विभाग अकरावा : काव्य - खतें
केअर्नस, जॉन एलियट- (१८२३-१८७५) इंग्रज अर्थशास्त्रज्ञ. १८५४ त तो एम. ए. झाला. त्यानंतर कायद्याची परीक्षा देऊन आयंर्लंडात वकिली करूं लागला. आयंर्लंडातील सामाजिक व अर्थशास्त्रीय प्रश्नासंबंधानें चर्चात्मक लेख तो लिंहू लागला व अर्थशास्त्राचा अभ्यास त्यानें सांगोपांग व काळजीपूर्वक केला डब्लिन येथें अर्थशास्त्राच्या अध्यापकाची जागा १८५६ मध्यें केअर्नसला मिळाली. पहिल्या वर्षांचीं त्याची अर्थशास्त्रावरील व्याख्यानें प्रसिद्ध झालीं. त्यांत जे. एस. मिल्लची पद्धतीच विस्तारपूर्वक पुडें मांडलेली होती.
१८६२ त यानें 'दि स्लेव्ह पॉवर' (गुलामांची अर्थोत्पादनशक्ति) या विषयावर तात्विक विचारपरिप्लुत निबंध प्रसिद्ध केला. त्यांत त्यानें गुलाम मजूर पद्धतींत किती तोटे आहेत तें विस्तारपूर्वक व मार्मिकपणानें पुढें मांडलें असून त्यानें काढलेलीं अनुमानें आतां अर्थशास्त्रांतील ठाम सिद्धांत होऊन बसलीं आहेत. शिवाय अमेरिकेंत हें गुलामपद्धतिप्रकरण युद्धावर जाणार, हें भविष्यहि त्यानें या निबंधांत वर्तविलें होतें.
इ. स. १८६६ मध्यें लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजांत त्याला प्रोफेसरची जागा मिळाली. पण १८७२ मध्यें प्रकृति फार ढासळल्यामुळें त्याला राजीनामा द्यावा लागला. 'स्लेव्ह पॉवर’ `पोलिटिकल एसेज’ `लीडिंग प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल एकॉनॉमी’ हीं त्यानें लिहिलेली पुस्तकें होत. शेवटचा ग्रंथ स्मिथ, माल्थस, रिकार्डो, मिल्ल यांच्या परंपरेंतील विद्वानाला शोभण्यासारखाच होता. हा इंग्रजपंथी अर्थशास्त्रज्ञांच्या मुख्य सिद्धांतांवरील टीकापर ग्रंथ असून त्यांत केअर्नसनें मिल्लच्या बहुतेक सर्व प्रमुख सिद्धांतांसंबंधानें आपलें भिन्न मत स्पष्टपणें पुढें मांडलें आहे.
जे. एस. मिल्लच्या `अर्थशास्त्राचीं तत्वें’ या ग्रंथानंतरचे अर्थशास्त्रावरील महत्त्वाचे ग्रंथ म्हटले म्हणजे केअर्नसचेच असून त्यांत मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणें आहेतः (१) अर्थशास्त्राची व्याप्ति व अनुमानपद्धति यांपैकीं व्याप्तीसंबंधीं केअर्नस म्हणतो कीं, अर्थशास्त्र हें निव्वळ तात्विक शास्त्र असून प्रत्यक्ष सामाजिक स्थिति किंवा व्यवस्था यांच्यामुळें या शास्त्रांतील सिद्धांतांनां यत्किंचितहि बाध येऊं शकत नाहीं. समाजशास्त्राची किंवा गणितशास्त्राची अर्थशास्त्र ही शाखा नसून तें कांहीं अंशीं बौद्धिक व भौतिक असें मिश्र शास्त्र आहे. या मुद्यासंबंधानें एवढे सांगितलें पाहिजे कीं, समाजव्यवस्थेच्या आर्थिक परिस्थितीवर होणार्या परिणामाकडे केअर्नसने दुर्लक्ष केलें, हा त्याच्या विचारसरणींतील मुख्य दोष होय. (२) पदार्थ तयार करण्यास लागणारा खर्च व त्याची किंमत यासंबंधीचा पदार्थाच्या उत्पादनखर्चामध्यें मजुरी व भांडवलवाल्याचा नफा या दोहोंचा समावेश मिल्ल करीत असे. परंतु ही दृष्टि भांडवलवाल्यांची असून किंमतींत केवळ मजुरीची अंतर्भाव होत नाहीं, असे केअर्नसचें म्हणणें आहे. पदार्थ उत्पन्न करावयास लागणारे श्रम, मध्यंतरीची विश्रांति आणि अपघात या तिहींचा विचार किंमतीमध्यें येतो असें तो म्हणतो. (३) स्वतंत्र चढाओढ व तिच्यावरील नैसर्गिक व सामाजिक निर्बंध, समाजाचे धंदेवारीनें होणारें वर्गीकरण व भांडवलाची अडचण यामुळें एक धंदा सोडून दुसरा पत्करणें माणसाला कठिण जातें, व त्यामुळें स्वतंत्र चढाओढीचें तत्व पूर्णपणें अमलांत येऊं शकत नाहीं. म्हणून मालाच्या किंमती आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तत्त्वानुसार म्हणजे मागणी व पुरवठा या तत्त्वानुसार ठरतात. केवळ उत्पादकाच्या दृष्टीनेंच केलेली ही केअर्नसची मीमांसा मिलच्यापेक्षा अधिक व्यापक असली तरी एकांगीपणाची आहे असें म्हणावें लागतें. गिर्हाईकाच्या दृष्टीनें पाहतां, स्वतःस तो जिन्नस तयार करावा लागू नये म्हणून तो जास्तींत जास्त जें मोल द्यावयास तयार होतो त्यावरून पदार्थाची जास्तींत जास्त किंमत ठरत असते ही गोष्ट केअर्नसनें लक्षांत घेतलेली नाहीं. (४) मजुरीफंडाचा सिद्धांत मिल्लनें प्रथम प्रतिपादन करून पुढें सोडून दिला होता. केअर्नसनें तो प्रश्न हातीं घेऊन त्यासंबंधाचा बराचसा गैरसमज दूर करून त्याचें खरें स्वरूप लोकांपुढें मांडलें. शिवाय व्यापारीसंघ व संरक्षणपद्धति, तसेंच आंतरराष्ट्रीय व्यापार व पदार्थांच्या किंमती यासंबंधानें फार महत्त्वाचें व अगदी नवीन स्वरूपाचें विवेचन त्यानें केलें आहे.