प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें       

कृषिकर्म किंवा शेती— कृषिकर्म हा शब्द कृष् म्हणजे नांगरणें या धातूपासून झाला आहे. यावरून या धंद्यास नांगर हें मुख्य साधन आहे हें उघड दिसतें. फार प्राचीन काळीं रानटी स्थितींत मनुष्य असतां जंगलांतील श्वापदें मारून त्यांवर तो निर्वाह करीत असावा. त्यानंतर कंद, मुळें, झाडांची फळें व धान्य याच्याकडे त्याचें लक्ष जाऊन त्यावर तो उपजीविका करूं लागला. नंतर सभोंवतालीं उगवणारीं धान्यें यांचें संवर्धन कांहीं कृत्रिम उपायानीं- जमीन नांगरून खतें वगैरे घालून केलें असतां पीक जास्त येऊन धान्याची जात सुधारत जाते हा शोध त्यास लागला असावा. ह्या प्रवृत्तीमुळेंच विविध शेतकी, व बागायतीचीं आऊतें मनुष्याच्या कल्पक बुद्धीमुळें निर्माण झालीं. मिसरदेश, बाबिलोन व इतर प्राचीन राष्ट्रें शेतकींत प्रवीण होतीं असें इतिहासावरून दृष्टोत्पत्तीस येतें. नाइलनदीला पूर आल्यावर केवळ लांकडी नांगराच्या साहाय्यानें जमीन नांगरून ईजिप्‍तमध्यें पिकाची लागवड करीत असा शोध लागला आहे. आर्यांचा अतिशय प्राचीन ग्रंथ जो ऋग्वेद त्यांत कृषिविषयक पुष्कळ उल्लेख सांपडतात.

अक्षैर्मा दीव्यः कृषिमित्कृषस्व वित्ते रमस्व बहुमन्यमान: (ऋ. मं. १० सूक्त ३४ ऋचा १३)

"हे द्यूतक्रीडा करणारे जन हो, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, तुम्ही द्यूतक्रीडा करणें सोडून द्या आणि उत्तम प्रकारची शेती करून त्यापासून प्राप्‍त होणार्‍या धान्य, गाई इत्यादि संपत्तीचा उपभोग घ्या; त्या संपत्तींत रममाण व्हा. त्याच व्यवसायामध्यें गवादि संपत्ति आणि भार्यापुत्रादि गृहसौख्य प्राप्‍त होतें असें सर्व जगत्प्रेरक अशा भगवान् सवित्यानें मला सांगितलें."

तसेंच खालीं दिलेल्या ऋचेंत तर त्याहूनहि स्पष्ट शेतकामाचे व त्याकरितां लागणार्‍या बैल, नांगर आदिकरून सामुग्रीचें वर्णन आलें आहे :—

शुनंवाहाः शुनं नरः शुनं कृषतु लांगलं। शुनं वरत्रा बष्यंतां शुनमष्ट्रामुदिंगय।। (मं. ४ सू. ५७ ऋ. ४)

शुनं नः फाला विकृषंतु भूमिं शुनं कीनाशा अभियंतु वाहैः।

शुनं पर्जन्योमधुना पयोभिःशुनासीरा शुनमस्यासु धत्तम्।।
(मं. ४ सू. ५७ ऋ. ८)

"हे नांगरास जोडलेले बैल नांगर उत्तम रीतीनें ओढोत. त्याचप्रमाणें नांगर हातांत धरणारे शेतकरी आणि नांगर हे जमीन नांगरण्याचें कार्य आनंदानें करोत. बैलांच्या गळ्यास बांधावयाच्या दोर्‍या त्रासदायक न होतील अशा रीतीनें बांधल्या जावोत. आणि बैलास मारण्यास घेतलेल्या प्रातेदाचा योग्य रीतीनें उपयोग केला जावो.

"हे आमचे नांगराचे फाळ जमीन उत्तमप्रकारें नांगरोत. त्याचप्रमाणें नांगर ओढणार्‍या बैलांनां शेतकरी आनंदानें हाकोत. आणि शेतीला उपयुक्त अशा प्रकारची सुखकर पर्जन्यवृष्टि होवो. शुनासीरदेवता आम्हास सुख प्राप्‍त करून देवोत."

वैदिक कालानंतर तयार झालेलें कौटिल्याचें अर्थशास्त्र या ग्रंथांत शेतकीसंबंधानें उल्लेख असून त्या खात्यावर निरनिराळे अधिकारी असत असें वर्णन आहे.

महाभारतांतील सभापर्वांत नारदांनीं युधिष्ठिरास केलेल्या प्रश्नांत शेतकीसंबंधानें राजाचें कर्तव्य उत्तम रीतीनें वर्णिलें आहे.

X  X  X  ।। कच्चित्तुष्टाः कृषीवलाः ।।८०

कच्चिद्राष्ट्रे तटाकानि । पूर्णानिच बृहंतिच

भागशो विनिविष्टानि । न कृषिर्देवमातृका ।।८१

"हे राजा, तुझ्या राज्यांतील शेतकरी संतुष्ट आहेत ना? तसेंच तुझ्या राज्यांत तलाव, विहिरी, कालवे परिपूर्ण असून त्यांचें पाणी शेतीला विभागलें गेल्यामुळें केवळ नैसर्गिक पावसावरच शेतें अवलंबून नाहींत ना?"

शेतकी या शब्दाचा अर्थ जमीनीची मशागत करून तींत पीक काढणें असा केला जातो. परंतु या शब्दाची अर्थमर्यादा इतकी आकुंचित नसून पाश्चात्य देशांत ती बरीच विस्तृत आहे. जीं धान्यें व फलें आपण खातों, जीं वस्त्रें प्रावरणें आपण वांपरतों, जे रंग आपण उपयोगांत आणतों अशा अनेक गोष्टी मनुष्यप्राण्यास उपयोगाच्या आहेत त्या सर्व आपणांस वनस्पती व प्राणी यांपासून मिळतात. ज्वारी, भात, गहूं, कापूस, नीळ, साखर हीं जमीनीची लागवड केल्यानें तयार होतात व दूधदुभतें, लोणी, रेशीम, लोंकर व चामडीं हीं प्राण्यांपासून पैदा होतात. म्हणून शेतीकरितां व दुधासाठीं गुरे बाळगणें, लोंकरीसाठी बकर्‍या, मेंढ्या बाळगणें मधाकरितां मधमाशा पाळणें, रेशमाकरितां रेशमाचे किडे व त्यांच्या पोषणाकरितां तुतीची व एरंडांची लागवड करणें या सर्व गोष्टींचा शेतींत समावेश होतो. शिवाय कोंबडी पाळणें, वगैरेसारख्या बाबीहि शेतींत गणल्या जातात. एकंदरींत अंग मेहनतीनें अगर प्राण्यांच्या किंवा यंत्रांच्या सहाय्यानें जमीन कसून तींत मनुष्यांच्या व पाळीव जनावरांच्या पोषणार्थ थोड्या खर्चांत फायदेशीर रीतीनें जमीनीला फारसा धक्का न बसतां पिकें तयार करणें याला शेती अथवा कृषिकर्म म्हटलें असतां वावगें होणार नाहीं.

फुलझाडें वगैरे लावून मौजेकरिता बगीचा करतात त्याचाहि शेतींत अंतर्भाव होतो. शेतींत जिराईत, बागाईत असे दोन भाग आहेत. जिराइतांत पुन्हां खरीप व रब्बी असे दोन प्रकार करतात. जिराईत शेतीपेक्षां बागाईत शेतीची शेतकरी लोक जास्त काळजी घेतात. कारण या शेतीला कायमचें पाणी, जास्त खर्च, पुष्कळ खतमूत व अति मेहनत लागते व याबद्दल थोड्या क्षेत्रांत उत्पन्नहि जास्त येतें.

कृषिकर्माचें वर्गीकरण खाली दिल्याप्रमाणें करतां येईल:— मुख्य कृषिकर्माचे दोन भाग, शेती व बागबगीचे; पैकीं शेतीचें जिराइती व बागाइती असे दोन भेद असून जिराइतीचे खरीप व रब्बी असे दोन पोटभेद आहेत. बागाइतींत विहिरींच्या किंवा पाटाच्या पाण्यावर भाजीपाला, फूलबाग, फळफळावळ हीं पिकें होतात. बागबगीच्यांत आंबराया, संत्र्यांच्या बागा, पेरूंच्या बागा व फुलझाडें वगैरेंचा समावेश होतो.

शे ती चा प्रा ची न इ ति हा स.— फार प्राचीन काळापासूनच शेती हा धंदा महत्त्वाचा आहे. या धंद्याचें महत्त्व उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी या फार जुन्या म्हणीवरून सहज लक्षांत येईल. या धंद्याविषयी लिहितांना पुढें नमूद केलेल्या गोष्टींसंबधीं थोडथोडी माहिती देण्याचें योजिलें आहे. पूर्वकालीं लोकांचा देश म्हणजे चराऊ रानें, संपत्ति म्हणजे गुरें व मुख्य अन्न म्हणजे दूध असें समजलें जात असें. हल्लींसुद्धां अशा पशुपालवृत्तीवर रहाणार्‍या अनेक जाती आढळतात.  गुजराथेंतील रब्बारी, भारवड व चारण सातपुड्यांतील वंजारी व खिलारी;  व देशावरील धनगर व कानडे लोक हे यांपैकीं होत. पुढें समाज वाढल्यानें जमीन कसण्यास सुरुवात झाली. ती पद्धत म्हणजे जंगल जाळून त्या राखेंत धान्य पेरणें ही होय. अशी पद्धत हल्लीं डोंगरकड्यावर चालू असू.  तिला कुमरी किंवा डाली असें म्हणतात. अशा पद्धतीनें कातवडी, वालीं, कोळी वगैरे जाती लागोपाठ चार पाच वर्षे नाचणी, वरी, हरिक, कारळा वगैरेसारखीं पिकें घेऊन ती आपोआपच सुधारावी म्हणून ८-१० वर्षे पड टाकतात. ही झाली डोंगरी भागांतील शेतीची स्थिती. अशा प्रकारानें शेती करणारे लोक एके ठिकाणीं स्थाईक रहात नाहींत. यापुढील सुधारलेल्या शेतीची पायरी म्हणजे एके ठिकाणी कांहीं विवक्षित क्षेत्र घेऊन त्यावरच वर्षानुवर्षे शेती करणें हे होय. निरनिराळ्या धंद्यावरून जशा निरनिराळ्या जाती झाल्या आहेत. त्याचप्रमाणें निरनिराळीं पिकें करणारे लोक देखील विशिष्ट असतात. जसे कोरडवाहू किंवा जिराईत पिकें कुणबी करतात; माळी फुलबागा, बागाइत पिकें, भाजीपाला व फळफळावळ करतात. पुणें, सातारा व सोलापुराकडे तिरगूळ लोक पानमळे करतात. हें काम मध्यप्रांतांत वारी लोक करतात. या जाती आपआपल्या धंद्यांत हुषार असतात.

दिवसेंदिवस जंगलांतील जमीन लागवडीस कशी येत आहे हें पुढें दिलेल्या अगदीं अलीकडील आकड्यांवरून सहज लक्षात येईल. इ. स. १८९१-९२ सालीं ब्रिटिश हिंदुस्थानांत १८ कोटी ७७ लक्ष एकर जमीन लागवडीस असून लोकसंख्या २४ कोटी १० लक्ष होती. तीच वीस वर्षांनंतर म्हणजे १९१०-११ साली २२ कोटी ३० लक्ष एकर जमीन लागवडीखाली आली असून लोकसंख्या २४ कोटी ४० लक्ष झाली आहे व दाट अरण्यांचा संहार करून जमीन लागवडींत आणण्याचा क्रम चालू आहे. मनुष्यवस्ती जसजशी वाढत गेली तसतशी कित्येक भागांत जमीनीची फार टंचाई पडत चालली. पुढें जमीन सुधारण्याचे उपाय सुचले. कोठें समुद्र हटवून खारी तयार केल्या. कोठें तळीं, विहिरी बांधून लहान लहान ओढे अडवून शेजारच्या जमीनी बागाईत बनविल्या. हालंड देशांत फार श्रम व पैसा खर्च करून समुद्र हटवून मोठमोठ्या अजस्त्र ताली घालून जमीनी काढलेल्या आहेत. मुंबई इलाख्यांत कुलाबा व ठाणें जिल्ह्यांत समुद्र व खाड्या हटवून मोठमोठ्या खारी काढल्या आहेत. अशा अनेक तर्‍हेनें शेतकीची जमीन वाढवून ती सुधारण्याकरितां व उत्पन्न वाढविण्याकरिता आजपर्यंत प्रयत्‍न झाले आहेत व ते अद्यापि पुढें चालू आहेत.

हल्लीं जमीनीची मशागत करण्याकरितां प्रचारांत असलेली आउतें लांकडीच आहेत. सर्व आउतांत नांगर हा मुख्य आहे. नांगराचें उत्पत्तिस्थान काठी असावें. काठीपासून कुदळ व कुदळीचा नांगर झाला असावा. लांकडी कुदळीचा काथवटी व हेटकरी लोक डोंगरी भागांत अद्यापि नाचणी, वरी वगैरे ठोकण्या (पेरण्या) करितां उपयोग करतात. हल्ली उपयोगांत असलेले लहान व मोठे नांगर हे मूळ कुदळीपासून सुधारणा होऊन झाले असावें असें वाटतें.

हल्लींप्रमाणे प्राचीन काळीं खताची किंमत लोकांना पूर्ण अवगत होती. ते शेणखत, मासळी, शेळ्यामेंढ्याच्या लेंड्या, राख, राखुंडा व टहाळ (कोंवळा झाडपाला) यांचा खताकडे उपयोग करीत असत.

मुसुलमान, रजपूत वगैरे राजांच्या कारकीर्दीत ज्यावेळीं सुस्थिति असे त्यावेळीं आपापल्या समजुतीप्रमाणें त्यांनीं (राजांनीं) शेती सुधारण्याचे थोडेबहुत प्रयत्‍न केले होते. फिरोजशहा तघलख यानें विहिरी, तलाव, कालवे इत्यादि लोकोपयोगी कामें पुष्कळ केलीं. त्यानें यमुना नदीचा बांधलेला कालवा अद्य़ाप चालू आहे.

मुसुलमानांपूर्वी हिंदुस्थानमध्यें तलाव, कालवे वगैरे बांधिले जात असत. पाटबंधार्‍याचीं कामेंहि पण त्याप्रमाणेंच कित्येक प्रांतांतून केलेलीं आढळतात. नाशिक, तैलंगण, गुजराथ व कर्णाटक या ठिकाणी तलाव व बंधारे फार जुन्या काळापासून बांधीत आले आहेत व त्यांतील कित्येक अद्याप अस्तित्वात आहेत.

मध्यप्रांतात विशेषतः चांदा, भंडारा व बालाघाट या भागात मालगुजारी गांवातून तेथील मालगुजारांनीं मोठमोठीं तळीं बांधून त्याचें पाणी आपल्या शेतास व गावांतील लोकास देण्याची वहिवाट फार जुन्या काळापासून चालू आहे. चांदा जिल्ह्यांतील गडमोसी नांवाच्या गांवीं टेंकडीच्या मध्यभागीं एक जुना तलाव आहे. त्या तलावाचें पाणी निरनिराळ्या उंचीवर सोडण्यासाठी पायर्‍या करून त्यामध्यें व टोळीं सुमारें ४-६ इंच व्यासाचीं भोकें ठेविलेलीं आहेत. त्याचा उपयोग तळ्यांतील पाण्याच्या खोलीप्रमाणें करण्यात येतो. हल्लीं मोठमोठ्या नद्यांना धरणें बांधून त्यांतून कालवे काढून दुष्काळी भागात जमीनीला पाणी देऊन ती सुपीक करण्याचें काम चालू आहे. भात, सातू, गहू, राळ, हरभरा, उडीद, मसूर, मूग, वाल, कुळीथ, तीळ, सरसव, कारळा, सुपारी, विड्याची पानें, मिरी, कापूस, नीळ, ऊंस, भांग, गांजा वगैरे पिकें नारळ, केळीं, महाळुंग, डाळिंब, फणस, आंबे, संत्रीं वगैरे फळफळावळ फार जुन्या काळापासून म्हणजे सुमारें ३००० वर्षांपूर्वी पासून माहीत असावी. कारण वरीलपैकीं काहीं नावें वेदांत आलीं असून संत्र्याखेरीज बाकी सर्व नांवें वाग्भटाच्या अष्टांगहृदयात आलीं आहेत व त्याचे गुणदोषहि त्यात सांगितलेले आहेत. वाग्भटाचार्यांचा काळ २००० वर्षांच्या सुमारें असावा असें दिसतें. वाग्भटाचार्यांचा अष्टांग हृदय हा स्वतंत्र ग्रंथ नसून तो आकारग्रंथ म्हणजे त्यांत तत्पूर्वीच्या चरक, सुश्रुतादि ग्रंथांचा सग्रह आहे म्हणजे चरक, सुश्रुत वगैरे आचार्यांच्या वेळींहि (सुमारें ३००० वर्षांपूर्वी) वरील सर्व नांवें माहिती होतीं. इतकेंच नव्हे तर उसाचीं पेरीं खाण्यापासून तों त्याचा रस,राब, काकवी, गूळ, बारीक साखर व खडीसाखर अशा परंपरा लावून गुणामध्येंहि उत्तरोत्तर श्रेष्ठ असें वर्णनहि त्यांत दिलें आहे. यावरून हिंदुस्थानांत शेतीची व तिच्या आउतांची माहिती फार प्राचीन काळापासून,— म्हणजे वेदकालापासून म्हटलें तरी चालेल-होती असें सिद्ध होतें. अकबरास बागबगीचें करण्याची फार हौस होती. मुसुलमानी अमलांत फळांच्या व फुलांच्या, बागा वाढून त्यांत बरीच सुधारणा झाली. पोर्तुगीज राजांच्या अमदानीत पश्चिम हिंदुस्थानात उत्तम आंब्याच्या जाती व चिकू वगैरें फळें आलीं. कॉफी पहिल्यानें इ. स. १६०० सालीं अरबस्तानातून हिंदुस्थानांत आली. हल्ली कॉफीचे जे मळे म्हैसुरात आहेत. त्यांची लागवड सन १८३० सालीं सुरू झाली. तंबाखू जहागिराच्या वेळीं पाश्चात्य देशांतून आली असावी. अकबराचा मुख्य प्रधान अबुलफझल यानें १९ वर्षांच्या दप्‍तरातील माहितीवरून उत्पन्नाच्या आकड्याची सरासरी तयार केलेली आहे. या कोष्टकावरून पहाता तत्कालीन दर बिघ्यास सरासरी उत्पन्न भात १०३६ पौंड, गहूं १०३६ पौंड, ज्वारी ८२७ पौंड व कच्चा कापूस ६०० पौंड वजनाचा याप्रमाणें येत होता असा अंदाज आहे.

इ. स.  १८४५ पर्यंत हिंदुस्थानांतून यूरोपखंडांत साखर जात असे. इसवी सन ६२७ ते ६७० या सालाच्या दरम्यान चीनचा बादशहा टाइटसंग यानें आपलें कांहीं इसम साखर करण्याची कला शिकण्याकरितां बहार प्रांतात पाठविले होते असा इ. स.१५५२ सालीं लिहिलेल्या चीनच्या ज्ञानकोशांत उल्लेख आहे. हिंदुस्थानांतून परदेशाशीं कालिको (चिटाचें कापड) कपड्याचा मोठा व्यापार चाले व डाक्याला उत्तम तर्‍हेची मलमल  तयार होई या दोन्ही गोष्टी जगप्रसिद्ध आहेत. गाई व बैल यांनां पूर्वी फार महत्त्व होतें व हल्लींहि आहेच. हैदरअल्ली हा अमृतमहाल जातीचे बैल तोफखान्यास लावीत असे असें नमूद आहे. गुरांचा देवघेवींत उपयोग करीत व तीं दानहि देत. गोप्रदानाची चाल अद्यापि अस्तित्वांत आहे. पंचमहाल जिल्ह्यांत भिल्ल लोक हल्लीं लग्नकार्यांतील हुंडा बैल व गाई या रूपानें देतात. मुसुलमानी राज्यांत गोशाळा, अश्वशाळा व उष्ट्र (उंट) शाळा होत्या. पेशव्यांच्या वेळीं पुणे जिल्ह्यांत आलेगांव येथें घोड्यांच्या उत्पत्तीसाठीं मोठ्या पागा होत्या. व्यापारी लोकांनीं गोमातेच्या संरक्षणासाठीं पूर्वापार जागजागीं पांजरपोळ काढिले आहेत. पूर्वी जनावरांची उत्पत्ति वाढविण्यासाठीं खेडोंपाडीं पोळ सोडलेले असत व ते अद्यापिहि कोठें कोठें आढळतात.

पूर्वी वसुलाचे मक्ते देण्याची चाल होती ती अकबरानें बंद केली. अकबर बादशहाचा मुख्य प्रधान राजा तोडरमल्ल यानें शीरशहानें घालून दिलेल्या पद्धतीवर जमीनीची मोजणी करून प्रतबंदी केली व महसुलांचें निरख ठरविले. तीच पद्धत थोड्या फार फरकानें आजतागाईत हिंदुस्थानांत चालू आहे.

दख्खनमध्यें मलिकंबरनें मोजणी करून धारापद्धत सुरू केली. तिला ‘तनखा’ अशी संज्ञा होती. जमीनीचे मक्ते देण्याची पद्धत जरी वाईट अशी मानली जात असे तरी ती इतर राजांच्या कारकीर्दीत चालू होती. ती ब्रिटिश अमदानीच्या सुरुवातीस बंद झाली. लॉर्ड कार्नवालिस यानें बंगाल्यांत ‘कायम धारा’ पद्धत सुरू केली व इतर प्रांतांत बहुतेक ठिकाणी ‘रयतवारी’ पद्धत चालू आहे.

अकबराच्या वेळीं दुष्काळ वगैरे पडेल त्यावेळीं शेतकर्‍यांस मदत करण्यास उपयोगी पडावे म्हणून दर बिघ्यामागें १० शेर धान्य दरसाल वसूल करून तें जागोजागी सांठविण्यांत येई असा ऐने-इ-अकबरींत उल्लेख आहे. या धान्याचा व्यय पुढें नमूद केलेल्या गोष्टींकडे होई (१) सरकारी गुरांनां खुराक, (२) गरीब शेतकर्‍यांस बी बियाणें, (३) दुष्काळाच्या सालीं शेतकर्‍यांनां स्वस्त दरानें धान्याचा पुरवठा करण्याच्या कामीं व (४) जागजागीं अन्न शिजवून गरीब लोकांस देणे वगैरे.

हल्लीं दुष्काळ पडल्यास बींभरणासाठीं, बैल विकत घेण्यासाठीं, विहिरी खोदण्यासाठीं आउतें विकत घेण्यासाठी तगाई देतात व सार्‍याची सूट व तहकुबी पिकाच्या अंदाजाकडे लक्ष देऊन द्यावी असे कायदे आहेत. अशी पद्धत शिवाजीच्या वेळींहि होती. सारा वसूल करण्याचे नियम रयतेस सोइस्कर असेच होते. लोकांची फार अडचण दिसल्यास सूट देण्यांत येई. शेतकीचीं साधनें जवळ नसल्यास शेतीचें काम नडतें असें दिसून आल्यावर सरकारांतून थोड्या व्याजानें किंवा बिनव्याजानें पैसे देण्यांत येत.

इंग्रजी राज्य झाल्यावर लार्ड डलहौसीच्या कारकीर्दीत सन १८५६ सालीं दुष्काळनिवारणार्थ आगगाडीच्या कामास सुरुवात झाली. सन १८७६-७७ च्या दुष्काळांत बरीच प्राणहानी झाली असावी. सन १८९६ व सन १९००-१९०१ या सालांचे दुष्काळ बर्‍याच क्षेत्रावर पसरले होते. तरी आगगाडीच्या सोईमुळें धान्याचा पुरवठा इकडून तिकडे असा सहज करिता आला. हल्लीं कालव्यांचा व आगगाडीचा जास्त सार झाला असल्यामुळें एकंदरीत दुष्काळ कमी प्रमाणांत भासूं लागला आहे; कारण धान्य व चारा हे दोन्ही जिन्नस इकडून तिकडे सहज नेतां येतात.

स ह का रि ता:- जुन्या काळीं प्रत्येक खेड्यांत सहकारितेचें तत्त्व आढळून येई. बलुतेदार सर्व शेतकरी लोकांस सहकारितेच्या तत्वावर मदत करीत व खेड्यांतील सावकार देखील खेड्याचा एक घटकावयव समजला जात असे. तसेंच जातीं-जातींतील लोक एकमेकांस कमी व्याजानें रकमा देत असत. हा प्रकार गुजराथेंत अद्याप आढळून येतो. पूर्वी ग्रामपंचायतीपद्धतींमुळे वसूल करणें सुद्धां सोईचें होतें. शेतीच्या कामीं गरीब शेतकर्‍यांचें एखादें शेत गांवांतील बरेच शेतकरी एक दिवस जाऊन नांगरून देत. अद्यापीहि ही चाल कोठें कोठें आढळतें. या पद्धतीला ‘विरजिक’ असे म्हणतात.

शे ती चा अ र्वा ची न इ ति हा स.- हिंदुस्थानांत शेतीचा धंदा जरी फार जुन्या काळापासून चालत आला आहे, तथापि शास्त्र या दृष्टीनें गणित वगैरे विषयांप्रमाणें या विषयावर स्वतंत्र ग्रंथ नाहींत. बहुतेक सर्व ज्ञान अनुभवानें व परंपरेनें आलेलें आहे. म्हणून येथील शेती ‘शेतकी शास्त्र’ या संज्ञेस पूर्णपणें पात्र नाहीं. परंते पाश्चात्य राष्ट्रांनीं प्रयोगाच्या योगानें शेतकीं पूर्णशास्त्राच्या दर्जास पोंहोचविली आहे. परंतु मुख्य गोष्ट लक्षांत ठेवावयाची म्हणजे शेतकी हा धंदाच इतका व्यापक आहे की शेतकीचें ज्ञान म्हणजे एक लहान शास्त्र असें नाहीं. शेतकी शास्त्र पूर्णपणें बनण्यास त्यास इतर किती तरी शास्त्रांची मदत व्हावी लागते. त्यापैकीं महत्त्वाच्या शास्त्राचें स्वरूप येथें देतो. (१) भूस्तरशास्त्र, (२) पदार्थविज्ञानशास्त्र, (३) वनस्पतिशास्त्र, (४) रसायनशास्त्र, (५) कीटकशास्त्र, (६) जंतुशास्त्र, (७) पशुवैद्यकशास्त्र, (८) पशुसंगोपनशास्त्र, (९) कृषियंत्रशास्त्र व (१०) वातावरणशास्त्र.

(१) भू स्त र शा स्त्र:- याच्या साहाय्यानें कोणकोणत्या तर्‍हेचे खडक कोठें असतात व त्यांपासून जमिनी कशा तयार होतात हें समजतें. तसेंच कोणकोणतीं खनिजद्रव्यें निरनिराळ्या ठिकाणीं असतात त्यांचेंहि ज्ञान मिळतेंच. त्यापैकीं कांहीं द्रव्यें खताकरितां उपयोगीं पडतात.

(२) प दा र्थ वि ज्ञा न शा स्त्र.— जमिनीवर उष्णता, थंडी, निरनिराळ्या प्रकारचे वारे व हवा याचे परिणाम कोणत्या प्रकारचे व कसे घडतात याचें ज्ञान पदार्थविज्ञान शास्त्रानें होतें.

(३) व न स्प ति शा स्त्र:— यानें झाडें कशीं वाढतात, निरनिराळ्या जाती कशा उत्पन्न करितां येतील, असलेल्या पिकांत कोणत्या सुधारणा करितां येतील, वनस्पतींचे पोषण व त्यांची फलद्रुपता या गोष्टी कशा प्रकारें घडतात याचें ज्ञान होतें.

(४) र सा य न शा स्त्र.— या शास्त्राच्या ज्ञानानें शेतीच्या जमिनीचें पृथक्करण, तसेंच खतांचें, पाण्याचें व गुरांच्या चार्‍यांचें पृथक्करण करितां येतें व यामुळें कोणकोणती द्रव्यें कमी अधिक प्रमाणांत आहेत तें समजतें. तसेंच खतें कोणतीं व कां घालावींत, तीं किती घालावींत, झाडें कशीं पोसतात, गुरांना खाणें योग्य कोणतें व तें किती घालावें वगैरेबद्दल ज्ञान होतें.

(५) की ट क शा स्त्र.— कीटकशास्त्रानें सर्व प्रकारे उपयोगीं पडणारे कीटक व वनस्पतींनां त्रासदायक कीटक कसे उत्पन्न होतात त्याबद्दलची माहिती व त्यांवर उपाय यांचें ज्ञान होतें.

(६) जं तु शास्त्र:- हें दृष्टीनें न दिसणारे असे जे बारीक जीव वनस्पतींवर अगर प्राण्यांवर उत्पन्न होतात, त्यासंबंधीं बरेवाईट परिणाम व त्यांवरील उपाय याबद्दल माहिती देतें.

(७) प शु वै द्य क शा स्त्र.— हें जनावरांच्या जाती, त्यांचे आहार, निगा, आरोग्य, व आजार व त्यावर उपाय या गोष्टींविषयीं सर्व माहिती देतें. त्याचप्रमाणें निरनिराळ्या तर्‍हेच्या कामासाठीं गुरांत कोणत्या गुणधर्मांची आवश्यकता असते वगैरे माहिती या शास्त्राच्या अभ्यासानें मिळते.

(८) प्राणिसंगोपनशास्त्र.- हें जनावरांची व पक्ष्यांची निपज, निगा, वगैरेबद्दल माहिती देतें.

(९) स्थापत्यशास्त्र:- या शास्त्राच्या साहाय्यानें शेतीसंबंधीं हरएक प्रकारचीं आउतें, शेतीसंबंधीं जनावरांचे गोठे व धान्यांची कोठारें बांधाणें, शेतीच्या उपयोगीं पडणारे रस्ते वगैरे करणें याचें ज्ञान होतें.

(१०) वातावरणशास्त्र.— या शास्त्राच्या योगानें हवेंतील फेरफार, पाऊस आणणारे अगर घालविणारे वायूंचे प्रवाह, दर्यांतील तुफानें व त्यामुळें जमिनीवर होणारे फेरफार, अतिवृष्टि, अनावृष्टि व त्यांपासून वनस्पतींवर होणारे परिणाम याचें ज्ञान होतें. या ज्ञानानें पुष्कळ वेळां नुकसान टाळतां येतें.

यांशिवाय अर्थशास्त्र वगैरे शास्त्रांचा शेतकीशीं बराच निकट संबंध येतो. वर दिलेल्या सर्व शास्त्रांच्या विवेचनावरून असें वाटूं लागेल कीं, शेतकी हा धंदा फायदेशीर करणें हें फार कठिण व गूढ आहे. परंतु त्यांतील मुख्य मुख्य सिद्धांत कित्येक पिढ्यांच्या अनुभवानें चांगल्या शेतकर्‍यांस साधारणपणें माहीत असतात व त्या माहितीस जर वर लिहिलेल्या शास्त्रांची जोड मिळाली तर या धंद्यांत झपाट्यानें प्रगति होईल. चांगली जमीन, उत्तम बीबियाणें, जनावरांची नीट जोपासना व द्रव्याची अनुकूलता या गोष्टीहि पण इतर गोष्टींप्रमाणेंच साध्य झाल्या पाहिजेत व त्या सर्व असूनहि स्वतःची देखरेख शेतीवर व जनावरांवर जातीनें राहून केल्याखेरीज शेती फायदेशीर होणार नाहीं एवढेंच नाहीं तर वेळप्रसंगीं थोडी थोडकी अंगमेहनतहि करण्याची मालकाची तयारी असली पाहिजे म्हणजे त्या धंद्याचें इंगित कळून हा धंदा फायदेशीर करितां येईल.

शेतींत सुधारणा होण्यास पुष्कळ अडचणी आहेत. त्यापैकीं एक मुख्य म्हणजे शेतकरीवर्गांत शिक्षणाचा अभाव व त्याची पुराणप्रियता ही होय. परंतु हल्लीं जी शेतकींत सुधारणा दिसत आहे तिलाहि इतिहास आहे. या इतिहासाचे ठोळक मानानें दोन भाग करितां येतील ते असे :- (१) शेतकी खातें निघण्यापूर्वी शेतीच्या सुधारणेसंबंधानें झालेले प्रयत्‍न व (२) त्यानंतरचें प्रयत्‍न. ईस्ट इंडिया कंपनीकडे हिंदुस्थानची राज्यसूत्रें होतीं तेव्हां जागोजागीं अ‍ॅग्रिकलचरल व हॉर्टिकलचरल् सोसायटीज स्थापन झाल्या. या संस्थांचे बागबगीचे असत. त्यांपैकीं मुंबई इलाख्यांत पुणें जिल्ह्यांत हिंवरें व दापुडी, खानदेशांत धुळें, खेडा जिल्ह्यांत नडीयाद, उत्तर हिंदुस्थानांत मीरत, गोरखपूर, कुमाव, कलकत्ता वगैरे अनेक ठिकाणीं बागा होत्या. त्यांचें काम नानातर्‍हेचीं पिकें, औषधी वनस्पती, फळझाडें, फुलझाडें, भाजीपाला व इतर व्यापारोपयोगी पिकें याचें बीं आणून त्यांपासूने चांगलें पीक करणें व त्या पिकांचा फैलाव संस्थेच्या मंडळामार्फत शेतकर्‍यांत करणें हें असे. खेड व जुन्नर येथें बटाट्यांचा प्रसार होण्याचें श्रेय हिवरें येथील बागेला असावें. भुइमूग, बटाटे, रताळी, तंबाखू, मका, श्रावणघेवडा, कोबी, नोलकोल, कॉलीफ्लॉवर, टमाटो, गिनीगवत, लसूणघास, मॉरिशस (पुंड्या) ऊस वगैरे पिकांचा इकडे विशेष प्रसार झाल्याचें श्रेय या बागांकडेसच असावें. अशा रीतीनें गेल्या शंभर दोनशें वर्षांत पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्लिश वगैरे पाश्चात्य लोकांचा सहवास घडून आल्यापासून अनेक तर्‍हेचीं पिकें परदेशांतून येऊन ती स्थानिक झालीं आहेत.

प्राचीन काळीं शेतकींत सुधारणा करण्याचे प्रयत्‍न एखाद्या विवक्षित पिकासंबंधीच असत. असे प्रयत्‍न म्हणजे परदेशी लांब धाग्याच्या कापसाचें बीं आणून शेतकर्‍यांस वाटणें. उदाहरणार्थ:- अमेरिकन, ईजिप्शियन व बोरबोन कापूस, रेशमाचे किडे वगैरे. या पूर्वीच्या प्रयत्‍नांस यावें तसें यश आलें नाहीं. अमेरिकन कापूस मात्र थोड्या प्रमाणावर धारवाड जिल्ह्यांत जीव धरून राहिला आहे.

या नवीन पिकांपैकीं सांपत्तिक दृष्ट्या फार महत्त्वाची अशीं कापूस, तंबाखू, भुइमूग व ऊंस हीं पिकें होत. नंतरचें प्रयत्‍न सन १८८१ मध्यें होऊन दुष्काळी कमिशनच्या शिफारशीवरून सर्व हिंदुस्थानांत प्रांतानिहाय शेतकीखालीं स्थापन करावी असें ठरले. तथापि या खात्यांना मूर्तस्वरूप लॉर्ड कर्झन साहेबांच्या कारकीर्दीत आलें. पहिल्यानें सर्व हिंदुस्थानांकरितां पुसा येथें फिप्स साहेबांच्या उदार देणगीच्या व्याजांतून एक मध्यवर्ती कॉलेज काढून त्यांत प्रत्येक शेतकीं विषयाचा एकेक तज्ज्ञ नेमून त्या सर्वांवर सन १९०१ सालीं इन्स्पेक्टर जनरल ऑफ अ‍ॅग्रिकलचर अशी नेमणूक करण्यांत आली. सन १९०५ सालापासून हिंदुस्थानसरकार या खात्याच्या सुधारणेसाठीं दरवर्षी २० लक्ष रुपये प्रयोगसंशोधन, प्रात्यक्षिकें व शेतकीशिक्षण याकरितां वेगळे काढून ठेऊं लागलें; व भारतमंत्र्यांनां खालीं नमूद केलेल्या शिफारशी शेतकीखात्यांकरितां करण्यांत आल्या.

(१) प्रत्येक प्रांतांत स्वतंत्र शेतकीकॉलेज व प्रयोगक्षेत्र असावें, (अ) या कॉलेजांत शेतकी, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, कीटकशास्त्र व जंतुशास्त्र या विषयांचे तज्ज्ञ असावे; व त्यांत संशोधनाची सोय असावी. (ब) वादग्रस्त प्रश्नांचा शोध व खल प्रयोगशाळांत व प्रयोगक्षेत्रांत व्हावा. (क) शेतकीखात्यासाठीं स्वतंत्र डायरेक्टर असावा.

(२) प्रत्येक प्रदेशानिहाय एक प्रयोगक्षेत्र असावें.

(३) भागानिहाय प्रयोगक्षेत्राच्या देखरेखीसाठीं, शेतकीचौकशी, संस्थांस सल्ला देण्याकरितां, प्रदर्शनें भरविण्यास निवडक बीं वांटण्यासाठीं व सुधारलेल्या आउतांचा प्रसार करण्यासाठीं व शेतकीविषयक पत्रव्यवहार करण्यासाठीं एक सुपरिटेंडेन्ट ऑफ दि फार्मस् असा अधिकारी असावा.

(४) प्रयोगक्षेत्रांत उपयुक्त ठरलेल्या गोष्टी शेतकर्‍यांच्या नजरेस आणण्यासाठीं जागोजाग प्रात्यक्षिकें स्थापन करावीं.

सदरहू सूचनेप्रमाणें प्रांतानिहाय शेतकीचें डायरेक्टर अशा अधिकार्‍यांच्या नेमणुका झाल्या; कांहीं कांहीं प्रांतांत पूर्वी डायरेक्टर ऑफ ऑग्रिकलचर आणि सेटलमेन्ट अशा नेमणुका झाल्या होत्या.

इसवी सन १८८४ सालीं मुंबई इलाख्यांत शेतकीखातें स्थापन झालें असून मध्यप्रांतात १८८३ सालीं व निझामच्या राज्यांत (फसली १३२४) इ.सन १९१४-१५ सालीं स्थापन झालें. अगदीं पूर्वी या खात्याचें काम लोकस्थितीसंबंधीं आंकडे गोळा करणें हें असून शेतींत सुधारणा घडवून आणण्याकडे त्यांनां फारसें लक्ष देतां येत नसे. डायरेक्टराला जास्त कामें झाल्यामुळें शेतकी कामाकरितां डेप्युटी डायरेक्टरांची नेमणूक करून त्यांच्या देखरेखीखालीं जागजागीं प्रयोगशाळा स्थापन केल्या. मुंबई इलाख्यांत सन १९०५ सालीं शेतकीखातें अगदीं स्वतंत्र झालें. या वेळेपासून शेतकीखात्याचें काम ज्यास्त व्यवस्थित रीतीनें व जोरानें चालू झालें. प्रयोगाचीं शेतें व त्याचप्रमाणें अनुभवदर्शक क्षेत्रें हीं वाढलीं. याप्रमाणें सर्व दिशेनें काम वाढल्यामुळें प्रत्येक प्रदेशकरितां वेगवेगळाले डेप्युटी डायरेक्टर नेमून प्रत्येक भागाकरितां एक डिव्हिजनल सुपरिंटेन्डेंट याची नेमणूक झाली. त्याच्या हाताखालीं जिल्हानिहाय ओव्हरसियर नेमून त्यांच्याकडे शेतकर्‍यांच्या शेतांतील चालू असलेल्या प्रयोगांची देखरेख सोंपविण्यांत आली. याप्रमाणेंच बहुतेक प्रांतोप्रांतीं व्यवस्था आहे. प्रत्येक डायरेक्टराच्या देखरेखीखालीं अनेक पोटखातीं सुरू झालीं तीं येणेंप्रमाणे :— प्रयोग क्षेत्रें आणि अनुभवदर्शनक्षेत्रें. पशुवैद्यक खातें. शेतकीशिक्षण शेतकर्‍यांना भांडवलाचा पुरवठा (परस्पर सहकारी) खातें. शेतकीसंस्था. शेतकरी वर्गांत सुधारणेचा प्रसार इत्यादि.

शेतकींत कोणतीहि सुधारणा घडवून आणण्यापूर्वी त्याविषयीं रासायनिक प्रयोगशाळेंत व प्रयोगक्षेत्रांत पूर्ण छाननी झाली पाहिजे. ही छाननी त्या त्या प्रांतांत रयतेच्या उपयोगीं पडेल अशा पिकांसंबंधीं किंवा शेतीच्या पद्धतीसंबंधीं झाली पाहिजे. ही पुरी झाल्यानंतर मग सुधारणा घडवून आणणें शक्य आहे किंवा नाही याचा विचार करावा लागतो. निरनिराळ्या प्रांतांत हवा पाणी वगैरे निरनिराळीं असल्यामुळें तेथील बिकट प्रश्नांच्या संशोधनाकरितां रासायनिक प्रयोगशाळा व प्रयोगक्षेत्रें वेगवेगळ्या परिस्थितींत स्थापन झाली आहेत. प्रयोगक्षेत्र स्थापन झाल्यावर तेथील प्रयोग सफळ किंवा निष्फळ आहेत हें ठरण्यास बरींच वर्षे लागतात.

हीं प्रयोगक्षेत्राची कल्पना फार वर्षांची जुनी आहे. हिंदुस्थानांत पहिलें प्रयोगक्षेत्र इ. सन १८१४ सालीं कानपूरनजीक वित्तूर येथें मि. राव्हेन्स क्राफ्ट कानपूरचे त्या वेळचे कलेक्टर यांनीं काढिलें होतें.

निरनिराळ्या प्रांतांतील प्रयोगक्षेत्रांची संख्या सन १९१७-१८ सालीं पुढें नमूद केल्याप्रमाणें होती. बंगाल ११, बहार ओरिसा ९, संयुक्तप्रांत ३९ पंजाब ४ वायव्येकडील प्रांत २, मुंबई २२, मद्रास १२, मध्यप्रांत १५, आसाम ५, ब्रह्मदेश १६, म्हैसूर ३ व बडोदें ४.

मुंबई इलाख्यांत इसवी सन १८६९ सालीं खानदेश जिल्ह्यांत भडगांव येथें सुमारें १२०० एकर जमीन घेऊन तेथें सरकारी शेतीची स्थापना केली. हें शेत कापसाची सुधारणा करण्याकरिता घेण्यांत आलें होतें. सन १८९० सालीं पुण्यानजीक खडकी येथें शेतकीखात्यानें दुधाची डेअरी काढली. ही हिंदुस्थानांतील पहिली डेअरी होय. हल्ली सर्व हिंदुस्थानात हजारों डेअर्‍या स्थापन झाल्या आहेत.  सन १८९४ सालीं मांजरी येथे उंसाकरितां स्वतंत्र शेताची स्थापना झाली. सन १९१७-१८ सालीं मुंबई इलाख्यांत एकंदर २२ प्रयोगक्षेत्रें होतीं. यापैकीं गुजराथेंत सुरत, नडियाद व दोहद येथें; मध्यभागांत धुळें, जळगांव, कोपरगांव, गणेशखिंड, मांजरी, व खडकी येथें; कर्नाटकांत गोकाक, धारवाड, गदग व तेगूर येथें; सिंध प्रांतांत मिरपूर खास, सक्कर, लारखाना व वलांडी येथें आहेत.

गुजराथ प्रांतांतील प्रयोगशाळेत मुख्यत्वेंकरून कापूस, जोंधळा, तंबाखू, बाजरी, मका वगैरे पिकें; मध्यभागांत कापूस; मांजरी येथें उसास खत, पाणी, फेरपालटाची पिकें, नवीन जाती आणून लावणें, वाफेच्या यंत्रानें रस काढणें, चुलाणांत सुधारणा वगैरे; खडकी येथें दूधदुभतें, गुरांची उपज निपज वगैरे; गणेशखिंडींत फळफळावळ; कर्नाटकांत कापूस व कोंकणांत भात वगैरेसंबंधी प्रयोग चालले आहेत.

मध्यप्रांतांत व वर्‍हाडांत एकंदर १५ प्रयोगक्षेत्रें होतीं. अकोला (मुख्यत्वेंकरून कापूस), हुशंगाबाद (पावरखेडागहूं); नागपूर (शेतकी कॉलेज फॉर्म) रायपूर (लंभाडी-भात). तेलंगखेडी (डेअरी-दुभत्याचें प्रयोगक्षेत्र) बोरगांव, थारसा, सिंधवाडी, चांदखुरी, बिलासपूर दग, वडशिवणी, खावर्था, आथर्ताळ आणि खेवी, बैतुल व दमोह येथें प्रयोग क्षेत्रें स्थापन झालीं आहेत.

निजामच्या राज्यांत महबूबनगर (मुख्यत्वेंकरून कापूस व रेशमाचे किडे), आलेर (जिल्हा नालगोडा-कापूस व एरंडीवरील रेशमाचे किडे,) कमरेड्डी (जिल्हा निजामाबाद ऊंस) व परभणी (मराठवाडा कापूस) वगैरे मिळून नवीन चार क्षेत्रें स्थापन झालीं आहेत.

ह्या प्रयोगक्षेत्रांत त्या त्या प्रदेशांतील महत्त्वाची पिकें व कांहीं नवीन पिकें, नवीन तर्‍हेचीं खतें, आऊतें, सुधारलेलीं पाणी काढण्याचीं साधनें. पिकें करण्याच्या सुधारलेल्या पद्धती वगैरे गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यांत येतो; व त्यांपैकीं फायदेशीर ठरतील त्या पद्धतींचा, बियांचा, खतांचा, आऊतांचा वगैरे इतरत्र फैलाव होण्याचा प्रयत्‍न करण्यांत येतो. सरकारनें काढलेल्या या प्रयोगशाळा लोकांनीं येऊन पाहाव्या म्हणूनच आहेत.

प शु वै द्य क खा ते व गो शा ळा.— या सदराखालीं शिक्षण देण्याकरितां मुंबई, मद्रास, बंगाल, पंजाब व ब्रह्मदेश या प्रांतांत कॉलेजें स्थापन करण्यांत आलीं आहेत. जनावरांची पैदास, जोपासना व वाड्यांप्रीत्यर्थ मुंबई इलाख्यांत गुजराथेंत चारोंडी येथें नार्थकोटगोशाळा व धारवाडा जिल्ह्यांत तेगूर येथें गोशाळा आहेत. मध्यप्रांतात तेलंन, खेडी, चांदखुरी, पावरखेडा, बोरगांव व थारसा येथें गोशाळा स्थापन झाल्या आहेत. या गोशाळेंत जे गोर्‍हे उत्तम व खात्रीचे निपजतील ते खेड्यांत ठेऊन गुरांची सुधारणा करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. याशिवाय चांगल्या जातीचे पोळ वेळोवेळी तगाईरूपानें किंवा लोकलबोर्डांतून विकत घेऊन खेड्यांत ठेवण्यांत येतात.

सन १९१५-१६ सालच्या पशुवैद्यक खात्याच्या रिपोर्टावरून चांगली अवलाद तयार करण्याकरिता सरकारांतून ९० व लोकलबोर्डांतून ११११ सांड (पोळ) ठेविले होते असें दिसून येतें. याखेरीज सन १९१५-१६ सालीं १९३ घोडे, ११३ गाढवें अशीं या खात्यांतून उत्पत्तीकरितां ठेविलीं होतीं.

शेतकी सर्वस्वीं चांगल्या जनावरांवर अवलंबून आहे. गुरांच्या रोगांवर उपाय करण्यासाठीं व जागोंजागीं मोफत दवादारू देण्यासाठीं सर्व हिंदुस्थानांत ४५६ दवाखाने असून त्याची संख्या मुंबई इलाख्यांत सिंध प्रांतसुद्धां ६५ व मध्यप्रांत व वर्‍हाडांत ७९ होती. या सर्वांवर पशुवैद्यकखात्याची देखरेख असते. दवाखान्यांतील डाक्टर वेळोंवेळीं खेडोंखेडीं फिरतात व शेतकरी लोकांनां गुरासंबंधीं योग्य सल्ला देतात. एखादें वेळीं स्पर्शजन्य रोगांचा उद्‍भव खेड्यांत झाल्यास त्यांनां खबर मिळतांच ते तेथें जाऊन रोगप्रतिबंधक उपाय योजून शिवाय गुरें लशीनें टोचतात. या खात्याचा खर्च वर्षानुवर्षे वाढत्या प्रमाणावर आहे हें खालीं दिलेल्या आंकड्यांवरून स्पष्ट होईल.

१९०४-०५ सालीं रुपये १०८२३५३: १९१०-११ सालीं रुपये २०२९४९५; आणि १९१५-१६ सालीं रुपये ३१७२६२५ याप्रमाणें खर्च झाला.

शे त की शि क्ष ण.— शेतकर्‍यांत ज्ञानाचा प्रसार होणें हा शेतकीच्या प्रगतीचा पाया आहे. भौतिक शास्त्रें व शेती यांची सांगड कशी घालावयाची हें शेतकर्‍यांमध्यें ज्ञानाचा प्रसार झाल्याशिवाय कळणें शक्य नाहीं. सदरहू शास्त्राचें शिक्षण देण्याकरिता खालीं दिलेल्या ठिकाणीं कॉलेजें स्थापन करण्यांत आलीं आहेत. (१) पुणें मुंबई, (२) नागपूर, मध्यप्रांत, (३) कोईमतूर (मद्रास), (४) कानपूर (संयुक्त प्रांत, (५) साबूर (बहार व ओरिसा) व (६) लायलपूर (पंजाब). यांशिवाय देशी भाषेंतून या विषयाचें त्रोटक शिक्षण देण्यासाठी कित्येक ठिकाणीं प्रयोगक्षेत्रांस जोडून शेतकीचे वर्ग काढिले आहेत. देशी भाषेच्या द्वारें शेतकीशिक्षण देण्यासाठीं शाळा मुंबई इलाख्यांत पुण्यानजीक लोणी, धारवाड जिल्ह्यांत देवीहोत्तूर, ठाणें जिल्ह्यांत जांभूळ, कुलाबा जिल्ह्यांत अलिबाग, पंचमहाल जिल्ह्यांत गोध्रा व सिंध प्रांतांत मिरपूरर खास येथें काढिलेल्या आहेत. हल्लीं मध्यप्रांतांत चांदखुरी व पावरखेडा येथें अशा तर्‍हेच्या शाळा काढण्याचें ठरलें आहे. या विषयासंबंधीं जास्त माहिती शेतकीशिक्षण या विषयाखालीं मिळेल.

शेतकर्‍यांस भांडवलाचा पुरवठा.- शेतकरी वर्गांस त्याच्या कामाकरितां भांडवलाची अतिशय जरुरी असते. तें भांडवल कमी व्याजानें मिळावें म्हणून सन १९०४ सालीं हिंदुस्थान सरकारनें सहकारी पतपेढ्यांचा कायदा केल्यापासून खेडोंखेडीं परस्पर सहकारी पतपेढ्या स्थापण्यास सुरुवात झाली. सदरहु संस्थेंत गांवांतील कांहीं निवडक माणसें घेऊन त्यांच्या हमीवर गांवांत मिळविलेल्या थोड्या भांडवलास सरकारमार्फत कांहीं रक्कम कमी व्याजानें मिळते. सन १९१७-१८ सालीं अशा खेड्यांतील लोकांनां भांडवल पुरविणार्‍या पतपेंढ्यांची संख्या २३,७४२ असून त्यांत ८,५१,४०७ सभासद होते. व एकंदर भांडवल ६८९० रुपये होतें. मुंबई इलाख्यांत १३९० पतपेढ्या असून सभासद १,०१,३१३ होते. भांडवल ७१९९ लाख रुपयांचें होतें. त्याचप्रमाणें मध्यप्रांतांत ३४१२ पतपेढ्या होत्या- सभासदांची संख्या ५६,०७२ असून भांडवल ५७६३ लाख रुपयांचें होतें. या रकमेपैकीं शेंकडा ७४ उचल आउत, बैल, बीं बियाणें, शेतखर्च, विहिरी खणणें व ताली घालणें यांसाठीं होती. मुंबई इलाख्यांत २१ खत विक्रीसाठीं, ८ कापूसविक्रीसाठीं, ८ बीं बियासाठीं, १० सुधारलेलीं आऊतें विकण्यासाठीं व १० उत्तम गुरांची पैदास करण्यासाठीं संस्था होत्या. याशिवाय सर्व हिंदुस्थानांत गुरांचा विमा उतरण्यासाठी ३९९ संस्था होत्या. त्यापैकीं ३७९ फक्त ब्रम्हदेशांत असून मुंबई इलाख्यांत त्यांची संख्या चार होती. अशा अनेक प्रकारांनीं शेतकीच्या धंद्यांत सहकारितेचा प्रसार होऊं लागला आहे. भांडवलाप्रीत्यर्थ सरकारने अग्रिकलचरल रिलीफ अ‍ॅक्ट, (शेतकरी ऋणमोचन कायदा) अग्रिकलचरल इंप्रुव्हमेन्ट अ‍ॅक्ट (शेतीच्या सुधारणेसाठीं तगाई देण्याचा कायदा) व अग्रिकलचरल लोन्स अ‍ॅक्ट (शेतकर्‍यास तगाई वगैरे देऊन मदत करणारा कायदा) असे कायदे केले आहेत. या कायद्यान्वयें शेतकर्‍याला ताली घालणें, विहिरी खोदणें, बैल, बीं वगैरे विकत घेणें वगैरेकरितां तगाईच्या रूपानें पैसा दिला जातो. त्याचप्रमाणें हल्लीं ऑईल एन्जिन व पंप, उंसाचे घाणे, लोखंडी नांगर वगैरे विकत घेण्यासाठी तगाई मिळते.

शेतकी संस्था.- शेतकर्‍यांच्या अडचणी दूर कराव्या व त्यांच्या गरजा भागविण्याबद्दल त्यांत सल्ला द्यावा याकरितां जागोंजागी शेतकीसभा स्थापन झाल्या आहेत. अशा सभा सर्व हिंदुस्थानांत असून त्या महाराष्ट्रांतहि आहेत. पुणें येथील मध्यवर्ती डेक्कन आग्रिकल्चरल असोसिएशन या नांवांच्या सभेच्या विद्यमानें शेत व शेतकरी या नांवाचें शेतीसंबंधी माहितीनें भरलेलें मासिक प्रसिद्ध होत असतें. अशाच तर्‍हेचीं मासिकें गुजराथी व कानडी भाषेंत शेतकी संस्थेमार्फत भडोच व धारवाड येथें प्रसिद्ध होतात. मध्यप्रांतांत नागपूर येथें शेतकी खात्यांतून “किरसानी समाचार” नामक मासिक पुस्तक हिंदी, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषांत प्रसिद्ध होतें. निजामच्या राज्यांत अशाच प्रकारचें एक मासिक पुस्तक उर्दूंत निघत असतें. शेतकी कॉलेजांतून व पुसा येथून तिमाहि पुस्तकें शेतकी विषयावर इंग्रजींत प्रसिद्ध करण्यांत येतात.

या शेतकीसभा वेळोंवेळी सभा भरवून व्याख्यानद्वारा शेतकर्‍यांच्या शेतींत ज्ञानाचा प्रसार करीत असतात. कांहीं ठिकाणीं या सभांनीं निवडक बीं, सुधारलेलीं आउतें व त्यांचे भाग व खतें पुरविण्यासाठीं डेपो काढलेले आहेत. शेतकीचें ज्ञान गरजू शेतकर्‍याला वेळेवर मिळावें म्हणून शेतकी खात्यानें प्रत्येक जिल्ह्यांत फिरस्ते ओव्हरसियर नेमिले आहेत. त्यांच्याबरोबर व फार्म सुपरीन्डेन्डेंट यांच्यांशी पत्रव्यवहार केल्यास त्यांच्याकडून शेतीसंबंधी ताबडतोब माहिती मिळावी अशी योजना आहे.

शेतकरी वर्गांत सुधारणेचा प्रसार.- पहिल्या सदरांत लिहिलेल्या ठिकाणीं जे शोध उपयुक्त ठरतात त्याचें ज्ञान शेतकर्‍यांस मिळावें म्हणून हस्तपत्रकें प्रसिद्ध करून गांवोगांव शेतकीचीं प्रदर्शनें व प्रात्यक्षिकें भरतील त्या ठिकाणीं तीं वाटण्यांत येतात. अशीं पत्रकें मुंबई इलाख्यांत सन १९१८ अखेर १०८ निघाली असून मध्यप्रांत व वर्‍हाडातहि पुष्कळ निघाली आहेत. या पत्रकांत पिकांची लागवड, त्यांस उत्तम ठरलेली खतें, नवीन सुधारलेली आउतें धान्य व जनावरांचे रोग, पिकांवरील कीड घालविण्याचे उपाय, आउतांची व दुभत्या जनावरांची जोपासना वगैरेसंबंधीं माहिती दिलेली असते. याशिवाय प्रत्येक प्रयोगशालेचे वार्षिक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यांत येतात. विवक्षित विषयांवर इत्थंभूत माहितीची लहान लहान पुस्तकें व टिपणें काढून शेतकीखात्यांतून तीं वेळोवेळीं छापून प्रसिद्ध करण्यांत येतात.

शिवाय दरवर्षी शेतीसंबंधीं सप्रयोग ज्ञान शेतकर्‍यांनां मिळावें यासाठी जेथें मोठे बाजार व जत्रा भरतात, त्या ठिकाणीं शेतीचीं व गुरांचीं प्रदर्शनें व प्रात्यक्षिकें भरविण्यांत येतात व या प्रदर्शनांत चढाओढीची बक्षिसें देण्यांत येतात. सन १९१५-१६ सालीं सर्व हिंदुस्थानांत घोड्यांचीं २५ व गुरांची ३४५ प्रदर्शनें भरली होती. त्यापैकीं मुंबई इलाख्यांत गुरांची ३, मध्यप्रांतांत ५, वर्‍हाडांत १३ व निझामच्या राज्यांत ९ प्रदर्शनें व प्रात्यक्षिकें भरविण्यांत आली होती. प्रदर्शनाच्या वेळीं उपयुक्त ठरलेली आउतें प्रत्यक्ष चालवून दाखविण्यांत येतात. याशिवाय जमलेल्या शेतकर्‍यांस निरनिराळ्या विषयांवर तज्ज्ञ माणसांकडून व्याख्यानें देण्यांत येतात. त्याप्रमाणें निरनिराळ्या जिल्ह्यांतून शेतकरी लोकांस सरकारी खर्चानें आणून त्यांनां प्रयोगशाळेंत उत्तम ठरलेले प्रयोग, उभी पिकें व इतर उपयुक्त आउतें वगैरे दाखवितात.

इसवी सन १९१७-१८ सालीं शेतकी खात्याप्रीत्यर्थ सर्व हिंदुस्थानांत किती खर्च झाला ह्याचा तपशील खाली दिला आहे:—

स्थलाचें नांव खर्च रुपये
पुसा व मध्यर्ती कॉलेज व संशोधनशाळा ५८१७२३
मुक्तेस्वर ब्याक्टिरिऑलॉजिकल लॅबोरेटरी ३३६४८१
मुंबई शेतकी खातें ९९०८६१
मद्रास         ” ७७६३३६
बंगाल         ” ३९६४२९
बहार, ओरिसा ” ३६३९००
संयुक्तप्रांत     ” ७८४८४४
पंजाब         ” ७५६३४४
ब्रह्मदेश     ” २३९०९५
मध्यप्रांत     ” ६०६७५७
आसाम     ” २४८०९३
वायव्य सरहद्दीवरील प्रांत ३६७९७
बलुचिस्तान     ” १४५७५
एकूण ६१३२२३५


शेतीचा प्रसार.— हिंदुस्थांन हा देश फार प्रचंड आहे. तो जर्मनीच्या सातपट, जपानच्या दसपट व ब्रिटिश बेटांच्या पंधरापट मोठा आहे. हिंदुस्थानांत मोठाले नऊ व लहान पांच असे एकंदर १४ प्रांत आहेत. शिवाय अनेक एतद्देशीय संस्थानें आहेत. हिंदुस्थानची दक्षिणोत्तर लांबी सुमारें २००० मैल असून रुंदी १९.० मैल आहे. सन १९१४-१५ सालीं प्रसिद्ध झाल्याप्रमाणें एकंदर क्षेत्रफळ १७,९९,००० चौरस मैल अथवा १,१,५,१४,७४,००० एकर आहे. इ. स. १९११ सालीं झालेल्या खानेसुमारी प्रमाणें लोकसंख्या अदमासें ३१ कोटी ५० लक्ष आहे. याची विभागणी पुढे दिल्याप्रमाणें :—

[एकर व लोकसंख्या यांचे आंकडे हजारांचे आहेत.]

देशाचें नांव एकर लोकसंख्या
ब्रिटिश हिंदुस्थान (कांहीं संस्थानां सुद्धां) ७४९११६ २६७१६४
हिंदुस्थान सरकाराशीं प्रत्यक्षसंबंध असणारीं संस्थानें ३१६३८७ ४४७६७
शानसंस्थानें (ब्रह्मदेश) वायव्य सरहद्दीवरील प्रांत वगैरे ५१२६५ २७३८
ब्रिटिश बलुचिस्तान ३४७०६ ४१४
एकूण ११५१४७४ ३१५०८३


शेतीचा प्रसार व महत्त्व.— राष्ट्रांतील धंदा या दृष्टीनें पण शेती महत्त्वाची आहे. व परदेशी दळणवळणाचीं साधनें नसत त्यावेळीं प्रत्येक देशास स्वतःच्या निर्वाहाकरितां पुरेसें धान्य करणें भाग असे, व यूरोपखंडांतील लढायांमध्यें नुकतेंच असें अनुभवास आलें आहे कीं राष्ट्रांतील इतर उद्योगधंदेच नव्हे परंतु प्रजेचें जीवनहि शेतीवर अवलंबून आहे, व प्रत्येक राष्ट्रानें अतःपर तरी शेतीस धंदा या दृष्टीनें पूर्ण महत्त्व दिलें पाहिजे.

इ. सन १९१४-१५ साली लागवडींत व पड वगैरे असलेलें क्षेत्र प्रांतवार दाखविणारा तक्ता खुलाशासाठीं पुढें दिला आहे. कोष्टकांतील आंकडे हजारांचे आहेत व जमिनीचें मान एकरांत दिलें आहे. एकूण संख्या दिलेल्या आंकड्यांची बेरीज नसून खर्‍या आंकड्यांची बेरीज आहे व तींतील हजारांचे आंकडे वगळले आहेत.

लागवडीच्या व पडित जमीनीचें प्रांतवार कोष्टक.

हिंदुस्थानांत शेतीवर अद्याप शेंकडा ८० लोक अवलंबून आहेत. शहरांत रहाणार्‍या लोकांनां या धंद्याचें महत्त्व नीटसें कळत नाहीं. परंतु खेडेगांवांत हाच कायतो मुख्य धंदा असतो. एकंदर देशांत यावर किती माणसें अवलंबून आहेत हें पुढील आंकड्यांवरून दिसून येईल. सन १९११ सालीं झालेल्या खानेसुमारीवरून पहातां सर्व हिंदुस्थानांतील शहरांतील लोकसंख्येचें खेडेगांवांतील लोकसंख्येशीं प्रमाण येणें प्रमाणें आहे:-

शहरांत रहाणारे लोक:- २,९७,४८,२२८
खेड्यांत रहाणारे लोक:- २८,५४,०८,१६८

नगरस्थांचें खेड्याच्या लोकसंख्येशीं प्रमाण १:८ आहे. या प्रमाणामध्यें प्रत्यक्ष स्वतःची शेती करणारे, दुसर्‍याची खंडानें करणारे, शेतावर मजुरी करणारे, व शेतीवर ज्यांचे लहान लहान धंदे अवलंबून आहेत त्या सर्वांचा समावेश होतो. यावरून या धंद्याचा निर्वाहाचें साधन म्हणून देशास किती उपयोग होतो हें दिसून येतें. इंग्लंड देशाशीं तुलना करितां असें दिसून येतें कीं इंग्लंड देश उद्योगधंद्याचे माहेरघर असल्यामुलें तेथें शेंकडा ५८ लोक निरनिराळ्या इतर धंद्यांत गुंतलेले असतात व फक्त शेंकडा ८ शेतकीं करितात. परंतु हिंदुस्थानांत शेतकी हा आद्य धंदा असल्यानें तींत शेंकडा ७१ लोक गुंतलेले असून शेंकडा १२ उद्योगधंदे; ५ व्यापार; २ घरगुती नोकरीं, शेंकडा अर्धा वकिली, डॉक्टरी, वैद्यकी, भिक्षुकी वगैरे धंदा व शेंकडा अर्धा सरकारी नोकरी व लष्करी नोकरी वगैरे करितात.

अजून शेंकडा ७० लोकांचें पोट प्रत्यक्ष शेतीवर चालतें, आणि शेंकडा ९० जणांची धांव शेती कोणत्या रीतीनें तरी संपादन करण्याकडे जात आहे. रावापासून रंकापर्यंत सर्वांचा व्यवहार शेतीच्या साहाय्यानें सुखाचा होतो हें सर्वश्रुत आहे. सर्व धंदे, नानातर्‍हेचे उदीम व्यापार व निरनिराळे कारखाने हे देखील शेतकीवरच अवलंबून आहेत. इतकेंच नव्हे तर सर्व तर्‍हेचे भिकारी, गोसावी, बैरागी, भिक्षुक, वकील व बलुतदार वगैरे अठरापगड जाती या सर्वांचा उदरनिर्वाह शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. म्हणून शेती हा धंदा सर्वांत श्रेष्ठ व महत्वाचा मानिला पाहिजे.

शेतकीदृष्ट्या मुख्य विभाग.— शेतकी दृष्ट्या विचार करितांना हिंदुस्तानचे अगदीं तीन वेगवेगळाले भाग करितां येतात. पहिला भाग हिमालय पर्वत, दुसरा भाग हिमालय पर्वताच्या पायथ्यापासून दक्षिणेकडे पसरत गेलेला आहे. हिमालयांतून निघणार्‍या मोठमोठ्या नद्या या भागांतून वहात गेलेल्या आहेत. तिसरा भाग वरील मैदानाच्या दक्षिण सीमेपासून पुन्हां वर चढत गेला आहे. हा एक त्रिकोणाकृति उंच सखल प्रदेश आहे.

हिमालय पर्वतांतील पाण्याचा साठा खालील सपाटीच्या उष्ण प्रदेशांना उपयोगी पडतो. हिमालयाच्या दक्षिण बाजूस पाऊस इतका पुष्कळ पडतो कीं, तेणेंकरून नद्यांस महापूर येतात व यामुळें त्यांच्या उतरणीवरील प्रदेशांत पीक फार चांगलें येतें. तेथें जव, बरग, नाचणी वगैरे किरकोळ धान्यें व बटाटे मुबलक पिकतात. ही पिकें रानटी व डोंगरी लोक जंगलास आग लावून त्या राखेंत खोरीं व कुदळी यांच्या साहाय्यानें जमीन तयार करून जागोजागीं ताली घालून फार मेहनतीनें काढितात. हिमालयांतून निघणार्‍या नद्या ज्या विस्तीर्ण प्रदेशांतून वाहतात तो दुसरा भाग होय. या प्रदेशाचा विस्तार बंगालच्या उपसागरापासून हिंदी महासागरापर्यंत पूर्व-पश्चिम आहे. हा भाग अत्यंत सधन व दाट वस्तीचा आहे. ह्या प्रदेशाला पश्चिमेकडून सिंधु, पूर्वेकडून ब्रह्मपुत्रा व मध्यभागीं गंगा आणि तिला मिळणार्‍या नद्या ह्यांच्या पाण्याचा पुरवठा होऊन गाळ सांचून येथील प्रदेश सुपीक झाला आहे. ह्या भागांत बंगालचा खालचा प्रदेश, आसाम, संयुक्तप्रांत, पंजाब, सिंध, राजपुताना आणि इतर एतद्देशीय संस्थानें यांचा समावेश होतो.

बंगाल्यांतील नदीकांठच्या सपाट प्रदेशांत कित्येक ठिकाणीं दोन व कित्येक ठिकाणीं भाताची तीन पिकें एक वर्षांत घेतात. अंतर्वेदींत एकसारखीं भाताचीं शेतें व त्यांच्या भोंवतीं बांबूची हिरवीगार बेटें, नारळी, पोफळी व दुसरे ताडमाडांचे वक्ष दृष्टीस पडतात. या भागांत जूटची लागवड विशेष आहे. उत्तरभागांत गहूं, जव, ज्वारी, गळिताचीं धान्यें, कापूस, तंबाखू, नीळ वगैरे पिकें होतात. दक्षिण बंगाल्यांत रेशमाची लागवड विशेष करितात. जंगलांत रेशमाचे कोशे उत्पन्न होतात. आसामांत मुख्यत्वेंकरून चहाची लागवड पुष्कळ आहे.

तिसरा भाग म्हणजे त्रिकोणाकृति आकाराचा हिंदुस्थानचा पठाराचा प्रदेश होय. पूर्वी याला ‘दक्षिण’ व हल्ली या भागाला ‘डेक्कन’ असें म्हणतात. या प्रदेशाच्या उत्तरेस अरवली, विंध्याद्रि व सातपुडा हे डोंगर असून पूर्व-पश्चिम बाजू घांट या नांवानें प्रसिद्ध आहेत. सबंध देश डोंगरांच्या रांगा व शिखरें ह्यांनीं भरलेला आहे. ह्याच्या मधून मधून मात्र लागवड केलेलीं व उंचवट्याचीं अनेक मैदानें आहेत. पूर्वघांटाचे तुटक तुटक सुळके आणि रांगा ह्या मद्रास इलाख्याकडून खालीं गेल्या आहेत. मुंबई इलाख्याला समुद्राच्या बाजूनें पश्चिमघांटाची एक मोठी भिंतच आहे. त्या घांटाच्यामध्यें व समुद्रकिनार्‍यांमध्यें फक्त चिंचोळी पट्टी आहे त्याला कोंकण म्हणतात. ह्या भागांत मध्यप्रांत, वर्‍हाड, मुंबई इलाखा, मद्रासइलाखा, म्हैसूर व निझामचें राज्य व इतर मांडलिक संस्थानें ह्यांचे मुलूख येतात.

महाराष्ट्रांतील शेती या विषयांवर विचार करण्यापूर्वी महाराष्ट्रांमध्ये कोणकोणत्या प्रांतांचा समावेश होतो याचा विचार करूं. महाराष्ट्र देशाची मर्यादा येणेंप्रमाणें:-

उत्तरेस नर्मदा नदी व सातपुडा डोंगर: पूर्वेस वाइन गंगा आणि प्राणहिता या दोन नद्या, त्यांच्या आग्नेय दिशेस माहूर गांवापासून गोव्यापर्यंत त्याची पूर्व मर्यादा वांकडी आहे. आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राचा आकार कांहींसा त्रिकोणी आहे. त्याची उत्तरेकडील बाजू सुमारें २०० कोस आहे. आणि पश्चिमेकडील व उत्तर-दक्षिणेकडील साधारण तितकीच आहे. पश्चिमेकडील भागाला कोंकण व पूर्वेकडील भागाला देश सें म्हणतात. मध्यभागीं सह्याद्रि पर्वतावरील जो प्रदेश त्याला घांटमाथा असें म्हणतात. या देशापैकीं पूर्वेकडील एक भाग मोंगल सरकाराकडे आहे. व दक्षिणेकडील एक लहानसा भाग (गोवें व भोंवतालचा प्रदेश) पोर्तुगालच्या स्वाधीन आहे. या देशांतच कोल्हापूरचें राज्य व दुसरें अनेक संस्थानिक राजे यांचे देश मोडतात. इसवी सन १८६२ सालीं महाराष्ट्र देशाचा वसूल सुमारें दीड कोट रुपये होता. महाराष्ट्रांत खालील प्रांतांचा समावेश होतो.

(१) कोंकण प्रांतः- यांत ठाणें, कुलाबा, रत्‍नागिरी व कारवार जिल्हे.

(२) गोवे प्रांतः- यांत दहा महाल आहेत- ते इलयस (जंजिरा गोवा), साष्टी, बारदेश (बारा देसायांचा गांव). भतग्राम (डिचोली), फोंडें, पेंडणें, सांगें, केपें, काणकोण व सत्तरी हे होत.

(३) देश:- यांत पश्चिमखानदेश, पूर्वखानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणें, सोलापूर व सातारा.

(४) कर्नाटक:- यांत बेळगांव, धारवाड व विजापूर.

(५) निझामच्या राज्यामध्यें:- मराठवाडा, औरंगाबाद, बीड, परभणी, बेदर, नांदेड, गुलबर्गा.

(६) मध्यप्रांतापैकी नागपूर भाग:- यांत नागपूर, भंडारा, चांदा, वर्धा, बालाघाट.

(७) वर्‍हाडप्रांत:- यांत उमरावती, अकोला, बुलढाणा व यवतमाळ.

एतद्दशीय संस्थानें:- यांत कोकण- डांग, सुरगणें, जव्हार, जंजिरा, सावंतवाडी. देश- यांत औंध, फलटण, भोर, अक्कलकोट, जत, डफळापूरे.

दक्षिण महाराष्ट्र:- यांत कोल्हापूर, सांगली, मिरज, कुरंदवाड, जमखंडी, मुधोळ, रामदुर्ग व सावनूर.

कोकण:- सह्याद्री पर्वताच्या योगानें महाराष्ट्राचे दोन विभाग झाले आहेत. त्यांतील सह्याद्रि व अरबीसमुद्र यांमध्यें दक्षिणोत्तर जी अरुंद पट्टी आहे तिला कोंकण असें म्हणतात. या प्रदेशाची दक्षिणोत्तर लांबी सुमारें ४५० मैल आहे व रुंदी ३०-६५ मैल पावेतों आहे. पूर्वभागांतून सह्याद्रि पर्वत गेल्यानें हा फार डोंगराळ भाग आहे. व पश्चिमभाग साधारणपणें सपाट आहे. सह्याद्रिच्या घाटमाथ्यावरील भागास मावळ म्हणतात. मावळांत सरासरी १२५ इंचावर व कोंकणांत १०० इंचपावेतों पाऊस पडतो. उत्तर कोंकणांत पावसाचें मान कमी व दक्षिण कोंकणांत जास्त आहे. कोंकणांतील हवा उष्ण व दमट आहे. येथील मुख्य पीक भाताचे होय.

कोकणप्रांताचें क्षेत्रफळ १३६६२ चौरस मैल आहे, व लोकसंख्या ३१,१०,६६१ आहे.

गोवा प्रांत:— दक्षिण कोंकणांत गोमांतकाचा समावेश होतो. पूर्वेस सह्याद्रि व पलीकडे उत्तरकारवारांतील सुपा तालुका, पश्चिमेस हिंदीमहासागर, दक्षिणेस कारवार जिल्हा, उत्तरेस तेरेखोलची नदी व सावंतवाडी संस्थान. इ.स. १५१० सालीं पोर्तुगीज लोकांचा सरदार वास्को दि गामा यानें पहिल्यानें गोंवा बेट हस्तगत केलें व १७६३ पावेतों वेळोवेळीं आणखी प्रांत काबीज केले. गोमांतकाची दक्षिणोत्तर लांबी ६१ मैल; व पूर्वपश्चिम रुंदी ४५ मैल आहे. क्षेत्रफळ सुमारें १०६२ चौरस असून लोकसंख्या ५,४१,०७४ आहे.

गोंवा प्रांत समुद्रसपाटीपासून सुरू होऊन तो ३५०० फुटांपर्यंत उंच उंच होत गेलेला आहे. समुद्रकांठीं हवा खारी, घाम आणून थकवा आणणारी पण डोंगराच्या बाजूला वर जावें तों साधारण बरी होत जाते. एकंदरींत हवा ओलसर, दमट व उष्ण आहे. या प्रांतात पावसाळा भरपूर व खात्रीचा आहे. येथील मुख्य पिकें भात, नारळ व सुपारी ही होत.

देश व कर्नाटक— यांत एकंदर १० जिल्हे आहेत. हा प्रदेश उत्तरेस सातपुडा पर्वतापासून सुरू होऊन दक्षिणेस म्हैसूर संस्थानापावेतों पसरलेला आहे. याच्या पश्चिमेला दक्षिणटोंकापावेतों सह्याद्रि पर्वताची ओळ आहे. या प्रदेशाचे स्थूलमानानें तीन भाग करतां येतात.

पश्चिम पट्टी:- सह्याद्रि पर्वताला लागून असलेला २०-२५ मैल रुंदीचा प्रदेश. हा अगदीं डोंगराळ आहे. यांतील मुख्य पीक भात होय.

मध्यपट्टी:- यांत पश्चिम पट्टीच्या पूर्वेकडे १५-२० मैल रुंदीचा प्रदेश मोडतो. येथें डोंगर थोडे आहेत व पाऊस साधारण ३० इंच पावेतों पडतो. हवा मध्यम प्रतीची उष्ण आहे. गहूं, बाजरी व ज्वारी ही मुख्य पिकें होत. कापूसहि या भागांत पिकतो.

पूर्वपट्टी:- ही संज्ञा मध्यपट्टीच्या पूर्वेकडील सपाट प्रदेशास देतात. या भागांत डोंगर व टेंकड्या थोड्या आहेत. या प्रदेशांत पाऊस कमी असून सुमारें २० इंच पावेतों पडतो. या पूर्वपट्टीपैकी अगदीं पूर्वेकडील जिल्ह्यांत (अहमदनगर, सोलापूर व विजापूर येथें) पावसाचें बहुतेक दुर्भिक्ष असतें. या भागांत हवा उष्ण असते. यांत मुख्य पिकें ज्वारी, थोडी बाजरी, कापूस, गहूं व गळिताचीं धान्यें हीं होत. देश या विभागाचें ३७,२५१ चौरस मैल क्षेत्र असून लोकसंख्या ६३,८,७०६४ आहे.

कर्नाटक:- हा प्रदेश मुंबई इलाख्यांतील दक्षिण टोंक होय. याचे मुख्य दोन भाग करितां येतात. पश्चिमेकडील मल्लाड अगर मलनाड (मळी= पाऊस, नाड= भाग) व पूर्वेकडील देशी भाग. मल्लाड भाग डोंगराळ असून त्यांतील हवा थंडगार असते. येथें ५०-१०० इंचांपावेतों पाऊस पडतो. तो नियमित व पुरेसा असतो. तेथील मुख्य पीक भात असून डोंगराळ भागांत नाचणी, वरी वगैरे पेरितात. या भागांत लहान तळीं बरींच आहेत. पूर्वेकडील काळ्या कोरडवाहू जमीन असलेल्या भागाला देश म्हणतात. यांत हवा उष्ण असून पाऊस सुमारें २३-२६ इंचांपावेतों पडतो. या भागांतील महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे पाण्याचा तुटवडा ही होय. तळीं उन्हाळ्याच्या आरंभींच आटतात. या भागांतील मुख्य पिकें कापूस, ज्वारी, गहूं आणि गळिताचीं धान्यें होत. बहुतेक सर्व विजापूर जिल्हा या भागांत मोडतो. पूर्व व पश्चिम यांच्या दरम्यान धारवाड व बेळगांव जिल्ह्यांत जो भाग आहे त्याला संक्रमणपट्टी म्हणतात. या भागाला पावसाळा जून महिन्यांत सुरू होणार्‍या पावसाचा व ऑक्टोबर महिन्यांत सुरू होणार्‍या मद्रासच्या पावसाचा या दोहोंचा पूर्ण फायदा मिळतो. या भागांतील हवा, पाणी, पाऊस, काळी जमीन वगैरे कांहीं मल्लाड व कांहीं देशासारखी आहे. या भागांत सर्व तर्‍हेचीं पिकें होतात. कर्नाटकाचें क्षेत्रफळ १५९२४ चौरस मैल असून लोकसंख्या २८,३२,७९८ आहे.

निझामचें राज्य— हें राज्य विस्तारानें आणि उत्पन्नाच्या मानानें सर्व संस्थानांत जास्त आहे. हे दख्खनच्या पठाराच्या मध्यभागीं आहे. याची सर्वांत मोठी लांबी ९०२ मैल असून सर्वांत मोठी रुंदी ७६२ मैल आहे. या पठाराची उंची औरंगाबादेजवळ २००० फूट असून ती कर्नूलजवळ अवघी ९०० फूट आहे. एकंदरींत सरासरीनें या पठाराची उंची १२५० फूट आहे. या राज्याचे गोदावरी व मांजरा नदीनें दोन विभाग होतात. उत्तरेकडील व पश्चिमेकडील भागांत काळा खडक असून दक्षिण व पूर्वेकडील भागांत ग्रानाइट व शाहाबादी धोंड्यांच्या खाणी आहेत. पश्चिमेकडील काळ्या खडकाच्या भागाला मराठवाडा अशी संज्ञा असून पूर्वेकडील ग्रानाईटच्या बहुतेक भागाला तेलंगण म्हणतात. तेलंगणांत ओढ्यांना धरणे बांधून केलेले हजारों तलाव आहेत. सह्याद्रींतील बर्‍याच नद्या या भागांतून वहात जातात व त्यांचा पुष्कळ फायदा त्याला मिळतो.

निझामच्या राज्यांत सरासरीच्या मानानें ३०-३५ इंचापर्यंत पाऊस पडतो. तेलंगणांत मुख्य पीक भाताचें आहे. मराठवाड्यांत व कर्नाटकांत गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा या मोठ्या नद्यांच्या आजूबाजूस, गाळाच्या काळ्या खोल जमिनी असून त्यांत ज्वारी (खरीप, रब्बी) कापूस, बाजरी, तूर, हरभरा, वाटाणा, लाख, तीळ, जवस, करडई इत्यादि जिन्नस विपुल पिकतात. पठारावर जेथें जमीन सपाट असते, तेथें गव्हाची लागवड जास्त होते. तंबाखू व ऊंस यांची लागवड जागजागीं आढळते. तेलंगणांत एरंडीचा पेरा पुष्कळ होतो. औरंगाबाद जिल्हा फळफळावळीच्या बागांबद्दल प्रसिद्ध आहे.

येथील हवा समशीतोष्ण आहे. दक्षिण भागाची हवा उत्तरेपेक्षां अधिक उष्ण आहे. मराठवाड्यांतील हवा शरीर प्रकृतीस जास्त मानवते. एकंदरींत मार्चपासून जूनपावेतों हवा रुक्ष व गरम असतें व इतर दिवसांत बरी असते.

निझामच्या राज्याचें एकंदर क्षेत्रफळ ८३,६९८ चौरसमैल असून लोकसंख्या १,३३,७४,६९६ आहे व उत्पन्न सरासरीनें तीन कोट आहे.

वर्‍हाड प्रांत- ह्या प्रांताला पूर्वी विदर्भदेश म्हणत असत. हा प्रांत साधारणपणें हिंदुस्थानच्या मध्यभागी आहे. याची पूर्वपश्चिम लांबी १५० मैल व रुंदी १४४ मैल आहे. या प्रांताच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत असून पश्चिम सीमेवर खानदेश व निझामचें राज्य आहे. इ.स. १६६७ साली वर्‍हाड प्रांताचें ऐनेइ अकबरींत मोंगलाचा एक सुपीक प्रांत असें वर्णन केलेलें आहे. वर्‍हाडच्या स्वाभाविक रचनेवरून त्याचे दोन भाग करितां येतात. सखल प्रदेशास पेनघांट म्हणतात व उंच प्रदेशास मेळ घांट म्हणतात. सखल प्रदेशांतील जमीन उत्तम काळी व खोल आहे. ही जमीन फार सुपीक असून उत्तम जातीचा कापूस याच प्रदेशांत होतो. याशिवाय येथें गहूं, जोंधळा, हरभरा, जवस, तूर व दुसरीं कित्येक पिकें होतात. पूर्णा कांठच्या जमिनींत बराच क्षार आहे व येथें बर्‍याच लोण्याच्या जमिनी आहेत. बालाघांट (दक्षिणेकडील अजिंठ्याचे डोंगर) पट्ट्यांत जमिनी मध्यम प्रतीच्या आहेत. येथें खरिपांत कापूस, ज्वारी, तूर, तीळ, भुइमूग वगैरे पिकत असून रब्बींत गहूं, जवस व हरभरा ही मुख्य पिकें होतात.

एकंदरींत हा प्रांत उष्ण व रुक्ष आहे. पेनघाट खेरीज करून हवा साधारण देशासारखी आहे. पेनघाटांत मात्र उन्हाळ्यांत हवा अति उष्ण असते. रात्रीं बहुतकरून गारठा असतो. पावसाळ्यांत हवा दमट व साधारण गार असते. या प्रांतांत सरासरीनें ३३-३५ इंचांपावेतों पाऊस पडतो. पेनघाटापेक्षां बालाघाटांत पाऊस जास्त पडतो व मेळ (गावी लगड) घांट म्हणून जो साधारण जंगलमय भाग आहे तेथें पाऊस फार पडतो. या प्रांताचें क्षेत्रफळ १७७६६ चरस मैल असून लोकसंख्या ३०,५७,१६२ आहे.

मध्य प्रांतः- यांत डोंगर व खोरीं आहेत. उत्तरेकडील प्रदेश विशेष डोंगराळ आहे. या प्रांताचा सरासरीनें एक चतुर्थांश भाग जंगलानें व्यापिलेला आहे. येथील मुख्य नद्या नर्मदा, महानदी, वर्धा, वैनगंगा ह्या होत. या प्रांतांत जबलपूर पासून हरद्यापावेतों बहुतेक भागांतील जमीन गाळाची बनलेली आहे. सागर, जबलपूर, मंडला, शिवणी, छिंदवाडा, नेमाड, नागपूर व वर्धा जिल्ह्यांतील बर्‍याच भागांत काळा खडक असून गोंडावणी खडक नागपूर, वर्धा, चांदा वगैरे जिल्ह्यांत सांपडतो. शिवाय हा बिलासपूरच्या जमीनदारी भागांतहि आहे. वाळूचे व चुन्याचे खडक सागर व दमोह जिल्ह्यांत आहेत. नीस व ग्रानाईट, नागपूर व छत्तीसगड भागांत आढळतात.

ह्या प्रांतांत सरासरीनें ३५-४८ इंच पाऊस पडतो. हवा एकंदरींत उष्ण आहे. मंडला, चांदा, भंडारा, बालाघांट, छत्तीसगड या जिल्ह्यांत वैनगंगा नदीच्या पूर्व काठच्या प्रदेशांत मुख्यत्वेंकरून तांदुळांचें पीक फार होतें. नागपूरकडच्या पश्चिम भागांत, वर्धा जिल्ह्यांत व छिंदवाड्याच्या दक्षिणेस मुख्य पिकें कापूस व ज्वारी हीं होत. उत्तरेकडील प्रदेशांत गहूं पुष्कळ पिकतो. शिवाय तूर, हरभरा, गळिताचीं धान्यें वगैरे बरीच होतात. तंबाखू व ऊंस याचेंहि थोडेसें उत्पन्न होतें. नागपूर भागांत बोरें, संत्री आणि केळीं चांगलीं होतात. मध्यप्रांतांत पानमळे बर्‍याच ठिकाणी आढळतात, परंतु रामटेकच्या पानांची विशेष प्रसिद्धि आहे.

जमीनीचे प्रकार व त्यांतील पिकें:- शेतकी दृष्ट्या हिंदुस्थानांतील एकंदर जमीनीपैकी मळईच्या जमीनीचा पसारा फारच मोठा आहे. सिंध प्रांतांपैकीं बहुतेक भाग, मुंबई इलाख्याचा उत्तर भाग (गुजराथ), राजपुताना, पंजाब, संयुक्त प्रांत, बंगाल इलाखा, मद्रास इलाख्यांतील गोदावरी, कृष्णा आणि तंजावर जिल्हे व आसाम आणि ब्रह्मदेशांतील बराच प्रदेश वगैरे मळईचा आहे. दक्षिण हिंदुस्थानच्या पूर्व किनार्‍यावरील पट्टी व पूर्वपश्चिम घांटाच्या खोर्‍यांतील जमीनी या सर्व वरील प्रकारच्याच होत. शिवाय असल्या प्रकारच्या जमीनी मोठमोठ्या नद्यांच्या दोन्ही थड्यांना बनलेल्या आहेत. कृष्णा आणि गोदावरी यांच्या मुखाजवळील जमीनीचा रंग कांहींसा काळसर आहे. उत्तर हिंदुस्थानांतील गंगाथडीच्या जमीनीचा रंग, भुरकट, पिंवळसर व काळसर असा असतो. कित्येक ठिकाणीं जमीन वालुकामय, तर कित्येक ठिकाणीं ती इतकी चिकण व घट्ट असते कीं, पाणी बिलकुल निचरून जात नाही. कित्येक ठिकाणीं सोडा मॅग्नेशियाचें क्षार बसून लोणा आलेला आहे. पूर्वेकडील व मुख्यत्वेकरून बंगल्यांतील जमीन पंजाब व संयुक्त प्रांतांतील जमीनीपेक्षां फारच बारीक कणांची झालेली आहे. या बारीक कणांच्या जमीनींत कित्येक ठिकाणीं चुनखडी असून कांहीं ठिकाणीं तिच्या पोटीं चुनखडीचे थर बनलेले आहेत. बहुतेक ठिकाणी जमीनींतील थर अगदी खालीं वाळू, तिच्यावर चिक्कण जमीन व अगदीं वरील थर लापणजमीन असे असतात. गंगाकांठीं विहिरी फारशा खोल नसतात. परंतु पंजाब व संयुक्त प्रांतांतील विहिरींना पाणी फार खोलीवर लागतें. ज्या मळईच्या जमीनी भुसभुशीत असून स्वाभाविक निचर्‍याच्या असतात, त्यांत पाणभरती पिकें चांगलींच होतात. उत्तरेकडील मळईच्या प्रदेशांतील जमीनी सुपीक असून बहुतकरून पाऊस बेताचा व नियमित पडत असल्यामुळें यांत अनेक तर्‍हेचीं खरीफ व रब्बी पिकें होतात. या मळईच्या जमीनींत सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजन फारच थोडा सांपडतो. पोट्याश पुरेसा असून हिंदुस्थानांतील इतर जमीनीपेक्षां फास्फरिक असिडचें प्रमाण बरेंच जास्त असतें. चुना आणि मॅग्नेशिया ही पुरेशी असून लोखंड व अल्युमिना यांचें प्रमाण बरेंच जास्त असतें. हें प्रमाण मुख्यत्वेंकरून चिकण जमीनींत असतें. दक्षिणेंतील काळवथरी दगड (डेक्कन ट्रॅप) या खडकाचा प्रसार अजमासें दोन लक्ष चौरस मैल आहे. या खडकानें मुंबई इलाख्यांतील बहुतेक भाग व्यापला असून शिवाय तो वर्‍हाड प्रांत व मध्यप्रांताच्या पश्चिमेकडील तिसरा हिस्सा व निजामशाहीच्या पश्चिमेकडील अर्धा भाग यांतहि पसरला आहे. या सर्व प्रदेशांत जमीनी अनेक तर्‍हेच्या आढळत असून त्यांत होणार्‍या पिकांचें प्रमाण कमजास्त असतें. या प्रदेशांतील जमिनी सारख्या सपाट नसून उंचसखल असतात. डोंगराच्या उतारावरील जमिनी उथळ व हलक्या असून यांत पाऊस वेळेवर पडल्यास पिकें चांगलीं येतात. पायथ्याकडील जमिनी खोल, काळ्या रंगाच्या असतात. या वर्षानुवर्षे डोंगरांवरील गाळ येऊन सुधारत असतात. या प्रदेशांतच कापसाला योग्य अशा काळ्या, खोल व सपाट जमिनी आहेत. तापी, नर्मदा, गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या कांठच्या भारी काळ्या जमिनी कित्येक ठिकाणी वीस वीस फूट पावेतों खोल असतात. पावसाळ्यांत या इतक्या चिकण होतात कीं, त्यांत त्यावेळीं जाणें दुरापास्त होत असल्यामुळे त्यांत गहूं, जवस, हरभरा व शाळूसारखीं रब्बी पिकें करतात. ज्या काळ्या जमिनींत जोंधळा व कापसासारखीं पिकें खरीप हंगामात घेतात त्या जमिनी चार पांच फूट खोल असून त्यांत चुनखडीचे व मुरमाचे तुकडे मिसळलेले असतात. या काळ्या जमिनींची तळजमीन भुसभुशीत व चुनखडीनें मिश्रित असल्यामुळें तींतून पाण्याचा निचरा चांगला होतो. काळ्या जमिनीचे रंग, रूप, पोत व सुपीकता यांमध्यें जरी बराच फरक आढळतो, तरी तिच्या आंगी ओलावा राखून ठेवण्याची शक्ति असते. उन्हाळ्यांत या जमिनी आवळतात व त्यामुळें त्या फार खोलपर्यंत भेगाळतात. या जमिनी पाणभरती पिकें करण्यास फारशा उपयोगी पडत नाहींत. पण त्याच कमी खोलीच्या आणि मिसळीच्या असल्या म्हणजे त्यांत २५ ते ३० फूट खोलीवर पाणी लागत असून विहिरीच्या पाण्यावर उत्तम पिकें होतात. दक्षिणेंतील ट्रप प्रदेशाच्या बाहेरहि काळ्या जमिनी आढळून येतात. उदाहरणार्थ मुंबई इलाख्यांतील सुरत, भडोच जिल्ह्यांतील जमिनी; मद्रास इलाख्यांत बल्लारी, कर्नूल व कडाप्पा जिल्ह्यांतहि याच प्रकारच्या काळ्या जमिनी आहेत. पण या सर्व जमिनी मळईच्या आहेत. या निराळ्या तर्‍हेच्या काळ्या जमिनींत लोखंड, अल्यूमिनिअम व म्यांगेनीज हीं बरींच असतात. चुन्याचें प्रमाण कमीजास्त असून तो कार्बोनेट व सिलीकेट या दोन्ही रूपांत सांपडतो. मॅग्नेशिआ जास्त प्रमाणांत असून पोट्याश बहुतेक पुरेसा असतो. फास्फॉरिक असिड, नायट्रोजन व सेंद्रियपदार्थ यांची बहुतेक तूट असते.

तिसरा महत्त्वाचा प्रदेश म्हणजे प्रस्तरीभूत (ग्रानाइट) खडकाचा होय. मद्रास इलाख्यांतील बहुतेक प्रदेशांत, म्हैसूर संस्थानांत, मुंबई इलाख्याच्या गदगकडील भागांत, निजामशाहीच्या पूर्वेकडील अर्ध्या व मध्यप्रांताच्या पूर्वेकडील दोनतृतीयांश भागांत, ओरिसा व छोटा नागपूरकडे, बंगल्यांतील संताळपरगण्यांत व बिरभूम जिल्ह्यांत, संयुक्त प्रांतांतील मिरझापूर, झांशी आणि हमीरपूर जिल्ह्यांतील कांहीं भागांत आणि राजपुतान्यांतील पूर्व भागांत हा खडक आढळतो. याच प्रकारच्या खडकाची एक लांब पट्टी दक्षिण ब्रह्मदेशाच्या पूर्व भागांत सांपडते. या जातीच्या खडकापासून झालेल्या जमिनी भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. कांहीं अगदीं उथळ, खडकाळ व पांढरट रंगाच्या जमिनी डोंगरकठड्यांवर सांपडत असून त्यांत अगदीं हलक्या दर्जाचीं पिकें होतात. अशा जमिनी म्हैसूर संस्थानांत व मद्रास इलाख्यांत बर्‍याच प्रमाणावर आढळून येतात. तांबूस व तांबूसकाळसर व चिकण लापण जमिनी या पायथ्याशीं आढळत असून त्या सुपीक असतात. या दोहोंच्या मिश्रणानें झालेल्या मध्यम प्रतीच्या जमिनी पाणभरतीं पिकें करण्यास योग्य असतात. अशा जमिनींत कालव्याच्या पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी मुख्य पीक भाताचें करतात. या भागांत तळी व विहिरी रगड असून त्यांत अनेक तर्‍हेचीं बागाईती पिकें करतात. बेळगांव, धारवाड आणि उत्तर कानडा या जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील भागांत जांभा खडक (लाटेराईट) आढळतो. त्याच्यापासून होणार्‍या जमिनीचा रंग पिवळा, तांबडा अथवा लालसर काळा असतो. तांबूस जमिनी चांगल्या निचर्‍याच्या असतात. तेथें पुष्कळ तर्‍हेचीं पिकें करितात. साध्या व तालीच्या जमिनींतील मुख्य पीक भाताचें होय. बेळगांव, धारवाडकडील तांबड्या जमिनींत व तशा तर्‍हेच्या म्हैसूराकडील जमिनींत सर्व जातींचीं फळझाडें चांगलीं होतात. आंबे तर उत्तमच होतात. या खडकापासून झालेल्या जमिनींत फास्फॉरिक असिड, नायट्रोजन व सेंद्रिय पदार्थ यांची वाण आढळून येते.

हवामान:—  साधारणपणें हिंदुस्थान देश समशीतोष्ण कटिबंधांत व अंशतः उष्ण कटिबंधांत असून तो विषुववृत्तापासून फार जवळ आहे. हिंदुस्थानांत तीन प्रकारची हवा आढळून येते. उष्ण व दमट अशी मद्रास इलाख्यांतील दक्षिण भागांत, ओरिसा, बंगाल व आसाम प्रांतांत आढळते. उष्ण व कोरडी हवा राजपुताना, पंजाब, संयुक्तप्रांत व सिंधचा उत्तर भाग यांत आढळते. मध्यम उष्ण व कोरडी पंजाब व संयुक्त प्रांताचा कांहीं भाग, माळवा, मुंबई इलाखा, निझामचें राज्य व मध्यप्रांत यांत आढळते. सामान्य रीतीनें दक्षिणेकडून उत्तरेकडे जातांना जसजसे समुद्रापासून अंतर वाढत जातें तसतसें हिंवाळ्यांतील थंडीचें मान व उन्हाळ्यांतील उष्णतेचें मान यांत बराच फरक पडत जातो. पूर्वेकडील किनारा व उत्तरहिंदुस्थानांतील वाळवंटाचा प्रदेश यांत उन्हाळा फार कडक असतो.

हिंदुस्थानांत नैऋत्य व ईशान्य अशा दोन दिशांनीं पाऊस येतो. पहिले मान्सून वारे एप्रिलपासून आक्टोबरपर्यंत वहात असतात, व हे हिंदी महासागरावरून येतात. हा पाऊस मुंबई इलाख्याच्या बहुतेक भागांत पडतो. परंतु सह्याद्रीचा पश्चिम भाग सोडून जों जों पूर्वभागांत जावें तों तों पाऊस कमी होत जातो. शिवाय हा पाऊस पंजाबचा ईशान्य भाग, गंगाकांठ, पूर्वबंगाल व आसाम, सह्याद्रीच्या पश्चिमेकडील आणि पूर्व घाटांच्या पूर्वेकडील प्रदेश, पश्चिम किनारा व पूर्व किनारा यांस लागून असलेला प्रदेश व बंगाल यांत पडतो. दख्खनचा बहुतेक भाग, सिंध, राजपुताना, पंजाब येथें पाऊस अनिश्चित असतो. पूर्वबंगाल, आसाम, मध्यप्रांत, कोंकण व मावळ ह्या भागांत तो खात्रीचा असतो. ईशान्येकडून नैऋत्येकडे वहाणारे मान्सून वारे आक्टोबरपासून मार्चपर्यंत वहातात. बंगालच्या उपसागरावरून वहाणारे वारे अशाच पैकीं होत. यामुळें पूर्वेकडील प्रदेशांत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत बराच पाऊस बहुतेक निझामच्या राज्यांतील कांहीं भागांत, मद्रास इलाख्यांत, दक्षिण महाराष्ट्रांत (कर्नाटकांत), दख्खनच्या पूर्व भागांत, मध्यप्रांतांत व वर्‍हाडांत पडतो. हा पाऊस गहूं, हरभरा, जवस, शाळू वगैरे रब्बी पिकांनां फार महत्वाचा आहे. उत्तर हिंदुस्थानांत नैऋत्येकडील पावसानें खरीप पिकांना मदत होते व नोव्हेंबर ते मार्च महिन्यांतील पावसानें रब्बी पिकांस उपयोग होतो. हाच पाऊस संयुक्त प्रांतांत मार्च व मेच्या दरम्यान पुष्कळ पडतो. व त्यामुळें येथें पेरे लवकर होतात. यावेळीं केव्हां केव्हां दक्षिण हिंदुस्थानांत आंब्यांच्या हंगामांत पाऊस पडतो. निरनिराळ्या प्रांतांतील पावसाचें सारासरी मान खालीं दिलेल्या कोष्टकांत नमूद केल्याप्रमाणें असतें.

 

 प्रांताचें नांव  पाऊस इंच
 वायव्य स. ह. वरील प्रांत  १६.९
 पंजाब पूर्व व उत्तर भाग  २३.१
 दक्षिण व पश्चिम भाग  ९.२
 सिंध  ६.५
संयुक्तप्रांत-पूर्वभाग ३९.२
संयुक्तप्रांत-पश्चिमभाग ३७.९
बहार-ओरिसा ५६.८
छोटा नागपूर ५१.९
बहार ४८.६
बंगाल-पूर्वभाग
बंगाल-पश्चिम
 ७४.८
 आसाम  ९८.८
ब्रह्मदेश-उत्तर भाग ४५.२
ब्रह्मदेश-दक्षिण भाग १२९.२
मध्य हिंदुस्थान पश्चिम भाग ३३.६
पूर्व भाग ३८.७
राजपुताना पश्चिम भाग १३.१
पूर्व भाग २५.२
मुंबई-गुजराथ ३२.६
मुंबई-कोंकण १०९.३
मुंबई-डेक्कन देश ३०.८
मध्यप्रांत- पश्चिम भाग ४५.४
पूर्व भाग ५२.१
वर्‍हाड ३२.२
हैद्राबाद उ.भा. ३४.९
हैद्राबाद द.भा. ३०.६
मद्रास. मलबार १२७.६
मद्रास दक्षिण व पूर्व ३५.०
मद्रास डेक्कन २४.४
मद्रास उ. किनारा ३९.५
म्हैसूर ३६.१

 

सह्याद्रीवर कित्येक ठिकाणी २५० पासून ४०० इंचांपावेतों पाऊस पडतो. आसामांतील चेरापुंजी या ठिकाणी ४६० इंचांपर्यंत पाऊस पडतो.

वनस्पतीची पुनरुत्पत्ति करण्याचे प्रकार- हल्ली जी पिकें शाकभाज्या, फळफळावळ वगैरे वापरण्यांत येतात, त्यांची पूर्वपीठिका पाहिल्यास त्यांचे मूळचे प्रकार जंगलांत आपोआप बी, मुळें व डोळें वगैरेनीं होत असत. मनुष्यप्राण्यानें आपल्या कल्पनेनें फांद्यांचें व खोडाचे तुकडे करून लागण करणें, कलमें करणें, डोळे बांधणें, बियांची निवड करणें, मिश्रण किंवा संकर करणें वगैरे फेरफार करून जास्त व चांगल्या उत्पन्न देणार्‍या वनस्पती तयार करण्याचे प्रयत्‍न केले आहेत. ज्याप्रमाणें रानटी मनुष्य शहरांत आला म्हणजे त्याच्या स्वभावांत व चालचालणुकींत फरक होतो त्याप्रमाणें रानांत होणारीं पिकें, भाज्या, फळें, शेतांत व मळ्यांत लाविल्यास, त्यांचा रानटी निबरटपणा लोपून जाऊन तीं आकारांत मोठी, कोमल व रुचकर होतात. भेंडी, काकडी, दोडका, वांगें, भोंपळा वगैरे अनेक भाज्या रानटी स्थितींत कांटेरी, कडु, उग्र अशा असतात; त्यांत मनुष्यानें नवड, मिश्रण, कलमें वगैरे युक्त्यांनीं सुधारणा घडवून आणिली आहे. परंपरा वाढविण्याचे जरी असले अनेक प्रकार आढळून येतात, तथापि शेतींतील बहुतेक पिकांची वाढ बियांपासून केली जाते असें म्हणण्यास हरकत नाही. निदान तृण व कडधान्य हीं जीं खाण्याचीं मुख्य धान्यें होत त्यांची वाढ बियांपासून होते. गोराडू, बटाटे, सुरण वगैरेंची वाढ तुकडे करून ते लावून करितात. रताळ्याची वाढ त्याच्या वेलापासून अगर रताळ्याचे तुकडे लावून करितात. पानवेलीची वाढ वेलाचे तुकडे लावून करितात. फळझाडाची वाढ करण्यांत कलमें करणें, बांधणें वगैरे पद्धतीचा जास्त उपयोग करण्यांत येतो.

पिकें- कोणत्याहि भागांतील पिकें सर्वस्वी जमिनीच्या मगदुरावर अवलंबून असतात, पण त्यांतले त्यांत पाऊस काळ, उष्णता, दंव व हवेंतील ओलावा यांवर विशेषतः तीं फार अवलंबून असतात. पिकें करण्याचें मुख्य दोन हंगाम आहेत. एक खरीप व दुसरा रब्बी. यांचे पुन्हां दुसरे तीन भाग करतां येतात. एक जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा, आक्टोबर ते डिसेंबरपावेतों हिंवाळा व मार्च ते मेपर्यंत उन्हाळा. खरीप हंगामाचा पेरा जून ते जुलईपर्यंत होतो; व त्याची कापणी सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत होते. रब्बी पिकांनां खरीप पिकांपेक्षा पाऊस कमी लागतो. उत्तर हिंदुस्थानांत या पिकांनां दहिंवरापासून बराच फायदा होतो. रब्बी पिकांची पेरणी आक्टोबर व नोव्हेंबरांत होऊन कापणी मार्च-एप्रिलमध्यें होते. तांदूळ, ज्वारी, बाजरी व गहूं हीं हिंदुस्थानांतील लोकांच्या खाण्यांत येणारी मुख्य धान्यें होत. यापैकीं ज्वारी, बाजरी, खाणारे लोक दक्षिण हिंदुस्थानांत फार असून उत्तर हिंदुस्थानांत गहूं खाण्याची फार चाल आहे. तांदूळ खाणारे लोक थोड्या बहुत प्रमाणांत सर्वत्र आहेत. तथापि बंगाल, आसाम, ब्रह्मदेश व मद्रास या प्रांतांत तांदूळ हें खाण्याचें मुख्य धान्य होय. तांदूळ पिकण्यास उष्ण व दमट हवा, भरपूर पावसाळा किंवा पाण्याचा भरपूर पुरवठा लागतो. यामुळें बंगाल, आसाम, ब्रह्मदेश, मद्रास पूर्व व पश्चिम किनार्‍याजवळील प्रदेश, ओरिसा व संयुक्तप्रांतांतील कांहीं भाग यांत तांदूळ पुष्कळ पिकतो. गहूं हें रब्बी पीक आहे. याला सुपीक जमीन व कडक थंडी किंवा कोरडी हवा लागते. म्हणून उत्तर हिंदुस्थानांत, संयुक्त प्रांत, पंजाब, सिंध, माळवा, राजपुताना व मध्यप्रांतांतील कांहीं भाग यांत गहूं पुष्कळ पिकतो. ज्वारी दोन प्रकारची असते. एक खरीप व दुसरी रब्बी. जेथें उत्तम जमीन असून पहिल्या हंगामांतील पाऊस बेताचा पडतो, परंतु रब्बी हंगामांत थोडा जास्त पडतो, तेथें रब्बी शाळूचें पीक करतात. खरीप जोंधळा दक्षिण गुजराथ, खानदेश, सातारा, धारवाड व बेळगांव या जिल्ह्यांत जास्त होतो. निझामच्या राज्यांत मराठवाड्यांत जोंधळा पुष्कळ पिकतो. मध्यप्रांतांतहि जोंधळ्याचा पेरा पुष्कळ आहे. बाजरीला साधारणपणें हलकी जमीन व बेताचा पाऊस लागतो. बाजरी व जोंधळा ही पिकें मुख्यत्वेंकरून मुंबई इलाखा, मध्यप्रांत, निझामचे राज्य व मद्रासपैकी कांहीं भाग यांत होतात.

कडधान्यें- तुरीचे पीक सर्वत्र होतें. तथापि जेथें थंडी फार व पाऊसहि फार, तेथें ती चांगली होत नाही. हरबरा हें रब्बी हंगामांतील पीक असून ज्या ठिकाणीं गहूं होतो तेथें हरभरा उत्तम होतो. उत्तर हिंदुस्थानांत हें पीक महत्वाचें आहे.

उंस- थोड्याबहुत प्रमाणांत ऊंस सर्वत्र होतो. परंतु या पिकाला बारा महिने पाण्याचा भरपूर पुरवठा लागतो. उत्तर हिंदुस्थानांत जमीन सुपीक असून पाण्याचा पुरवठा चांगला आहे तेथें व मद्रास इलाख्यांत कृष्णा, गोदावरी, या नद्यांच्या मुखाजवळील प्रदेशात व मुंबई इलाख्यांत कालव्याखाली ऊंस बराच पिकतो.

वर नमूद केलेल्या खाण्याच्या धान्याखेरीज निरनिराळ्या तर्‍हेचा भाजीपाला, निरनिराळ्या प्रकारची फळफळावळ, दूधदुभतें, अंडीं, कोंबडीं, बदकें, मेंढ्या व शेळ्या वगैरे जिनसांचा खाण्याच्या पदार्थांत समावेश होतो. याखेरीज विवक्षित जातीच्या आहाराकरितां गाई, वासरें, म्हशी वगैरे गुरें मारिलीं जातात.

समुद्रकिनार्‍याच्या पट्ट्यांत नेहेमीं असंख्य मासे सांपडतात. त्यांपैकीं कांहींचा उपयोग खताकडे होतो. तथापि कोळी, खारवी वगैरे बर्‍याच लोकांचा उदरनिर्वाह माशांवर होतो. खारवलेल्या माशांचा घाटावर बराच व्यापार चालतो. मद्रास व बंगाल इलाख्यांत माशांत सुधारणा घडवून आणण्यासाठीं व त्यांचें उत्पन्न वाढविण्यासाठीं शेतकी खात्याची स्वतंत्र शाखा उघडण्यांत आली आहे.

भाजीपाला;- दररोजच्या खाण्याच्या पदार्थांमध्यें शाकभाजीचा कोणता तरी पदार्थ अवश्य होऊन बसला आहे. व शाकाहारी लोकांत तर तो अवश्यच आहे. मांसाहारी लोकांतहि आठवड्यांतून कांहीं दिवस शाकभाजीचा उपयोग करणें अवश्य मानिलें जातें.

खेड्यापाड्यांत पावसाच्या पाण्यावरच भाज्या करतात. पाऊस संपल्यानंतर पाण्याचा सांठा असेल तर व खतहि मिळाल्यास दुसर्‍या ऋतूंतहि त्याचे दुसरे प्रकार करतां येतात. खेड्यापाड्यांत भाज्यांचा खप फारसा नसल्यामुळें त्या करण्यापासून फायदा होत नाहीं. शहरांच्या आसपास अशा भाज्या जास्त खर्च करून केल्यास त्यांचा खप होतो, म्हणून भाज्यांचे मळे बहुतकरून मोठ्या शहरांजवळ अथवा त्यांच्याशीं सोईचें दळणवळण असलेल्या गांवांतून करतात.

भाजीपाला करणें ही फायद्याची बाजू असल्यामुळें परप्रांतांतून व परदेशांतून निरनिराळ्या जातींचें बी, प्रथमतः पुष्कळ घस सोसून मळेवाले आणितात व त्यांतून हवापाण्यास योग्य असे प्रकार कोणते आहेत. हें अनुभवानें ठरवून त्या जातींची वाढ करितात. ही वाढ लोकांच्या अभिरुचीवर अवलंबून असणार, परंतु त्याशिवाय हवापाण्याची योग्यता हें मुख्य कारण आहे. हिंदुस्थानांत आलेल्या कांहीं विलायती भाज्या दक्षिणेकडील लोकांस फार आवडतात. परंतु त्या दक्षिणेंतील हवेंत होतच नाहीत, म्हणून त्यांचें बीं इकडे आणून लागवड करीत नाहींत. परंतु या स्थितींतहि सुधारणा होत आहे.

ज्याप्रमाणें थंड देशांतील मनुष्य व इतर प्राणी उष्ण देशांत रहाण्यास परिस्थितीच्या बदलण्यानें योग्य होतात त्याचप्रमाणें अतिशय थंड देशांतील भाज्या मध्यम थंड देशांत आणिल्या असतां थोड्या फरकानें तेथें तयार होऊं लागतात. मध्यम थंड देशांतील बियाणें समशीतोष्ण हवेंत कांहीं दिवसांनीं व्हावयास लागतें; व अखेर पूर्ण ऊष्ण हवेंतहि थंड हवेच्या देशांतील भाज्या तयार होऊं लागल्या आहेत. कोबी, कॉलीफ्लावर वगैरे थंड देशांतील भाज्यांच्या जाती हिंदुस्थानांतील उष्ण भागांतहि होऊं लागल्या आहे.  त्याचप्रमाणें हिंदुस्थानांतील वांगीं, भेंड्या, बेलवांगी वगैरे भाज्या विलायतेंत हवेची परिस्थिति बदलून करतां येतात.

यूरोपच्या दक्षिण भागांतील बियाणें आणिल्यास हिंदुस्थानांत त्यांच्यापासून भाज्या बर्‍या होतात. त्याहीपेक्षां मध्य अमेरिकेंत व उत्तर अमेरिकेंतील दक्षिण भागांतील हवामान उत्तर हिंदुस्थानांतील हवेशी मिळते. म्हणून तिकडील मूळ अमेरिकन बेण्यापासून दक्षिणेंत झालेलें बेणे परदेशी बेण्यापेक्षां जास्त फलद्रुप होतें असाहि अनुभव आहे. अमेरिकेंत वसाहत झाल्यानंतर तिकडे यूरोपांतून निरनिराळ्या भाज्या गेल्यावर तेथील हवेंतील परिस्थितीप्रमाणें त्यांत फरक झाला. त्याचप्रमाणें हिंदुस्थानांतील हवेच्या परिस्थितीनुरूप त्यांत फरक झाला आहे.

वरील सर्व गोष्टी ध्यानांत घेतां हल्ली भाजीपाल्याची जी स्थिति आहे, तीपेक्षां भविष्यकालीं पुष्कळ निरनिराळे फेरफार दृष्टीस पडतील असें अनुमान करणें गैर होणार नाही. क्वचित थोड्या प्रकारांचा लोपहि होत आहे. भेंडी, वांगें, दोडका व वेलवांगे, बटाटा, कोबी, फुलवर, घेवडा, श्रावणघेवडा, भोपळा, काकड्या, मिरच्या, वाटाणे यांच्यांत गेल्या २५-३० वर्षांत किती फरक झाले आहेत. तसेंच गोराडु व पांढरीं रताळीं कांहीं ठिकाणी नामशेष होत चालली आहेत. यांचा सूक्ष्म विचार केला असतां असें अनुमान निघतें की दळणवळणाचे प्रकार (मार्ग) सुलभ होत आहेत, त्यामुळें चारीहि खंडांत होणार्‍या निरनिराळ्या जातींच्या भाज्यांत अधिक अधिक प्रकार निष्पन्न होतील हें साहजिकच आहे.

फळफळावळ- लहानापासून मोठ्यांनां फळ ही वस्तु फार प्रिय आहे. कोणालाहि भेट पाठवावयाची असल्यास फळफळावळीचा विचार अगोदर केला जातो. मोंगल बादशहांच्या वेळीं त्यांच्याकरितां फार दूर ठिकाणाहून आंबे जात असत. फळें जरी सर्वांनां प्रिय असली तरी ती ती सर्वांना घेणें परवडत नाहीं; युरोपियन लोकांमध्यें फळें खाण्याची वहिवाट बरीच आहे. त्यांच्या मागून पारशी, बोहरी, मुसुलमान भाटे वगैरे लोकांनीं त्यांचें अनुकरण केलें आहे. परंतु पांढरपेशे लोकांमध्यें फक्त उपासाचे दिवस खेरीज करून फळें खाण्याची वहिवाट बरीच कमी आहे. याचें मुख्य कारण त्यांनां ती घेणें परवडत नाही हें होय.

फळें दोन प्रकारचीं असतात. वाळलेली फळें म्हणजे बदाम, खारीक वगैरे; हीं महाराष्ट्रांत फारशीं होत नाहींत. व ओलीं ताजीं फळें. हीं न शिजवितांच खातात; ही लुसलुशींत, मऊ, रसाळ व मधुर असतात, व या गुणांमुळेंच ती सर्वांस प्रिय असतात. हीं पाचक व सारक असल्यामुळें खाद्य पदार्थांमध्यें यांनां महत्व बरेंच देतात. लोकांच्या वाढत्या अभिरुचीबरोबर फळांनां मागणी फार येत आहे व त्यांच्या बागाहि सर्व ठिकाणी जास्त प्रमाणावर लाविल्या जात आहेत. सर्वच फळझाडें सर्व ठिकाणीं होणें शक्य नाहीं. कारण प्रत्येक झाडाची विशिष्ट परिस्थिति ही त्याला मिळालीच पाहिजे. उदा. पपया, अननस, संत्रा, मोसंबे, डाळिंब, अंजीर वगैरे झाडांनां पाण्याचा अतिशय चांगला निचरा व कोरडी हवा पाहिजे. केळ, पेरू, द्राक्ष, यांनां जरा कमी निचर्‍याच्या जमिनी चालतात. सुपारी, पपनस, नारळ, केळ वगैरेंनां हवा फार दमट पाहिजे. स्ट्रॉबेरी, पीच वगैरे झाडांस समुद्रसपाटीपासून बरींच उंच जागा लागते. चिकू, संत्रा, मोसंबे, द्राक्षें वगैरे झाडांच्या बागा करण्यासाठीं फार मोठें भांडवल लागत नाहीं. डाळिंब, आंबा, संत्रा, नारळ वगैरे झाडांचे कीटक शत्रू फार आहेत. पण पपया, केळ, अननस, सुपारी यांनां कीटकांपासून फारशी भीति नसते. द्राक्षें, सुपारी, संत्रा, मोसंबे वगैरे झाडांचे वनस्पतीजन्य रोगां(अळिंब)पासून फार नुकसान होतें. अंजीर, रामफळ, सिताफळ, पेरू, द्राक्ष वगैरे फळें फार वेळ न टिकणारीं असल्यामुळें यांनां गिर्‍हाईक वेळेवर व जवळ मिळालें पाहिजे. अंबा, संत्रा, मोसंबे, चिकू वगैरेचीं रोपें विकत घेतेवेळी फार काळजी घ्यावी लागते. नाही तर तीं खोटीं व वाईट लागण्याचा फार संभव असतो. यावरून फळझाडांच्या लागवडीला बरेंच धोरण व त्यासंबंधीं सर्व प्रकारची माहिती मालकाला असणें अत्यंत जरूर असतें. कारण हीं बहुतेक झाडें फार वर्षे टिकणारी असल्यामुळें एकदां झालेली चूक पुढें सुधारतां येणें बहुधां शक्य नसतें. झाडांची खणणी- खुरपणी, छाटणी, खत देणें, रोगांवर उपाय वगैरे गोष्टी मालकाला स्वतःला माहीत असून त्यानें आपल्या गडीमाणसांनां शिकवून त्यांच्याकडून वेळेवर त्या करून घेतल्या पाहिजेत. हिंदुस्थानांत फळझाडांची लागवड वाढत असली तरी बाहेरून फळें आणावीं लागतातच. विशेषतः डाळिंबें, संत्रीं हीं इतर प्रांतांतून फार येतात. परंतु ही स्थिति जाऊन आपल्या इकडे भरपूर फळफळावळ तयार होऊन तीं सर्वांनां मिळालीं पाहिजेत, इतकेंच नव्हे तर टिकाऊ फळें बाहेरच्या देशांत पाठवून तेथील गिर्‍हाईक पटकावण्याची हिंदुस्थानची ताकद असूनहि योग्य ती शास्त्रीय माहिती, धाडस, भांडवल, उद्योग, व राजाश्रय यांच्या अभावीं सर्व गोष्टी कल्पनासृष्टीतच रहातात.

जो माल तयार होईल त्याला पुरेसें गिर्‍हाईक मिळत नसल्यास त्यापासून रस, तेल, अ‍ॅसिडें वगैरे जिन्नस तयार करून माल खपविण्याची खटपट झाली पाहिजे. आंब्याचा रस बाटल्यांत भरणें, आंब्याचें लोणचें करणें, पडीच्या आंब्यांची आंबोशी करणें, कागदी लिंबांपासून नायट्रिक आसिड करणें, पेरूपासून जेली करणें, वगैरे रीतीनें पक्का माल तयार करणें ही फळझाडांच्या लागवडींच्या धंद्यातील परिणत स्थिति होय.

इसवी सन १९१४-१५ साली मुख्य खाण्याच्या धान्याखालीं व इतर पिकांखालीं पुढें नमूद केल्याप्रमाणें क्षेत्राची वाटणी होती.

खाण्याचीं धान्यें

भात:- सात कोटी ऐशी लक्ष एकर.
गहूं:- दोन कोटी साठ लक्ष एकर.
जंव:- ऐशी लक्ष एकर.
ज्वारी:- दोन कोटि दहा लक्ष एकर.
बाजरी:- एक कोटि साठ लक्ष एकर.
नागली (नाचणी):- चाळीस लक्ष एकर.
मका:- साठ लक्ष एकर.
हरभरा:- एक कोटि पन्नास लक्ष.
इतर तृण व कडधान्यें:- तीन कोटी दहा लक्ष एकर.
एकूण खाण्याच्या धान्याखालीं एकंदर जमीन वीस कोटी पन्नास लक्ष एकर होती.
ऊस:- सवीस लक्ष एकूणसाठ हजार एकर.
गळिताची धान्यें – पन्नास लक्ष एकर.
ज्यूट:- तेहतीस लक्ष एकर.
इतर तंतूपिकें- नऊ लक्ष शहात्तर हजार एकर.
नीळ:- एक लक्ष शेचाळीस हजार एकर.
अफू:- एक लक्ष एकूणऐशी हजार एकर.
चहा:- पांच लक्ष चौर्‍यायशी हजार एकर.
काफी:- सत्यायशी हजार एकर.
तंबाखू:- दहा लक्ष छपन्न हजार एकर.
सिंकोना:- पांच हजार एकर.
गांजा:- दोन हजार एकर.
इतर औषधी व कैफी पिकें:- एक लक्ष तेहतीस हजार एकर.

चार्‍याची पिकें:— (ओट, गिनी गवत, लसूण, घास वगैरेसह). त्रेसष्ट लक्ष त्रेसष्ट हजार एकर.

फळफळावळ व भाजीपाला:- एकूणसाठ लक्ष, एकतीस हजार एकर.

सन १९१४-१५ सालीं ब्रिटिश हिंदुस्थानांत २६ कोटी १० लक्ष एकर जमीन लागवडीखालीं होती. तीपैकीं शेंकडा दहा गव्हाखालीं, शेकडा ३० तांदुळाखालीं आणि शेंकडा ३८ ती इतर खाण्याचीं धान्यें (डाळी साळी वगैरे) यांच्याखालीं क्षेत्र होतें. शेंकडा ६ क्षेत्र गळिताच्या धान्याखालीं असून शेंकडा ७ कापूस, ताग व इतर तंतूपिकाखालीं होतें. याखेरीज ऊंस, चहा आणि तंबाखू ह्या महत्वाच्या पिकाखालींहि बरेंच क्षेत्र होतें.

पाश्चात्य देशांतील दर एकरीं उत्पन्नाच्या आंकड्याचें निरीक्षण केल्यास येथील पिकांचें उत्पन्न वाढविण्यास अद्यापि पुष्कळ वाव आहे असें वाटतें.

इ.स. १९१६-१७ सालचें दर एकरी सरासरी उत्पन्न पुढील कोष्टकांत दिलें आहे:—

प्रांताचें नाव पिकाचें नांव दर एकरी सरासरी
उत्पन्न पौंड
एकंदर लागवडींत असलेल्या
क्षेत्रांशीं शेंकडा प्रमाण
    भात
 बंगाल   हिवाळा   १०३६    २६.३
 उन्हाळी ११७९
 पावसाळी  ८७१
 मद्रास एकंदर १३८५ १४.१
 बहार हिंवाळी १२३४    २०,५
 ओरिसा   पावसाळी  ८००
 उन्हाळी ८००
 ब्रह्मदेश      
 उत्तरभाग   १०३४  २.७
 दक्षिणभाग    १०८३  १०.६
 मुंबई  एकंदर  १२३०  २.३
 मध्यप्रांत व व-हाड  ,,  ६२४  ६.४
    गहू
पंजाब पाणभरते ९६४ ३७.६
कोरडवाहू ६०६
संयुक्तप्रांत पाणभरते १२५० २८.७
कोरडवाहू ८५०
मध्यप्रांत एकंदर ६०० १४.६
मुंबई पाणभरते १२५० ६.३
कोरडवाहू ५१०
ज्वारी
मुंबई पाणभरते १५५० ३२.७
कोरडवाहू ६७०
मद्रास कोरडवाहू ६९६ २४.३
मध्यप्रांत व व-हाड एकंदर ६६४ २९.६
बाजरी
मुंबई एकंदर ४०० ३२.९
मद्रास ,, ,, ६२४ २२.५
पंजाब पाणभरते ५६८ १७.०
कोरडवाहू ४१६
संयुक्तप्रांत एकंदर ५५० १६.६


इतर पिकांचे दर एकरी सरासरी उत्पन्न

पिकाचें नांव उत्पन्न पौंड
भात १०६२
गहूं ८३०
सातू १०४७
बाजरी ५०२
नाचणी १०५९
मका १०२५
तूर ८४०
हरभरा ७२०
 जवस ३५७
तीळ २८०
सरस व मोहरी ४६७
गूळ २७५४
कापूस १०२
ज्यूट (ताग) १२९२कीटकशास्त्र— या शास्त्रासंबंधीं थोडीबहुत माहिती प्रत्येक शेतकर्‍यास असणें जरूरीचें आहे. भातावर, ज्वारीवर व कपाशीवर पडणारे किडे, उंसांतील मर, बटाट्यावरील अळी, मावा, वाळवी वगैरे किड्यांपासून दरसाल लाखों रुपयांचें नुकसान होत आहे. यासाठीं या विषयाचें शेतकीदृष्ट्या फार महत्व आहे. कारण हें शास्त्र अगदीं आधुनिक असल्यामुळें त्यासंबंधीं माहितीचा प्रसार व्हावा तसा अद्यापि झालेला नाही. शेतकर्‍यांनां कीटक हे प्राणी कोणते, त्यांची रचना कशी असते, त्यांची वाढ कशी होते, रूपांतर आणि जडावस्था कशा होतात, तसेंच त्यांचें अन्न कोणतें, त्यांचा एकंदर आयुष्यक्रम कसा चाललेला असतो यांची माहिती झाली पाहिजे. म्हणजे हल्लीं एखाद्या पिकाला कीड पडली किंवा रोग झाला म्हणजे शेतकर्‍यांनां ही एक दैविक आपत्ति आपणावर ओढवली आहे, किंवा हे रोग देवानें आभाळांतून किंवा स्वर्गांतून पाठविलें आहेत ही समजूत त्यांच्या मनांतून नाहींशी होईल. पिकावरील किडे अनेक प्रकारचे असतात. फुलपांखरें, मधमाशा, कठिण पंखाचे किडे, ढेंकूण, मुंग्या, पिसा वगैरे प्राणी जे आपल्याला आढळतात, त्यांचे आकार खाणे, पिणें, वाढ वगैरे मोठ्या प्राण्यांहून अगदीं भिन्न असतात. कित्येक किड्यांनां आपलें भक्ष्य खाण्याकरितां दाभाडे असतात, कित्येक तें चावून खातात. कित्येकांस सोंड असते. मावा व पिकांवरील अनेक जातीचे किडे, माशा, डांस वगैरे आपलें भक्ष्य सोंडेनें शोषून घेतात.

कीटकांत एकंदर चार अवस्था असतात त्या अंडे, अळी, कोश पूर्ण कीटक. ज्यांत रूपांतर नसतें त्यांत कोशावस्था नसते. बहुतेक किडे अंडी घालतात. कित्येक वेळीं ती वेगवेगळालीं व कित्येकवेळीं त्यांचे चिकटलेले पुंजके असतात. कित्येकांचीं अंडी चार पांच ते वीस दिवसांत फुटतात, तर कित्येकांना अनेक महिने लागतात. अंडीं फुटून आळ्या व किडी बाहेर पडल्या म्हणजे भक्ष्याचा शोध करतात व तें मिळाल्याबरोबर अधाशाप्रमाणें खाऊं लागतात. किड्यांच्या आकारमानानें ते इतर प्राण्यांपेक्षां जास्त खातात. म्हणून पिकांवर कीड पडली म्हणजे ते त्यांचा फन्ना उडवितात. किडे मोठे झाले म्हणजे त्यांनां कोशावस्था प्राप्‍त होते. या स्थितींत प्राणी बहुतकरून कांहीं खात नाहींत व हालचाल करीत नाहींत. अशा स्थितींत कांहीं १०-१५ दिवस तर कांही महिनाभरहि रहातात. कोशेट्यांतून पतंग बाहेर पडणें यासच रूपांतर म्हणतात. म्हणजे आळीचा पतंग होतो. पण असें टोळांत होत नाहीं. अंड्यांतून बाहेर पडणारा प्राणी आळीसारखा असून लहान टोळच असतो. दिवस भरले म्हणजे तो कोशेटा फुटून त्यांतून पतंग, फुलपांखरू वगैरे बाहेर पडतें. ह्या स्थितींत ते प्राणी कांहीं खात नाहींत, व पिकांची खराबीहि करीत नाहींत. परंतु नर मादी यांचा संयोग होऊन अंडी घालतात व दोन्ही मरून जातात. दुसर्‍या पिढीस ह्या अंड्यांपासून सुरुवात होते. ह्या अंड्यांपासून निघालेल्या सुरवंटासारख्या किड्यांच्या अवस्थेमध्येंच पिकांची नुकसानी होते. पिकें निघाल्यानंतर किडे दुसरे पीक येईपर्यंत जडावस्थेंत पडून राहतात. त्यावेळीं त्यांस खाण्यास कांहीं लागत नाहीं. ही अवस्था चार पांच महिन्यांपासून एक वर्षपर्यंतसुद्धां असते. वर नमूद केल्याप्रमाणें कीटकांचा आयुष्यक्रम व निरनिराळी स्थित्यंतरें यांची माहिती झाली म्हणजे शेतकर्‍यांनां त्यांचें निर्मूलन करण्याकरितां कोणते उपाय व ते केव्हां योजावे हें त्यांच्या लक्षांत सहज येईल. उपाय तीन प्रकारांनीं करतां येतात; प्रतिबंधक, निवारक व मारक. या उपायांची सविस्तर माहिती सांसर्गिक व पोटांत गेली असतां मारक होणारीं विषें कोणतीं, ती कोणत्या प्रमाणांत व केव्हां वापरावीं, तीं शिंपडण्याची यंत्रें, फवारे वगैरे केव्हां व कशीं उपयुक्त आहेत वगैरेसंबंधीं सविस्तर माहिती या विषयावरील स्वतंत्र लेखांत दिलेली आहे. होतां होईतों उपद्रवी कीटकांसंबंधी उपायासह माहिती दर पिकाखालीं दिलेली आहे.  याखेरीज कोठारांतील व सांठविलेल्या धान्यांनां कीटकांपासून किती नुकसान होतें त्यांचा प्रसार कसा होतो, त्यांचा प्रतिकार करण्याकरिता कोणते उपाय योजावे, जनावरांस गोचिड, उवा, गोमाशा, वगैरेपासून कसा उपद्रव होतो हें सांगून त्यांवर उपाय सुचविलेले आहेत.

उपयुक्त किडे— रेशमाचे किडे, मधमाशा, लाख बनविणारे किडे वगैरेसंबंधी सविस्तर माहिती त्या त्या स्वतंत्र लेखांखालीं दिलेली आहे.

परोपजीवी वनस्पती व त्यांपासून पिकांस होणारे रोग— मनुष्यांस व जनावरांस जसे रोग होतात तसेच अनेक प्रकारचे रोग वनस्पतींसहि होतात. हे रोग पुष्कळ वेळां इतके अकस्मात होतात कीं ते झाल्यावर थोड्याच अवकाशांत सर्व देशभर पसरून भयंकर नुकसान होतें. पाश्चात्य देशांत परोपजीवी वनस्पतींच्या रोगासंबंधीं संशोधनास सुरुवात होऊन सुमारें ८० वर्षे झालीं; तथापि एवढ्या अवधींत मिळालेल्या ज्ञानानें तिकडे शेतकरी वर्गास पुष्कळ फायदा झाला आहे. जमीनींतील व हवेंतील दोष, किडे व परोपजीवी वनस्पती वगैरे वनस्पतींनां रोग होण्याचीं मुख्य कारणें होय.

परोपजीवी वनस्पतींचे दोन वर्ग करितां येतात. एक डोळ्यास स्पष्ट दिसणार्‍या उदा. बांडगूळ, टारफुला अथवा टवळी, अमरवेल किंवा निमोळ वगैरे. दुसर्‍या सूक्ष्म आकाराच्या वनस्पतीच्या वर्गांत दोन प्रकार आहेत. एक शिलींघ्र अगर अलिंब वर्ग; यांत कुत्र्याची छत्री, बुरा, बुरसी वगैरे रोग येतात. दुसर्‍या प्रकारात जंतुजन्य रोग येतात. जसें बटाट्याची बांगडी अगर चक्री.

गव्हावरील ताबेरा, ज्वारीवरील काजळ्या अगर काणी व द्राक्षावरील भुरी हे शिलींघ्र वर्गांत मोडतात. बटाट्यावरील चक्री किंवा बांगडी ही जंतुवर्गांत येते. प्रत्येक शिलींघ्रकापासून असंख्य रेणू उद्‍भवतात व ते हवेंतून व पाण्यांतून इकडून तिकडे वाहून जातात. जमीनीवरील व झाडांवरील रेणू वार्‍यानें, पशुपक्षी व विशेषतः कीटक यांच्या साहाय्यानें योग्य स्थानांस पोंचविले जातात. कांहीं रेणू रुजून ते आपले जाळें पोषक वनस्पतीवर पसरितात व कांहींचीं शोषणेंद्रियें पोषकाच्या त्वचेंतून आंत शिरतात व अन्न शोषून घेतात. अशा रोगांची पिकास बाधा झाली म्हणजे त्यांचीं पानें पिंवळी पडतात, कित्येकांवर ठिपके व डाग पडतात, कित्येक पिकांत फांद्यावर, गळवांसारखी वाढ होते; कित्येकांत वाढ खुंटणें, फळें न येणें किंवा गळूण पडणें असें होतें. कित्येकांत धान्याऐवजीं रोग, रेणूचे झुबके येणें वगैरे प्रकार होतात. अशा या शिलींघ्ररूपीं रोगांनीं पिकाचें दरवर्षी अतोनात नुकसान होतें. गव्हांवरील "ताबेर्‍या" पासून हिंदुस्थानात दरवर्षी कमीत कमी चार कोटी रुपयांचे नुकसान होत असावें असें अनुमान काढलेलें आहे. दुसरें ढोबळ उदाहरण म्हणजे काणी अगर काजळ्या रोगांचें होय. या रोगापासून दरसाल फक्त मुंबई इलाख्यांतच सुमारें २ कोटी रुपयांचें नुकसान होत असावें असा तज्ज्ञ माणसांचा अजमास आहे.

वरील हकीकतीवरून रोगाचें विशेषतः शिलींघ्रजन्य रोगाचें अस्तित्वच आधीं रोगानें सर्व काम करून टाकिल्याखेरीज उघडकीस येत नाहीं. याकरितां नजरेस आल्यावर रोगावर उपचार करणें जवळ जवळ अशक्य असल्यामुळें तो न होऊं देण्यास प्रतिबंधक उपायांची योजना करणें हें फार सोपें आहे. प्रतिबंधक उपाय येणेंप्रमाणें:—

जमीन काळजीपूर्वक तयार करणें; पाण्याच्या निचर्‍याची सोय करणें; फाजील पाणी न देणें; पिकांत फेरफार करणें, बीं तपासून लावणें, रोगांस न जुमानणारे व निवडक बीं पेरणें, निरोगी जात प्रयोग करून उत्पन्न करून तितेंच बीं पुढें उपयोगांत आणणें, शेत स्वच्छ ठेवणें व झाडांत दाटी न होऊं देणें; शिलींघ्रघातक द्रव्यांत बीं पेरण्यापूर्वी भिजवून नंतर पेरणें; रोग झाल्यावर किंवा पूर्वी शिलींघ्रघातक विषारी पदार्थांचे मिश्रण पिकांवर योग्य वेळीं शिंपडणें, जखमांस व वण्रांस रोगप्रतिबंधक औषधें लावणें वगैरे.

हल्ली परोपजीवी वनस्पतिजन्य रोगापासून गव्हांवरील तांबेरा, ज्वारीवरील काणी, द्राक्षावरील भुरी, ऊंस गाभ्यांत रंगणें, बाजरी, ज्वारीवरील केवड्या किंवा गोसावी, सुपारीवरील गळ किंवा कोळे रोग बटाट्यावरील चक्री किंवा बांगडी हे परोपजीवी वनस्पतिजन्य रोग मुख्य पिकावरील असून त्यांपासून दरवर्षी कोट्यवधि रुपयांचें नुकसान होत आहे. याकरितां वर नमूद केलेल्या रोगप्रतिबंधक उपायांनीं योग्य वेळीं तजवीज केल्यास शेतकर्‍यांस हल्लीपेक्षा बराच जास्त फायदा होईल यांत संशय नाहीं. रोगांसंबंधीं चिकित्सा व त्यावरील उपाय यासंबंधीं इत्थंभूत माहिती या विषयावरील स्वतंत्र लेखांत पहावी.

शेताचीं खतें:- जमीन निकस होऊ नये म्हणून शेतकी चांगली मशागत करणें, शेत पड टाकणें, पिकांत फेरबदल करणें पिकें मिसळून करणें. जमीनींत खत घालणें व बेवड करणें वगैरे अनेक योजना करण्यांत येतात. त्यांपैकीं खत घालून जमीनीची सुपीकता राखणें ही बाब फार महत्वाची आहे. सर्व शेत कसणारांस खतांचें महत्व अवगत आहे. हिंदुस्थानांत मुख्य खत म्हणजे शेणखत होय. गुरांच्या मुताची किंमत शेणखताइतकी किंबहुना जरा जास्तच असून देखील तें राखून ठेवण्याची वहिवाट नाहीं. ते बहुतेक वायां जातें.

शहरांत रस्त्यांवर, गल्लींत, व जिकडे जिकडे गुरें चरत असतांना किंवा फिरत असतांना शेण पडेल तेवढें गोंवंर्‍यासाठीं किंवा सारविण्यासाठीं गोळा करण्यांत येतें. शेतकर्‍यांच्या घरीं सुद्धा बर्‍याच शेणाच्या गोंवर्‍या लावून वाळवून त्यांचा सर्पणाकडे उपयोग करितात किंवा त्या शहरांत नेऊन विकतात. शेणखताचा असा अपव्यय होणें म्हणजे जमीनीचें मोठें नुकसान आहे. याचें मुख्य कारण लागवडी खालीं असलेल्या क्षेत्रांत सर्पणाचा तुटवडा होय. जें थोडें बहुत शेणखत राहील त्याचा उपयोग ऊंस, पानमळे, फळफळावळीच्या बागा व भाजीपाला यांसारख्या बागाईत पिकांकडे होतो. शेणखताखेरीज घरांतील केरकचरा राख, गांवठाणांतील माती, तळ्यांतील गाळ, निरनिराळ्या प्रकारच्या पेंडी, मांसळी, सोर्‍याची माती, सोरी वगैरे जिन्नसांचा खतांकरितां उपयोग करितात. गोव्याकडे खारी माती नारळींनां घालितात. मद्रास इलाख्यांत कांहीं ठिकाणीं जुन्या घरांतील वाघळांची शीट व डुकराची विष्ठा खतासाठी वापरितात. बर्‍याच ठिकाणी गुरें शेतांत बांधतात. मोठमोठ्या शहरांत म्युनिसिपालिटी सोनखत तयार करिते त्याचा बागाइताकडे फार चांगला उपयोग होतो.

ज्या ठिकाणीं ड्रेनेज चालू आहे त्या ठिकाणीं सांडपाण्यावर उत्तम पिकें येतात, असा अनुभव आहे.

हिंदुस्थानांत द्विदल धान्यें पुष्कळ आहेत. तीं बहुतेक इतर पिकांबरोबर पेरितात त्यांच्या मुळ्याचा व पाल्याचा जमीनीची सुपीकता राखण्याकडे पुष्कळ उपयोग होतो. ताग, कुळिथा, सारखीं पिकें करून तीं फुलवर्‍यांत आल्यावर किंवा पूर्वी जमीनींत गाडतात. बहार, ओरिसा व मद्रास इलाख्यांत जेथें निळीची बरीच लागवड करतात, तेथें नाळ काढून घेतल्यावर जो झाडांचा भाग रहातो त्याला सीट असें म्हणतात. तो जमीनींत गाडतात. त्याचा हिरवाळ खताकरिता चांगला उपयोग होतो. भातशेतींत मद्रासेकडे धाइनच्याचें (लाल देंठाची शेवरी) पीक करून तें शेतांत गाडून टाकतात. याशिवाय तिकडे करंज, मोंगली एरंड, निरगुडी, अडुळसा, रुई वगैरे झाडांचा पाला आणून तो लावणीपूर्वी भातजमीनींत टाकतात. तो कुजला म्हणजे त्याचे चांगलें खत होतें. मुंबई इलाख्यांत पुष्कळ पाऊस पडणार्‍या भागांत भाताचे रोपटे (तरवे) पेरण्यापूर्वी त्यांत निरनिराळ्या प्रकारच्या झाडांचे टाहाळ आणून ते जाळतात. त्याला राब भाजणें असें म्हणतात.

कृत्रिम खतांचा उपयोग मुख्यत्वेंकरून चहा, कॉफी, रबर वगैरे पिकें करणारे यूरोपियन मळेवाले आज बरीच वर्षे करीत आहेत. तथापि त्यांपैकीं सल्फेट ऑफ अमोनिया, नायट्रेड ऑफ सोडा, सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश, हाडांची पूड, पेंडी, मांसळी वगैरे खतांचा कमीजास्त प्रमाणांत बागाईत पिकांत उपयोग होऊं लागला आहे. हल्लीं साकची येथील टाटाच्या कारखान्यांत थोड्या प्रमाणांत सल्फेट ऑफ अमोनिया तयार होऊं लागला आहे. चांगली मशागत व भरपूर खत दिलें असतां वर्षोवर्ष गव्हाचें उत्पन्न कसें येतें हें खालीं दिलेल्या रादमस्टेड येथील प्रयोगाच्या आंकड्यावरून लक्षांत येईल.

 

 

सन वार्षिक सरासरी दर
एकरी उत्पन्न (बुशल)
 वार्षिक सरकारी बुशलांचें
वजन पौंड
   बिन खतवलेलीजमीन  दरवर्षी दर एकरी १४
टन शेणखत घातलेली ज.

खत न घातलेली जमीन

 दरवर्षी दर एकरी १४
टन शेणखत घातलेली ज.
१८५२-६२  १५.३  ३४.५   ५५.९ ५९.० 
१८६३-७२  १३.३  ३६.०   ५९.३ ६१.० 
१८७३  ११.८  २६.८ ५७.०  ५७.१ 
१८७४ ११.५ ३९.२५ .... ६०.२५


कड्यावरून पहातां असें दिसून येतें कीं चांगली मशागत केली असतां दर एकरी सरासरी १२.९७ बुशल अगर ७४४.२९ पौंड उत्पन्न आलें; व खतविलेल्या जमीनींतील उत्पन्न ३४.१४ बुशेल अथवा २०३० पौंड आलेलें आहे. या आंकड्यांवरून खताची जरूरी किती आहे व तें भरपूर मिळाल्यास उत्पन्न किती वाढेल हें विचार करण्यासारखें आहे.

शेतीचीं आऊतें— मशागतीचे दोन भाग करतां येतात. एक बी पेरण्यापूर्वीचा व दुसरा नंतरचा. जमीन नांगरणें, कुळवणे, ढेकळें फोडणें वगैरे कामें पहिल्या प्रकारांत येतात. दुसर्‍या प्रकारांत खुरपणी, कोळपणी वगैरे कामें मोडतात. चांगल्या मशागतींत खालील मुद्दे साध्य झाले पाहिजेत.

(१) जमीन मऊ, बारीक व भुसभुशीत करणें; असें केल्यानें झाडांच्या मुळ्या पसरण्यास व त्यांनां पोषक द्रव्यें घेण्यास सोपें जातें.

(२) जमीनींत ओलावा घेऊन तो राखून ठेवण्याची शक्ति वाढविणें.

(३) जमीनींत हवा खेळवून तींतील पोषक दर्व्यें झाडांस घेतां येतील अशा स्थितींत आणणें.

(४) तणांचा, किड्यांचा, त्यांच्या अंड्यांचा व वनस्पतिजन्य रोगांचा नायनाट करणें.

वरील चारी मुद्दे देशी आऊतांनीं साध्य करून घेतां येतात. नांगर, कुळव, मैद, पेटारी, पाभर, कोळपें हीं शेतीचीं पूर्वापार मुख्य आउतें आहेत. नांगर लहानमोठे असून ते २ ते १६ बैलांनीं ओढतात. भातशेतीत टोणग्यांचा उपयोग करतात.

हिंदुस्थानांतील शेतीचीं आउतें लांकडाचीं, फारच थोडीं, साधीं, थोड्या खर्चांत होणारी व खेड्यांतील कारागिरांकडून होण्यासारखीं आहेत. सर्व आउतांत नागरांस अग्रस्थान दिलें पाहिजे.

नांगराचे प्रकार:- पूर्वी कुदळ, नंतर हातनांगर, नांगर, त्यानंतर बैलाच्या आकारमानानें व शक्तीच्या प्रमाणानें व जमीनीच्या मगदुराप्रमाणें देशपरत्वें (बंगाल, आसाम, गुजराथ, कोंकण, तेलंगण, देश, कर्नाटक, वर्‍हाड वगैरे) नांगरांत फरक होऊन निरनिराळ्या आकारांचे नांगर प्रचारांत आले आहेत. हे निरनिराळे फरक नांगराचें भाग लहानमोठे करण्यांत झालेले नसून त्याच्या आंकड्यांत, हलसींत, रुमण्यांत, फाळांत फाळकांवींत व सुताराच्या भरणींत थोडाबहुत फरक झालेला आहे. कोंकणांत नांगर ओढण्यास दोन बैल लागतात. पण देशावर सोलापूर धारवाडाकडे १२ ते १६ बैल लागतात. मोठ्या नांगराचा उपयोग जमीन खोल नांगरून, कुंदा, हरळी, लव्हाळा, काशा वगैरे तणांचा नायनाट करण्याच्या कामीं मुख्यत्वेंकरून करतात. उथळ नांगरट करण्यास नांगरांचा उपयोग करतात. त्याचप्रमाणें कांहीं भागांत (तापी कांठीं, पंचमहालांत, मध्यप्रांतांतील गव्हाळी भागांत) नांगरीला नळी व चाडें बांधून तिचा बीं पेरणीकडे उपयोग करतात.


कुळव:— कुळवाचा उपयोग नांगरट झाल्यावर किंवा जेथें जेथें नांगरट करणें परवडत नाहीं तेथें तेथें कुळवाच्या अगर वखराच्या पाळ्या घालून जमीन तयार करतात. बहुतेक हिंदुस्थानांतील शेतीची मशागत याच आउतांवर चालते. कुळवानें जमीन बारीक भुसभुशीत होते. बारीक तणें उपटून पडतात. शिवाय कुळवाचा उपयोग बीं पेरल्यानंतर रासण्या घेण्याच्या कामींहि करतात. कुळवांतहि देशपरत्वें अनेक प्रकार आढळतात.

पाभर:— जमीन तयार झाल्यानंतर पुढें बीं पेरणीचें काम पाभरीनें करतात. पाभरींत एक फणी (नारी)पासून तों दोन फणी, तीन फणी, चार फणी, पांच फणी, सहा फणी असे प्रकार आढळतात. सहाफणी पाभरीचा कर्नाटकांत भातपेरणीस उपयोग करतात. बाकीच्या पाभरींचा खरीप व रब्बी पिकें पेरण्यास उपयोग करीत असून रब्बी पाभरी वजनांत थोड्या जास्त असतात. त्यांनां मोघड असें म्हणतात. पाभरीच्या पेरणींत बीं कमी लागत असून तें समान अंतरावर ओळींत पेरलें जातें. एखादी ओळ वेगळ्या धान्याची पेरावयाची असल्यास मोगणीचा उपयोग केला जातो.

कोळपा:— हें आऊत लहान प्रमाणावर कुळव म्हटला तरी चालेल. यांत दोन प्रकार आढळतात. एकांत पासेचे दोन तुकडे असून मध्यें एक फट असते. तींतून कोळपतांना पिकाची ओळ जाते. दुसर्‍या कोळण्यांत कुळवाप्रमाणें सबंध पास असते. कोळप्याचा मुख्य उपयोग म्हणजे पिकाच्या ओळींतील तणझाडें काढून जमीन भुसभुशीत करणें व पिकास थोडीबहुत भर देणें होय. एका जुवावर बहुतकरून दोन कोळपीं व कांहीं ठिकाणीं चारहि चालवितात. कोळप्यागणीक वेगळा इसम लागतो.

मैद:— या आउताचें मुख्य काम म्हणजे ढेंकळें फोडून जमीन सपाट करणें होय. देशावरील हें आऊत म्हणजे तुळवंटच असतें. त्याला बैल जुंपून जमीनीवर ओढतात. कोंकण, गुजराथ, कर्नाटक व इतर भात पिकणार्‍या भागात जमीन व चिखल सपाट करण्याचें काम खुट्टेफळीनें करतात. या आउतांत एका चौकोनी फळीला बारीक बारीक खुंटे बसविलेले असतात. त्याला खुट्टे (गुटे) फळी असें म्हणतात.

पेटारीः- कोंकणांत ज्या ठिकाणीं दर वर्षी भात खांचराची बांधबंदस्ती करावी लागते तेथें माती इकडून तिकडे वाहून नेण्याकरितां व खांचखळगे बुजविण्याकरितां पेटारीचा उपयोग करतात. देशावरहि पेटारीचा ताली घालण्याकडे उपयोग करतात. पीक तयार झाल्यावर मळणीचें काम बहुतकरून नुसतीं पिकें झोडून, कांठ्यांनीं ठोकून किंवा बैलांच्या पायांखालीं मळून वार्‍यानें उपणून धान्य तयार करितात. तथापि गुजराथेंत ओलपाड तालुक्यांत गव्हाची मळणी एका चौकटींत दांते असलेलीं चाकें बसवून त्या आउताच्या साह्यानें करितात. कर्नाटकांत, विशेषतः धारवाड जिल्ह्यांत व बल्लारींत जोंधळ्याच्या कणसाची मळणी लहानशा दगडी रुळानें करितात. त्याप्रमाणेंच खपला गहूं चुन्याच्या घाणींत मळल्यास थोड्या खर्चांत धान्य तयार होतें.

धान्य तयार झाल्यावर तें गाड्यांत भरून विक्रीकरितां बाजारांत पाठवितात. गाड्यांतहि प्रांतोंप्रांतीं फरक दिसून येतो. खानदेश, वर्‍हाड व कर्नाटक येथें फार मोठी भरींव चाकांची गाडी असते. तिचा उपयोग धान्य घरीं आणण्यास करितात. व ती ओढण्यास ८ बैल लागतात. मध्यप्रांतांत अनेक तर्‍हेच्या गाड्या आढळतात. उत्तर हिंदुस्थान व गुजराथ या भागांतील गाड्या फार ओजडबोजड अशा असतात.

वरील मोठमोठ्या आउतांखेरीज माती खणण्याच्या कामीं पहार, वडर, खोरें, कुदळ, टिकाव, पेंडस वगैरे आउतांचा उपयोग करितात. माती ओढण्यास व वाफे करण्यास खोर्‍याचा उपयोग होतो. गोठ्यांत शेणखत ओढण्यास व खळ्यांत मदन (मळलेलें धान्य) हलविण्यास दाताळ्याचा उपयोग करितात. खुरप्यानें तण काढितात व विळ्यानें पिकें कापितात. खळ्यांत धान्य उपणून पाखडून तयार करण्यास तिवई, सुपें, चाळणी भोकरीं हीं लागतात. धान्याचा भरडा व पीठ दळण्यास लांकडांचीं मोठीं जातीं व लहान जातीं असतात. वरील हकीकत देशी आउतांची झाली. यांच्याशिवाय सुधारलेल्या लोखंडी सीटी, अर्लीग्टन, किर्लोस्कर, मेस्टन् मन्सून वगैरे नांगरांचा प्रसार मुंबई, मद्रास, मध्यप्रांत व वर्‍हाड या प्रांतांत होऊं लागला आहे. याखेरीज कडबा कापण्याचें यंत्र, धान्य उपणण्याचें यंत्र, माती ओढण्याचीं लोखंडीं पेटारीं, मक्याच्या कणसांतील दाणे काढण्याचें यंत्र, हातानें चालविण्याचें खुरपण्याचें यंत्र, पिकें कापण्याचें यंत्र, धान्य उपणण्याचे यंत्र वगैरे आउतांनीं शेतीच्या सुधारणेंत बरीच भर पडलेली आहे.

पूर्वी उंसाचा रस काढण्याकरितां दगडी किंवा लांकडी घाणे असत व अद्यापिहि काहीं ठिकाणीं ते चालू आहेत. तथापि लोखंडी घाण्यांचा बराच प्रसार झालेला आहे. अलीकडे ऑइल एन्जिननें चालणारे उंसाचे मोठे चरक व पाणी काढण्याकरिता ऑइल एन्जिनें व पंप प्रचारात येऊं लागले आहेत. अगदीं अलीकडे शेतकी खात्यानें दोन चार ठिकाणीं जमीन नांगरण्यासाठीं वाफेनें व मोटारशक्तीनें चालणारे नांगर हिंदुस्थानांत आणिले आहेत. त्यांचीं कामें बरीं चाललीं आहेत. हल्ली वॉटर फाइन्डर (पाणी दाखविणारे यंत्र) शेतकी खात्यानें आणिलें आहे. त्या यंत्रानें पाण्याचा झरा जमिनीखालीं आहे किंवा नाहीं हें पूर्वी पाहून नंतर विहिरी खोल करण्याच्या यंत्रानें त्या खणल्या जातात. अशा अनेक तर्‍हेनें शेतींत प्रगति चालू आहे.

पाण्याचा पुरवठाः- ज्या ठिकाणीं पाऊस सरासरी १०-१२ इंचांपेक्षा कमी पडतो तेथें पिकें करणें अति धोक्याचें आहे. अशीं ठिकाणें म्हणजे सिंध प्रांत, पंजाब आणि राजपुताना यांतील बहुतेक भाग होत. अशा भागांत व वायव्येकडील ओसाड मैदानांत नुसत्या गुरांनां बकर्‍या-मेंढ्यांनां व उंटांनां खाण्यालायख थोडासा चारा व झुडपें यांशिवाय कांहीं होत नाहीं. हल्लीं अशा भागांत व उत्तर हिंदुस्थानांत व मद्रास इलाख्यांतील गोदावरी व कृष्णा या अंतर्वेदी भागांत मोठमोठीं धरणें बांधून कालवे काढिले आहेत. दक्षिणेंत नीरा, गोदावरी, प्रवरा वगैरे नद्यांनां धरणें बांधून मोठमोठे कालवे काढिले आहेत. अशीं ठिकाणें व ज्या ठिकाणीं विहिरींत भरपूर पाणी असतें असे भाग व ज्या ठिकाणीं पाऊस मुबलक पडतो असे प्रदेश खेरीजकरून जवळ जवळ सुमारें दहा लक्ष एकर चौरस मैल क्षेत्रावर पावसाच्या कमतरतेमुळें दुष्काळ पडतो असें आढळतें. अशा ठिकाणीं पडतो तेव्हां एकदम पुष्कळ पाऊस पडतो व नाहीं तेव्हां पुरेसा पडत नाहीं. असा भाग म्हणजे मुख्यत्वेंकरून दक्षिणेंतील सुमारें ३० इंच अगर त्यांहून कमी पाऊस पडणारा भाग होय. याशिवाय मध्यप्रांत माळवा व गुजराथ येथें कधीं कधीं दुष्काळ पडतो. सम १९१४-१५ सालीं प्रांतवार पाणभरत्या क्षेत्राचें एकंदर लागवडीखालीं असलेल्या क्षेत्राशीं प्रमाण खालीं दिलें आहेः-

प्रांत शेंकडा प्रमाण
दिल्ली १६
मुंबई
संयुक्तप्रांत ३१
बंगाल
बहार व ओरिसा १८
पंजाब ४३
मध्यप्रांत व वर्‍हाड
मद्रास २८
वायव्य सरहद्दीवरील प्रांत ३४
मणिपूर
अजमीर, मेरवाडा ३२
आसाम
सिंध ८२
कूर्ग
ब्रह्मदेश


एकंदर पाणभरत्या पिकांपैकीं शेंकडा ८४ क्षेत्र खाण्याच्या धान्यासाठीं असून बाकी शेंकडा सोळा इतर धान्याखालीं होतें. खाण्याच्या धान्यांपैकीं १,०१,१९,३०० गव्हाखालीं, २,८८,६३,००० इतर तृणधान्य व कडदण या धान्याखालीं व ३७,२९,००० एकर इतर खाण्याच्या धान्याखालीं होतें.

सर्वांत पाणभरत्या क्षेत्राचें प्रमाण सिंध प्रांतांत जास्त असून अगदीं कमी मुंबई, मध्यप्रांतांत, वर्‍हाड, मणिपूर व कूर्गप्रांत यांत असतें.

पंजाबांत जेथें अगदीं उध्वस्त रान होतें, तेथें चिनाब व झेलम नद्यांचे मोठमोठाले कालवे निघाल्यापासून नवीन वसाहती झाल्या आहेत. हिंदुस्थानांत कालव्याच्या पाण्याखेरीज तळीं व विहिरीं यांवर बरेंच क्षेत्र भिजविलें जातें. तळ्यांची संख्या निझामच्या राज्यांत, मद्रास इलाख्यांत व म्हैसूर संस्थानांत जास्त प्रमाणांत आहे. मुंबई इलाख्यांत, गुजराथेंत व कर्नाटकांत बरींच तळीं असून मध्यप्रांतांत तीं जास्त प्रमाणांत आढळतात. तळ्यांचें पाणी बहुतकरून पाटानें नेण्यांत येतें. जेथें पाटांत पाणी सोडण्यापूर्वी थोडेसें उचलावें लागतें तेथें ओक्ती, हरणी, डोणी, चंपारा झील, टोपली, सारस वगैरेसारख्या साधनांचा उपयोग करितात. सरासरीनें तळ्याच्या पाण्यानें ८० एकर क्षेत्र भिजविलें जातें असा अंदाज आहे.

उत्तर हिंदुस्थानांतील मळईच्या पट्ट्यांत पुष्कळ विहिरी आहेत व त्याचप्रमाणें कालवेहि आहेत; पण दक्षिणहिंदुस्थानांत बरेंचसें बागाईत विहिरीवरच आहे. हल्लीं विहिरी खोदण्याकरतां सरकार तगाई सढळ हातानें देत असल्याकारणानें व विहिरी खणण्यासाठीं व खोल करण्यासाठीं नवीन यंत्रें निघाल्यामुळें त्यांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे. विहिरींतील पाणी काढण्याचें मुख्य साधन म्हणजे मोट होय. मोटा कातड्याच्या व लोखंडी असतात. कोंकणपट्टींत बहुतकरून रहाट असतात. हल्लीं पाण्याच्या संचयाप्रमाणें हातानें चालविण्याचे, बैलानें ओढण्याचे, ऑइल एनजिन् व वाफेनें चालणारे पंप जागोंजागी प्रचारांत येऊं लागले आहेत. विहिरीच्या खोलीप्रमाणें एका मोटेवर अडीच ते ५ एकरांपर्यंत बागाईत करितात.

सन १९१४-१५ सालीं कालवे, विहिरी, तळीं वगैरेंच्या साहाय्यानें भिजविलेल्या क्षेत्राचा तपशील खालीं दिला आहे.

सन १९१४-१५ सालीं कालवे, तळीं, विहिरीखालीं भिजविलेल्या
जमिनीचा (एकरांचा) तपशील (आंकडे हजारांचे आहेत)

देशाचें नांव लागवडीचें एकंदर क्षेत्र कालवे तळ्यांवर विहिरींवर इतर रीतीनें एकंदर भिजविलेलें क्षेत्र
सरकारी खाजगी
ब्रिटिशहिंदुस्थान. २६०६४१ १८८८५ २४९६ ६९४३ १२५५६ ६३०९ ४७१९४
मध्यप्रांत २०२२० १८ ५८१ ८४ ३१ ७२१
वर्‍हाड. ७०४७ ... ... १/२ ३२ ३३
मुंबई इलाखा. २६४६३  १७८ १९ १३५ ५१६ ९९ ९४८
सिंध ४९२४ ३१९४ ९० ... २३ ३७९ ३६८७


कृषिशास्त्र व त्याचा शेतीकडे उपयोग- शेतकी व कृषियंत्र अगर शास्त्र यांचा परस्परांशीं फार निकट संबंध आहे. परंतु या गोष्टीची जाणीव कृषियंत्रशास्त्र हें शास्त्र या दृष्टीनें शेतकर्‍यांनां शिक्षणाच्या अभावीं माहीत नसल्यामुळें व शिकलेल्या लोकांनीं शेतकीकडे प्रायः दुर्लक्ष केल्यामुळें महाराष्ट्रांतील लोकांनां थोड्या वर्षांपूर्वी नव्हती. कृषिस्थापत्यशास्त्रांतील तत्वें आजपर्यंत शेतकीच्या कामाकडे मुळींच उपयोगांत आणलीं गेलीं नाहींत असा मात्र याचा अर्थ नाहीं. हीं तत्वें निरनिराळ्या वेळीं व निरनिराळ्या कामीं आजपर्यंत उपयोगांत आणलीं गेलीं आहेत. उदाहरणार्थ, जमीन खणण्यास कुदळीचा किंवा टिकावाचा उपयोग करणें, जमिनीच्या मशागतीस नांगर, कुळव, कोळपें वगैरे आउतें वापरणें, शेतांतील माती वाहून जाऊं नये म्हणून ताली घालणें, बागाइती पिकें करण्याकरितां नद्यांनां व ओढ्यांनां कच्चे अगर पक्के बंधारे घालून पाटानें त्यांचें पाणी शेतावर आणणें, उपळ्याच्या जमिनींत चर खोदून पाण्याचा निचरा करणें, विहिरीचें पाणी काढण्यास रहाट अगर चाक वापरणें वगैरे गोष्टींवरून कृषिस्थापत्यशास्त्रांतील तत्वांचा शेतकीकडे उपयोग केलेला आढळतो. परंतु कुदळीला विवक्षित आकार कां दिला, तो आकार बदलल्यानें जास्त सुलभता येईल किंवा नाहीं, तसेंच नांगर, कुळव व कोळपें वगैरे आउतें विवक्षित आकाराचींच कां केलीं व त्यांतहि सुधारणा होणें शक्य आहे किंवा नाहीं, याचा विचार थोड्या वर्षांपूर्वी कोणीच केला नाहीं म्हटलें तरी चालेल.  याचा परिणाम असा झाला कीं या आउतांनां एकदां शेकडों वर्षांपूर्वी जो आकार मिळाला तो अद्याप बदलला नाहीं. कृषिस्थापत्यशास्त्र याची शास्त्र या दृष्टीनें लोकांनां ओळख असती व त्या शास्त्राचा शेतकीकडे असलेला महत्त्वाचा निकट संबंध त्यांनां माहीत असता तर अशी स्थिति कधींहि झाली नसती. शेतांतील माती वाहून जाऊं नये म्हणून पुष्कळ शेतकरी आपल्या शेतांनां ताली घालतात. परंतु ताल कोठें घालावी, कशी घालावी, तिची लांबी, रुंदी व उंची किती असावी, तालींत सांड ठेवावयाची ती कोठें ठेवावी व तिचा आकार केवढा असावा याबद्दलची शास्त्रीय माहिती असलेला शेतकरी अगर ही शास्त्रीय माहिती असून तिचा शेतकीकडे उपयोग केलेला शिकलेला मनुष्य बहुतकरून दुर्मिळ म्हटलें तरी चालेल. जी गोष्ट आउतें व ताली यांसंबंधांची तीच पाट व बंधारे यांची होय. कृषिस्थापत्यशास्त्रज्ञांनी पाटबंधार्‍यांचीं जीं मोठमोठीं कामें केलीं आहेत ती वगळलीं असतां निवळ शेतकरी लोकांनीं केलेलीं व त्यांच्याच देखरेखीखालीं चालू असलेलीं लहान लहान पाट बंधार्‍यांचीं कामें महाराष्ट्रांत पुष्कळ ठिकाणीं दृष्टीस पडतात. परंतु या कामींहि उन्हाळ्यांत घातलेला बंधारा पावसाळ्यात वाहून गेलेला पाहाण्याचा जो कधीं कधीं प्रसंग येतो त्याच्या मुळाशींहि शेतकरी लोकांचें शास्त्रीय गोष्टींचें अज्ञान व शिकलेल्या लोकांची शेतकीबद्दल अनास्था हेंच होय. बंधार्‍यापासून पाट नेलेले असतात तेहि पुष्कळ वेळां जरूरीपेक्षां जास्त उतरणीच्या जाग्यांवरून नेलेले आढळतात. तसेंच पाणथळ जमिनींतील पाण्याचा निचरा करण्याकरितां खोदावयाचे चर एकमेकांपासून किती अंतरावर खोदावें, त्यांची खोली किती असावी, रुंदी किती असावी वगैरे माहिती न मिळाल्यामुळें पुष्कळ चुका होतात. केलेलें काम बरोबर झालें नाहीं असें आढळल्यावर शेतकरी चुका दुरुस्त करण्याचा यत्‍न करतात. अशा रीतीनें एक दोन वेळ चुका दुरुस्त केल्यानंतर हीं कामें योग्य तर्‍हेचीं होतात. परंतु अशा तर्‍हेनें चुका दुरुस्त करण्यांत गेलेला वेळ व पैशाचें नुकसान शेतकर्‍यांस सोसावें लागतें. कित्येक प्रसंगीं तर अशा नुकसानीनें शेतकरी कायमचा बुडतो. या सर्व कारणांकरतां व हल्ली असलेल्या ज्ञानांत भर पडून या बाबतींत योग्य व शक्य त्या सुधारणा जितक्या लवकर करतां येतील तितक्या अगत्याच्या आहेत. म्हणून शेतकीकडे स्थापत्यशास्त्राचा उपयोग व त्यांचा परस्परांचा संबंध याबद्दल शेतकरी व शिकलेले लोक यांच्यामध्यें शक्य तितक्या लवकर जाणीव उत्पन्न होणें जरुरीचें आहे. या कामांत पाश्चात्य राष्ट्रें व अमेरिकाखंडांतील देशांनीं पुष्कळ प्रगति केलेली आहे. उदाहरणार्थ, आपल्या लांकडी व त्रिकोणाकृती तास पाडणार्‍या नांगरांऐवजीं त्यांनी लोखंडीं, चतुष्कोणी तास पाडणारे व अल्प काळांत आणि अल्प श्रमांत जास्त काम करणारे नांगर बनविले आहेत. एवढेंच नसून नांगर बैलांच्या साह्यानें न चालवितां त्या कामीं ते वाफेचा अगर ज्वालाग्राही तेलांचाहि उपयोग करूं लागले आहेत. अलीकडे थोड्या वर्षांत वर सांगितलेल्या प्रकारचे बैलांच्या साह्यानें चालणारे नांगर हिंदुस्थानांतील सर्व भागांत हजारों आले असून त्यांचा नित्यशः उपयोग होत आहे व अल्पावधींतच हे नांगर लांकडी नांगरांना पदभ्रष्ट करून त्यांची जागा पटकावतील. हल्लीं सर्वच नांगर परदेशांतून येत नाहींत. कांहीं येथेंच तयार होतात. हे तयार करण्याचे कारखाने सातारा जिल्ह्यांत पाडळी व किर्लोस्करवाडी येथें आहेत. वाफेचे नांगरहि हिंदुस्थानांत लोक वापरुं लागले आहेत.  परंतु त्यांचा उपयोग सार्वत्रिक झालेला नाहीं. मुंबई इलाख्यांत असले कांही नांगर सरकारनें आणले असून पंजाबांतहि या तर्‍हेचे कांहीं नांगर आहेत. नांगरांप्रमाणेंच इतर सुधारलेलीं आउतें आहेत. म्हणजे तव्याचा कुळव व इतर तर्‍हेचे कुळव, कोळपी, सोंगणी करण्याचीं यंत्रें, मळण्याचीं व उपणण्याचीं यंत्रें वगैरे आहेत. या सर्व यंत्रांच्या साह्यानें मजूर लोकांवर विशेष अवलंबून रहावें लागत नाहीं, व कामहि तडाख्यांत होऊन जातें. परंतु लोक नांगराप्रमाणें या यंत्राचा अजून विशेष उपयोग करीत नाहींत. नांगराच्या उपयुक्ततेबद्दल लोकांची जशी खात्री झाली आहे तशी या आउतांच्या बाबतींत खात्री झाली म्हणजे त्यांचाहि प्रसार शेतकरी लोकांत वाढेल. या आउतां प्रमाणेंच विहिरीचें पाणी खेंचण्याकडे मोटांच्यापेक्षां वाफेच्या शक्तीनें अगर ज्वालाग्राही तेलाच्या साह्यानें चालणारे पंप निःसंशय जास्त उपयोगी व कमी खर्चाचे असून त्यांचाहि उपयोग अहर्निश वाढत्या प्रमाणांत करण्यांत येत आहे. विहीर कोठें खोदली असतां पाणी लागेल हें पहाण्याकरितां 'वॉटर फाइंडर'चा उपयोग प्रचारांत येऊं लागला आहे. प्रत्यक्ष विहीर खोदण्याचें काम मस्टो साहेबाच्या यंत्रानें यशस्वीरीतीनें व अल्पायासानें होत आहे. अशा रीतीनें वर नमूद केलेल्या बाबतींत शेतकर्‍यांस शास्त्रीय मदत मिळू लागली असून त्यांनांहि या ज्ञानाचें व मदतीचें महत्व व उपयुक्तता समजूं लागली आहे. उपळ्याच्या जमिनींनां पाण्याचा निचरा करण्याच्या योजना पंजाबांत लागू करण्यांत आल्या असून त्यांपासून निरुपयोगी झालेल्या अगर ज्या थोड्या फार दिवसांत निरुपयोगी झाल्या असत्या अशा पुष्कळ जमिनी पुन्हा लागवडीस आल्या असून रयतेचा हिमज्वर (हीवताप)सारख्या रोगापासून बचाव झाला आहे. पूर्वी सरकारचें शेतीला पाणी पुरवणारें खातें मागचा पुढचा विचार न करतां वाटेल त्या जमिनीला पाणी देत असे व त्यामुळें पाणी देण्यास अयोग्य असलेल्या जमिनी लवकरच निरुपयोगी होत, व त्यामुळें खेड्यांतील आरोग्यासहि धोका येत असे. अशा तर्‍हेनें निरुपयोगी झालेल्या जमिनी निरा व गोदावरी कनॉलवर पहावयास मिळतात. परंतु या नुकसानीचा धडा मिळाल्यामुळें यापुढें होणार्‍या मोठमोठ्या पाटावरील कोणत्या जमिनींनां पाणी द्यावें व कोणत्यांना देऊं नये हे आगाऊ ठरविण्यांत येऊं लागलें आहे. ही योजना अमलांत आलीं म्हणजे उपळ्याच्या व लोण्याच्या जमिनी कमी होऊन शेतकर्‍यांचें आरोग्यहि वाढेल.

गुरें, मेंढ्या, शेळ्या व घोडेः- सरकारी आंकडे प्रसिद्ध झाल्याप्रमाणें इ. स. १९१४-१५ सालीं ब्रिटिश हिंदुस्थानांत अंदाजें १४,७३,३६,००० गुरें होतीं. पैकीं बैलांची संख्या ४,८६,६४,७१० असून गाईंची संख्या ३,७४,८१,२७३ होती, रेडे ५५,६०,३५२ व म्हशी १३४६४७२३ असून वांसरें व रेडकें यांची संख्या ४,२१,८४,७९० होती. यांचें प्रांतवार शेंकडा प्रमाण पुढें दिल्याप्रमाणें आहे. संयुक्तप्रांत २२, बंगाल १७, मद्रास १५, बहार व ओरिसा १४, पंजाब ११, मध्यप्रांत व वर्‍हाड ८, मुंबई व सिंध ७, बाकीचें ब्रिटिश हिंदुस्थान ६. पिकाच्या क्षेत्राच्या दर शंभर एकरांमागें हें प्रमाण ६५ पडतें व लोकसंख्येच्या १०० मागें ६१ पडतें. इतर सुधारलेल्या देशांत दर शेंकडा लोकसंख्येला बैलाचें प्रमाण पुढें देंतों.

देश प्रमाण
जपान २.८
इंग्लंड व रशिया २५.०
अमेरिका ७७.०
कोरिया ४.०
जर्मनी व ऑस्ट्रिया ३३.०
कान १४०.०
चीन ७.०
फ्रान्स ३८.०

   
            
ही तुलना थोडी भ्रामक आहे. कां कीं, बैल हा नांगराचा प्राणी इतरत्र हिंदुस्थानाइतका नाहीं. यू. एस. अमेरिकेच्या दक्षिणेकडील कांहीं संस्थानांत मात्र बैल आहेत. असें असूनहि कानडांत व अमेरिकेंत बैलांचें प्रमाण हिंदुस्थानापेक्षां अधिक आहे.

सन १९१४-१५ सालीं मेंढरें, बकरी, घोडीं, खेचरें वगैरेंची संख्या हिंदुस्थानांत खालीं नमूद केल्याप्रमाणें होती (यांत बंगाल प्रांताचे आंकडे नाहींत.) मेंढरें २,३०,१५,८३६, बकरी ३,३३,३८,४८७. घोडे व तट्टें १६,५३,३७९. खेचरें ७१,२०७ गाढवें, १५,१२,२०५, उंट ४,९७,२०१.

हिंदुस्थानांत इतर देशांपेक्षां गुरांचें महत्व अधिक आहे. या देशांत आउतांचा मुख्य घटक बैल आहे. बैल चांगले तर शेती चांगली. पाश्चात्य देशांत शेतीला बहुतेक घोडे व खेचरांचा उपयोग करतात. पॅलेस्टाइनकडे नांगरास गाढवें लावितात. सिंधप्रांतांत जुजबी उंटांचाहि शेतकीला उपयोग करतात. परंतु स्थूलमानानें पाहिल्यास बैलांचाच शेतकींत फार उपयोग आढळतो. कांहीं कांहीं ठिकाणीं पावसाळी भागांत टोणग्यांचा उपयोग शेतकामाकडे करितात. तथापि हवा, पाणी व जमीन यांचा विचार करता बैलांशिवाय इतर जनावरांचा शेतकीकडे फारसा उपयोग होत नाहीं.

शेतकीदृष्ट्या प्रत्येक शेतकरी एक-दोन गाई बैलांबरोबर ठेवीतच असतो. गाईचें दूध घरखर्चास उपयोगीं पडतें, गोर्‍हा मोठा झाला म्हणजे आउताच्या कामीं येतो, बैल आउतास, गाडीस, मोटेस व कांहीं ठिकाणीं वर बसून जाण्यासहि उपयोगी पडतो. अर्थात बैलाची निपज होण्याकरितां गाईचेंहि तितकेंच किंबहुना जास्तच महत्व आहे. कारण आपल्या अन्नाचा जो मुख्य भाग धान्य तें पिकविण्याच्या कामीं लागणारीं गुरें उत्पन्न करणारी गायच आहे. शेताची मशागत करणें, धान्य पेरणें, त्याची मळणी करून ते घरीं आणणें वगैरे गोष्टी गाईच्या संततीवरच अवलंबून आहेत.

गाईपासून बैल व शिवाय दूधदुभतें, गोमूत्र व गोमय या मिळणार्‍या पदार्थांचा शुद्धतेकरितां उपयोग होत असून त्यांचा (गोमूत्र व गोमयाचा) खताच्या कामीं फार उपयोग होतो. अशा अनेक कारणांसाठीं गाय ही हिंदुलोकांत पूज्य मानलेली असून गोहत्या हें महत्पाप समजलें जातें. आपल्याकडे अशी एक गोष्ट रूढ आहे कीं गाय वात असतां तिजला प्रदक्षिणा केल्यास पृथ्वीप्रदक्षिणेचें फळ मिळतें. त्याचप्रमाणें शेतकरी लोकांत अशी म्हण आहे की, "शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदयकाळ आणतीलच आणतील." एकंदरींत बैलाच्या जातिवंत पैदाशीवर व त्यांच्या संख्येवर शेतकीची भरभराट अवलंबून असते.

यूरोप, अमेरिका व वसाहती यांमध्यें गुरांची उपज मांसांकरितां व दुधाकरितां अशा वेगवेगळ्या हेतूनीं करण्यांत येते. हिंदुस्थानांत गाई शेतकीला लागणार्‍या बैलांकरिता पाळतात व दुधासाठीं विशेषतः म्हशी पाळतात.

हिंदुस्थानांतील निरनिराळें हवामान, चार्‍याचा कमजास्त पुरवठा, निरनिराळ्या तर्‍हेच्या कमजास्त कसाच्या जमिनी या मानानें गाईच्या अनेक जाती झाल्या आहेत. त्यांत कित्येक बरेंच दूध देणार्‍या तर कित्येक कमी पण कसदार दूध देणार्‍या व कांहीं फारच देखण्या अशा आहेत. कित्येकांची प्रजा जड ओझीं वाहण्यास व नांगर ओढण्यास बळकट, कित्येक जास्त कांटक, जास्त वर्षे काम देणारी व कित्येकांची अवलाद गाडीला लावल्यास घोड्यासारखी पळणारी आहे. बहुतेक जातींत वशिंड कोळें किंवा कमी जास्त प्रमाणांत वाढलेलें असतें. बहुतेकांना शिंगें असतात. मद्रासेंतील कांहीं भागांत बिनशिंगांचीं गुरें बरींच आढळतात. म्हशीच्या जातींत रंग बहुतकरून काळा असून वशिंड नसतें. बंगाल, आसाम, बहार, ओरिसा, तेलंगण, कोंकण वगैरे भात पिकणार्‍या भागांत गुरें अगदीं लहान असतात. इतर उष्ण व समशीतोष्ण भागांत कांही कांहीं गुरांच्या जाती आढळतात. त्यांपैकीं नेलोरी; मद्रास इलाख्यांत अमृतमहाल म्हैसूर संस्थांनांत माँटगामेरी व हांसी पंजांबांत सिंधी दक्षिणसिंधांत; माळवी सातपुड्यांत व मध्य हिंदुस्थानांत; सोरटी अगरगीर काठेवाडांत; कांकेजी गुजराथेंत; गोळाऊ मध्यप्रांतांत; खामगांवी वर्‍हाडांत; खिल्लारी सातपुड्यांत व आटपाटी महालांत; व कृष्णाकांठीं कर्नाटकांत होत. यांपैकीं दूधदुभत्याला चांगल्या मॉटगॉमेरी, हांसी, सोरटी, सिंधीं, कांक्रेजी व नेलोरी ह्या गाईंच्या जाती असून दिल्ली जाफराबादी, सुरती, नागपुरी अगर वर्‍हाडी या म्हशींच्या जाती होत.

इ. स. १८९० सालीं सुधारलेल्या पद्धतीवर हिंदुस्थानांत दूधदुभत्याचा कारखाना पुणें जिल्ह्यांत खडकी येथें सुरू झाला. हल्लीं सर्व हिंदुस्थानांत दुधाचे हजारों कारखाने चालू आहेत. अलीगडला दुधाची डेअरी मोठ्या प्रमाणावर आहे. मिलिटरी (लष्करी) खात्यानें फौजफांट्यांला दूध व लोणी पुरविण्याकरितां हिंदुस्थानांत बरेच कारखाने काढले आहेत. त्यांपैकीं पुणें, बंगलूर, कानपूर, अंबाला, अलाहाबाद वगैरे ठिकाणीं दूध दुभतें पुरविणारीं त्यांची मोठीं शेतें आहेत.

सन १९१७।१८ सालीं सहकारी तत्वावर दूध दुभतें पुरविणार्‍या २४ संस्था होत्या. त्यांपैकीं ११ मुंबई इलाखा, २ नागपुरांत, ६ बंगाल्यांत, २ बहारांत, १ अलाहाबाद, १ बनारस व १ लखनौस होती. मुंबई इलाख्यांत मुंबई शहराखेरीज अहमदाबाद व खेडा जिल्ह्यांत लोणी पुरविण्याचे बरेच कारखाने आहेत. सांगली, मिरज, वर्‍हाड, नागपूर, अहमदाबाद वगैरे ठिकाणांहून सर्व हिंदुस्थानांत, ब्रह्मदेशांत, सिलोन व आफ्रिका येथें लोणी, तूप वगैरे रवाना होतें.

मेंढ्या व शेळ्या— मेंढ्या व शेळ्या यांच्यावर निर्वाह मुख्यत्वेंकरून करणारे महाराष्ट्रांत धनगर लोक होत. ते मेंढ्या व शेळ्या मुख्यत्वेंकरून त्यांचें मांस व लोंकर या करितां पाळितात. उत्तर हिंदुस्थानांत व दक्षिण हिंदुस्थानांत कांहीं मेंढ्यांच्या जाती नामांकित असून त्यांची लोंकर तलम असते. चांगल्या जाती पाश्म (काश्मीर व तिबेट), डुंबा (सिंध), राजपुतानी, पाटणा (बहार), कोइमतूर (मद्रास) व म्हैसूर ह्या होत. काश्मिरी शालजोड्या, पंजाबी गालिचे, सतरंज्या व ब्ल्यांकेटें, मारवाडी धाबळ्या, सिंधी बुरणुस व बंगलुरी घोंगड्या प्रसिद्ध आहेत. देशी मेंढ्यांचीं लोंकर व मांस सुधारण्याकरितां गेल्या पांच पन्नास वर्षे प्रयत्‍न चालू आहेत. तथापि त्यांत फारसें यश आलेलें आढळून येत नाहीं. हल्लीं आस्ट्रेलियांतील मरिनो जातीचे नर आणून मेंढ्यांच्या लोंकरींत सुधारणा घडवून आणण्याचे ब्यानटा-नहाल (मद्रास), तेलिंगखेडीं (मध्यप्रांत), लखनौ, मुरादाबाद, खेरी, मथुरा, (संयुक्त प्रांत) हिसार, (पंजाब), पुसा (बहार) व कोइमतूर येथें चालू आहेत.

त्याचप्रमाणें घोड्यांचा विशेष भरणा दक्षिण काठेवाड, पंजाब, सिंध वगैरे प्रांतांत आहे. पुणें व नगर जिल्ह्यांत व निझामच्या राज्यांत घोड्यांची निपज गोदावरी, भीमा, नीरा, व माण या नद्यांच्या कांठीं होते. मात्र हीं जनावरें एकत्र एकाच इसमाजवळ नसून तीं प्रत्येक गांवीं कांहीं सधन लोक मात्र तयार करवितात. या नदीकांठीं तयार होणारे घोडे लहान, बांधेसूद, पाणीदार व काटक म्हणून प्रसिद्ध आहेत. या जनावरांस भिमथडी, निरथडी घोडे असें म्हणतात. हे घोडे मराठी राज्यांत बरेच प्रसिद्धीस आले होते. अद्याप यांचीं प्रदर्शनें नगर, अहमदाबाद, रावळपिंडी, डेरागाझीखान वगैरे ठिकाणीं प्रतिवर्षी भरवितात व त्यांना प्रोत्साहन मिळावें म्हणून बक्षिसेंहि देतात. त्याचप्रमाणें काठेवाडांत काठीघोडे तयार करतात ते सुंदर व चपल असतात. याशिवाय ब्रिटिश राज्यांत खेचरें तयार करण्याकडे पंजाब व वायव्य सरहद्दीवरील प्रांतांत पुष्कळ लक्ष दिलें जातें. त्यांचा उपयोग अनेक प्रकारच्या लष्करी कामांकडे होतो.

प शु वै द्य क शा स्त्र – पशु हा शब्द फार व्यापक असून त्यांमध्यें सर्व चतुष्पाद प्राण्यांचा समावेश होतो. पशुवैद्यक म्हणजे ज्या शास्त्रांत पशूंच्या रोगांचें निदान व त्यांची चिकित्सा (औषधयोजना) केलेली असते तें शास्त्र होय. ज्या अर्थी हिंदुस्थानांतील शेती जनावरांवर व मुख्यत्वेंकरून बैलांवर अवलंबून असतें त्या अर्थी त्यांनां होणारे मुख्य रोग व त्यांवर उपाय यासंबंधीं शेतकर्‍यांस थोडीबहुत माहिती असणें जरुरीचें आहे. जनावरांच्या रोगाचे दोन प्रकार करितां येतात. एक सांसर्गिक सांथीचे रोग व दुसरा इतर सर्व रोग. लाळ अथवा खुरकूत, डरंगळ्या अगर देवी, फर्‍या, फांशी व घटसर्प हे मुख्य सांसर्गिक रोग असून इतर रोगांत जनावरांच्या पायाला होणारे रोग जसें हाड किंवा सांधा निखळणें, नसा किंवा स्नायूमध्यें लचक भरणें, जखमा होऊन किडे पडणें, शरीरावरील कातडीला गजकर्ण, नायटे, इसब इत्यादि होणें, अंगावर गोचीड, सुळे, उवा वगैरे होणें, शिंगे उखळणें, मोडणें, भिरड लागणें, बैलांचा खांदा येणें वगैरे रोगांचा समावेश होतो. याखेरीज अजीर्ण, जुलाब, पोटदुखी, पोटफुगी, दुभत्या जनावरांची कांस सुजणें, आंचळांतून पाणी, पू, रक्त अगर दुधाच्या गांठी येणें वगैरे अनेक रोग होतात. पशुवैद्यकांत पाळींव पक्षांच्या रोगांचाहि विचार केला जातो.

कृ षि क र्मा चा आ र्थि क वि चा र – महाराष्ट्रांतील शेतकरी लोकांची सांपत्तिक स्थिति चांगली नाही हें वेळोंवेळीं निरनिराळ्या अधिकार्‍यांनीं दाखविलेंच आहे. नुकत्याच डॉ. मॅन यांच्या 'व्हिलेज एकॉनेमिक्स इन डेक्कन व्हिलेज' या नांवाच्या पुस्तकांत एका विशिष्ट गांवाची स्थिति आंकडे देऊन लिहिली आहे. त्यावरून आपल्या इकडला शेतकरीवर्ग कर्जांत बुडून गेला आहे व ह्या स्थितींतून डोकें बाहेर काढणें हें काम फारच दुरापास्त होऊन बसलें आहे. ह्या स्थितीचीं कारणें पुष्कळ आहेत. त्यांपैकीं कांहीं खालीं दिलीं आहेत.

(१) शिक्षणाचा अभावः- हिंदुस्थानांतील शेतकरी वर्गाला बहुतेक शिक्षण नाहीं असें म्हटलें तरी चालेल. इकडील शेती फार पूर्वीपासून चालत असलेली व प्रत्यक्ष अनुभवानें ठरलेली असल्यामुळें ती फार चांगली आहे असा समज आहे, व तो जरी कांहीं अंशीं बरोबर आहे, तरी पूर्वीच्या स्थितींत व आतांच्या स्थितींत फारच फरक झाला आहे; याचा शेतकरी बंधूनीं विचार केलेला नाहीं. पूर्वीची शेती कांहीं तत्वावर व कांहीं अनुभवावर ठरविलेली होती; व ही तत्वें अजीबात विसरून गेल्यामुळें परिस्थिति बदलल्याबरोबर इकडील शेतींत अद्यापि कांहीं एक फरक झाला नाहीं. सध्यांच्या स्थितींत जगांतील शेतीशीं टक्कर देणें भाग आहे व अशा स्थितींत थोड्या खर्चांत शेतीचें उत्पन्न जितकें वाढवितां येईल तितकें तें वाढविणें भाग आहे. जुन्या खर्चाच्या पद्धती टाकून कमी खर्चाच्या व प्रत्यक्ष शास्त्रीय माहिती व अनुभवावरून श्रेयस्कर ठरलेल्या पद्धतींचा उपयोग केला पाहिजे. हें सर्व कळण्याला शिक्षणाची अत्यंत जरूर आहे. शिवाय प्रत्येक काम हिशेबी झालें पाहिजे. प्रत्येक पिकाला मजुरी, खत व इतर खर्च किती आला व प्रत्यक्ष उत्पन्न किती झालें; उत्पन्नांतून खर्च जातां निवळ फायदा किती झाला हें सर्व कळण्याला शेतकरी बंधूंनीं शिक्षणाची फार जरूर आहे. ह्याच्या अभावीं प्रगति होणें अतिशय कठीण आहे.

(२) मजूरः- दिवसानुदिवस मजुरांची फारच अडचण भासूं लागली आहे. देशांत इतर उद्योगधंदे वाढल्यामुळें पुष्कळ मजूरलोक शेतकामांतून निघून इतर धंद्यांत पडूं लागले. ह्यामुळें व राहाणीचा खर्च वगैरे वाढल्यामुळें साहजीकच मजुरीचा रोज वाढला व सध्यां पुष्कळ वेळां जास्त पैसे देऊन सुद्धां शेतीच्या कामास वेळेवर मजूर मिळत नाहींत. यामुळें जमिनीची मशागत वेळेवर होत नाही व त्यामुळें खर्च मात्र वाढत जातो व हंगामशीर मशागत न झाल्यामुळें उत्पन्न कमी येतें. ही स्थिति लक्षांत घेऊन शेतकरी वर्गानें ज्याच्या योगानें थोड्या मुजुरींत व हंगामशीर काम होईल अशा तर्‍हेच्या पद्धतीनें शेती करण्यास प्रारंभ केला पाहिजे.

(३) भांडवलाचा अभावः- भांडवलाच्या अभावामुळें शेतकरी वर्गास अतिशय अडचणी सोसाव्या लागत आहेत. भांडवल नसल्यामुळें पुष्कळ वेळां जमिनीची मशागत करतां येत नाही. जमिनी सपाट करणें, शेतीला ताली घालणें, विहिरी खणणें, फायदेशीर पिकें करणें, मजुरी वांचविणारीं औंतें घेणें वगैरे फायद्याच्या बाबींचा विचार करतां येत नाहीं व ज्याप्रमाणें कोणत्याहि धंद्यांत भांडवल कमी पडत चाललें कीं तो धंदा बसत जातो. त्याप्रमाणें हा शेतकीचा धंदा निकृष्ट स्थितीस येत चालला आहे.

(४) जमिनीची विभागणीः- आपल्या समाजांत असा नियम आहे कीं, बापाच्या मागें वडिलोपार्जित सर्व इस्टेट त्याच्या मुलांनां सारखी मिळावयाची. हिंदुधर्मशास्त्र असें असल्यामुळें त्याचा शेतीवर मात्र अति वाईट परिणाम झाला आहे. सध्यां ह्या कायद्यामुळें जमिनीचे इतके कांहीं लहान लहान तुकडे पडले आहेत कीं, पुष्कळ जमीन पड होत चालली आहे व कांहीं जमिनींत खर्च जास्त येत असल्यामुळें तींत मुळींच फायदा होत नाहीं. ह्या परिस्थितीमुळें पुष्कळ लोक शेती सोडून इतर धंद्याकडे जाऊं लागले आहेत. ह्या पद्धतीला कांहीं तरी आळा पडणें जरूर आहे.

(५) सर्वसाधारण महर्गताः- सध्यां प्रत्येक जिन्नस म्हणजे धान्य, आउतें, मजुरी, बींबियाणें खतें वगैरे जिन्नस पूर्वीपेक्षां किती तरी महाग झाले आहेत. पूर्वी चांगल्या माणसाचें पोट ४-५ रुपयांत भरत असून आतां ८-१० रुपयापेक्षां जास्त खर्च येतो. ह्याबरोबर धान्याचा भावहि वाढला आहे. व त्याचा शेतकरी वर्गास फायदा मिळावयास पाहिजे होता, परंतु तो मिळतोसें दिसत नाहीं.

(६) दुष्काळः- महाराष्ट्रांत कांहीं भागांत तर दुष्काळ बहुतेक वारंवार पडतात. सह्याद्रीच्या खालीं व माथ्यांवर पुष्कळ पाऊस पडतो. परंतु जसजसें ह्याच्या पूर्वेकडे जावें तसतसा पाऊस कमी होत जातो व पुढें म्हणजे पुण्याचा पूर्वभाग, नगर, सोलापूर व विजापूर जिल्ह्यांत पहिला पाऊस अगदीच थोडा पडतो व कधीं कधीं पडतहि नाहीं; पुढील म्हणजे सप्टेंबर आक्टोबरमध्यें पाऊस पडतो परंतु पुष्कळदां हा पाऊस पुरेसा होत नाहीं. म्हणून या मुलखांत कोठेंनाकोठें तरी महर्गता असतेच. ह्यामुळें जमिनीची चांगली मशागत करणें व चांगलें पीक करणें ह्याबद्दल शेतकरी वर्गाला उमेदच रहात नाहीं. कारण पावसाच्या अभावी त्यांची मेहनत व पैसा पुष्कळदां वाया जाते.

ही स्थिति सुधारण्याला सरकारने पुष्कळ उपाय केलेले आहेत व लोकांनींहि कांहीं करण्याजोगे आहे. त्यांपैकीं कांहीं पुढें दिले आहेत.

(१) वर सांगितल्याप्रमाणें शेतकरी बंधूंनीं शिक्षणाचा फायदा जरूर घ्यावयाला पाहिजे. पूर्वी थोडेंसें शिक्षण मिळालें म्हणजे त्यांनां शिक्षणाची गोडी लागेल व लोक जास्त शिकूं लागतील व वाचनानें निरनिराळ्या देशांच्या व ठिकाणांच्या शेतीची माहिती मिळूं शकेल व त्याचा फायदा शेतकरी लोकांस करून घेतां येईल. ठिकठिकाणीं सरकार शेतकरी वर्गाकरतां शेतकी शाळा व शेतकी कॉलेज स्थापन करीत आहे. व त्या शाळांतून शेतकींचें शास्त्रीय व अनुभवसिद्धज्ञान दिलें जातें. हें शिक्षण मिळालें असतां शेतकरी वर्गाला शेती सुधारण्यास फार अडचण पडणार नाहीं. याकरितां प्राथमिक शिक्षण सक्तीचें व मोफत होणें अत्यावश्यक आहे.

(२) प्रात्यक्षिकेः- शेतकरीवर्गाच्या शेतीसंबंधाच्या अडचणी सोडविण्याकरितां निरनिराळ्या पद्धतींचा, खतांचा व औतांचा प्रयोग करण्याकरितां ठिकठिकाणीं सरकारनें प्रयोग क्षेत्रें काढिलीं आहेत. अशा ठिकाणीं शेतकरीवर्गाकरितां प्रात्यक्षिकें व प्रदर्शनें भरविलीं जातात व अनुभवानें यशस्वी ठरलेली संपूर्ण माहिती त्यांनां दिली जाते. त्याचा शेतकरीवर्गानें फायदा घेतल्यास त्यांचा व शेतीचा फायदा होईल.

(३) मजुरांचा प्रश्न फारच महत्वाचा, काळजीचा व जरा कठिण आहे. मजूर थोडे व मागणी फार अशी स्थिति आज आहे. शिवाय एकंदर रहाणीचा खर्च वाढला आहे. अशा वेळीं जुन्या जास्त मजूर लागणार्‍या पद्धती टाकून सुधारलेल्या औतांचा व यंत्रांचा उपयोग करून पिकें जास्त केल्याशिवाय फायदा होणें कठीण आहे. येथल्या अनेकपट मजूरी देऊन अमेरिकेंतील शेती यंत्रांच्या साहाय्यानें फायदेशीर होऊं शकते व धान्यांच्या बाबतींत जगांतील किंमतींशी स्पर्धा करूं शकते ही गोष्ट विसरतां कामा नये.

(४) सहकारी संस्थाः- शिवाय संघशक्तीच्या तत्वावर हा प्रश्न सोडविला पाहिजे. भांडवलाच्या अभावीं शेतकरी वर्गाला शेतीं सुधारणा करतां येत नाहीं असें वर सांगितलें आहे. ह्याकरितां भांडवल उभारण्याची तजवीज केली पाहिजे.

या कामीं सहकारी पतपेढ्यांचा फार उपयोग होत आहे व तो जास्त होईल अशी आशा आहे. हल्लीं पुष्कळ खेडेगांवीं पतपेढ्या झाल्या आहेत. व त्यामुळें शेतकामाला भांडवलाची अडचण पडणार नाहीं. शिवाय गांवाला पतपेढीच्या मार्फत पुष्कळ औतें ठेवतां येतील व ज्यांस तीं विकत घेण्याची ऐपत नसेल त्यांनां तीं भाड्यानें देतां येतील व संघशक्तीच्या जोरावर मजुरीची बचत करणारीं यंत्रें आणविता येतील. एकंदरीत जमिनीची मशागत वेळेवर थोड्या खर्चांत व चांगल्या प्रकारें करतां येण्याचा संभव आहे. सध्यां शेतकरी वर्गाला आपला माल विकावयाच्या वेळीं दलालाकडून पुष्कळ नुकसान सोसावें लागतें. यासाठीं माल विकणार्‍या संस्था स्थापन केल्या असतां मालाला किंमत चांगली मिळून शेतकरी वर्गहि फसला जाणार नाहीं. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे भांडवल लागणारी सर्व कामें गांवाला या संस्थेच्या योगानें करतां येतील.

(५) जमिनींच्या विभागणीला आळा घालणें अगदीं जरूर आहे. कारण जमिनीचे लहान लहान तुकडे झाले असल्यामुळें तींत सुधारणा करतां येत नाहीं व एखाद्याच्या मनांत तसें करावयाचें आल्यास त्यास फार खर्च येतो. याकरितां जमिनीची विभागणी अशा बेतानें झाली पाहिजे की त्या जमिनीच्या मशागतीपासून एका कुटुंबाचें चांगलें पोट भरून त्यास चांगल्या स्थितींत रहातां येईल. कांहीं कांहीं देशांत यासंबंधानें नियम झालेले आहेत. व हिंदुस्थानांतहि तसें होऊन विभागणीला आळा पाडणें जरूर आहे. असे नियम होण्याकरितां लोकांनीं नेटाचा प्रयत्‍न चालू ठेविला पाहिजे.

स र का र नें दु ष्का ळा च्या प्र ति का रा र्थ यो जि ले ले उ पा य.— दुष्काळ पडल्यास सरकार तहकुबी किंवा सार्‍याची माफी देतें. शिवाय शेतकरी वर्गाला कर्जमुक्त करण्याकरितां 'डेक्कन अ‍ॅग्रिकलचरिस्ट्स् रिलीफ अ‍ॅक्ट' पास केल्यामुळें सावकराच्या कचाटींतून शेतकरी वर्गाची मुक्तता करण्याची सरकारनें व्यवस्था केली. ह्यामुळें भांडवलाच्या व्याजाचा दर उतरला व सावकारांच्या व्यवहारांत सचोटी वाढली. सरकारनें दुष्काळी मुलुखांत मोठमोठे कालवे व तळीं बांधलीं व तीं जास्त बांधण्याचीं कामें चालू आहेत. या पाण्याच्या सोईमुळें पूर्वीचे दुष्कळी भाग अति सुपीक व फायदेशीर झालेले आहेत. आगगाडीच्या प्रसारामुळें दुष्कळाच्या वेळीं एका ठिकाणाहून धान्य व गुरांनां लागणारी वैरण दुसर्‍या ठिकाणीं नेणें फार सोपें झालें आहे. शिवाय शेतकरी वर्गाला विहिरी पाडण्याकरितां व इतर कामाकरितां कमी व्याजानें तगाई देण्याची व्यवस्था सरकारनें केली आहे. या सर्व बाबींचा विचार करून शेतकरी वर्गानें वरील सर्व सवलतींचा योग्य मार्गानें फायदा घेतल्यास त्याच्या शेतीची सुधारणा होणें सोपें जाईल.

ज मी नी व री ल स त्ते चे प्र का रः- हिंदुस्थानांत शेतावरील सत्तेचे किंवा स्वत्वाचे (मालकीचे) तीन प्रकार आढळतात. तेः- (१) रयतवारी, (२) सर्व गांवांवर मुदतीनें ठरविलेली जमीनदारी व (३) कायम धार्‍याची जमीनदारी. यांपैकीं पहिल्या व दुसर्‍या प्रकारांत ठरविलेल्या मुदतीनें धारा बदलतो. परंतु तो तिसर्‍या प्रकारांत कधींहि बदलत नाही.

यांपैकीं रयतवारी पद्धत मद्रास, मुंबई, सिंध, ब्रह्मदेश, कूर्ग प्रांत, वर्‍हाड, मध्यप्रांत, व आसामांतील बहुतेक भाग यांत प्रचलित आहे. कायम जमीनदारीची पद्धत बंगाल, संयुक्त प्रांत, बहार, ओरिसा, आसाम, अजमीर व मारवाडपैकीं कांहीं भाग यांत लागू आहे. मुदतीची जमीनदारी पंजाबांत, वायव्येकडील आणि प्रांतांत आणि दिल्ली, बंगाल, मुंबई, संयुक्त प्रांत, बहार, ओरिसा, मध्यप्रांत, आसाम, अजमीर, मारवाड कांहीं भागांत चाल आहे.

एकंदर क्षेत्रांपैकी शेंकडा ४८ क्षेत्र रयतवारी, शेंकडा २० कायम धारा व शें. ४२ तूर्तच्या किंवा मुदतीच्या पद्धतीखालीं मोडतें. व एकंदर धान्याचें उत्पन्न (वसूल) इतर सेसशिवायकरून ३३१/३ कोटी रुपयांचें आहे व ह्याचें दर माणशी प्रमाण एक रुपया सहा आणे पडतें. वरील हकीकतीच्या स्पष्टीकरणार्थ इ. स. १९१६-१७ सालीं प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टवरून केलेला तक्ता पुढील दिला आहेः-

प्रत्येक प्रांतांतील कृषिक्षेत्राचें धारापद्धति, धारा, लोकसंख्या यांशीं तुलना करून वर्गीकरण

प्रांताचें नांव रयतवारी क्षेत्र जमीनदारी एकंदर क्षेत्र एकंदर धारा रुपये एकंदर लोकसंख्या दरमाणशी धारा
कायमची मुदतीची रु. आ. पै.
बंगाल ... ३९२११ ११२६९ ५०४८० २७४६७ ४४५८८ १०
मद्रास ६१२८६ २९८५२ ... ९११३८ ६७२९४ ४१४०५ ११
मुंबई ४४८७६ ... ३७५३ ४८६२९ ३०९२८ १५१३४
सिंध ३०२५७ ... ... ३०२५७ ९०९० ३५१३
संयुक्तप्रांत ... ७५४२ ६०७९३ ६८३३५ ६५७६८ ४७१९०
बहार ओरिसा ... ४१४५२ ११७६० ५३२१२ १५७१३ ३४४९०
 पंजाब ... ...  ६१८५६   ६१८५६ ३९४९५  १९५४८   २  
ब्रह्मदेश  १०८८८१   ...  ... १०८८८१   ३२४४२ १०५७७  ८   १२ ० 
मध्यप्रांत   १२१४२ ...  ४०४५२  ५२५९४  १०८७४  १०८७३   ०
 वर्‍हाड  ११३७४  ... ...   ११३७४ ८६२८  ३०६७  २   १३ ० 
आसाम २५८३० ३९३० १५४६ ३१३०६ ७७९५ ६७१४
अजमीर, मारवाड ... ९७४ ७९७ १७७१ ३६५ ५०१ १२
दिल्ली ... ... ३६८ ३६८ ३९८ ४१३ १५
कूर्गप्रांत १०१२ ... ... १०१२ ३६५ १७५
मानपूर ३१ ... ... ३१ १६
वायव्य सरहद्दीवरील प्रांत ... ... ८४६८ ८४३८ २७३७ २२५५
एकूण २९५६८९ १२२९६१ २०१०३२ ६१९६८२ ३३४७४४ २४०४५० ३१ १३


दु य्य म प्र ती चे धं देः-(१) कोंबड्या पाळणें व त्यांची उपज करणेः- ही वहिवाट शेतकरी लोकांमध्यें फार पूर्वापार आहे. परंतु हें काम धंदा या दृष्टीनें कोणीच करीत नाहीं. एक-दोन कोंबड्या पाळणें त्यांचें उत्पन्न अंडीं, पिलें, कोंबड्या या रूपानें काढणें या पलीकडे हा धंदा अद्याप गेलेला नाहीं. कोंबड्यांचा धंदा काळजीपूर्वक केल्यास तो फायदेशीर असून शिवाय तो मन रमविणाराहि आहे. फ्रान्स, इंग्लंड वगैरे यूरोपियन राष्ट्रांत कोंबडीं व त्यांचीं अंडीं यांची आयात व निर्गत दरवर्षी लाखों रुपयांची होते. तिकडे अंडीं उबविण्याचीं कामें यंत्रानें करितात. पांक्ष्यांना नियमित वेळीं व नियमित प्रमाणांत रोज चारा देतात व सर्व कामें धंदा या दृष्टीनें करितात. हिंदुस्थानांत कांहीं साहेब लोक, किरिस्ताव लोक व सोलजर हौसेसाठीं निरनिराळ्या हिंदीं व विलायती जाती आणून त्या स्वतःच्या घरखर्चासाठीं पाळितात. हल्लीं त्यांचीं कोठें कोठें प्रदर्शनहि भरूं लागलीं आहेत. चितागांग, असील, बसरा व गेम या हिंदुस्थानांतील मुख्य जाती होत. या विषयाच्या विशेष माहितीकरितां कोंबडी, बदकें वगैरे लेख पहावेत.

(२) मधुमक्षिकापालनः- पाश्चात्य देशांतमध्यें शेतीच्या धंद्यांत मधमाशांची वाढ करून मध उत्पन्न करणें याचाहि समावेश होतो. मधमाशा हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत, यामुळें पाश्चत्य राष्ट्रांत ज्याप्रमाणें कृत्रिम पोळीं करून मधमांशांकडून मध तयार करवा लागतो, त्याप्रमाणें हिंदुस्थानांत करण्यांचें कारण पडत नाहीं. मध तयार करण्याच्या कामांतच आपलें सर्व आयुष्य घालविणारीं माणसें हिंदुस्थानांत तयार झालीं नाहींत याचें कारण त्या उद्योगास धंद्याचें स्वरूप आलेलें नाहीं. काहीं रामोशी, कोळी किंवा कुणबी, वर्षांतून कांहीं दिवस ज्यावेळीं वनस्पती बहरास येऊन मधमाशांची पोळीं लागतात तेव्हां पोळीं काढून मध तयार करून विकण्याचा धंदा करितात. परंतु त्यांनां मधमाशांसंबंधीं शास्त्रीय माहिती नसल्यामुळें त्यांनी पोळ्यांतून काढलेला मध कमी दर्जाचा निघतो, तो लवकर आंबतो किंवा काकवीसारखा पातळ होतो. पाश्चात्य देशांतील मध जास्त दिवस टिकतो.

हिंदुस्थानांत मधमाशांकडून मध तयार करण्यासंबंधाने एंजिनियरिंग कॉलेजचे प्रिन्सिपाल डॉ. कुक यांनीं इ.स. १८९० सालीं प्रयत्‍न केला होता. त्यांनीं इटालियन मधमाशांच्या राण्या आणून त्या कृत्रिम घरांत ठेवल्या होत्या. त्यांपासून मध तयार होऊं लागला होता, परंतु कांहीं दिवसांनीं त्या मधमाशा मेल्यामुळें तें काम बंद पडलें. यासंबंधानें पुण्याच्या शेतकी कॉलेजचे शेतीविषयीचे प्रोफेसर मि. नाईट यांनीं व पुसा येथील कीटकशास्त्रवेत्यांनीं कांहीं प्रयोग केले, पण त्यांत त्यांनां यावें तसें यश आलें नाहीं. मद्रास इलाख्यांत कृत्रिम पोळ्यांत मध उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न झाला असून तो यशस्वी झाल्याचेंहि प्रसिद्ध झालें आहे. तथापि हा धंदा अद्यापपर्यंत प्रयोगावस्थेंतच आहे असें म्हणावें लागतें. शेतकी खात्याकडून संशोधनाचें काम चालू असतें. त्यांत याचा प्रमुखत्वानें समावेश केल्यास शेतकरी लोकांस एक नवीन घरगुती धंदा होईल.

(३) रेशीमः- या विषयावरील लेख पहावा.
(४) लाखः- या विषयांवरील लेख पहावा.

व्या पा र उ दी मः- पूर्वकाळीं आपल्यास पुरेसें धान्य तयार करणें हाच साधारण व्यवहार होता व तेवढी जमीन शेतीखालीं वहातुकीस होती. दळणवळणाचे मार्ग कमी व धोक्याचे असल्यामुळें प्रत्येक गांवीं लागणारा सर्व माल बहुतेक तेथेंच तयार होत असे. यामुळें धान्याचा संग्रह व जनावरांचें पालनपोषण यापेक्षां पैशाला अधिक महत्त्व नव्हतें. परंतु आतां सडका, मोटारी, आगगाड्या, आगबोटी वगैरे ने-आण करण्याचीं साधनें झाल्यामुळें व तारायंत्राच्या योगानें व्यवहार लवकर कळूं लागल्यामुळें आणि सरकारच्या आरमारी व लष्करी बंदोबस्तामुळें दर्यावरील व्यापार वाढून तांदूळ, गहूं, ज्वारी, बाजरी, गळिताचीं धान्यें, चहा, काफी, वेलदोडे, मिरी, सिंकोना, अफू, कापूस, ज्यूट, रबर, रंग, नीळ, सोरा, हाडें, पेंडी, कमावलेली व कच्चीं कांतडीं, लोंकर वगैरे जिन्नस परदेशीं जाऊं लागले. या स्थितीमुळें खाण्याच्या धान्याखालीं क्षेत्र कमी होऊन अन्नेतर पिकांखालीं क्षेत्र वाढूं लागलें आहे. याचा परिणाम परदेशीं चढाओढ हा एक आहे. शिवाय कित्येक ठिकाणीं त्याच ठिकाणीं होऊं शकणार्‍या व जरुरीच्या जिनसा देखील इतर ठिकाणाहून आणाव्या लागत आहेत.

हिंदुस्थानांतून परदेशास निर्गत होणार्‍या मालांत कापूस व ताग (ज्यूट) हे जिन्नस बरेच महत्त्वाचे आहेत. निर्गत मालाची युद्धापूर्वीची पांच वर्षांची सरासरी पाहिल्यास ती साधारणपणें २२० कोटी रुपयांची भरते. त्यांत धान्य (मुख्यत्वें करून तांदूळ व गहूं) ४६ कोटी रुपये, कापूस व कापड ४५ कोटी रुपये, ताग व तागाचा कपडा वगैरे ४२ कोटी रुपये गळिताचीं धान्यें २४ कोटी रुपये, चामडीं व कांतडीं १५ कोटी रुपये आणि चहा १३ कोटी रुपये हे सहा जिन्नस निर्गत व्यापारांत प्रमुख आहेत.

सन १९१४।१५ सालीं तांदूळ व गहूं (ब्रिटिश हिंदुस्थानांत) या दोन जिनसांचें उत्पन्न ३८२३३००० टन असून त्यांपैकीं ३६६००६३१ टन हिंदुस्थानांत राहिले व १६३२३६९ टन परदेशीं रवाना झाले. निर्गत मालांत १५६१९६९ टन तांदूळ व ७०४०० टन गहूं होते. याखेरीज ज्वारी, बाजरी, जव, मका, डाळी, हरभरा वगैरे मिळून २४८००० टन जिन्नस परदेशीं गेले. आयात मालांत कपडा साखर मुख्य आहे.

आयात माल

जिनसाचें नांव वर्ष सरासरी किं. रू.
(१) कपडा व सूत १९०९-१० ते १९१३-१४ सरासरी ५२१८०३०००
,, १९१५-१६ ४३२७५५०००
,, १९१६-१७ ५३०६४६०००
(२) साखर १९०९ ते १९१० व १९१३ ते १४ सरासरी १३१७५८०००
,, १९१५ ते १९१६ १६६१७८०००
,, १९१६ ते १९१७ १५४५०३०००

निर्गत व्यापाराचा तपशील

मालाचें नांव सन मालाचें वजन टन  किंमत रू. हजार
खाण्याचीं धान्यें १९०९-१४ ४४११ ४५८१११
१९१५-१६ २४३६ २९०७१२
१९१६-१७ २९१५ ३४९०४३
गळिताचीं धान्यें १९०९-१४ १४५३ २४३६९७
१९१५-१६ ७०० १०१२२६
१९१६-१७ ९२८ १६४४३२
कापूस कपडा वगैरे १९०९-१४ ४४६८३७
१९१५-१६ ३४५३४९
१९१६-१७ ४६९४५७
ज्यूट-पोतीं वगैरे १९०९-१४ ७६४ ४२४५११
१९१५-१६ ५३६२०४
१९१६-१७ ५७९४२७
चहा १९०९-१४ २६६४९८ १३०६७८
१९१५-१६ ३३८४७० १९९८११
१९१६-१७ २९१४०३ १६७७१०
काफी १९०९-१४ १३७५२
१९१५-१६ ९८६९
१९१६-१७ १०४५८
अफू १९०९-१४ ९९६१७
१९१५-१६ १४७०२
१९१६-१७ २०९६५
नीळ १९०९-१४ २९९२
१९१५-१६ २०७८७
१९१६-१७ २०७४४
सोरा १००९-१४ ३४९९
१९१५-१६ ६८८७
१९१६-१७ १०५१३
हाडें १९१६-१७ ४२ ३२४४
पेंडी १९१६-१७ २५ ९९१०
कच्चीं चामडीं १९०९-१४ १०३१६०
कमावलेली चामडीं १९१६-१७ ४२७४५
१४४०८६
१९१६-१७ ९३१७८
लोंकर १९०९-१४ ३७८००
१९१५-१६ ३७९०८
१९१७-१७ ३७७९८

 

सन १९१६।१७ सालीं प्रसिद्ध झालेल्या व्यापारासंबंधीं परीक्षण रिपोर्टावरून असें आढळून येतें कीं बाहेर जाणार्‍या मालाचे चार पांच वर्ग करतां येतात.

१ खा ण्या चीं धा न्येः- गहूं, गव्हाचें पीठ, भात, तांदूळ, चहा, काफी, मसाल्याचें सामान वगैरे.

२ क च्चा मा लः- कापूस, ताग, गळिताचीं धान्यें, बिन कमावलेलीं चामडीं, लोंकर, सागवानी लांकूड वगैरे.

३ अ र्ध व ट त या र के ले ले जि न्न सः- सूत, निरनिराळ्या प्रकारची तेलें, सोरा, कच्चें रेशीम, कमावलेलीं चामडीं वगैरे.

४ त या र के ले ले जि न्न सः- कपडा (रंगविलेला) पोतीं, गोणपाट, दोरखंडें, लाख, रेशमी कपडा वगैरे.

५ अफू, नीळ व इतर रंग निघणारे जिन्नस.

ज मि नी ची सु पी क ताः- जमीनीची सुपीकता राखण्याचे मुख्य मार्ग चार आहेत ते पहिला जमिनीला खत देणें; दुसरा, जमीन पड ठेवणें; तिसरा हिरवाळ खत देणें व चवथा पिकांत फेरपालट करणें.

जमिनीला खत देऊन व तिची चांगली मशागत करून तिची सुपीकता कायम राखणें शक्य आहे परंतु ही बाब फार खर्चाची आहे. जमीन पड ठेवणें म्हणजे ती नांगरून वरचेवर कुळवून तयार करून त्यांत सबंध एक हंगाम कांहीं पीक न घेतां हवेचा व उष्णतेचा वगैरे तिजवर परिणाम होऊं देणें हा होय. यामुळें तींत जास्त पोषक द्रव्यें उत्पन्न होतात, तण मरतें, व तींत जास्त पाणी मुरून रहातें. जमीन अशी अगदीं पडित ठेवण्याची चाल मुख्यत्वेंकरून गुजराथेंत भडोच जिल्ह्यांत आढळते. ज्या ठिकाणीं खरीप व रब्बी पिकें फेरपालटीनें घेतात, तेथे रब्बी पीक घेतलें म्हणजे जमिनीला तीन साडेतीन महिने विश्रांति मिळते व खरीप घेतलें तर आठ नऊ महिने विश्रांति मिळते.

कांहीं कांही भागांत जमीन पडित ठेवणें फायदेशीर असून ती पडित ठेवणें जरुरीचें आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम घाटांत आसामांत, ब्रह्मदेशांत, मध्यप्रांतात व मध्यहिंदुस्थानांत जंगली भागांत जेथें नवीन वैती जमीन करतात व ज्या ठिकाणीं वर्षानुवर्ष जमीन बदलतात तेथें जमीन पड ठेवण्याची पद्धत जमिनीच्या मगदुराप्रमाणें व हवामानावर अवलंबून असतें.

ही पड ठेवण्याची पद्धत कोकणांत वरकस जमिनींत आढळते. नागली, हरीक, वरी व कारळा तीळ हीं पिकें लागोपाठ चार वर्षे घेऊन नंतर ती जमीन पांच ते दहा वर्षे पड टाकितात. तेणेंकरून तिची फलद्रूपता पुन्हां ताळ्यावर येते. या जंगली भागांत पाऊस पुष्कळ पडत असल्यामुळें व जमीन उतारांवर असल्यामुळें नांगर वगैरे करून ठेविल्यास भुसभुशीत जमीन वाहून जाते याकरतां ती तशीच आठ दहा वर्षे सोडून नंतर त्यांतील जंगल तोडून व आजूबाजूच्या जंगलांतील डहाळ्या आणून व गवत हांतरून त्याला उन्हाळ्यांत आग लावून देतात. ही राख लहान नांगरीनें हलवून पहिल्या वर्षी पाऊस पडल्याबरोबर नाचणी पेरितात; व पुढें वर नमूद केल्याप्रमाणें तीन पिकें घेऊन पुन्हां पूर्वीप्रमाणें पड टाकितात. याशिवाय रानटी जातीचे लोक अशाच पद्धतीनें करांदे, कोन, कणगरें भात, मका व हलक्या प्रतीचीं तृणधान्यें वगैरे करून आपला उदरनिर्वाह करितात.

या पद्धतीला ब्रह्मदेशांत टावनग्या, आसामांत झुम, मध्यहिंदुस्थानांत डह्या, हिमालयांत खिल व पश्चिम घाटांत कुमरी अगर डाली म्हणतात.

हि र वा ळ ख तें- म्हणजे ताग, गवारी, कुळीथ, कारळा वगैरेंसारखीं पिकें करून तीवर फुलवरा आला म्हणजे नांगरून जमिनींत गाडून टाकणें होय. याच्या योगानें जमिनीचा पोत सुधारतो व पोषक द्रव्यांचा सांठा वाढतो. यांचा उपयोग पुढील पिकांनां होतो. ही पद्धत मुख्यत्वें करून बागाइतांत सर्वत्र प्रचलित आहे. याला बेवड करणें असेंही म्हणतात.

पिकांत फेरपालट करण्याची पद्धत सर्व हिंदुस्थानभर आढळते. ही पद्धत अनुभवानें जमिनीचा मगदूर, हवा, मान, पाऊसकाळ वगैरे पाहून त्यावर बसविलेली असते.

पि कां त फे र ब द ल- वनस्पतीस जीं पोषक द्रव्यें हवेंतून घ्यावयाचीं असतात, तीं हवेंत पुष्कळ असतात. परंतु जीं जमीनींतून घ्यावयाची असतात तीं मात्र जमीनींत कांहीं नियमित प्रमाणांत आढळतात. यामुळें पिकांची लागवड आळीपाळीनें करणें जरुरीचें आहे. पिकांत आळीपाळी कां असावी याचीं कारणें पुढीलप्रमाणेः- पहिलें कारण जमीनींतील द्राव्य रसांपैकीं कांहीं भाग प्रत्येक वनस्पति शोषून घेते. दुसरें कारण जमीनींत जीं पोषण द्रव्यें असतात त्यांचे सारखेच भाग सर्व जातींच्या वनस्पती घेतात असें नाहीं. तिसरें कारण सर्व वनस्पती जमीनींतून एकच जातीचें द्रव्य घेतात असेंहि नाहीं. चवथें प्रमाण प्रत्येक जातीच्या वनस्पतींत त्यांत तण वाढण्याचें मान त्या वनस्पतीच्या मानानें कमजास्त असतें. वर नमूद केलेल्या कारणांअन्वयें पुढील नियम फायदेशीर दिसतात.

ज्या पिकांच्या पोषणास एकाच जातींचीं द्रव्यें लागतात अशी पिकें एकाच शेतांत लागोपाठ घेऊं नये. धान्याची पिकें कंदांचीं पिकें, पाल्याची पिकें, फलमूळांचाच उपयोग होतो अशी पिकें, यांचा परिणाम जमीनीवर निरनिराळ्या तर्‍हेनें होतो. म्हणून जर एक साल धान्यांचीं पिकें एका जमीनींत केलीं तर त्याच जमीनींत दुसर्‍या वर्षी कंदांचीं अगर मुळाचीं किंवा कडधान्याचीं पिकें करावी. धान्यांच्या (तृणधान्याच्या) पिकांस नायट्रोजन व फास्फरस या द्रव्याची विशेष जरुरी आहे. कडदणाच्या धान्यास पोट्याश व चुना यांची जरूरी असते. हीं पिकें नायट्रोजन हवेंतून घेऊं शकतात. म्हणून त्यांच्या काड्याकुड्या मुळ्या वगैरे कुजल्यावर त्यांतील नायट्रोजन जमीनीस मिळतो. व त्या शेतांत पुढील सालीं तृणधान्याचीं पिकें काढल्यास तो त्या पिकांच्या उपयोगी पडतो. यासाठीं एक तर्‍हेचें अन्न खाणारें पीक काढल्यावर दुसर्‍या तर्‍हेचें अन्न लागणारें पीक करावें, म्हणजे जमीनीची सुपीकता कायम रहाते. कापसासारख्या कांहीं पिकांच्या मुळ्या खोल जाऊन खालच्या थरांतील पोषक द्रव्यें घेतात. जोंधळा, बाजरी, गहूं वगैरेंच्या मुळ्या आंखूड असून वरच्या थरांतील पोषक द्रव्यें घेतात. याकरितां खोल व आंखूड मुळ्यांचीं पिकें आळीपाळीनें केल्यास वरच्या व खालच्या थरांनां आळीपाळीनें विश्रांति मिळते.

विवक्षित पिकांबरोबर विवक्षित तणें माजतात. याकरितां जमीनींत फेरपालटीनें निरनिराळीं पिकें केल्यानें व त्या पिकांनां निरनिराळ्या प्रकारच्या मशागतीची जरूर असल्यामुळें तण नाहीसें होतें. उदाहरणार्थ बाजरीमागून भुईमूग अगर बटाटे व कापसामागून हरभरा.

एका जातीच्या पिकावरील रोग अथवा कीड यांची बाधा दुसर्‍या जातीच्या पिकांस येत नाहीं. म्हणून एकाच जातीचीं पिकें लागोपाठ केल्यास किड्यांनां भरपूर पोषण मिळतें व त्यांची वीण अतिशय जोरानें होते. याकरितां पिकांत फेरपालट केल्यानें किड्यांनां अन्न न मिळून त्यांचा नाश होतो. खेड व जुन्नर येथील बटाट्यांतील बांगडी व त्याप्रमाणें अळी नाहींशी करणें असल्यास तेथें कांहीं वर्षेंपर्यंत बटाटे करणें बंद झालें पाहिजे.

वर सांगितलेल्या गोष्टींचा फायदा मिळावा म्हणून पिकांची मांडणूक चांगली करावी. जमीनीची चांगली मशागत करून कीड व तण न माजण्याबद्दल योग्य उपाय योजून दर वर्षी जमिनीला खत घालून एकाच जमिनींत लागोपाठ तेंच पीक करीत गेल्यास वावगें होणार नाहीं. परंतु असें करणें ही जास्त खर्चाची बाब असल्यामुळें दरवर्षी पिकाचीं चांगली मांडणूक केल्यानें जमिनीला विश्रांति मिळून फार खर्च न येतां चांगलीं पिकें येतील.

हिंदुस्थानांत मिसळीचीं पिकें करण्याची बरीच वहिवाट आहे. उदाहरणार्थ बाजरी आणि तूर; बाजरी आणि कुळीथ व मठ; बाजरी व कारळा; जोंधळा व उडीद; शाळू, जोंधळा व करडई; गहूं आणि करडई; शाळू व हरभरा वगैरे. मिसळीचीं पिकें केल्यानें पिकांत फेरबदल केल्यापासून जो फायदा होतो तो होऊन शिवाय अनेक धान्यें मिसळून पेरलीं असतां सर्वच पिकें बुडत नाहींत. एखादें पीक बुडालें तरी इतर पिकांपासून कांहींना कांहीं तरी उत्पन्न होतें. मिसळींत कडदणाचीं पिकें असतात व तूर ही सर्वत्र आढळते. तुरीपासून अतिशय फायदा आहे. कारण तुरीचीं मुळें खोल जातात व तेथील पोषक द्रव्यें वर आणतात. तुरीचा पाला जमिनीवर पडतो व अशा योगानें जमीन सुपीक बनते. पिकाची चांगली मांडणूक केल्यास जमीन पड ठेवण्याची फारशी जरूर पडणार नाहीं. कांहीं पिकें धान्याचीं असावीं व कांहीं बिवडाचीं असावी. पिकांत फेरबदल केल्यानें व नवीन जातीचीं पिकें केल्यानें पेरणीचे, कापणीचे व मशागतीचे हंगाम वरच्यावर येऊन माणसांनां व गुरांनां भरपूर अन्न मिळून शेतकर्‍यांस व बैलांनां वर्षभर राबणूक पुरेल. पिकांत फेरपालट करणें तो बाजारच्या मागणीवर, मजुरीवर, जमीनीच्या जातीवर हवेवर व शेतापासून नजीक असणार्‍या बाजारावर व एकंदरींत शेतांत होणार्‍या फायद्यावर अवलंबून आहे. असें असल्यामुळें व वेगवेगळ्या प्रांतांत व प्रदेशांत जमीन व हवा निरनिराळी असते म्हणून पिकांची मांडणूक करण्याला निश्चित नियम सांगणें कठिण आहे. तथापि पिकांची मांडणूक करतांना ज्या पिकापासून जास्त फायदा होऊन जमिनीचें फारसें नुकसान होणार नाहीं इकडे विशेष लक्ष पोंचवावें. पिकाच्या फेरपालटींत एखादें पीक जमिनीची सुधारणा करण्यासारखें असावें. जसें ताग करून तो जमीनींत नांगरून टाकणें. असें केल्यानें जमिनीची पोत सुधारतो. सोईप्रमाणें पिकें करणें ती कांहीं खोल व कांहीं उथळ जमीनींत पोषण करणारीं पिकें असावींत. नेहमीं फायद्याची पिकें करीत असतांना त्यांत एखादें पीक असें असावें कीं तें करतांना जमीनीची जास्त मशागत करून तींतील सर्व तण नाहीसे होईल. उदाहरणार्थ कापसाच्या फेरपालटींत सवडीप्रमाणें बटाटे, भुईमूग, हळद वगैरे पिकें करावीं. एकंदरींत पिकांची मांडणूक करतांना जास्त पैसा देणारीं पिकें, बिवडाचीं पिकें, जमीन साफ ठेवणारीं पिकें, वाढींत फेर असणारीं पिकें व निरनिराळ्या जमीनीच्या थरावर पोसणारीं पिकें अशीं असावीं याबद्दल जास्त काळजी घ्यावी.

महाराष्ट्रांतील फेरपालटीच्या कांहीं पद्धती खालीं दिल्या आहेतः- (१) फार पाऊस पडणार्‍या भागांत वर्षानुवर्ष भात घेतात. ज्या भातांच्या जमीनींत ओलावा टिकतो तेथें रब्बी हंगामांत वाल, पावटा, कुळीथ, वाटाणा, गहूं, एरंडी, हरभरा वगैरे पिकें घेतात. (२) वरकस जमीनींत पहिल्या वर्षी नागली, दुसर्‍या वर्षी वरी, तिसर्‍या वर्षी हरीक, चवथ्या वर्षी कारळा. परंतु कोंकणांत नागली, हरीक व तिसर्‍या वर्षी वरी अशी चाल आहे. कारण वरी केल्यानंतर तिचीं पाळें जमीनींत रहातात व त्या पाळांवर कारळ्याशिवाय दुसरें पीक येत नाहीं अशी समजूत आहे. सर्वसाधारण हीं पिकें दर एकरी नागलीच्या सवाई हरीक व पाऊणपट म्हणजे नागलीच्या तीनचतुर्थांश वरी अशीं असतात. या पिकानंतर जमीन कांहीं वर्षे पड टाकतात. ही जमीन कमींत कमी आठ-दहा वर्षे तरी पड टाकली पाहिजे असा कोंकणांतील अनुभव आहे. (३) खानदेश, भडोच, धारवाड, वर्‍हाड, मराठवाडा येथील काळ्या जमीनींत पहिल्या वर्षी कापूस, दुसर्‍या वर्षी बाजरी, तिसर्‍या वर्षी तीळ, हरभरा अगर गहूं.

तापीकांठः- यांत पहिल्या वर्षी गहूं, दुसर्‍या वर्षी हरबरा किंवा जवस.

दख्खनः- हलकी जमीन, हींत बाजरी व कडधान्यें.

डेक्कनः- मराठवाडा; काळी जमीन. हींत शाळू व करडई; गहूं आणि करडई व हरभरा.

उत्तर गुजराथः- गोराडू जमीन. हींत पहिल्या वर्षी बाजरी व कडधान्यें; दुसर्‍या वर्षी कोद्रा, तूर व तीळ; तिसर्‍या वर्षी नाचणी. बेसर-जमीन. हींत पहिल्या वर्षी ज्वारी व क़डधान्य; दुसर्‍या वर्षी कांदा, तीळ, तूर अगर तंबाखू; तिसर्‍या वर्षी नाचणी.

पंचमहाल:- येथें पहिल्या वर्षी मका; दुसर्‍या वर्षी हरभरा, गहूं.

वसईपट्टी (ठाणे जिल्हा)- येथें पहिल्या वर्षी पानमळा; दुसर्‍या वर्षी आलें; तिसर्‍या वर्षी ऊंस; चवथ्या वर्षी केळीं.

खेड जुन्नर (पुणें जिल्हा)- येथें पहिल्या वर्षी बाजरी व रब्बी बटाटे; दुसर्‍या वर्षी भुईमूग; तिसर्‍या वर्षी बाजरी व रब्बी कांदे व चवथ्या वर्षी मिरची.

पाटबंधार्‍याखालील जमीन (जिल्हा नाशिक):- हींत पहिल्या वर्षी भात; दुसर्‍या वर्षी ऊंस; तिसर्‍या वर्षी बाजरी, रब्बी गहूं किंवा हरभरा व चवथ्या वर्षी भात.

बि यां ची नि व ड:- बीं खळ्यांत न धरितां मळ्यांत धरावें अशी म्हण आहे. शेतकीला आधारभूत मुख्य बींच आहे. "बीज तसा अंकुर" अशीहि म्हण आहे. व ती सार्थ आहे. बीं चांगलें असेल तर पीक चांगलें येईल; परंतु बींच जर वाईट असेल तर तें कसल्याहि जमीनींत पेरा, नंतर कशीहि मेहनत करा, तीत कितीहि खत मूत टाका तरी बीं रोगट वाईट असल्यामुळें पुढें पीक चांगलें येणार नाहीं.

असें असतांहि या प्रश्नाकडे फारच दुर्लक्ष आहे. हल्लीं शेतकरी लोक बहुतेक जातीचें बीं पेरणीच्या वेळीं बाजारांतून आणतात, तें बहुतेक मिसळीचें असतें. कांहीं लोक खळ्यांतील ठळक ठळक कणसें राखून किंवा बीं पाखडून पेरणीकरिता ठेवितात. सरकी बहुतेक गिरणींतून आणितात. म्हणजे गिरणी हीं मुख्यतः बियांचीं कोठारें होत. ही निष्काळजी रीत झाली. या कामांत खालील तत्त्वें लक्षांत घेतलीं पाहिजेत. (१) बीं पेरलेल्या जमीनींत व हवेंत येईल असें असलें पाहिजे. (२) तें वर्षानुवर्ष निवड केलेल्या, चांगली मशागत केलेल्या व जोरदार झाडांचें असावें. (३) तें नवें, बिन भेसळीचें, वजनदार, रंगदार, मोठें ढगळ, चकचकीत, पक्कें झालेले, चांगलें उगवणारें, बिनरोगी असावें. तें किडकें असूं नये. बियांच्या अंगींच चकचकीतपणा असल्यास तें त्याच्या परिपक्वतेचें दर्शक होय. (४) बीं भिजकें, उबट किंवा कुबट असूं नये. भिजकें बीं तोंडांत घातलें असतां कुबट लागतें (५) बियांत केरकचरा, खडा माती किंवा तणाचें बीं ही नसावींत. (६) तें जास्च प्रमाणांत उगवणारें असावें. बियांची निवड करतांना खालींल गोष्टी लक्षांत ठेवाव्या. (१) एखादें निर्मळ रोग न झालेंले असें शेत पाहून त्यांतील चांगला भात पसंत करावा. (२) त्यांतील ओंब्या किंवा कणसें चांगली भरलेलीं व मोठीं असावीं; (३) ओंबीतील किंवा कणसांतील दाणे मोठें व वजनदार असावेत. (४) रोपावर किंवा धान्यावर कीड, तांबारा, किंवा काणी सारखी रोग नसावेत. (५) बीं धरणें तें पीक चांगलें तयार झाल्यावर धरावें. (६) बीं तयार झाल्यावर तें चाळावें. त्यांतील हलके, किडके व फुटके दाणे वेगळे करावे. बीं चांगलें असलें तरी तें पेरल्यावर उगवण्याला पुरेसा ओलावा, पुरेशी हवा व उष्णता यांची जरुरी आहे. हीं सर्व जमीनीची चांगली मशागत केल्यानें, व पाऊस न पडल्यास पाणी पाजल्यानें भागवितां येतात. पाणथळ जमीनींत बीं उगवत नाहीं. तें कुजतें. कोरड्या जमीनींत तें उगवत नाहीं व अगदीं थोडा ओलावा असल्यास तें पिठूळतें.

बि यां ची प री क्षा.- बीं शेतांत पेरण्यापूर्वी त्याचें उगवण्याचें प्रमाण काय आहे हें पहाण्याची गुजराथेंतील कांहीं भागांत एक पद्धति आहे. गहू शेतांत पेरण्यापूर्वी एक मूठभर घेऊन त्यांची एक पुरचुंडी बांधितात व ती चार तास पाण्यांत भिजवून नंतर ती ओलसर दाण्यांची पुरचुंडी जमीनींत पुरतात. पुढें चार दिवसांनीं ती बाहेर काढून किती बियांना मोड फुटले हें पहातात. बहुतेकांना मोड फुटले असल्यास ते पेरण्याला हरकत नाहीं असें समजतात. याहीपेक्षां शेतकर्‍याला सोपी रीत म्हणजे एका लांकडाच्या खोक्यांत अगर टिनच्या तरईंत नदींतील बारीक रेती भरावी व ती पाण्यानें ओली करावी. नंतर बियांपैकीं शंभर दाणे घेऊन ते वाळूवर टाकावे व हळूच दाबावे. रेती ओली ठेवावी, पण बियांवर पाणी खेळूं देऊं नये. चार पांच दिवसांनीं बियांना मोड फुटले म्हणजे मोडावलेले दाणे मोजून फेंकून द्यावे व आणखी चार दिवसांनीं पुन्हां मोड आलेले दाणे मोडून फेंकावे. अशा रीतीनें दहा दिवसांत एकंदर किती दाणे उगवलें हें आपणास कळेल शंभर पैकीं ९०-९५ दाणे उगवले तर बीं पेरण्यास चांगलें आहे असें समजावे. बाजरी, राळे, तीळ वगैरे बारीक दाण्याच्या धान्याचीं जास्त काळजी घेतली पाहिजे.

बीं सां ठ वि णें:- प्रत्येक शेतकर्‍यानें पुढील वर्षाच्या पेरणीकरितां बीं राखून ठेवावें. पुष्कळ बियांनां विशेष करून कडदण धान्यांनां तीं फार दिवस ठेविल्यास कीड लागते व बियांची नासाडी होते. धान्याला कीड लागूं नये म्हणून हिंदुस्थानांत बीं सांठविण्याचे अनेक उपाय योजण्यांत येतात. गुजराथेंत, देशावर व कर्नाटकांत बीं गाडग्यांत सांठवून ठेवतात. दक्षिण कोंकणांत भात पेंढ्याच्या मुड्यांत बांधून ठेवण्याची चाल आहे. कित्येक ठिकाणीं तट्ट्ये सारवून त्यांत अगर कणगींत किंवा फळ्यांच्या कोठारांत धान्य सांठवून ठेवतात. गाडगें, कणिंग व तट्ये यांचीं तोंडें बीं भरल्यानंतर शेण, माती व राख यांच्या मिश्रणानें लिंपतात; बियांचा किडीपासून बचाव व्हावा म्हणून बियांत राख व लिंबाचा सुकलेला पाला मिसळतात. गुजराथेंत बीं टिकावें म्हणून त्याला एरंडेलाचें पूट देतात. कोंकणांत कडवे, वाल, पावटे वगैरेंना तांबडी माती लावतात. गुजराथेंत कित्येक ठिकाणीं गव्हांच्या बियांत थोडा पारा घालण्याची चाल आहे व त्याच्या पासून बियांचा बराचा बचाव होतो. कित्येक ठिकाणीं मोठमोठीं दाणेदार कणसें निवडून, कित्येक ठिकाणीं धान्याच्या राशींतून मोठें ठोकळ बीं पाखडून राखून ठेवतात.

उन्हांत वाळविलेलें बीं रांजणांत अगर गाडग्यांत भरलें म्हणजे बियाच्या मानानें त्यांत कांहीं नेफथलाइनच्या (डांबरातील द्रव्य) गोळ्या घालाव्यात व तोंड चांगलें बंद करावें. गाडगें, कणंगी वगैरें ऐवजीं शेतकर्‍याला लोखंडी पत्र्याच्या हौदांत बीं ठेवणें बर्‍याच अंशीं फायदेशीर पडेल. या हौदाचें तोंड बंद असून त्याचें झांकण अगदीं घट्ट बसणारें असावें. प्रत्येक पन्नास पौंड बियांवर सुमारें १०-१२ डांबराच्या गोळ्या घालाव्या, म्हणजे डब्यांतील हवेंत बहुतेक कीटकांची वीण होणें बंद पडेल. त्या गोळ्या टाकलेल्या बियाचा फक्त पेरण्याच्या कामींच उपयोग होतो. त्याचा जनावरांस अगर माणसांस खाण्यास उपयोग होत नाहीं. शेतकरी जीं पिकें करितात. त्यांना अनेक शत्रू आहेत. ते जमीनींत बीं पेरल्यापासून तों पीकं तयार होऊन पदरांत पडे पावेंतों त्याच्या मागें लागलेले असतात. पुन्हां धान्य कोठारांत सांठविल्यास तेथेंहि त्याचा फन्ना उडवितात. हे शत्रू म्हणजे निरनिराळ्या तर्‍हेचीं तणझाडें किडे व वनस्पतीजन्य रोग होत. यांखेरीज उंदीर, कावळे, चिमण्या, खारी, ससे, कोल्हे रानडुकरें, सायाळ, हरणें, रानमांजरें, रुई वगैरे प्राणी पिकें उभीं असतांना खाऊन नुकसान करतात.

शेतांत आपणांस नको असलेलें किंवा पिकाची नुकसानी अगर खराबीं करणारें झाड यास तण म्हणण्यास हरकत नाहीं. तणझाडें पिकांचें अनेक तर्‍हेनें नुकसान करतात. ज्याप्रमाणें पिकें वाढण्यास पाणी, पोषक द्रव्यें, हवा, उष्णता वगैरेंची जरुरी लागते. त्याप्रमाणें तणझाडांची वाढ होण्यासहि या गोष्टींची अनुकूलता लागते. म्हणून तणझाडें शेतांत होऊं दिल्यास तीं पिकासाठीं घातलेल्या पोषक द्रव्याचा वांटा घेतात व त्यामुळें ओलावा कमी पडतो; पिकें कमजोर दिसू लागतात. शिवाय रोपांनां त्यापासून दाटी होऊन त्यांची वाढ होण्यास लागणारें ऊन व हवा बंद होते. अशा दाटींत किडे, त्यांचीं अंडीं व त्याचप्रमाणें वनस्पतिजन्य रोगाचा उद्‍भव व वाढ होण्यास चांगली जागा सांपडते. तणझाडें शेतांत वाढूं दिली व त्यांनां बीं येऊं देऊन त्यांच्यासहित पिकाची कापणी केली तर धान्याच्या बियांत तणाच्या बियांची आतोनात भेसळ होते व वर्षानुवर्षे असेंच बीं पेरीत गेल्यास तणझाडें आपलें वर्चस्व बसवितात. व मुख्य पिकाची वाढ बंद करतात. शेतकर्‍यांत "तण खाई धन" अशा एक म्हण आहे व ती सर्वस्वी खरी आहे. ती पूर्वजांनीं पुष्कळ वर्षांच्या अनुभवांतीं केलेली असून अज्ञानामुळें व आळसामुळें ती शेतकर्‍यांनां माहीत असूनहि त्यांच्या हांतून ती कृतींत येत नाहीं.

या तणझाडरूपी खादांड व आंगतुक शत्रूचा वेळींच प्रतिकार व बंदोबस्त केल्यास हल्लीं शेतांत मिळणारें पीक निदान सवाई दिढीनें तरी वाढवितां येईल.

तणांचें वर्गीकरण:- हें पुष्कळ तर्‍हेनें करतां येईल. तर्णे कांहीं वर्षायु व कांहीं बहुवर्षायु असतात. कांहींच्या मुळ्या खोल जातात व कांहींच्या वरच असतात व कांहीं कोरडवाहू जमीनींत आढळतात तर कांहीं पाणभरत्या व बागाईत जमीनींतच फैलावतात. कित्येक खरीप हंगामांत तर कांहीं रब्बींत व कांहीं दोन्ही हंगामांत सांपडतात. कांहीं तणांचा फैलाव बियांपासून होतो, कांहींचा दर कांड्यास मुळ्या येऊन होतो व कांहींना ताणे फुटून त्यांच्या शेवटीं कांदा किंवा गड्डा येऊन पुन्हां त्यांतून फूट होऊन जास्त जास्त क्षेत्रावर त्यांचा प्रसार होत जातो.

तणांच्य बीजांचा फैलाव होणार्‍या निरनिराळ्या तर्‍हा:-

(१) शेतांतील तणांनां बीं येऊन तेथल्या तेथेंच पडणें. जसें- टारफुला, कुरडू, फली, पिवळा धोतरा वगैरे.

(२) वार्‍यानें बाहेरून बीं शेतांत येऊन उ. म्हातार्‍या, पाथरी वगैरे.

(३) पक्ष्यांच्या विष्ठेंतून बीं शेतांत पडून. उ. आंब्यावरील बांडगूळ.

(४) गुरें, मेंढ्या, बकर्‍या वगैरेंकडून-बाभूळ- वांकेरी,

(५) कालव्याच्या पाण्यांतून- घोळ, पाथरी, फुली, नागरमोथा वगैरे.

(६) मनुष्याकडून-तणाच्या बियाची भेसळ असलेलें बीं पेरून.

निरनिराळ्या प्रकारच्या पिकांत विशिष्ट प्रकारच्या तणाचीं बीजें आढळतात तीं पुढें दिलीं आहेतः-

पिकें तणांचीं नांवें.
१ राळा, सांवा व बाजरी कुरडू, शिपी, शेवरा, पिंवळा धोतरा, माठ,
तांदुळजा, चिमणचारा व टारफुला.
२ ज्वारी व कुळीथ खरीप व रब्बी शेवरा,वरबडा,चांदवेल व टार पुला.
३ मटकी बरवडा, शेवरा, पडवेल.
४ गंहू शेवरा, तांदुळजा, बरवडा, चांदवेल,
माठ व सारमळ.
५ भात पाकड, बरडी.
६ ताग खांडेकुळी


बियानें फैलाव होणार्‍या तणांचा नायनाट करणें झाल्यास तीं बींज येण्यापूर्वी निंदून (खुरपून) टाकावीं व पेरणीला निर्भेळ बीं वापरावें. जमीन खोल नांगरून कुळवून व पावसारंभीं तणांचीं आंडीमोड करून व पीक उभें असतांना वरचेवर कोळपण्या देऊन व एक दोन खुरपण्या देऊन साधारणपणें वर्षायु तणाचा नायनाट करतां येतो. वर्षायु तण दोन पानी असतांना कुळवाची एक पाळी घातल्यास ते उपटून मोकळें होतें व उन्हानें मरून जातें. परंतु याच तणाला चार पानें फुटूं दिल्यास त्याच्या मुळ्या पसरतात व खोल जातात. हें तण काढण्यास खुरपावें लागतें व तेणेंकरून खर्च जास्त येतो. याहूनहि हीं तणें मोठीं होऊं दिल्यास तीं हातांनीं उपटावीं लागतात व याला जास्त मेहनत व खर्च येतो.

मुळ्या खोल जाऊन व कांड्याकांड्यानें नवीन मुळ्या फुटून फैलावणारी तणें बहुवर्षायु होत. कुंदा, हरियाळी (दूर्वा) वसनसडी, लव्हाळा (नागरमोथा) दर्भ व मध्यप्रांतांतील कांसगवत वगैरे हीं या वर्गांतील होत. हीं तणें उत्तम काळ्या जमिनींतच फार होतात. यांचा बीमोड करणें फार कठीण असून जास्त खर्चाचें आहे व कांहीं कांहीं तणांचा बीमोड करणें तर दुरापास्तच आहे. पाणभरत्या जमिनींत लव्हाळा कधीहिं नाहींसा होत नाहीं. एका कुंद्याच्या रोपाला एक वर्षांत नवे कोंब दहा फूटतात व त्याच्या मुळ्या सुमारें चवदा इंच खोल जातात व त्यांचा विस्तार एक चौरस फूट जागा व्यापितो. त्याच्या दोन तीन वर्षांत एक हांतरीऐवढ्या पेढी बनतात. लोखंडी नांगरानें जमीन नांगरून, कुंद्याचें गड्डे वेंचून जाळल्यास कुंद्याचा नायनाट एक दोन वर्षांत होऊं शकतो. बर्‍याच ठिकाणीं कुंद्याच्या पेढी हातानें खणवितात पण त्याला फार खर्च येतो.

लव्हाळा:- बागाइतांत कोरडवाहू जमिनींतहि हा काहीं ठिकाणीं आढळतो. फळझाडांच्या व फुलझाडांच्या बागांत तर बहुतेक जागा या तणानें व्यापलेली आढळते. लव्हाळा खणून वेंचून काढून वावर अगदीं साफ करणें अगदीं अशक्य आहे. कारण जमीन खोल नांगरली अगर खणून काढिली तरी नागरमोथे रंगानें काळें असल्यामुळें ते वेंचण्यास  दिसत नाहींत. तागाचें पीक करून जमिनींत गाडल्यानें, रताळ्यासारखीं जमिनींवर आच्छादन करणारीं पिकें केल्यानें  व पाणभरतीऐवजी कोरडवाहू पिकें केल्यानें हें तण कांहीं अंशीं कमी पडतें. उन्हाळ्याच्या एका झाडाला चार महिन्यांत पांच नागरमोथे, आठ महिन्यांत नऊ व बारा महिन्यांच्या झाडास त्रेपन्न नागरमोथे येतात. यांपैकीं बर्‍याच नागरमोथ्यांनां नवीं रोपें फुटतात व त्यांचे ताणे खालीं जाऊन दर चार ते नऊ इंचांच्या अंतरावर खोल जमिनीत एक एक नागरमोथा याप्रमाणें येतात व वर्षअखेर शेवटचा नागरमोथा अठरा इंच खोलीवर धरतो. अशा रीतीनें प्रत्येक झाड एक वर्षांत वीस चौरस फूट जागा व्यापतें.

हरियाळी:- हरियाळी (हरळी) नांगरून किंवा खणून वेंचून टाकून थोडीबहुत नाहींशी करितां येते. ती वखराच्या पाळ्या वरचेवर घालून दाबांत ठेवितां येते. परंतु बीमोड करणें झाल्यास दरवर्षी नांगरणें, वेंचणें अशी सतत दोन तीन वर्षे मेहनत घेतल्यास प्रयत्‍न बराच फलद्रुप होतो.

एका हरयाळीच्या झाडाला आठ महिन्यांत तीन ताणे फुटतात व प्रत्येकाची लांबी तीन साडेतीन फूट असते. हिची कांडी फार जवळजवळ असतात. दर कांड्यास मुळ्या फुटून ती जमिनीला चिकटते. तेथें पुन्हां फूट होऊन लहान ताणा तयार होतो. अशा तर्‍हेचे हरियाळी भराभर जास्त जास्त जागा व्यापीत जाते. हे ताणे जमिनीवर आढळतात तसेंच खालीं आढळतात. हरयाळीची फूट आठ महिन्यांत सुमारें सतरा इंचपर्यत खोल जाते व एका झाडानें सुमारें पांच चौरस फूट जागा व्यापिली जाते. जबलपुराकडे कांस नांवाच्या तणाचा नाश शेतांत पाणी सांठवून तें कुजवून करितात. या गवताच्या मुळ्या फार खोल जातात व कुंद्याप्रमाणेंच त्याच्या शेतांत पेढी बनतात. टारफुला नांवाची एक परोपजीवी वनस्पति आहे. हा टारफुला आपल्या मुळ्या दुसर्‍या झाडाच्या मुळांत गुंतवून झाडांतून आपलें पोषण करितो हें तणझाड ज्वारी व ऊंस या पिकांत फार आढळतें. या तणाचीं झाडें फूल येण्यापूर्वी उपटून काढिल्यास पिकास होणारा अपाय बंद करितां येतो.

वरील हकीकतीवरून तण हा शेतकर्‍यांचा केवढा शत्रु आहे हें स्पष्टपणें लक्षांत येईल. हल्लींच्या चढाओढीच्या व अवर्षणाच्या काळांत या शत्रूस थारा देतां नये. याचा शक्य त्या उपायानें नायनाट केला पाहिजे.

हिंदुस्थानांत तणांचा बीमोड करण्याच्या कामीं रसायन द्रव्यांचा उपयोग करून प्रयत्‍न केलेले कोठें ऐकिवांत नाहीं. [लेखांतील संदर्भग्रंथ द्यावयाचे म्हणजे एक वाङ्‌मयशाखाच सविस्तर वर्णावयाची. कांहीं ग्रंथांचें विवेचन कृषिशास्त्राच्या पोटविभागाचें विवेचन करतांना येईल. कृषिकर्मशास्त्रावर क्रमिक पुस्तकांसारखे अनेक इंग्रजी ग्रंथ आहेत येथील शेतकीसाठीं शेतकीखात्याचे, सहकारी संस्थाचें रिपोर्ट पहावे. मुकर्जीचा भारतीय शेतकीवरचा ग्रंथ बराच सूचक आहे]

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .