विभाग अकरावा : काव्य - खतें
केदारनाथ— संयुक्तप्रांत. गढवाळ जिल्ह्यांत महापथ नांवाच्या बर्फाच्छादित शिखरालगतचें देवस्थान. समुद्रसपाटीपासून उंची सुमारें ११७५३ फूट आहे.
चहूंफेर मोठाले उंच पर्वत असून मध्यें दोनअडीच कोसांचें मैदान आहे. त्या मैदानांत मध्यभागीं केदारनाथाचे मंदिर आहे. आसमंतात सर्व हिमालयाचीं शिखरें आहेत. त्यांवर बर्फ असल्यामुळें तीं सर्व रुप्यासारखीं चकाकतात. केदारेश्वराच्या मंदिरासभोंवतीं अष्टदिशांस ईशान्य तीर्थ, दक्षिणामूर्ति तीर्थ इत्यादि तीर्थे आहेत. केदारेश्वराचें देऊळ पांडवांनीं बांधिलें असें सांगतात. देवळावर शिखर केलेलें नाहीं. देवळाचा परिघ मोठा असून तें फार जुनाट आहे. देवळांत नेहमीं घोंट्याइतकें पाणी असतें. बाहेर मंडपांत इतर देवतांची स्थानें आहेत. मुख्य गर्भगृहांत केदारेश्वर आहे. तो लिंगाकार नसून मोठा रेडा बसतो त्या आकाराचा आहे. त्याच्या मागच्या बाजूस पुच्छाप्रमाणें आकार दिसतो. पांडवांचा स्पर्श होऊं नये म्हणून शंकरानें रेड्याचें रूप घेऊन पाताळांत शिरण्याचा प्रयत्न केल्याचें हें द्योतक आहे असें सांगतात. त्या प्रदेशीं बिल्ववृक्ष नाहींत; याकरतां मार्गांत जें भिल्लकेदार स्थान आहे, तेथून यात्रेकरू बिल्वपत्रें बरोबर आणून ती केदारनाथास अर्पण करितात.
येथील रावळ (पुजारी) म्हैसूर किंवा दक्षिण हिंदुस्थान या भागांतले बहुधां नंबुद्रि ब्राह्मणांपैकींच असतात. केदारक्षेत्रीं भृगुपतन (भैरवझांप) म्हणून एक हिमालयाचें शृंग आहे. या शृंगावरून उडी टाकून देहत्याग केला असतां त्यास आत्महत्येचा दोष नसून त्याच्या मनांत ज्या फलाची वासना असेल तें फल त्याला पुढील जन्मीं प्राप्त होतें, असें क्षेत्रमाहात्म्यांत लिहिलें आहे. म्हणून मागें पुष्कळ यात्रेकरू येथें उडी घेत. पण ब्रिटिश सरकारनें ही चाल बंद केली. केदार येथें देवस्थानें व तीर्थें आहेत तीं पुढीलप्रमाणें:-
काष्ठाद्रिपर्वत, कठोरग्राम, वालखिल्यगंगातीर्थ, पोवयाचा पर्वत. त्रियुगीनारायण, रुद्रकुंडतीर्थ (येथें स्नान केलें पाहिजे), विष्णुकुंडतीर्थ (येथें वंदन), वासुकीगंगा, झीलमीलपट्टण, गौरीकुंड तीर्थ, तप्तकुंडतीर्थ, गौरीश्वरमहादेव, मंदाकिनीतीर्थ, गौरीदेवी, वीरभैरव (येथें देवास वस्त्र वाहिलें पाहिजे), भीमगोडा, दुग्धगंगातीर्थ, स्वर्गद्वारतीर्थ, केदारेश्वर महादेव, ईशानेश्वर, संगमेश्वर महादेव (येथें पिंडदान केलें पाहिजे), उदककुंड, रेतोदककुंड (येथें उदकपान केलें पाहिजे), नंदीमहाकाव्य, भृगुपतनपर्वत, स्वर्गारोहण मार्ग, महापथ (म्हणजे कैलासमार्ग), इत्यादि. [अटकिनन्स- हिमालयन गॅ. २; ओकले— होली हिमालय; शेरिंग- वेस्टर्न तिबेट; मूर- नोट्स ऑफ ए ट्रिप टु केदारनाथ; तीर्थयात्राप्रबंध].