विभाग अकरावा : काव्य - खतें
कुर्तकोटी- मुंबई इलाखा धारवाड जिल्हा. गदगच्या नैऋत्येस सुमारें ८ मैलांवर हा एक गांव आहे. येथील गौरेश्वराच्या देवळाजवळ इ. स. १२४४ सालचा एक, केरी बसप्पाच्या देवळांत इ. स. १०८२ सालचा एक, शंकर लिंगच्या देवळांत इ. स. ११३२ आणि ११३८ सालचे दोन आणि विरुपाक्षाच्या देवळांत इ. स. १०८७ सालचा एक असे पांच शिलालेख आहेत. इ. स. १८३५ च्या सुमारास कुर्तकोटी येथील एका घराचा पाया खणीत असतां एक ताम्रपट सांपडला असून तो इ. स. ६१० सालचा आहे असें दिसतें. तथापि तो त्या सालचा नसून नवव्या किंवा दहाव्या शतकांतील आहे व त्यामुळें तो ताम्रपट बनावट आहे असें फ्लीटनें सिद्ध केलें आहे [इं. अँ. पु. ७; २१७. मु. गॅ.].