विभाग अकरावा : काव्य - खतें
केन- ही बुंदेलखंडांतील एक नदी आहे. ही कैमूरच्या डोंगराच्या वायव्य भागांतील उतरणीवर उगम पावून, ईशान्यगामी होऊन, संयुक्तप्रांतांतील बांदा जिल्ह्यामधील बिल्हर्का या शहराजवळून वहात जाते. अशा रीतीनें बांदा जिल्ह्यामधून शंभर मैल वहात गेल्यावर ती बांदा- फत्तेपूर या रस्त्यावरील चिल्ला नामक गांवाशेजारी यमुनेला मिळते. या नदीचें पात्र फार खोल असून हिच्यामधून लहान लहान नावा सहज जाऊं शकतात. बांदा येथील तिचें पात्र वालुकामय असून त्यांत गारगोट्या, दगड व स्फटिकाचे तुकडे सांपडतात. या स्फटिकाचे दागिने करण्यांत येतात. खरौनी येथें या नदीचें पात्र फार प्रेक्षणीय आहे. अजयगड संस्थानांतील बरियारपूर शहराजवळ या नदीस एक कालवा काढण्यांत आला आहे.