विभाग अकरावा : काव्य - खतें
कुर्ला— मुंबई इलाखा. ठाणें जिल्हा. साष्टी तालुक्यांतील एक गांव. साष्टीं बेटाच्या पूर्व टोंकावर असून जी. आय. पी. रेल्वेवें स्टेशन आहे. येथें कापडाच्या २ मोठ्या गिरण्या आहेत. १९११ सालीं येथील लो. सं. १५०८१ होती. येथें म्यु. कमिटीची स्थापना १८७८ सालीं झाली.
पोर्तुगीजांच्या अमलाखालीं कुर्ला गांवाला बरेंच महत्त्व चढलें. १७४० त मराठ्यांनीं त्यांनां हुसकावून लाविल्यावर साष्टीच्या मुख्य उपाध्यायकडे तें आलें. १८०८ त मुंबई सरकारनें मुंबईंतील अपोलो पीयर गेटाजवळील जमीनीच्या तुकड्याच्या मोबदला होर्मसजी बम्मनजी वाडिया या पारशी गृहस्थाला इतर पांच गांवांबरोबर कुर्ला देऊन टाकिलें. अर्देसर होर्मसजी वाडिया या मुंबईच्या व्यापार्याकडे १८८२ त तें होतें. सींव व कुर्ला यांस जोडणारा एक बांधाचा रस्ता १८०५ त सुरू झाला व पुढें १८२६ त तो चांगला दुरुस्त करून मोठा केला.