विभाग अकरावा : काव्य - खतें
कूटमाळी- याची वस्ती संयुक्त प्रातांत आढळते. मथुरा प्रांतांतील जिगनगड येथून हे लोक आले; व त्यांचा लालखानी मुसुलमान रजपुतांशीं संबंध असल्याची एक दंतकथा आहे. जिगनगडच्या लुटीच्या वेळीं ह्यांनीं मुसुलमानी धर्म स्वीकारला होता व पुढें लवकरच ते लालखानी झाले असें सांगतात. लुटीच्या वेळीं पळून जात असतां ते एका फकिराच्या बागेंत आश्रयाकरिता थांबले व तेथें ते माळ्याचा धंदा करूं लागले. त्यानंतर त्यांनीं भात (धान) कुटण्याचा धंदा केला व त्यामुळें त्यांचें नांव कुटमाळी पडलें अशी आख्यायिका आहे. कुक सांगतो कीं कुटणें व मळणें या भाताचे तांदूळ करण्याच्या दोन क्रियांपासून हा संयुक्त शब्द बनला. हे लोक मुरादाबाद, वरेली, बिजनोर, रामपूर व नैनीताल या प्रांतांत असून दिल्लीनजीकहि या लोकांचीं ४४ खेडीं वसलेली आहेत. या लोकांचीं कायमची पंचायत असून ती फार व्यवस्थित आहे. पंचायतींत २ सरदार २२ प्रधान व २२ चक्रयात असून त्यांच्या जागा वंशपरंपरागत चालतात.
प्रत्येक खेड्यांत एक प्रधान व एक चक्रयात नेमलेला असतो. बारीकसारीक खटल्याचा निकाल खुद्द प्रधान व चक्रयात देतात. या लोकांत दिराशीं लग्न लावतां येतें. हें लोक मोठे काटकसरी, उद्योगी व मेहनती आहेत. [सेन्सस रिपोर्ट १९११ (संयुक्तप्रांत). क्रूक].