विभाग अकरावा : काव्य - खतें
कुरु— एक प्राचीन राष्ट्र. कुरुवंशाबद्दलची वैदिक माहिती ज्ञानकोश विभाग ३ मधील 'दाशराज्ञ युद्ध' या प्रकरणांत आलीच आहे. ऋग्वेदांत कुरुवंशाचें स्मरण करून देणारे फक्त दोनच शब्द दिसतात ते कुरुंग व कुरुश्रवण हे होत. पुरु, तृत्सु, भरत व कुरु हीं राष्ट्रें पुढें मागें एकच झालीं असावींत असें वैदिक वाङ्मयावलोकनानें वाटूं लागतें. महाभारतांत वर्णिलेल्या कुरुवंशातील पुरु, भरत, देवापि, शन्तनु यांसारखे प्राचीन पुरुष ऋग्वेदांत सुद्धां उल्लेखिलेले आहेत असें एक मत प्रदर्शित झालें आहे पण तें आमच्या मतें चुकीचें आहे. अथर्ववेद (२०, १२७, १), शांखायनसूत्र (कांहीं प्रतींत १२. १४, १) इत्यादि वैदिक ग्रंथांत ज्याला कौरम म्हटलें आहे त्याचेंच प्रतिरूप कौरव आहे. ज्ञा. विभाग ३ यांत वेदकालांतील शब्द सृष्टि या प्रकरणांत (पा. ३६७-३६८) ब्राह्मण- उपनिषद्-वाङ्मयांत कुरु व कुरुपांचल यांची जी माहिती मिळते ती सविस्तर दिलेली आहे. तींत भारतकथांतील अनेक बीजें सापडतील. कुरूंचा पांचालांशीं निकट संबंध असल्यानें त्यांचे एकत्र उल्लेख आढळतात.
महाभारतांत कुरुवंशीय संवरणपुत्र जो कुरुराजा त्याच्या वंशजांनां सामान्यतः कुरु हें नांव देतात. पण विशेषतः पांडवशत्रू जे धृतराष्ट्राचे पुत्र व त्यांचें अनुयायी यांनांच कुरु किंवा कौरव म्हणण्यांत येतें. कुरुराजापासून जनमेजयापर्यंत कौरव वंशांत किती पिढ्या झाल्या व प्रत्येक पिढीचे समकालीन असे इतर घराण्यांतील राजे कोणकोणते होऊन गेले तें 'बुद्धपूर्व जग' विभागांतील सूतसंस्कृति- प्रकरणांत कोष्टकानुरोधानें दाखविलें आहे.
कुरु देशाची राजधानी हल्लींच्या दिल्लीजवळ असलेलें इंद्रप्रस्थ शहर होय. याच्या पूर्वेस पांचाल व दक्षिणेस मत्स्य लोकांची वस्ती होती.