विभाग अकरावा : काव्य - खतें
कुसुंबा (करडी)— या झुडुपास लॅटिनमध्यें कार्थे मस् आक्सिआकंथा इंग्रजींत सॅफफ्लावर, संस्कृतांत अग्निशिखा इतर भाषेंत कुसुंब, करडई, कुसुंबा, कुझबुराय, खरेझा व करर, पोलियान, पोलि, कंडियारा, मियान्, कलाय वगैरे नांवें आहेत.
स्पेन, जर्मनीचा दक्षिण भाग, इटली, हंगेरी, इराण, ईजिप्त, दक्षिण अमेरिका, दक्षिणरशिया, व हिंदुस्थानांतील बहुतेक प्रांतांत हीं झुडुपें होतात. पेशावरमध्यें विशेषतः हीं बरींच आढळतात.
उ प यो ग.- या झुडुपाच्या फुलांपासून रंगाचें द्रव्य व बियांपासून तेल निघतें. आफ्रिडी मेणकापड करण्याकरितां लागणार्या वस्तूंपैकीं हें मुख्य द्रव्य आहे. फुटलेली कांच सांधण्यांत त्याचा लुकणासारखा उपयोग करितात.
लागवड : केलेल्या करडईला बॅस्टर्ड सॅफ्रॉन, नकली केशर, कार्थेमाइन रंग, कुसुंबा इत्यादि अनेक नांवें रुढ आहेत.
इतिहास.— कुसुंब्याच्या बिया रेचक म्हणून लोक खातात. संस्कृत ग्रंथावरून कुसुंब्याचा हा उपयोग हिंदु लोकांनां माहीत होता असें सिद्ध झालें आहे. कुसुंब्याचें तेलहि औषधी असून त्याचा उपयोग इजिप्तमध्यें एरंडेलाच्या ऐवजीं करीत असत असें प्लिनीच्या ग्रंथावरून दिसतें. इजिप्त देशांतल्या ममींच्या शरीराचे आंगावरील कपडे कुसुंबाच्या रंगानें रंगविलेलें असतात असें आढळून आलें आहे. चीनमधील लोकांना इ. स. पूर्वी दोन शतकांपर्यंत कुसुंबा माहीत नव्हता व चीनमधून नंतर हें झाड जपानमध्यें गेलें असा समज आहे.
करडईचें झाड कंबरेइतकें उंच वाढतें. याचीं पानें लांबट असतात. त्यांस बारीक कातरा असतो. करडईस पिंवळ्या रंगाचें फूल येतें. त्यांत केशराप्रमाणें तंतु असतात. या फुलाच्यामागे सुपारीएवढें बोंड येते. त्यास टोंक असतें. व बोंडांत करडईचे दाणे असतात. करडई देशावर फार पिकते. करडईंत दोन जाती आहेत. एक काट्याची व दुसरी बिनकाट्याची. विन कांट्याच्या करडईची फुलें वाळवून त्यांचा कुसुंबा रंग करितात. करडी अहमदनगर, पुणें, सातारा, सोलापूर, विजापूर, धारवाड, बेळगांव येथें जास्त होतो. वर्हाडांत बुलढाणा, यवतमाळ व अकोला येथें हिचा पेरा होत असून निझामच्या राज्यांत मराठवाड्यांत हिचें पीक पुष्कळ होते. चीन देशांत हिची लागवड जास्त असते व तेथील रंग नांवाजलेला आहे.
करडी रब्बी पिकांशी मिसळून पेरितात. परंतु गुजराथेंत मात्र याची स्वतंत्र शेतें आढळतात. करडईचे शाळू, जोंधळा, गहूं व हरबरा यांत पाटे घालितात किंवा मिसळून पेरितात. याच्या स्वतंत्र पेर्यास दर एकरी वीस पौंड बी लागतें व मिसळीच्या पिकांत तें दोनतीन पौंड पुरतें. पीक फेब्रुवारी व मार्च महिन्यांत कापून त्याचे ढीग (कडपे) घालितात व वाळल्यानंतर खळ्यांत नेऊन कडपे काठ्यांनीं झोडितात; व बीं तयार करितात.
स्वतंत्र पिकाचें सरकारी दर एकरी उत्पन्न ६०० ते ८०० पौंड व मिसळीच्या पिकाचें द. ए. उत्पन्न १०० ते १२५ पौंड असतें. करडईचें तेल काढितात. तें स्वयंपाकांत व इतर कामीं उपयोगास येतें. करडईचे तेल लवकर खंवट होत नाहीं; म्हणून तें फार दिवस टिकतें. गुरांस पेंड खाण्यास व खतासाठीं उपयोगी पडतें. करडीच्या कोंवळ्या पाल्याची भाजी करितात. गुजराथेंत करडईच्या पाकळ्यांचा रंग करितात. फुलें जानुवारी, फेब्रुवारी महिन्यांत काढितात. पाकळ्या एक दोन दिवस ठेऊन त्या तिळाच्या तेलाबरोबर चोळितात. एक पौंड पाकळ्यांनां एक तोळा तेल लागतें. चोळलेल्या पाकळ्या तीन दिवस सावलींत वाळवितात. वाळल्यावर त्या मळून अगर ठोकून त्यांचें पीठ करितात व चोळतात म्हणजे रंग तयार झाला. रंगाच्या वड्या दर रुपयांस दोन तीन पौंड मिळतात.
तेल:- तेल काढण्यासाठीं कुसुंब्याची लागवड मुंबई इलाख्यांत करतात. परंतु फुलासाठीं लागवड केलेल्या कुसुंब्याच्या बियांचाहि पूरक उत्पन्न म्हणून उपयोग करितात. मुंबई इलाख्यांत याची लागवड अजमासें ५००००० पासून ६००००० एकर जमिनीवर करितात व गळिताच्या धान्यांत करडइ हें मुख्य पीक समजतात. अहमदनगर, पुणें, सातारा, विजापूर, धारवाड व बेळगांव हीं करडईच्या उत्पन्नाकरितां प्रसिद्ध आहेत. मध्यप्रांतांत तेलाकरितां कुसुंब्याच्या लागवडीचें प्रमाण कमी होत आहे.
ते ल का ढ ण्या च्या कृ ति.- बियांपासून तेल काढण्याच्या दोन तर्हा आहेत.-
पहिली:- फळाचें टरफल काढून उष्णता न लावतां तेल काढणें. किंवा यंत्राच्या साह्यानें तेल काढणें. यंत्रानें तेल जास्त निघतें खरें परंतु त्यामुळें ती पेंड निकस झाल्यामुळें जनावरें आवडीनें खात नाहींत व ती जास्त द्यावी लागते.
दुसरी:- एका मडक्यांत बिया घालून तें मडकें दुसर्या एका जमिनींत पुरलेल्या मडक्याच्या तोंडावर पालथें ठेवतात त्या दोन मडक्यांमध्यें भोकें पाडलेला पत्रा ठेवितात. नंतर उपड्या मडक्याच्या बुडावर व सभोंवती जाळ करितात. कांही वेळानें बियांतून तेल निघूं लागतें, व तें जमिनींत पुरलेल्या मडक्यांत जमा होते. पहिल्या तर्हेनें काढलेलें तेल लोक खाण्याकरितां वापरितात. तीळ व कुसुंब्याचें बी मिळून काढिलेले तेल मुंबई इलाख्यांत गोडें तेल म्हणून विकतात. याच प्रकारचें पण हलक्या प्रतीचें तेल लोक जाळतात. दुसर्या रीतीनें काढलेलें तेल खाण्याच्या किंवा जाळण्याच्या उपयोगी पडत नाहीं. परंतु दोरांनां चरबीसारखें लावण्याकरितां व कातड्याचे पोहरे मढविण्याकरितां त्याचा चांगला उपयोग होतो. हें तेल म्हणजे एक तर्हेचें रोगणच होय.
जं ग ली कु सुं ब्या चें ते ल:- उत्तर हिंदुस्थानांत व मुख्यत्वेंकरून पेशावर येथें रोगण निराळ्याच तर्हेनें तयार करितात. कुसुंब्याचें बीं दाबून काढलेलें तेल मातीच्या भांड्यांतून सारखे १२ तास कढवितात. तेल मातीच्या भांड्यांतून सारखे १२ तास कढवितात. तेल कढतांना त्यांतून जाणारी वाफ फार असह्य असते. म्हणून हें तेल कढविण्याचें काम मनुष्यवस्तीपासून दूर करितात. तेल चांगलें कढल्यावर तें कढत असतांनाच थंड पाण्याच्या पसरट भांड्यांतून ओततात. तें नंतर निवाल्यावर जो एक पदार्थ बनतो त्याला रोगण म्हणतात. मग तें जस्ताच्या डब्यात भरून बाजारांत विकतात.
मेणकापड:- 'अग्रिकल्चरल लेजर' (१९०१. नं. १२ ३९३-४१४) व 'दि इंडियन आर्ट अॅट दिल्ली' (१९ ३ २२१-३४) या पुस्तकांवरून येथें खनिज रंग गोठलेल्या तेलांत मिसळून तर्हेतर्हेचा रंग बनवीत असें दिसतें. अशा रीतीनें तयार केलेला रंग कापडांनां देऊन त्याचें मेणकापड करितात. बडोद्याला एरंडीच्या तेलाचें व कच्छमध्यें जवसाच्या तेलाचें रोगण करितात. कलकत्ता येथील तागाच्या गिरण्यांतून या पद्धतीनें मेणकापड तयार होतें.
बिया व पेंड:- कुसुंब्याच्या बिया भाजून खातात. पाळीव पक्ष्यांस कुसुंब्याच्या बिया खावयास घालितात व त्याची पेंड गुरांनां चारतात. या पेंडीला बुरशी येत नाहीं व त्यापासून उत्तम खत तयार होते.
कु सुं ब्या चा रं ग:- या झाडाच्या फुलांपासून दोन जातीचे पिवळे रंग व एक तांबडा रंग असे तीन रंग मिळतात. या तांबड्या रंगांत कारमियिक आसिड असतें. कुसुंब्याच्या फुलांत पाणी व तेल घातलें म्हणजे पहिला पिंवळा रंग निघतो. या पिवळ्या रंगास वायव्येकडील लोक "पुजन" म्हणतात. हा रंग पाण्यांत विद्राव्य आहे. हा रंग शेंकडा २६ ते ३६ प्रमाणानें फुलांत सांपडतो. व तांबडा रंग शेंकडा ३ ते ६ या प्रमाणांत सांपडतो. दुसरा पिवळा रंग अल्कलाईन दारूंत मात्र विद्रवण पावतो. पाण्यांत विद्राव्य होणारा पहिला पिवळा रंग काढून कुसुंब्यांत असिटिक आसिड मिसळलेलें पाणी घालून परीक्षा करण्यासाठीं प्रथम शिशाचा क्षार व नंतर अमोनिया त्यांत घातला म्हणजे दुसरा पिवळा रंग शिशाच्या क्षारासह तळीं बसतो. अलकलाईनच्या संयोगानें शुद्ध तांबडा रंग काढतां येतो. अल्कलांच्या ऐवजीं आपल्याकडील रंगारी सज्जी मट्टी घालतात.