विभाग अकरावा : काव्य - खतें
केंब्रिज— (१) हें इंग्लंडांतील केंब्रिजशायर नांवाच्या परगण्याचें मुख्य ठिकाण असून हें पार्लमेंटचा बरो आहे. हें लंडनच्या ईशान्येस आगगाडीनें ५६ मैल आहे. येथील लोकसंख्या १९२१ मध्यें ५९,२६२ होती. या शहराचा बराचसा भाग कॅम नदीच्या पूर्व किनार्यावर आहे. याचें क्षेत्रफळ ३२३३ एकर आहे. ब्रिटिश साम्राज्यांतील विश्वविद्यालयांत येथील विश्वविद्यालयाचा आक्सफोर्डप्रमाणें पहिला नंबर आहे. इ.स. १२८१-८४ मध्यें येथें पहिलें कॉलेज काढण्यांत आलें. पुढें निरनिराळ्या वेळीं येथें बर्याच कॉलेजांची स्थापना झालीं. त्यांत ख्राईस्ट पिटरहाऊस (१२८४), क्लेअर (१३२६), पेब्रोक (१३४७), ट्रिनिटी (१३५०), कापर्स (१३५२), गॉनविले (१३८४), किंग्स (१४४१), क्वीन्स (१४४८), जीझस (१४९६), ख्राइस्ट (१५०५), मॅक्डेलीन (१५४२), एम्यानुएल (१५८४), डाऊनिंग (१८००) वगैरे मुख्य आहेत. या कॉलेजांना जोडलेलीं प्रार्थामंदिरें, वाचनालयें, पदार्थसंग्रहालयें, निरनिराळ्या उपयोगांकरितां प्रयोगशाळा, वेधशाळा वगैरे अनेक संस्था आहेत. या विद्यालयांत कॉलेजांत न जाणारे विद्यार्थीहि अभ्यास करितात व त्यांच्याकरितां एक वाचनालय व कांहीं व्याख्यानगृहें आहेत. येथें स्त्रियांकरितां दोन कॉलेजें आहेत.
विश्वविद्यालय (युनिव्हर्सिटी) म्हणजे या सर्व कॉलेजांचा संघ होय. या कॉलेजांना विश्वविद्यालयाच्या कायद्याप्रमाणें चालावें लागतें. एलिझाबेथ राणीच्या वेळच्या विश्वविद्यालयाच्या कायद्याचें इ.स. १८५८ मध्यें रूपांतर झाले. यांतहि पुन्हां १८७२ व १८८२ त सुधारणा करण्यांत आल्या. त्याप्रमाणें चान्सेलर हा विश्वविद्यालयाचा मुख्य असतो. हा विश्वविद्यालयाचा सभासद असून सीनेटनें निवडलेला उच्च दर्जाचा मनुष्य असतो. हा येथील रहिवासी नसला तर हा आपले अधिकार दुय्यम चान्सेलरला देतो व हाहि सीनेटनें एक वर्षाकरितां निवडलेला असतो. याच्या हाताखाली दोन प्रॉक्टर असतात व हे क्रमाक्रमानें दोन कॉलेजें मिळून एक याप्रमाणें निवडले जातात. यांनां मदतनीस म्हणून ४ प्रो-प्रॉक्टर असतात. विश्वविद्यालयाच्या सभासदांत शिस्त राखण्याकरितां चान्सेलर व सीनेटनें नेमिलेले सहा विद्यालयाचे मुख्य अधिकारी मिळून एक सभा असते.
सीनेटला कायदे करण्याचा अधिकार असतो. या सीनेटांत चान्सेलर, दुय्यम चान्सेलर, कायदा, वैद्यकी, शास्त्र, वाङ्मय वगैरेंचे डॉक्टर व कायदा, गायनवादन, वैद्यकी व कला यांचा अभ्यास करून मास्टर (पारंगत) पदवी घेतलेले लोक यांना मत असतें. सीनेटचें कौन्सिल सर्व सूचना व ठराव सिनेटपुढें आणतें.
केंब्रिज विश्वविद्यालयांत सुमारें ३००० विद्यार्थी असतात. कालेजांतील अभ्यासाच्या तीन टर्म्स असतात व त्यांत एकंदर २२७ दिवस येतात. ९ टर्म्स राहिल्यानंतर अंडर ग्रॅज्युएटला बी.ए.च्या परिक्षेला बसतां येतें.
बी.ए.च्या परिक्षेस बसण्याकरितां तीन परीक्षा द्याव्या लागतात. त्यांना लिट्लगो, जनरल व स्पेशल अशीं नांवें आहेत. या विश्वविद्यालयाच्या अटी पाळणार्या ब्रिटिश साम्राज्यांतील कोणतेहि विद्यालय याला जोडतां येतें. विश्वविद्यालयांतील मुख्य महत्वाच्या प्रसंगास `मे आठवडा’ म्हणतात व त्यावेळीं निरनिराळ्या तर्हेची करमणूक केली जाते.
(२) अमेरिकेतील संयुक्त संस्थानांतील मॅसाचुसेट्समधील मिडलसेक्स काउंटीचें मुख्य स्थान. हें बॉस्टन जवळ चारलेस नदीवर वसलेलें आहे. पण त्याची राज्यव्यवस्था निराळी आहे. लो.सं. (१९१७) १,१४,२९३. येथें बहुतेक लोक यूरोपीय आहेत. शहरांत फक्त एकच रेल्वे आहे.
हें हारवर्ड विश्वविद्यालयाचें स्थळ असून वाङ्मयविषयक व शास्त्रीय अभ्यासाबद्दल प्रसिद्ध आहे. अॅन्डोव्हर सिमिनरी नांवाची संयुक्त संस्थानांतील सर्वांत जुनी धार्मिक शाळा येथें आहे. हें ठिकाण ऐतिहासिक व वाङ्मय विषयक दृष्टीनें महत्त्वाचें आहे.
येथील मुख्य उद्योगधंदे म्हणजे मांस बंद करून पाठविणें, छापणें, जोडे तयार करणें, पियानो तयार करणें वगैरे होत. याला शहराचे हक्क १८४६ सांत मिळाले.