतु पडत असतो तेथपर्यंत त्याच्या अनुयायांत घोंटाळा उडत नाहीं; कारण दैवी संदेशाच्या भाषेच्या सुसंबद्धतेविषयीं शंका उपस्थित करण्याची प्रवृत्ति त्याच्यांत नाहीं. तरी कित्येक ठिकाणीं हा फरक उपेक्षा करण्यासारखा नाहीं. म्हणून कुराण स्वत:च कबूल करतें कीं नास्तिक लोक उपहासानें महंमदास, ईश्वर कधीं कधीं एका कवितेच्या जागीं दुसरी कविता दडपून देतो असें म्हणतात (१६१०३). एका प्रसंगीं खुद्द महंमदाच्या दोघा अनुयायांत महंमदानेंच सांगितलेल्या दोन भिन्न पाठांपैकीं खरा कोणता याविषयीं वाद चालला असतां कुराण सात पाठांत प्रकट झालें असा महंमदानें खुलासा केला असें म्हणतात. या अस्सल वचनांतील सात हा शब्द फक्त मर्यादित संख्येचा निदर्शक आहे. परंतु यामुळें मुसुलमान धर्मशास्त्रयांनां आपल्या हटवादी मताशीं त्याचा मेळ घालतांना केवढे प्रयास पडले असतील! पाठभेदांबद्दल अनेक उपपत्ती आढळतात. व त्यापैकीं कांहीं खुद्द प्रेषिताचा आधार दाखवितात; आणि कुराणाच्या विवरणांत महंमदाच्या कल्पना बोधणार्या वचनांस अग्रस्थान देण्यांत येतें. एक अगदीं लाडकें पण तितकेंच असमर्थनीय समर्थन आहे तें असें कीं, हे सात पाठ म्हणजे अरबी भाषेचे सात पोटभेद होत.
र द्द झा ले ले पा ठ भे द.- अशा परिस्थितींत साहजिकच महंमदाला एकच सर्वमान्य पाठ असावा असें वाटत असावें, पण तसें करण्यांत त्यानें श्रम घेतले नाहींत इतकेंच. व त्याच्या व्यावहारिक बुद्धीला पुढच्या काळांतील धर्मशास्त्रयांच्या इतका कांटेतोलपणा ग्राह्य वाटला नाहीं. तथापि क्वचित कांहीं प्रकरणें किंवा कविता रद्द समजून विसरून जावयास त्यानें आपल्या अनुयायांस सांगितलेलें आहे. एक ध्यानांत ठेवण्यासारखें उदाहरण म्हणजे ५३ व्या अध्यायांतील दोन कविता होत. यांत तीन पाखंडी देवतांनां त्याचें ईश्वराजवळ वजन असल्यामुळें महंमदानें मोठी मान्यता दिली आहे. यांत अल्लाचा मोठेपणा कायम राहून शिवाय आपल्या देशबांधवांवर छाप बसविता येणार होती. हा त्याचा उद्देश सिद्धीस गेला परंतु पुढें त्याचें मन खाऊं लागलें तेव्हां त्यानें हे शब्द सैतानाच्या प्रेरणेमुळें निघाले असें प्रसिद्ध केलें.
र द्द ठ र ले ले नि य म.- कुराणांत वारंवार आढळणार्या मुसुलमानासंबंधींच्या कायद्यांच्या व नियमांच्या बाबतींत निराळाच प्रकार आढळून येतो. महंमदाच्या ईश्वरविषयक कल्पनेस तफावत पडण्यासारखें यांत कांहीं नाहीं. त्याच्या दृष्टीनें ईश्वर म्हणजे सर्वसत्ताधारी, कोणत्याहि गोष्टीचा बरेवाईटपणा बेफिकीरपणें स्वत:च्या जबरदस्तीच्या हुकुमानें ठरविणारा, स्वेच्छेनुसार आज्ञा फिरविणारा, ख्रिस्ती, ज्यू व मुसुलमान यांनां वेगवेगळे कायदे लावणारा असा आहे. उदाहरणार्थ कुराणांत निरनिराळ्या प्रसंगांस अनुसरून मूर्तिपूजकांनां मुसुलमानाकडून मिळणार्या प्रायश्चित्तासंबंधी भिन्न भिन्न आज्ञा आढळतात. त्या रद्द करण्याचा विचार महंमदास शिवला असल्याचें दिसत नाहीं. पुढील पिढ्यांतील लोकांनां यांतील रद्द भाग सहज निश्चित करतां येणार नाहींत. ही गोष्ट महंमदाच्या ध्यानांत आली नसावी कारण साहजिकच त्याची नजर आपल्या धर्माच्या लोकांच्या भविष्यकालापर्यंत पोचूं शकली नाहीं. प्रकटीकरणांत प्रासंगिक गोष्ट तशाच कायम राखण्यांत आल्या आहेत. मदिनेंत असतांना अत्यंत जरुरीच्या प्रश्नांवर ईश्वराकडून ताबडतोब उत्तर मिळण्याचे प्रसंग इतके वारंवार आले कीं श्रद्धाळू लोकांनां त्यांबद्दल सानंदाश्चर्य वाटतें. खलीफ (उस्मान)नें देखील एकदां असें म्हटलें आहे कीं, `जर प्रवक्ता आज ह्यात असता तर या मुद्यासंबंधीं कुराणांत नवी आज्ञा प्रकट झाली असती' तसेंच महंमदाच्या पट्टशिष्ट्यांनीं सुचविलेल्या विचारांशीं ईश्वरी आज्ञा मिळत्या झाल्याचीं उदाहरणेंहि थोडीं नाहींत. एक आख्यायिका अशी आहे कीं, पुष्कळदां उमरचें एक प्रकारचे मत असें व नंतर त्यास अनुसरून कुराण प्रकट होई.
कु रा णां त का य का य आ हे:- कुराणाच्या निरनिराळ्या भागांत अगदीं भिन्न भिन्न विषय आलेले आहेत. पुष्कळ प्रकरणांतून धार्मिक व नैतिक विषयांचा उहापोह केलेला आहे. ईश्वराचा मोठेपणा, भलेपणा व पुण्यशीलता यांचें भक्तांस वारंवार स्मरण दिलें आहे. ईश्वर हा एक असून सर्वशक्तिमान आहे. अशी त्याची श्रेष्ठता दर्शविली आहे. प्रवक्ता ख्रिस्त अशासारख्या मनुष्यास अगर मूर्ति वगैरेंनां देवत्व देण्याची कल्पना अत्यंत निंद्य मानिली आहे. स्वर्गीय सौख्यें व नरकांतील क्लेश यांचें अगदीं स्पष्ट शब्दचित्रे काढलें असून शेवटचा जगाच्या न्यायाचा दिवस येण्याच्या प्रसंगींच्या सर्व विश्वाच्या भयप्रद स्थितीचेंहि वर्णन आहे. आस्तिक लोकांच्या करतां त्यात नैतिक नियमांचे पाठ असून विशिष्ट प्रसंगीं उपयोगीं पडणार्या सूचनाहि आहेत. निरुत्साह्यांची निर्भर्त्सना केली आहे; शत्रूंना भयंकर शिक्षेची धमकी दिली आहे व नास्तिकास इस्लामाचें सत्यत्व पटविण्याचा प्रयत्न केला आहे. कुराणांत कांहीं ठिकाणीं उपदेशाची भाषा आहे व कांहीं ठिकाणीं सामान्य आज्ञा केल्याप्रमाणें अथवा एखादी गोष्ट जाहीर केल्याप्रमाणें अथवा एखादी गोष्ट जाहीर केल्याप्रमाणें भाषायोजना आहे. दिवाणी कायद्यापासून तों महंमदाच्या जनानखान्यापर्यंत व्यवस्था करणार्या आज्ञा बर्याच मोठ्या भागांत आहेत. एका अध्यायांत प्रार्थना आहे, दोहोंत जादूचें तंत्र आहे, कांहींत एकच विषय प्रतिपादिलेला आहे तर बाकीच्यांत अनेक विषय आणले आहेत.
क था भा ग.- कुराणांतील ऐतिहासिक भाग सांगण्यांत महंमदाचा हेतु दुष्टांनां शासन व शिष्टांनां लाभ कसा होतो हें दाखविण्याचा दिसतो. महंमदाच्या वेळीं अरब लोक ज्या देवतांची पूजा करीत त्यांच्या नांवांचा उल्लेख करून कुराणांत नोहाला त्याविरुद्ध भांडावयास लाविलें आहे. अब्राहामच्या तोंडीं घातलेलें भाषण स्वत:महंमदाचें अगर ``ईश्वराचें'' असावें असें वाचकांस वाटतें. दुसर्या कांहीं कथा केवळ मौजेखातर दिल्या आहेत. कुरेश लोक या कथांनां फारसा मान देत नसत.
जु न्या व न व्या क रा रा शीं कु रा णा चें ना तें.- वरील कथा पुराणांतील व विशेषत: जुन्या करारांतील व्यक्तींच्या आहेत. पण ग्रंथ नुसता ऐकून त्यांतील कथा घेतांना होणार्या फरकासारखे फरक पुष्कळ झाले आहेत. अगदीं अज्ञानी ज्यूचा देखील हामन हा कोणाचा प्रधान ही गोष्ट, अगर मोझेसची बहीण (मोरिआमा) व ख्रिस्त माता मेरी यांविषयीं घोंटाळा झाला नसता. या चुकांना भर घालण्यासाठींच कीं काय दुसरेहि पुष्कळ तर्हेवाईक फरक महमदाच्या अज्ञानामुळें झाले आहेत. १२.४९ मध्यें तो ईजिप्तची सुपीकता पावसावर अवलंबून आहे असें म्हणतो.
यांतील अलेक्झांडरचा वृत्तांत ज्यू अगर ख्रिस्ती ग्रंथांतून घेतला गेला हें निश्चित नाहीं. यांतील त्याच्या शिंगांचा उल्लेख अगदीं अलीकडील शोधाप्रमाणें इ. स. ५१४-१५ च्या सीरियन दंतकथेशीं जुळवितां येईल. ज्यू व ख्रिस्ती इतिहासाखेरीज यांत अरबी प्रवक्त्यांच्या कथा असून त्यांच्यांत याहूनहि अधिक फेरफार करण्यांत आला आहे.
लिखित माहितीपेक्षां ऐकीव माहितीवरच महंमदाची भिस्त आहे असें वर म्हटलेंच आहे. जुन्या किंवा नव्या कराराशीं क्वचित् जेथें प्रत्यक्ष साम्य सांपडूं शकतें तेथें म्हणजे जुना करार (२१. १०५ तसेंच साम ३७. २९; १. ५ व २७. ११ पहा) किंवा नवाकरार (७. ४८ व ल्यूक १६. २४; ४६. १९ व ल्यूक १६. २६). याठिकाणीं एखाद्या ज्यूचा अगर ख्रिस्त्याबरोबर झालेल्या संभाषणांतील सहज लक्षांत ठेवलेल्या गोष्टीपेक्षां अधिक सांपडत नाहीं. ज्यास वरील परिस्थितीचें यत्किंचित ज्ञान असेल त्यानें हे तोंडी भाषणांतील उतारे मानूं नये तथापि जेथें पाणी मिळणार नाहीं तेथें वाळूचा उपयोग करा अशी तलमुदशीं जुळणारी आज्ञा पाहून आपणांस महंमुदाला तालमुद देखील माहित असलें पाहिजे असें म्हणावें लागेल. बाकीच्या बाबतींत असें म्हणतां येईल कीं, ग्रंथ या संज्ञेस शोभेल असें कुराणाच्या पूर्वीं अरबी भाषेंत वाङ्मय असणें अगदीं असंभवनीय आहे.
भा षा शै ली.- भाषाशैलीच्या दृष्टीनें कुराणाचे निरनिराळे भाग निरनिराळ्या योग्यतेचे आहेत. निर्विकार मनाच्या वाचकांस त्याची सौंदर्यग्राहकतेची तृषा शमविण्यासारखा फारच थोडा भाग आढळेल, तरी त्यास मनोविकारांचा जोर व कल्पनाशक्तीचा प्रभाव दिसून येतो. स्वर्गाच्या वगैरे वर्णनांत कवित्व दिसून येत असून ९३ अध्यायामध्यें तर भरपूर प्रसाद दिसून येतो. कुराणाचा बराच मोठा भाग गद्यात्मक आहे, व त्याची भाषा बोजड आहे. वारसासंबंधीच्या वगैरे नियमांची भाषा गद्यात्मक असावी हें ठीक आहे, पण महंमदानें स्वत:च्या व श्रोत्यांच्या आवडीस अनुसरून प्रथमत: पतकारलेल्या गद्यपद्यात्मक भेसळीच्या भाषापद्धतीस चिकटून राहण्याचा त्याचा हट्ट चुकीचा आहे. कारण गद्य भाषेस योग्य असे विषय त्यानें कवितेंत व्यक्त केल्यामुळें ग्रंथांत विरुपता आढळून येते. कदाचित् जे दोन तीन पाठ एकदांच वाचतांना आज आपणांस त्रासदायक असे वाटतात ते मक्केच्या तप्तहवेंत उपदेशपद्धतीनें म्हणून दाखविले जात असतां त्यांचा श्रोत्यांवर अगदीं निराळा परिणाम होत असेल. कारण आपल्या ध्यानांत सुद्धां न येणार्या अनेक गोष्टी त्यांनां सार्थ अशा असतील. तीन चार वर्षांत पावसाचें दर्शनहि ज्यांनां लाभात नाहीं अशा अरबांनां महंमदानें केलेलें मेघ उत्पन्न करून ते रखरखीत प्रदेशावर पाडून त्यास फलपुष्पांनी समृद्ध करणार्या ईश्वराच्या थोरपणाचें वर्णन खास हृदयस्पर्शी वाटत असेल.
अलंकार युक्त स्वरूप व कविता.- पहिल्यापहिल्या अध्यायांत कवित्वविषयक शब्द असल्यामुळें मक्केतील लोक महंमदास प्रासादिक कवि म्हणत असले ती महंमद स्वतःस दैवी स्फूर्तीचा प्रवक्ता समजत असल्यामुळें त्याला ती पदवी सोडावी लागली. पण आपण सुद्धां त्याला कवित्वाच्या आरोपांतून मुक्त करूं. कट्ट्या धार्मिक लोकांप्रमाणें त्यासहि काव्यसौंदर्याची ग्राहकता मुळींच नव्हती. यावरून कुराणाची भाषा काव्यमय नसून अलंकारिक आहे असें ठरतें. व त्याचा जो विलक्षण परिणाम आपणांवर होतो तो काव्यांमुळें नसून अलंकारिक भाषेमुळे होतो. स्वाभाविक यमकें फार थोड्या ठिकाणीं आढळतात. तरी यमकें साधण्याचा सर्वत्र प्रयत्न केलेला आहे. यमकाची कविता त्यावेळच्य अरबांनां फार आवडे, व म्हणून महंमदानें ती पतकरली होती. यानें जरी थोडी शोभा आली तरी कित्येक ठिकाणीं ती निवळ ओझ्यासारखी भासते. कांहीं कांहीं ठिकाणीं यमकासाठी क्रियापदाची भलतींच रूपें घातलेलीं मुसुलमानांना देखील कबूल आहेत अर्थहानीहि कित्येक ठिकाणीं केलेली आहे. एरवीं ईश्वराच्या सिंहासनासभोंवार देवदूतांची संख्या सांगतांना (६९.१७) केवळ यमकास जुळल्यामुळें घातलेला आठाचा आकडा त्यानें घातला असता असें नाहीं. तसेच ४५ व्या अध्यायांत स्वर्गांतील दोन बागा, त्यात दोन कारंजीं, दोन प्रकारचीं फळें हीं सर्व या सबंध अध्यायांत प्रामुख्यानें असलेल्या यमकास शोभणारा द्विवचनाचा प्रत्यय असल्यामुळेंच घातलेली असावींत. पुढील पुढील भागांत नुसतें यमक पूर्ण करण्यासाठीं महंमद असंबद्ध धार्मिक वाक्यें घालतो.
नि र्जी व भा षा स र णी.- भाषासौंदर्याच्या दृष्टीनें बराच भाग जरी उत्तम आहे तरी साहित्यदृष्ट्या पुस्तक पहिल्या प्रतीचें वाटत नाहीं. घडलेल्या हकीकतींतील किंवा प्रवचनांतील अगदीं जरूर असलेले दुवे गाळले गेले आहेत; यामुळें त्या हकीकती ज्यांनीं पूर्वी ऐकिल्या त्यांच्यापेक्षां आम्हांस त्या दुसरीकडून माहीत झाल्यामुळें चांगल्या कळतात.
वे ग वे ग ळ्या भा गां चा का ळ.- हल्लींच्या कुराणांपैकीं कांहीं मक्केच्या वेळचें (इ. स. ६२२ पूर्वी) व कांहीं मदिनेच्या पलायनानंतरचे (इ. स. ६२२ च्या सुगीपासून ८ जून ६३२ पर्यंत) आहे. मक्केंत महंमद एका लहानशा समाजाचा आचार्यं म्हणून होता पण मदिनेंत प्रथम तो एका जोरदार पक्षाचा पुढारी होता व पुढें सर्व अरबस्तानचा शास्ता झाला. या फरकाची छाया कुराणावर पडलेली असून मदिनेंतील अध्याय मक्केच्या अध्यायाशीं मिसळलेले असतांहि स्पष्ट उघडकीस येतात. मदिनेंतल्या प्रकटीकरणाचा आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींशीं संबंध आल्यामुळें व त्यांच्या तारखा साधारणतः बरोबर माहीत असल्यामुळें त्याचा काळ आपल्यास निश्चित ठरवितां येतो. मुसुलमानांच्या परंपरेचाहि येथें बराच उपयोग होतो. तरी बर्याच भागाविषयीं अनिश्चितता रहातें. डॉ. स्नूक हुर्ग्रोजे यानें आपल्या निबंधांत दर्शित केलेली इब्राहिमची दंतकथा ही एक मक्केंतील वेगवेगळे अध्याय केव्हां झाले यांची उत्तम कसोटी आहे. त्या दंतकथेंत ज्यू लोकांशीं झालेल्या वादानंतर इब्राहिम सर्वांत पहिला महंमदाचा मदिनेंतील पुरस्कर्ता झाला, नंतर पहिला मुसुलमान व नंतर 'काबा' चा संस्थापक झाला. एक परंपरा सर्व अध्यायांची कालाच्या दृष्टीनें संगति लावणारी आहे. पण ती परंपरा हल्लींच्या अध्यायांतील फुटकळ भाग वेगवेगळ्या काळीं झाले असें मानीत नसल्यामुळें व दुसरीं अनेक शंकास्थानें असल्यामुळें तितकी ती विश्वासार्ह वाटत नाहीं. एक तर महंमदाच्या वेळची कोणी अशी यादी तयार करीलसें वाटत नाहीं; व कोणी प्रयत्न केला असल्यास मक्केंतील अध्यायांची विश्वासनीय माहिती त्यास मिळाली असणेंहि अशक्य आहे. तेव्हां यांत खरी परंपरा नसून महंमदाच्या काळानंतर शेंकडों वर्षांनीं झालेल्या एखाद्या सत्शील मुसुलमान शोधकानें तयार केलेली असावी.
म क्कें ती ल अ ध्या य.— मक्केंत व्यक्त झालेल्या प्रकटीकरणांत बहुतेक अगदीं लहान लहान अध्याय असून त्यांची रचना किंवा रोख मदिनेंतील अध्यायांहून अगदीं भिन्न आहे. यांतील विशिष्ट भाषासरणी पूर्णपणें एकसारखी असल्यामुळें त्यांचा वेगळा वर्ग आपण मानूं. याच्या उलट दुसरा एक वर्ग असा पडतो कीं, त्याचें मदिनेंतील अध्यायाशीं पूर्ण साम्य आहे. यावरून पहिल्या वर्गास आपण जुना वर्ग व या दुसर्या वर्गास नवा वर्ग असें मानूं. या दोन वर्गांच्या दरम्यान तिसरा एक वर्ग असून त्यांतील अध्याय पहिल्या वर्गांतून अखेरच्या वर्गांत झालेल्या फरकाचे निदर्शक आहेत. प्रोफेसर बीलनें दर्शविलेल्या या पृथःक्करणांत स्पष्ट अंतर दिसून येणें शक्य नाहीं. व कांहीं अध्याय कोणत्या वर्गांत पूर्णपणें पडतील याचा ठाम निश्चय होत नाहीं, किंवा या वर्गांतील अध्यायांचा कालाच्या दृष्टीनें क्रम लावणेंहि तसेंच अशक्य आहे. याकरितां योग्य पुराव्याच्या अभावीं आपण महंमदाच्या मानसिक प्रगतीच्या अनुरोधानें या अध्यायांचा क्रम लावावा. अर्थात् असें करतांना कल्पनेवर जास्त भिस्त ठेवावी लागेल. वस्तुस्थिति अशी आहे कीं, महंमदाच्या पलायनापूर्वीची कांहींच माहिती नाहीं, तो प्रवक्ता बरोबर कधीं झाला हे देखील उपलब्ध नाहीं. बहुधा हा काळ इ. स. ६१० असावा. तिसर्या वर्गांपैकी अध्याय ३०.१ पासून पुढील भागांत आलेला उल्लेख इ. स. ६१४ च्या वसंतऋतूंत दमास्कसपासून जवळच पर्शियनांनी बिझान्शिअमवर मिळविलेल्या जयाचा असावा अशी एक परंपरा मानतें. यावरून पाहतां हा तिसरा वर्ग मक्केंतील कारकीर्दीचा बराच भाग व्यापून असावा. आवेशयुक्त स्वरूपाचा पहिला वर्ग थोड्याच काळांतील असावा हेंहि असंभाव्य नाहीं. व इ. स. ६१५-१६ मध्यें उमर मुसुलमान झाला त्यावेळीं दुसर्या वर्गांत मोडणारा २० वा अध्याय लिहून तयार होता या म्हणण्यासहि वरील विधानानें बाध येत नाहीं. तथापि कालाच्या दृष्टीनें क्रम लावण्यासारख्या खुणांच्या अभावीं आपणांस मक्केंतील अध्यायांच्या या तीन मोठ्या वर्गांचा तरी निश्चित क्रम लावतां आला येवढ्यांत आपण समाधान मानलें पाहिजे.
म क्कें ती ल जु न्यां त जु ने अ ध्या य.— पहिल्यानें महंमदाच्या क्षुब्ध मनःप्रवृत्तीचा जोर इतका वाढत असे कीं त्यास शब्द सूचत नसत. यावेळच्या त्याच्या वचनावरून आपणां जुन्या रानटी भविष्यवाद्यांची आठवण होते. कारण त्यांच्या भाषापद्धतीच्या नकला हल्लीं आपणांस पहावयास मिळतात. त्यांच्याशीं यांचें बरेंच साम्य आहे. यावेळेचे अध्याय लहान, त्यांतील वाक्यें लहान व साधारण शुद्ध पण सारखी बदलणारी वृत्तरचना यांनीं युक्त असून, कांहींच्या आरंभी असणार्या शपथा भविष्यवाद्यांच्या शपथा प्रमाणेंच आहेत. कांहीं शपथांचें अर्थ समजत नाहींत व कांहींनां समजण्यासारखा अर्थच नसावा. कारण सर्व प्रकारचे चमत्कार या अध्यायांतून भरलेले आहेत. ठिकठिकाणी महंमदास साक्षात्कार झालेले आहेत व त्याच्या डोळ्यापुढें देवदूत प्रत्यक्ष दिसलेले आहेत. शेवटच्या दिवसांची व पुनरुत्थानाचीं स्पष्ट वर्णनें आहेत, तर दुसरीकडे स्वर्गांतील सुखांचीं व नरकांतील दुःखाचीं वर्णनें आहेत. तथापि सगळेच जुने अध्याय असे नसून कांहीं अधिक शांत अवस्थेमध्यें प्रकट झालेले आहेत. सगळ्या कुराणाचा जुन्यात जुना भाग ९६ व्या अध्यायाच्या प्रारंभास असलेला होय असें एका सुप्रसिद्ध परंपरेचें मत आहे. या परंपरेचा संबंध महमंदाच्या आवडत्या बायको (आयेषे)कडे पोहोचतो. परंतु ज्यावेळीं हा अध्याय झाला त्यावेळीं ती जन्मली नव्हती व ही गोष्ट महंमदानें तिला मागाहून कित्येक वर्षांनीं आठवण म्हणून सांगितलेली असावी. शिवाय ही स्त्री इतकी विश्वासार्ह नसून दुसरेहि कांहीं भाग सर्वांत जुने असल्याबद्दल अनेक मतें आहेत. एकंदरींत ज्यांत महंमदास देवदूतानें सांगितलेले प्रकटीकरण पाठ म्हणावयास आज्ञा झालेली आहे तो २६.१ पासून पुढील भाग सर्वांत जुना असला पाहिजे. यांत ईश्वराचें सार्वशक्तिमत्व व कृपादृष्टि यांचें उदाहरण म्हणून मांसाच्या गोळ्यापासून मनुष्याची उत्पत्ति व लेखनकला या दोन गोष्टी येऊन चुकल्या आहेत. या आवेशयुक्त अध्यायांतून ईश्वराचें एकत्व वगैरेची थट्टा करणार्यांनां भयंकर धमक्या महंमदानें दिल्या आहेत. १११ व्या अध्यायांत त्यानें आपल्या अबू लाहाब नांवाच्या चुलत्याला व त्याच्या बायकोला त्यानें दांडगाईनें प्रतिकार केल्याबद्दल नरकांत घालविलें आहे. या काळीं झालेल्या अध्यायांपैकीं बहुतेक हल्लींच्या कुराणाच्या शेवटास आहेत. व प्रथमतः ते पुष्कळच असून नंतर त्यांतील कांहीं लुप्त झाले असावेत असें वाटतें.
महंमदाचा सर्व जोर व्यवस्थित तत्त्वविवेचनापेक्षां आवेशयुक्त कल्पनाशक्तीवर अधिक असल्यामुळें तीच ज्यांत अधिक दृष्टीस पडते अशा या भागावर आपली नजर असणें अधिक योग्य होय. दुसर्या वर्गांतील अध्यायांत कल्पनेचा ओघ कमी कमी होत जाऊन त्यांतील ध्वनि नीरस होत गेला आहे. नवीन तत्त्वांची सिद्धता जुन्याच उत्तरांनीं केलेली आहे; अध्याय लांब लांब झाले आहेत, प्रतिस्पर्ध्यांच्या थट्टेच्या टीकेल देखील पुळचट उदाहरणांनीं उत्तरें दिली आहेत. ज्या जुन्या तत्ववेत्यांचे पूर्वी उल्लेख आलेले होते त्याचाच लांबलचक इतिहास सांगितला आहे व एकंदरीत भाषापद्धतीची मौज गेली आहे असें म्हणावें लागतें.
फा ते हा.— दुसर्या कालांतील अगर पहिल्या कालाच्या अखेरचा असा कुराणाचा पहिला अध्याय असून हा फार महत्त्वाचा आहे. त्यांत मुसुलमानांची ईश्वरास प्रार्थना असून त्याची मदत व (हुद्दा) योग्य मार्गाची जाणीव या गोष्टी मागितल्या आहेत. अल् फातेहा अध्यायांतील वाक्यें खालीं दिल्याप्रमाणें आहेत.
"(१) परम दयाळू (व) कृपाळू ईश्वराच्या नांवानें (मी आरंभ करितों), (२) सर्व जगाचा पालनकर्ता जो ईश्वर त्यालाच सर्व स्तुति (योग्य होय). (३) (तो) परमदयाळू (आणि) कृपाळू (आहे), (४) निर्णयाच्या दिवसाचा धनी आहे (५) (हे परमेश्वरा) तुझेंच पूजन आम्ही करतों व तुझेंच साहाय्य मानतों. (६) तूं आम्हांस सन्मार्गास लाव, (७) ज्या (लोकां)वर तूं कृपा केली आहेस त्यांचा मार्ग (दाखीव) ज्यांच्यावर तुझा अनुग्रह पण ज्यांच्यावर (तुझा) कोप झालेला आहे त्यांचा (मार्ग) नको आणि आडमार्गी भटकणार्यांचाहि नको.
वरील विधानांत याची एकहि नवी कल्पना नाहीं. यांतील सात वाक्यांपैकीं पांच वाक्यांचा ख्रिस्ती व ज्यू उपासनापद्धतींतील नेहेमींच्या उक्तींशीं उघड संबंध पोहोंचतो. सहावी उक्ति साम २७.११ शीं शब्दश: जुळते. ईश्वराच्या दयालुत्वाचें दर्शक 'रहमान' हें नांव ज्यूच्या 'रहमाना' याहून भिन्न नाहीं. दक्षिण अरबस्तानांत महंमदापूर्वी ईश्वराबद्दल हें नांव बराच काळ आस्तित्त्वांत होतें (उदा. साबिअन इन्स्क्रिप्शन्स ग्लेसर, ओळ ३२; ६१८. ओळ २)
मूर्तिपूजकांनीं 'अल्ला' या उपयोगांत आणलेल्या नांवाऐवजीं 'रहमान' हें नांव ईश्वराबद्दल योजावें असा महंमदाचा कांहीं काळ हेतु असावा असें दिसतें. हा उद्देश पुढें त्यानें सोडून दिला. तरी दुसर्या काळांतील अध्यायांत 'रहमान' या नांवाचा वारंवार उपयोग केला गेला आहे. यावरून जरी आपणांस हा अध्याय दुसर्या काळांत घालतां येतो तरी तो मक्केंतील कारकीर्दीच्या आरंभाचा होता किंवा त्यांतील 'ईश्वराच्या नांवानें' हें प्रारंभवाक्य मूळचें त्यांतील होतें किंवा कसें हें आपणांस ठरविता येत नाहीं. अर्थात जुन्या परंपरेच्या दृष्टीला कालविषयक विकल्प दिसत नाहीं व 'फातेहा' हा कुराणाच अत्युच्च भाग मानला जाऊन प्रत्येक मुसुलमान पांच प्रार्थानांत मिळून वीस वेळां त्याचा उच्चार करतो.
म क्कें ती ल अ खे र चे अ ध्या य.— हल्लींच्या कुराणांतील मोठा भाग व्यापून टाकणारे तिसर्या काळांतील अध्याय अगदीं नीरस आहेत. बहुतेक प्रकटीकरणें लांब लांब आहेत; व त्यांतील उक्तीहि लांब आहेत. त्यांची भाषा प्रवचनवजा आहे. हे अध्याय अगोदरच वश झालेल्या मनाची धर्मबुद्धि वाढविणारे असतील पण नवख्या मनुष्यावर त्यांचा कांहीं परिणाम होणार नाहीं. परंतु इस्लामाचा प्रसार होण्याच्या कामीं हेच लांब अध्याय विलक्षण परिणामकारक झालेले आहेत. कारण महंमदाचें अनुयायी तार्किक विचारांची ओळख नसलेले व जुना धर्म टाकून दिलेले असे होते.
म दि नें ती ल अ ध्या य.— मदिनेंतील अध्यायांचा ऐतिहासिक क्रम लावणें सोपें आहे. कारण मदिनेंतील महमंदाच्या इतिहासाचें आपणांस पुरेसें ज्ञान असून कांहींचे ऐतिहासिक प्रसंग स्पष्ट आहेत तर कांहींच्या परिस्थितीवरून त्यांचा काळ ठरवितां येणें शक्य आहे. तथापि थोडा भाग राहतो तो मदिनेंतील आहे येवढेंच आपणांस म्हणतां येतें.
मक्केंतील अखेरच्या अध्यायाप्रमाणे याचीहि भाषा गद्य असून मधून मधून अलंकारिक व कांहीं प्रसंगीं तेजस्वी अशी आहे. लढाईस आमंत्रण करणें, पूर्वीच्या जयापजयाबद्दल विचार प्रकट करणें, श्रद्धाहीनत्वाबद्दल कानउघाडणी करणें वगैरे अनेक वेगवेगळ्या बाबतींत महंमदास मुसुलमानांनां निरोप सांगावयाचे असत. कांहीं लोक श्रद्धा व अश्रद्धा यांच्या दरम्यान असत, अशा लोकांनां तो स्वतः 'शंकेखोर' म्हणत असे. या सर्वांच एक मेळ नसे व प्रसंग प्राप्त झाल्यावर सगळेच मागे रहात. मदिनेंतील ज्यू लोकांबरोबर त्यांच्या नेहमीं कलागती होत व त्या विकोपास जात असत. मक्केंतील इतर अध्याय सामान्य कायदेकानूंविषयीं व प्रासंगिक प्रश्नाविषयीं असून ते प्रथम लहान होते तरी मागाहून कमी अधिक महत्त्वाच्या माहितीची भर पडल्यामुळें ते आतां मोठ्या अध्यायांत मोडतात. सगळ्या कुराणांत मोठ्या वादाचा भाग म्हणजे महंमदाचें स्त्रियांसंबंधीं नातें दाखविणारा होय.
वरील माहितीवरून कुराणाचें बरेचसें अंतरंग कळून येईल. हें एक अठरा धान्यांचें कोडबोळें आहे. यांतील धर्मविषयक, तत्त्वज्ञानविषयक व मुसुलमानांच्या कायद्याविषयींचा भाग येवढे भाग एकत्र केले असतांही पुरण्यासारखें आहे. सर्वच भाग एकत्र गोळा केले गेले ही लोकांच्या दृष्टीनें सुदैवाची गोष्ट आहे. योग्य धार्मिक बुद्धि ठेवून वाचणारा वाचक मक्केंतील चालीरीतींवर टीकात्मक असलेला भाग उच्च नीतिविषयक भागांपेक्षाहि अधिक मन:पूर्वक वाचतो. कारण त्यास याच्या इतके ते भाग समजत नाहींत.
गू ढ अ क्ष रें.- एकोणविसाव्या अध्यायाच्या आरंभी कांहीं प्राथमिक अक्षरें असून त्यांचा अर्थ लावण्याचा अनेक विद्वानांनीं प्रयत्न केलेला आहे. परंतु निश्चित असा निकाल यूरोपीय अगर मुसुलमान विद्वानांनांहि अद्याप पर्यंत देतां आला नाहीं. सामान्य लोक त्या अक्षरांचा अर्थ फक्त ईश्वरासच माहीत आहे अशी दूरदर्शीपणाची समजूत करून घेऊन संतुष्ट असतात.
कु रा णा चें प्र व र्त न.— ईश्वरी आज्ञा लोकांस पोहोंचविण्याचे आपलें कर्तव्य आहे असें वाटल्यानंतर महंमदानें मक्केंतच प्रगटीकरणें लिहून ठेवण्यास सुरवात केली असली पाहिजे. महंमदाच्या मरणानंतर कुराण विस्कळित तुकड्यांच्या स्वरूपांत होतें. निरनिराळे भाग अनेक मुसुलमानांनां तोंडपाठ येत असत पण सबंध ग्रंथ कोणासच माहीत नव्हता. तोंडातोंडीं असलेल्या भागांत नवीन भर पडणें अगर त्यांतील कांहीं गहाळ होणें फार संभवनीय होतें. तशांत महंमदाच्या मृत्यूनंतर अरब लोकांशीं झालेल्या मोठमोठ्या झगड्यांत कुराण पाठ म्हणणारे अनेक मुसलमान बळी पडूं लागल्यामुळें उमर यास काळजी पडून त्यानें अबूबकर नांवाच्या पहिल्या खलीफास कुराणाचे निरनिराळे भाग एकत्र करावयास लावलें. त्यानें तें काम महंमदाच्याच एका मदिनेंतील सय्यद इब्न थाबित नांवाच्या लेखकावर सोंपविलें. त्यानें सपाट दगडावर, चर्मपत्रांवर, ताडपत्रांच्या दांड्यावर व अशाच दुसर्या पदार्थांवर लिहिलेल्या मजकुरावरूनच पण मुख्यतः 'माणसाच्या हृदयांपासून' म्हणजे लोकांच्या तोंडीं असलेल्या माहितीवरून एक प्रत तयार करून ती अबूबकर यास दिली व त्याजकडून पुढें ती उमर याजकडे आली. त्यानें ती आपली हफसा नांवाची मुलगी-जी महंमदाची विधवा स्त्री-तिला दिली. या कुराणाच्या मूर्त स्वरूपाला प्रारंभापासून धर्मशास्त्रविषयक प्रामाण्य नव्हतें व त्याची अंतस्थ रचनाहि केवळ तर्कगम्यच होती.
उस्मानचें कुराण — कुराणाच्या प्रती सर्वत्र एकप्रकारच्या नसल्यामुळें विद्वान लोकांत मतभेद उत्पन्न झाले व त्यामुळें त्यांच्या अनुयायांत भांडणें सुरू झालीं. अशीं भांडणें होणें घातक आहे ही गोष्ट ६५०-५१ मध्यें झालेल्या युद्धप्रसंगीं नेहावींदचा वीर हौधेफ याच्या ध्यानांत येऊन त्यानें उस्मान यास सर्वमान्य अशी एकच निश्चित प्रत करण्याविषयीं विनविलें. हेंहि काम सय्यदावरच सोंपविण्यांत आलें व त्यानें तीन कुरेश लोकांच्या साहाय्यानें मिळण्यासारखीं सर्व पुस्तकें एकत्र करून सर्व मुसुलमानांनां प्रमाण अशी एक प्रत पुनः तयार केली व पुनः घोंटाळा होऊं नये म्हणून बाकीचे सर्व पाठभेद जाळून टाकले. यांतून हफसाच्या जवळची प्रत उरली होती तीहि पुढें मदिनेचा सुभेदार मेरवान यानें जाळून टाकली. यामुळें संशोधनाच्या दृष्टीनें जरी बरेंच नुकसान झालें असलें तरी राजकीय व सामाजिक सोयीकरितां ही गोष्ट अपरिहार्य होती.
याप्रमाणें मोठ्या मेहनतीनें तयार केलेला हा कुराणाचा भाग आपल्या हातीं असून त्याच्या पूर्वतयारीची मात्र आपणांस फारशी माहिती नाहीं. अरब लोकांतच चिकित्सक पंडितवर्ग निघेपर्यंत संशोधनहि शक्य नाहीं. सय्यदानें पूर्वीच्या प्रतीवरून वाचावें व त्याच्या सहकार्यांनीं लिहावें अशा तीन प्रती एका विश्वसनीय परंपरेच्या माहितीप्रमाणें दमास्कस, बसरा व कुफा येथें खलिफानें मुख्य प्रती म्हणून पाठविल्या असाव्या व एक मदिनेस राहिली असावी.
वेगवेगळ्या प्रकरणांच्या रचनेंत विषयवारी लावणें अशक्य आहे. कारण एकाच अध्यायांत अनेक विषय आलेले आहेत. कालानुक्रम ठरविणें ही गोष्ट तर बोलावयासच नको, कारण जुन्या अध्यायांचा काल अनिश्चित आहे. वरील व्यवस्थित पद्धतीकडे दुर्लक्ष्य करून फक्त मोठे अध्याय प्रथम व लहान अध्याय मागाहून अशी रचनेची दृष्टी ठेविली असून तीस देखील क्वचित् फांटा दिला आहे. ११३ व ११४ या जादुगारीच्या अध्यायांनां त्यांच्या विषय-वैशिष्ट्याबद्दल शेवटीं स्थान मिळालें आहे. तसेंच पहिला अध्याय देखील त्यांतील विषयासच अनुसरून आरंभास आला आहे. सय्यदानें ज्यांच्या मूळ प्रतीवरून आपली रचना केली त्यांना अनुसरून व कांहीं स्वेच्छेनें अशी निरनिराळ्या तुकड्यांची रचना करण्यांत आली आहे. अध्यायांची विभागणी फक्त "ईश्वराच्या नांवें" वगैरे वाक्यांनीं करण्यांत आली आहे व तीं वाक्यें फक्त नवव्या अध्यायांत नाहींत. अध्यायांचीं नांवें व उक्तींची संख्या वगैरे दुसरे मथळे आद्य प्रतींत नव्हते व ते कुराणाचा महत्वाचा भागहि नव्हेत.
पूर्ण झालेलें कुराण- उस्मानचें कुराण अपूर्ण आहे. मूळच्या कुराणांतील कांहीं भाग सय्यदनें न घेतलेले असे आहेत. स्वतः महंमदानें त्यांपैकीं कांहीं क्वचितच टाकले असते. सय्यदानें हे भाग मुद्दाम गाळले असतील असें वाटत नाहीं. महंमदाच्या शत्रूंच्या नांवांपैकीं कांहीं नांवें त्यांचे वंशज चांगले निघाल्यामुळें त्यानें गाळलीं असावींत असा तर्क आहे. पण आपला दत्तक पुत्र सय्यद व शत्रू (चुलता) अबू लाहाब यांच्या नांवांशिवाय दुसरीं नांवें महमदानें कुराणांत घातलींच नाहींत. उलट नवीन कांहीं भाग कुराणांत घुसडण्याचा प्रयत्न सय्यदानें केल्याचेंहि दिसत नाहीं. यावरून उस्मानचें कुराण अगदीं शुद्ध असून पाश्चात्य पंडितांचा त्यांतील प्रक्षिप्त भाग शोधण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
उस्मानच्या कुराणाच्या चार निरनिराळ्या प्रतींत 'व' 'आणि' यांसारखे लहानसान फरक आहेत. पण कोठेंहि अर्थास बाध येत नाहीं. मागींल सर्व प्रती त्यांच्याच नकला होत.
कु रा णा च्या इ त र आ वृ त्ती — परंतु कुराणाचे दुसरे पाठ एकदम नाहींसे झाले नाहींत. उबय इब्न काबची एक अशी प्रत आहे. तींतील अध्यायांच्या अनुक्रमाची यादी जर बरोबर असेल तर त्यावरून हल्लींच्या कुराणांतील बहुतेक तोच विषय त्यांतहि आलेला दिसतो. यानें सय्यदाच्या मूल संग्रहाचा उपयोग केला असावा. इब्न मस्ऊद याच्या संग्रहाचा देखील तोच प्रकार आहे. मोठे अध्याय लहान अध्यायांच्या आधीं घालण्याचें तत्व सय्यदपेक्षां यानें अधिक चांगलें पाळलें आहे. पहिला व शेवटचा हे दोन अध्याय यानें गाळलेले आहेत. उलट उबयनें आणखी दोन लहान प्रार्थना अधिक घातलेल्या आहेत; त्या महंमदाच्या मानाव्यात. कुराणांत असे सिद्धांत असावेत किंवा नाहीं याबद्दल मतभेद असणें साहजिक आहे, असें कोणासहि वाटेल. हे दोन्ही पाठ व इतरहि अनेक प्राचीन पाठभेद संभाळून ठेवण्यांत आले आहेत. त्यांतील कांहीं नीरस तर कांहीं सामान्य व कांहीं सरस असे आहेत.
इ ब्न म स् ऊ द — उस्मानच्या कुराणाच्या सामान्य उपोदघातास मनापासून विरोध करणारा इब्नमस्ऊद हाच एकटा होय. तो महंमदाचा जुना शिष्य असून त्याच्या तैनातीस होता. तो जरी मुसुलमानी धर्मशास्त्राच्या बाबतींत प्रमुख होता, तरी त्याची दृष्टि संकुचित होती. त्याच्या विरोधास यश मिळालें नाही. महंमदाच्या तोंडून प्रत्यक्ष कुराण ऐकलेले मुसुलमान त्याकाळीं होते ही गोष्ट लक्षांत घेतां, व इतर बाबतींत उस्मानला झालेला विरोध व त्रास पाहतां, कुराणाच्या बाबतींत कोणाच्यानेंहि त्यास दोष देववला नाहीं किंवा सय्यदानें जुळविलेल्या कुराणास कोणासहि अमान्य करतां आलें नाहीं ही गोष्ट उस्मानच्या कुराणाचें महत्व सिद्ध करते.
पु ढी ल इ ति हा स — अरबी भाषेंतील उच्चारवैचित्र्यामुळें कुराणाचे अनेक वाचनसंप्रदाय उत्पन्न झाले. पुढें त्यांतील सात मुख्य ठरून बाकीचे लुप्त झाले. त्यांतहि हफस व नाफी हे दोनच सध्यां आफ्रिकेमध्यें ईजिप्तच्या पश्चिमेस प्रसिद्ध आहेत.
कुराणाच्या पोथ्या.— यूरोपीयन लायब्रर्यांतून कुराणाचीं कांहीं जुनी पानें सांपडतात. उस्माननें स्वतः लिहिलेल्या म्हणून कांहीं पोथ्या दाखविण्यांत येतात. अशी एक प्रत इंडिया ऑफिसच्या लायब्ररींत आहे. या जरी जुन्या काळच्या असल्या तरी स्पष्ट बनावट आहेत. तसेंच वरील लायब्ररींत असलेली अल्लीच्या हातची म्हणून दाखविली जाणारी प्रत देखील त्याच वर्गांतील होय. अलीकडे कुराणाच्या प्रती शिळाप्रेसवर छापण्यां आलेल्या आहेत.
कु रा णा व री ल टी का का र — महंमदानंतर लौककरच कुराणाचे अर्थ लावण्यास सुरवात झाली. यावेळीं शब्दाचे अर्थ न लावतां सबंध वाक्यांचा अर्थ लावण्यांत येत असे व अर्थ लावणारे फारशा योग्यतेचे नसत. व त्यांच्या अर्थांत असत्य गोष्टींचा भरणा असे. ह्या टीका किरकोळ भागावर झालेल्या होत्या. पहिली संपूर्ण टीका (इ. स. ८३९ ते ९२३) मधील ताबरीची होय. ही बरीच विस्तृत आहे. परंतु अनेक गोष्टींचा खुलासा अपेक्षेप्रमाणें तींत झालेला नाहीं.
दुसरी मोठी टीका झमखशरी याची इ. स. १०७५-११४४ मधील होय. ही १८५९ त कलकत्यास नेसौलीज यानें छापली. तिसरी फ्लाश्चेर यानें (लिपझिक १८४६-१८४८) छापलेली बैदावी याची इ. स. १२८६ मध्यें तयार केलेली होय. याशिवाय आणखी अनेक टीका झालेल्या असून त्यांनां जरी फारसें महत्व नाहीं. तरी यूरोपीय पंडितांनां अर्थ लावण्याच्या कामीं त्या फार उपयोगीं पडलेल्या आहेत.
कु रा णा चीं भा षां त रें.— आज जसें पाहिजे तसें कुराणाचें भाषांतर एकाहि यूरोपीय भाषेंत झालेलें नाहीं. त्यांतल्यात्यांत इंग्रजींतील भाषांतरें उत्कृष्ट असून त्यांत अनेकदा छापलेलें जार्ज सेल याचें, १८६१ त झालेलें राडवेलचें व १८८० तील पामरचें यांचा अंतर्भाव होतो. याशिवाय जर्मन भाषेंत झालेलें उलमानचें तसेंच हेनिंगचें (लिपझिक) वगैरे भाषांतरें साधारण आहेत. किरकोळ भागांचीं भाषांतरेंहि कांही आहेत त्यांचा उल्लेख येथें करीत नाहीं. डॉ. मीर मोहंमद याकुबखान या विद्वान मौलवी साहेबांनीं १९१६ त कुराणाचें मराठी भाषांतर करून प्रसिद्ध केलें याच भाषांतरांतील उतारे बुद्धोत्तर जग या विभागांत आलेच आहेत. आणखी कांहीं उतारें पुढें देत आहों.
कु रा णां ती ल उ ता रे.- इस्लामी धर्म हे खूळ नव्हे असें पुढील वाक्यांत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.- “(मुसलमानांनो यो लोकांस सांगा कीं आम्हीं तर) परमेश्वराच्या रंगांत (रंगले गेलों) आणि परमेश्वराचे (रंगा) पेक्षां आणखी कोणाचा रंग अधिक उत्तम होणार ? आणि आम्हीं त्याचीच भक्ती करित आहों. (हे पैगंबरा ! तूं या लोकांस) सांग कीं तुम्हीं कां परमेश्वराचे संबंधीं आम्हींशीं झगडत ! आणि खरें पाहता, तोच आमचाहि पालनकर्ता व (तोच) तुमचाही पालनकर्ता होय. आणि आम्हांला आमचीं कर्में व तुम्हांला तुमचीं कर्में; व आम्ही निखालस त्यालाच मानितो. अगर तुम्हीं असें म्हणतां कीं इब्राहिम व इस्माईल व इस्हाक व याकुब आणि (याकुबचीं) कुलें (हे लोक) यहुदी वा ख्रिस्ती होते. (हे पैगंबरा ! तूं त्यास) सांग कीं (बरें), तुम्हीं अधिक जाणणारे आहां कीं परमेश्वर ? आणि जो कोणी परमेश्वराकडून (आलेली) ग्वाही त्याच्या पाशीं (हजार असून तो ती) लपवील त्याच्यापेक्षाहि अधिक जुलमीं (आणखी) कोण होणार? आणि जें कांहींहि तुम्हीं करीत आहां, परमेश्वर त्याकडून गाफिल नाहीं. हे लोक (आपआपल्या वेळीं) होऊन गेले; त्यांचें केले सवरलें त्यांनां, व तुमचें केलें सवरलें तुम्हांला आणि जें कांहीं ते करून गेले आहेत तुम्हांस त्याची विचारपूस केली जाणार नाहीं.
ज्या लोकांची अक्कल मारली गेली आहे ते तर म्हणतीलच कीं मुसुलमान ज्या किबल्याकडे (पूर्वी) होते (म्हणजे पालेस्टाईल) त्यापासून त्यांच्या (काबागृहातील) वळण्यास काय कारण झालें ? (हे पैगंबरा! तूं हा) जबाब दे कीं पूर्व व पश्चिम (सर्व) परमेश्वराचीच होय. तो ज्याला इच्छितो त्याला (धर्माचा) सरळ मार्ग दाखवितो" (अ. २ १३७-१४१).
ई सा- ये शू ची मा ता कु मा री म र्य म (मेरी) हिच्या जननाची कथा.- एके काळीं इमरानच्या पत्नीनें (परमेश्वरा हुजूर) विनवणी केली कीं हे माझ्या पालनकर्त्या! माझ्या पोटीं जें (मूल) आहे तें मीं (संसार-) मुक्त करून तुला समर्पण करित्ये. तर तूं मजकडून (हें समर्पण) मान्य कर; कीं तूं (सर्वांचें) ऐकतोस (व सर्वांचे मनोगत) जाणतोस. मग जेव्हां ती मुलगी प्रसवली आणि परमोश्वराला हें खूप ठाऊक होतें कीं, ती कोण योग्यतेची (मुलगी) प्रसवली आहे (व ती तिच्या हकीकतीशी वाकब नव्हती) तेव्हां ती म्हणूं लागली कीं हे माझ्या पालनकर्त्या ! (आतां मी काय करूं ?) मीं तर ही मुलगी प्रसवली आहे; आणि मुलगा हा मुलगीप्रमाणें (दुर्बळ) नसतो. आणि मीं तिचें नांव मर्यम ठेविलें आहे; व मी तिला व तिच्या संततीस धोंडमार केलेल्या सैताना (च्या बहकविण्या) पासून तुझ्या आश्रयांत देते. तर तिच्या पालनकर्त्यानें (तिचें समर्पण म्हणजे) मर्यम इला चांगल्या मान्यतेनें स्वीकारिलें व तिला चांगल्याप्रकारें वाढवून मोठी केली व तिनें तिला जकरीयाच्या हवालीं केलें. जेव्हां जेव्हां जकरिया मर्यम (पाहण्यास्तव तिच्या) जवळ (तिच्या राहत्या) खोलीत जाई तेव्हां तेव्हां मर्यमजवळ (फळाफळादि पैकीं काहींना कांहीं) खाण्याचा पदार्थ त्याला आढळून येई. (म्हणून त्यानें एके दिवशी मर्यमला) विचारिलें कीं अगे मर्यम हा (खाण्याचा पदार्थ) तुजजवळ कोठून (येतो) ? (मर्यम) म्हणाली, हा परमेश्वराकडून (येतो). परमेश्वर ज्याला इच्छितो त्याला बेसुमार देतो. (अ. ३; ३४-३६)
ख्रिस्ताची सामान्यता— मरयमचा पुत्र ख्रिस्त हा तर केवळ एक पैगंबर होय एवढेंच. याच्या पूर्वीहि (अनेक) पैगंबर होऊन गेले आहेत. आणि याची मातोश्री (मर्यमही परमेश्वराची एक) सात्विक (सेविका) होती. (इतर मनुष्यांप्रमाणें हीं) उभयतां (मायलेकरें) अन्न खात होतीं. (हे पैगंबरा!) पहा तर खरें, कीं आम्हीं (आपलीं) प्रमाणें या लोकांस कशीं स्पष्ट करून सांगतों ! व नंतरहि पहा कीं (सैतानाचे बहकविण्यानें) हे लोक कोठेंच उलटे भटकत चालले जात आहेत ! (अध्याय ५ वा. ७४-७५)
ख्रि स्ती व य हु दी लो कां चा पा खं डी प णा.- अहो मुसुलमानांनो! ज्यांनीं तुमच्या धर्माला हंशी व खेळ बनवून ठेविला आहे, म्हणजे (यहुदी व ख्रिस्ती) कीं ज्यांनां तुमच्यापूर्वी पुस्तक दिलें जाऊन चुकलें आहे त्यांनां व नास्तिकांनां (आपले) मित्र बनवूं नका. आणि जर तुम्ही (खरे) मुसुलमान आहां तर परमेश्वराला भीत रहा आणि जेव्हां तुम्ही (नमाजीची बाग पुकारून लोकांस) नमाजीसाठीं बोलवितां तेव्हां हे लोक नमाजीला हंशी व खेळ बनवितात. (आणि) हें (गैरशिस्त कार्य यांच्याहातून) ह्यासाठीं (घडून येतें) कीं हे असे (बेवकूब) लोक होत कीं (बिलकुल) समजत नाहींत. [अध्याय ५ वा. ५६-५७].
बेवकूब व आत्मविश्वास नसलेल्या मुसुलमानांनां परकीयांशीं लढण्याला उत्तेजन देणारा पुढील भाग आहे :- "आणि (मुसुलमानांनों!) तुम्हाला झालें तरी काय कीं तुम्हीं परमेश्वराच्या मार्गांत व (तसेंच) दुर्बल पुरूष व स्त्रिया व मुलें यांच्या प्रीत्यर्थ शत्रूंशी लढत नाहीं, कीं ती (अगदीं काकुळतीस येऊन परमेश्वरास) प्रार्थना करतात कीं हे आमचे पालककर्त्या! आम्हाला ह्या वस्तीं (म्हणजे मक्कें)तून (कोठें) बाहेर ने, कीं येथील रहिवाशी (आम्हांवर) जाच जुलूम करीत आहेत. आणि तूंच (खुद्द) आपल्याकडून कोणालाहि आमचा पुरस्कर्ता बनीव व (खुद्द) आपल्याकडून कोणालाहि आमचा मदतगार बनीव."
जे विश्वास बाळगतात ते तर परमेश्वराच्या मार्गांत लढतात; आणि जे (इस्लाम धर्मास) नाकारतात ते सैतानाचे मार्गांत लढतात. तर (मुसुलमानांनों!) तुम्ही सैतानाच्या पक्षकारांशीं लढा; (आणि त्यांच्या बहुसंख्येची कांहीं पर्वा करूं नका; कां कीं,) सैतानाचे (जितकें) डावपेंच असतात (तितके सर्व) पोंचट. [अध्याय. ४. ७४-७५].
ऐ हि क मा र्गा ला व ळ ले ल्या लो कां ची अ व स्था:- आणि (हे पैगंबरा! तूं) या लोकांस आम्ही ज्या मनुष्याला आपले चमत्कार दिले होते व मग त्यानें ती कात फेंकून दिली, तोंच सैतान त्याच्या पाठीस लागला (व त्यानें त्याला बहकवलें), तेव्हां तो बहकलेल्या (लोकां)त जाऊन सामील झाला. अशा त्या मनुष्याची हकीकत वाचून ऐकीव. आणि जर आम्ही इच्छितों तर त्याच (चमत्कारांच्या) प्रतापानें आम्ही त्याला उच्च पद देतो. परंतु तो भूलोकां(च्या अधोगती)कडेच झुकुन राहिला व आपल्या मनोवासनेच्या नादी लागून गेला तर त्याची उपमा कुत्र्याच्या उपमेसारखी होऊन गेली. की जर तूं त्याला खिदडशील तर तो जीभ बाहेर काढील; अगर तूं त्याला (त्याच्याच स्थितीवर) सोडून देशील तरीहि तो जीभ बाहेर काढील. ज्या लोकांनीं आमच्या निशाण्यांस पाखंड म्हटलें त्यांचीहि (किती तरी) वाईट गत होय! आणि (त्यांच्या या पाखंड म्हणण्यानें) ते आपणच आपलें नुकसान करीत राहिले आहेत." (अ. ७- १७४-१७६).
पु ण्य वा न व पा पी लो कां ना मृ त्यू नं त र मि ळ णा रें शु भा-शु भ फ ळ- "परमेश्वराचे खास नि:सीम सेवक; हे असे (सुदैवी) असतील कीं त्यांचा रतीब बांधलेला असेल. आणि रतीबहि असलेतसले नाहींत, (तर) मेवे; आणि त्यांचें आदरातिथ्य केलें जाईल. (ते) ऐषआरामाच्या बागांत (ठेवले जातील) (आणि ते) तख्तांवर समोरासमोर (वसलेले) असतील. त्यांच्यांत स्वच्छ मद्याचा पेला (चौफेर) फिरविला जात असेल. (तें मद्य) पांढरें शुभ्र (असून) पिणारांस (फार) रुचि देईल. त्यांत बुद्धिविभ्रम होणार नाहीं. व त्यानें निशाधुंद होऊन ते बडबडणारहि नाहींत. आणि यांच्यापाशीं खालीं नजर राखणार्या मोठमोठ्या डोळ्यांच्या (अप्सरा) असतील. त्यांच्या गोर्यागोर्या रंगांत हलका हलका पिवळेपणा असा झळकत (असेल) कीं जणूं त्या (शहामृगाचीं) अंडीं होत कीं तीं (संभाळून) पडद्यांत ठेवलेलीं होत. मग हे (स्वर्गवासी) एकमेकांकडे वळून (व संबोधून) आपसांत प्रश्न करतील. यांच्यांतून एक बोलणारा बोलेल कीं (जगांत) माझा एक जिवाचा सोबती होता. (तो आश्चर्यानें) विचारीत होता कीं जे लोक (पुनरुत्थानास) खरें म्हणून मानतात. कां तूंहि त्यांजपैकींच आहेस? कां खरोखरीच आम्ही मरून जाऊं आणि माती व हाडें होऊन जाऊं, तेव्हां कां (खचितच आम्ही पुन्हां उठवून उभे केले जाऊं व) आम्हाला (आपल्या कर्मांचा) बदला मिळेल? (मग तो आपल्या इतर सोबत्यांस) म्हणेल (कीं मी तर त्या सोबत्यास पाहूं इच्छितो) कां तुम्हींहि (त्याला खालीं) डोकावून पाहूं इच्छितां? असें म्हणून तो (वरून नरकांत) डोंकावील तों, तो (आपल्या) त्या (सोबत्या)स पाहील (कीं) नरकाच्या मधोमध (पडलेला आहे). (तो त्याला त्या स्थितींत पाहून) असे उद्गार काढील कीं परमेश्वराची शपथ! तूं माझा जवळजवळ घातच केला होतास! आणि जर माझ्या पालकनकर्त्याची कृपा (मजवर) नसती तर (आज) मीहि (शिक्षेंत) पकडून हजार केलेल्या लोकांपैकींच असतो. कां आम्ही (स्वर्गवाशांची ही स्थिति, नाहीं. कीं पहिल्यांदा मरावयाचे होतें (तें मरून चुकलों); आतां पुढें आम्हाला मरावयाचें नाही व शिक्षेंतहि पीडित राहणार नाहीं. (अध्याय ३७. ३९-५७).
न र क पु री स्व र्ग पु री.- "यात संशय नाहीं कीं (परलोकी) 'जक्कूम' निवडिंगाचे झाड (महा) पापी (म्हणजे नास्तिक) यांचा आहार होईल; जसें वितळलेलें तांबें (व) तें पोंटात असें उकळेल. जसें कढ आलेलें पाणी उकळतें. (याशिवाय आम्हीं दूतांस आज्ञा करूं कीं,) याला धरा आणि ओढीत ओढीत याला नरकाग्नीच्या मधोमधपर्यंत घेऊन जा. मग [याला ही शिक्षा द्या कीं याच्या डोक्यावरून उकळी आलेलें पाणी ओता. [मग आम्हीं त्या नरकवाशाच्या क्लेशाची वृद्धि करण्यासाठी त्याला हिणवून म्हणूं कीं घे या शिक्षेची गोडी] चाख; [कारण] तूंच तर तो सामर्थ्यवान [व] अब्रूदार होतात. हाच तर तो [नरकाग्नी] होय कीं ज्याविषयीं शंका करीत होता. [राहिले परमेश्वराला] भिऊन वागणारे [तर ते] अभयाच्या स्थलीं [म्हणजे बागांत] व झर्यांत असतील; ते तलम रेशमाचीं व साटीनची वस्त्रें परिधान करून [एकमेकांच्या] समोरासमोर बसलेले असतील. [होईलहि] असेंच. आणि [या व्यतिरिक्त] मोठमोठ्या व काळ्या डोळ्यांच्या अप्सरांशीं आम्हीं त्यांचे जोड लावून दिलेले असतील. ते तेथें निश्चित होऊन हरतर्हेचे मेवे मागवून [मागवून खात] असतील. पहिला मृत्यु [जो ते या लोकीं चाखून चुकले] त्याशिवाय तेथें त्यांनां मृत्यु [चा कटु स्वाद] चाखावाच लागणार नाहीं; आणि परमेश्वर त्यांनां नरकाग्नीच्या शिक्षेंतून वांचवून घेईल. [अध्याय ४४. ४२-५६].
आ स्ति क्या चें फ ळ.- नास्तिकां (च्या बोध घेण्या) साठीं परमेश्वर, 'नूह' ची बायको व ‘लूत’ची बायको यांचा दृष्टांत सांगतो कीं, या (दोघी स्त्रिया) आमच्या सेवकांपैकीं दोन पवित्राचरणी सेवकांच्या विवाहांत होत्या. मग त्या दोघींनी त्यास दगा दिला (कीं आपल्या पतीच्या विरुद्ध नास्तिकाशीं मिळून राहिल्या); तर दोघींचें पती (पैगंबर असूनहि) परमेश्वरापुढें त्यांच्या कांहींहि कामा आले नाहींत; आणि (या दोघी स्त्रियांस) हुकूम दिला गेला कीं (जेथें) आणखीहि लोक (‘जहन्नमीं’त) दाखल झाले आहेत (तेथें) त्यांच्याबरोबरच तुम्हींहि नरकाग्नींत (दाखल) व्हा. आणि (खर्या) मुसुलमानां(च्या सांत्वना)साठीं परमेश्वर (एक तर) ‘फिरऔन’ची बायको (‘आसिया’) इचा दृष्टांत देतो कीं त्या बाईनें प्रार्थना केली कीं हे माझ्या पालनकर्त्या! माझ्याकरिता स्वर्गांत आपल्यापाशीं एक घर बनीव; आणि मला 'फिरऔन' व त्याच्या (दुष्ट) कर्मापासून सुटका दे व (तशीच) मला (या) जालीम लोकांपासून सुटका दे. आणि (दुसरा दृष्टांत) 'इमरानची' मुलगी 'मरयम' इचा; कीं, जिनें आपली लाज संभाळली. तर आम्हीं तिच्या (पोटां)त आपल्या आत्म्या (म्हणजे सामर्थ्या)नें फुंक मारली; व तीं पालनकर्त्याच्या शब्दांचें व त्याच्या पुस्तकांचे सत्यत्व पटवीत राहिली; आणि ती (आमच्या) आज्ञाधारक (सेविकांपैकीं होती.) (अध्याय ६६. १०-१२)
पु न रु त्था ना चा दि व स.— ज्यावेळी सूर्या (च्या प्रकाश पटला)स गुंडाळलें जाईल, व जेव्हां तारे झडून पडतील; आणि ज्या वेळां पर्वत (आपल्या जागेवरून) चालविले जातील, व जेव्हां दहा महिन्यांच्या गर्भिणी साढण्या मोकळ्या फिरतील; (व कोणीहि त्यांचा राखणदार नसेल;) आणि ज्यावेळीं आत्मे (आपापल्या शरीराशीं) जोडले जातील; व जेव्हां जिवंत पुरून टाकलेल्या मुलीस विचारिले जाईल; कीं जिला कोणत्या अपराधाबद्दल ठार केले गेले ? आणि ज्यावेळीं (लोकांचे) कर्मपट उघडले जातील; व जेव्हां आकाशाचें कातडें काढलें जाईल आणि ज्यावेळीं नरकाग्नि धनधगविला जाईल आणि जेव्हां स्वर्ग जवळ आणिला जाईल; (त्यावेळीं) प्रत्येक जीवाला त्यानें जें कांहीं (पुढच्या सामुग्रीदाखल) आणून हजर केलें आहे तें (प्रत्यक्ष) कळून येईल. (अ. ८१; १-३).
पैगंबराच्या शत्रूचा नाश कसा होतो हें पुढील अध्यायांत पैगंबराचा चुलता अबुलहब याचें उदाहरण घेऊन सांगितलें आहे. "(जसें 'अबुलहबनें' पैगंबरास गालिप्रदान केलें होतें तसें उलट) 'अबुलहब' चेच दोनही हात तुटून गेले. आणि तो (आपणहि) नाश पावला. त्याची धनदौलत व त्यानें जें काहीं संपादन केलें तें कांहींच त्याच्या कामा आलें नाहीं. तो लवकरच (नरकाच्या) डोंब घेणार्या अग्नींत जाऊन दाखल होईल; आणि (त्याच्या संगतीं) त्याची बायकोहि, कीं जीं लांकडें वाहून आणितो; तिच्या गळ्यांत खजुरीच्या तंतूंची पीळ दिलेली दोरी असेल."
[संदर्भग्रंथ.— यूरोपांत कुराणावर लिहिलेल्या ग्रंथाची यादी व्ही. चौव्हिननें १९०७ सालीं लीज येथें प्रसिद्ध केली आहे. कुराणाचें विवेचन करणारे वील, नोलडेके वगैरे जर्मन पंडितांचे बरेच ग्रंथ आहेत. ब्रिटानिका, ए. रि. ए. यांसारख्या कोशांतून कुराणावर टीकात्मक लेख आहेत. ज्ञानकोश, विभाग ४ यांतील १३ व्या प्रकरणांत महंमदाचा कुराणाशीं येणारा संबंध व्यक्त केला आहे व कुराणांतील कांहीं उतारेहि दिले आहेत.]