विभाग अकरावा : काव्य - खतें
कृष्णराव बल्लाळ काळे— हे नाना फडणीस यांचें विश्वासू असून निजामकडे पेशवे यांच्यातर्फे वकील होते. हे मूळचे काशीचे. त्यांनीं दक्षिणेंत येऊन बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या वशिल्यानें नानासाहेब पेशवे यांच्या वेळीं दरबारांत नौकरी धरिली. दादासाहेब हे उत्तर हिंदुस्थानांत स्वारीस गेले असतां कृष्णराव हा त्यांच्या बरोबर होता व त्यानें त्या सुमारास कांहीं राजकारण केल्यामुळें त्याला कांहीं इनाम पेशव्यांनी दिलें. पुढें निजामाकडे वकील असतां, यांस पंधरा हजारांचा सरंजाम व पंधरा हजारांची जहागीर मिळून तीस हजारांची नेमणूक होती; निजामाकडूनहि दहा पंधरा हजारांची यांस जहागीर मिळाली. स. १७६४ त हैदरावरील मोहिमेंत हे होते. त्यांचे चिरंजीव गोविंदराव, यांना एकंदर ८५ हजारांची नेमणूक होती. पुढें पेशव्यांनीं जातइनाम व सरंजाम (फौज) इनाम मिळून सव्वा लाखांची नेमणूक केली. टिपूविरुद्ध कारस्थानांत गोविंदरावांचा बराच हात होता. इंग्रजानें त्याबद्दल त्यांनां २ तोफा बक्षीस दिल्या होत्या. खर्ड्याच्या प्रसंगांत मध्यस्थीस हेच होते. पुढें रावबाजींनीं गोविंदरावाचा कांहीं सरंजाम जप्त केला. परंतु गोविंदराव स्वामिनिष्ठ होते. बापू गोखले पडेपर्यंत ते इंग्रजांशीं लढत होते [वाड. कै. या.; ऐ. ले. सं.]