विभाग अकरावा : काव्य - खतें
केंद्रापारा, पोटविभाग— बिहार- ओरिसा. कटक जिल्हा. याचें क्षेत्रफळ ९७७ चौरस मैल आहे. १९११ सालीं या विभागाची लोकसंख्या ४,८५,९१८ इतकी होती. हा दलदलीचा प्रदेश असून यांतून पुष्कळ नद्या व ओढे वहात गेले आहेत. यांत १३६८ खेडीं असून केंद्रापारा नांवाचें एक शहर आहे. या विभागांत केंद्रापारा धरून तीन तालुके आहेत.
शहर- केंद्रपारा तालुक्याचें मुख्य ठिकाण. हा बोटींचा धक्का असून कटकहून येणार्या बोटी येथें लागतात. याची लोकसंख्या १९११ सालीं १५,११३ भरली. या शहराच्या आसपास तांदूळ पुष्कळ होत असल्यानें हें शहर व्यापारी बनलेलें आहे. या शहरापासून कटक, जयपूर चांदवाली या शहरांकडे रस्ता गेलेला आहे. १८६९ मध्यें या शहरांत म्युनिसिपालिटी स्थापन झाली. या ठिकाणीं पुष्कळ सार्वजनिक इमारती असून शिवाय एक चांगली शाळा व दवाखना आहे. येथें एक सार्वजनिक लायब्ररी स्थापन करण्यांत आली आहे.