विभाग अकरावा : काव्य - खतें
कृष्ण याज्ञवलकी- हा एक महाराष्ट्रांतील प्रसिद्ध कवि होय. यानें कथाकल्पतरू नांवाचा एक मोठा थोरला पौराणिक ग्रंथ रचिला आहे. याचे पूर्वाध व उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. काहींच्या मतें पूर्वार्ध फक्त यानें लिहिला. या पूर्वार्धांत सात स्तबक आहेत. पैकीं एकट्या सातव्या स्तबकाचीच ग्रंथसंख्या २९४६ आहे. यावरून सर्व ग्रंथाच्या प्रचंडपणाची कल्पना येईल. याचा काळ शके १५००च्या सुमाराचा होता. हा कौडिण्य गोत्री असून याच्या आईबापांचीं नांवें कमळा व अंबाजी होत. याच्या गुरूचें नांव अनंत असून कवीनें सदर ग्रंथ नाशिक येथें लिहिला. ग्रंथांत अनेक पौराणिक कथा असून, त्यांत व प्रचलित कथांत बराच फरक आढळतो. कथांशिवाय, भूगोल, खगोल, चारी वर्ण, सर्व जातींची उत्पत्ति वगैरे इतर विषयहि यांत आहेत. भाषा सरळ व साधी आहे. यांचे मराठी भाषांतर ग्रंथसंपादक व प्रसारक मंडळीनें प्रसिद्ध केलें आहे. [म. क. च.; संतकवि सू.]