विभाग अकरावा : काव्य - खतें
कृष्णगर, पो ट वि भा ग.- बंगालप्रांतांत नडिया जिल्ह्याचा पोटविभाग. क्षेत्रफळ ७०१ चौ. मै. यांत कृष्णगर (जिल्ह्याचें व पोटविभागाचें मुख्य ठिकाण) व नवद्वीप अशीं दोन मोंठी गावें व ७४० खेडीं आहेत. याच्या पश्चिमेंस भागीरथी नदी आहे. जलंगीनदी या पोटविभागांतून जाते. इतिहासप्रसिद्ध प्लासीची रणभूमी या पोटविभागाच्या अगदीं उत्तरेस आहे.
श ह र.— बंगालप्रांतांत नडिया जिल्ह्याचें मुख्य ठिकाण व नडियाच्या राजाचें राहण्याचें ठिकाण. हें ईस्टर्न बंगाल रेल्वेचें एक स्टेशन असून जलंगी नदीच्या डाव्या तीराला आहे. याची लोकसंख्या (१९११) २३४७५. येथें नडियाचे राजे रहातात. कृष्णगर हें व्यापाराचें महत्त्वाचें ठिकाण असून मातीच्या रंगित चित्रांकरितां प्रसिद्ध आहे. येथील म्युनिसिपालिटीनें अंजोना नदीचा जुना पाट खोदून पाणी वाहून जाण्याच्या मार्गाची (ड्रेनेजची सुधारणा केली आहे.
येथें कलकत्ता युनिव्हर्सिटीस जोडलेलें एक कॉलेज व त्यास जोडलेलें हायस्कूल आहे. इतर दोन तीन मध्यम व उच्च इंग्रजी शिक्षणाच्या शाळा आहेत. हें चर्च मिशनरी सोसायटीचें मध्यबंगालच्या रोमनकॅथोलिक विभागाचें हें मुख्य ठिकाण असून येथें दोन्ही संस्थेच्या शाळा व प्रार्थनामंदिरे आहेत. तसेंच झनाना मिशननें चालविलेले दोन दवाखाने आहे. व एक इस्पितळ आहे.