विभाग अकरावा : काव्य - खतें
केल्व्हिन, विल्यम थामसन लॉर्ड- (१८२४-१९००) प्रसिद्ध शास्त्रज्ञ जेम्स थामसन या नांवाच्या प्रोफेसरचा हा दुसरा मुलगा होय. याच्या जन्माच्या वेळेस याचा बाप रॉयल अक्याडेमिकल इन्स्टिट्यूशन नांवाच्या संस्थेंत गणिताचा प्रोफेसर होता. इ. सन १८३२ सालीं या प्रोफेसरानें ग्लासगो कालेजांत प्रोफेसरची जागा स्वीकारली. सन १७४१ सालीं विल्यम थामसन केंब्रिजच्या विश्वविद्यालयांत शिरला; आणि त्यानें १८४५ सालीं त्या विद्यालयांतून `दुसरा रँगलर’ ही पदवी मिळविली व त्याबरोबरच स्मिथचें पारितोषिकही संपादन केलें. त्याच वर्षी थामसनला पिटरहौस शाळेचा फेलो नेमण्यांत आलें. त्यावेळीं इंग्लंडमध्यें भौतिक शास्त्राचें प्रयोगात्मक अध्ययन करण्याची चांगलीशी सोय नव्हती. याकरितां थामसननें पारीसचा रस्ता धरला व तेथें रेग्नोच्या प्रयोगशाळेत एकवर्षपर्यंत काम केलें. या वेळेस रेग्नो हा उष्णतेसंबंधीचे अत्यंत महत्त्वाचे असे प्रयोग करीत होता. १८४६ सालीं त्यानें ग्लासगो येथील विश्वविद्यालयाच्या निसर्गशास्त्राच्या प्रोफेसरची जागा स्वीकारली. या वेळेपासून पुढें त्रेपन्न वर्षेपर्यंत त्यानें याच जागीं प्रोफेसरचें काम केलें.
यावेळीं पृथ्वीच्या आयुष्याविषय़ीं सिद्धांत मांडणारा एक बलवत्तर पक्ष होता. त्या पक्षाचें असें म्हणणें होतें की, पृथ्वीवरील मृण्मय कठिण कवच तयार होण्यास शेंकडो कोटी वर्षे लागलीं असलीं पाहिजेत. परंतु थामसन याच्या विवेचनावरून असें सिद्ध होऊं लागलें कीं, दोन कोटी वर्षांपासून ते ४० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचें कवच तयार झालें असावें. हें मत अर्थातच पहिल्या मतास अगदी विरोधी आहे. थामसन यानें हें सिद्ध करण्याकरितां पृथ्वींतून ज्या प्रमाणांत उष्णता बाहेर जाते त्या उष्णतेच्या प्रमाणाच्या आधारें ही गोष्ट त्या लेखांत विशद करून मांडली होती. थामसनच्या मतें सुमारें १० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचें कठिण कवच तयार झालें असावें. यावर पुष्कळ वादविवाद झाला व त्यांत थामसनच्याच मताचा जय झाला. हें मत बरींच वर्षेपर्यंत टिकलें. १८४७ त जेम्स प्रेस्काट, जूल व थामसन यांनीं स्वित्झरलंडमध्यें एका धबधब्याचा उपयोग करून पाण्याच्या अध:पतनानें किती उष्णता उत्पन्न होते याविषयीं प्रयोग केलें. जूल याच्या उष्णतेविषयीच्या कल्पनेचा थामसनच्या मनावर अतिशय परिणाम झाला व सन १८४८ सालीं थासमननें या कल्पनेस परिणत स्वरूप देऊन त्यानें निरपेक्ष उष्णमानपद्धति किंवा केवल उष्णमानपद्धति शोधून काढली. या पद्धतींत हा विशेष आहे कीं, या प्रकारें उष्णतामापन करण्यास पारा, अल्कोहल इत्यादि द्रव्यांची मदत घ्यावी लागत नाहीं. पुढें सन १८५१ सालीं थामसन यानें `रॉयल सोसायटी ऑफ एडिंबरो’ नांवाच्या संस्थेला एक निबंध सादर केला. या निबंधांत त्यानें एन. एल. सादी कार्नो, कौन्ट रम्फोर्ड, सर. एन. डेव्ही, जे. आर. मेअर आणि जूल यांच्या मतांची एकवाक्यता करण्याचा प्रयत्न केला. या निबंधांत थामसन यानें शक्तिनित्यत्वाचा सिद्धान्त आणि उष्णतेचा गतिविशिष्टत्वाचा सिद्धान्त हे इतक्या उत्तम प्रकारें मांडले कीं, त्या सिद्धांतांना सर्व विद्वज्जनांकडून मान्यता मिळाली. याच निबंधांत प्रथमतः गत्युष्णतेच्या सिद्धान्ताचा दुसरा नियम लिहिला गेला. (`विज्ञानेतिहास’ पा. ५४३-५४४ पहा).
गत्युष्णतेचें संशोधन हें थामसनचें सर्वांत महत्त्वाचें कार्य आहे; तरी पण थॉमसनची प्रसिद्धि दुसर्याच एका महत्त्वाच्या कार्यांमुळें झाली आहे. सामुद्रिक- तारायंत्राच्या संबंधानें त्यानें जे शोध लावले त्यामुळें तो सर्व लोकांत प्रसिद्धीस आला आहे. तो इ.स. १८५४ सालापासून तारायंत्र- संशोधकांत प्रामुख्यानें गाजत होता. त्यानें असा निष्कर्ष काढला कीं, लांब सामुद्रिक तारांतून संदेश पाठवितांना लांबीच्या वर्गाच्या व्युत्क्रम प्रमाणांत संदेश पाठविण्याची शीघ्रता असेल. या सिद्धान्तास अनुलक्षून कित्येक शास्त्रज्ञांनीं असें आपलें मत दिलें कीं, खरें सामुद्रिक तारायंत्र सुरू होणें अशक्य आहे. थॉमसननें सामुद्रिक-तारायंत्रांत सुधारणा करण्याचें काम हातीं घेऊन अत्युत्तम प्रकारचें तांबें शोधून काढले. नंतर संदेश घेण्याचें उत्तम प्रकारचें यंत्र तयार केलें. या यंत्राच्या योगानें अति अशक्त असा विद्युतप्रवाह आला तरी त्या प्रवाहापासून संदेश घेतां येतो; तसेंच एखाद्या प्रवाहाच्या विद्युदबलांत अत्यल्प प्रमाणांत फरक होऊन प्रवाह येत असेल आणि तद्द्वारा संदेश येत असेल तर तो संदेश ग्रहण करतां यावा म्हणून त्यानें एक संदेशग्राही यंत्र तयार केलें. असल्या प्रकारच्या यंत्राची सुधारणा होत होत दर्पण विद्युन्मापक (मिरर गॅल्हानोमीटर) आणि वक्रनलिका नोंदयंत्र (सायफन रेकर्डर) हीं दोन यंत्रें तयार झालीं. थॉमसन यानें तारायंत्रावर काम करण्यास सुरुवात केल्यापासून विद्युल्लतेंतील प्रत्येक जातीची विद्युत्संख्या मापण्याचीं यंत्रें भराभर तयार केलीं; या यंत्रांच्या योगानें विद्युच्छास्त्रांतील त्या काळच्या बहुतेक सर्व अडचणी दूर झाल्या. पुढें ज्या वेळेस विद्युद्दीपाचा सार्वत्रिक उपयोग होऊं लागला त्या वेळेस दीपांत खर्च होणारी विद्युच्छक्ति मापण्याचीं यंत्रें त्यानें शोधून काढलीं. विद्युच्छास्त्रावरील एंजिनिअरास ज्या ज्या गोष्टी मापाव्या लागतात त्यांतील प्रत्येकीसंबंधानें थॉमसन यानें कसलें ना कसलें तरी यंत्र बनविलें आहे. एका अम्पिअरच्या एक दशसहस्त्रांशापासून तो दशसहस्त्र अम्पिअरपर्यंतचा विद्युत्प्रवाह मापतां येण्यासारखें यंत्र त्यानें तयार केलें आहे. एका व्होल्टच्या अत्यल्प अंशापासून ते १००००० व्होल्टपर्यंतचें विद्युदबलाचें मापन करणारें यंत्र याचें शास्त्रज्ञानें तयार केलें आहे.
यानंतर थॉमसन यानें डानिअलच्या सेल (घटा)चें विद्युदबल आणि तारेंतून विद्युत्प्रवाह जात असतांना त्या योगानें जी उष्णता उत्पन्न होते तिच्या आधारें तारेच्या अंगची विद्युद्रोधक शक्तीहि मोजली. पुढें सन १८५३ सालीं विद्युदघटातून होणारें विसर्जन प्रकंपित स्वरूपाचें असतें याविषयीं माहिती उपलब्ध करण्याकरितां थॉमसन यानें बरीच मेहनत घेतली. असलें विसर्जन प्रकंपित स्वरूपाचें असतें ही गोष्ट फार महत्त्वाची आहे; कारण असल्याच प्रकारच्या घटाच्या सहाय्यानें एच. आर. हर्ट्झ यानें विद्युल्लहरींचा शोध लावला व पुढें याच लहरीचा बिनतारी संदेश पाठविण्याकडे उपयोग करण्यांत आला. या गोष्टीवरून विद्युदघटांतील विसर्जन प्रकंपित स्वरूपाचें असतें याचें महत्व सहजच कळून येईल.
सन १८७३ सालीं त्यानें सच्छब्द नांवाची लेखमालिका लिहिण्याचें काम हातीं घेतलें. या मालिकेंत खलाशाच्या होकायंत्राविषयीं विवेचन केलें होतें. मालेचा पहिला अंक काढल्यानंतर त्याच्या डोक्यांत इतके प्रश्न उद्भवले कीं, त्या प्रश्नांचा नीटपणें विचार करून त्यांचा निकाल लावण्याला बरींच वर्षे लागलीं. या मालेचा दुसरा अंक सुमारें पांच वर्षांनीं जनतेपुढें आला. या अवधींत या संशोधकानें होकायंत्रांत अनेक सुधारणा केल्या. जहाजावरील बराच भाग लोखंडाचा असतो. त्यामुळे जहाजावरील होकायंत्रावर परिणाम घडून तें होकायंत्र योग्य दिशा दाखवीत नाहीं. असला अनिष्ट परिणाम घडूं नये म्हणून या संशोधकानें कांहीं योजना तयार केली. या योजनेमुळें जहाजांवरील होकायंत्र योग्य दिशा दर्शवितें आणि या योजनेमुळें आतांपर्यंत पुष्कळ खलाशी व प्रवासी यांचे जीव बचावले आहेत. जहाजासंबंधानें दुसरी महत्वाची सुधारणा थामसन यानें शोधून काढली. ती सुधारणा म्हटली म्हणजे १०० फ्यादम खोलीच्या समुद्रांत ५६ नाट या वेगानें जहाज जात असतां समुद्राचा ठाव काढून देणारें यंत्र त्यानें शोधून काढलें. यापेक्षां जास्त खोलीच्या समुद्रांत अल्पायासानें ठाव काढणारें यंत्र याच संशोधकानें बनविलें. भरतीचें मापन करणारें यंत्र, भरतीचे संगीतात्मक पृथक्करण करणारें यंत्र आणि भरतीचें भविष्यकथनकारी यंत्र हीं सर्व तयार करून संशोधकानें आपल्या कीर्तीत भर घातली. समुद्रांत जहाजाची स्थिति कोठें आहे हें वर्तविण्याची पद्धत सम्नर नांवाच्या संशोधकानें बसविली होती. परंतु ही पद्धत बरीच क्लिष्ट होती. या पद्धतींतील क्लिष्टता दूर करून तिला बरीच सुलभता थामसन यानें आणली. या प्रसिद्ध शास्त्रज्ञानें नवीन कल्पनेनें भरलेले असे सुमारें तीनशें निबंध लिहिले. या सर्व निबंधांत पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रत्येक शाखेंतील विषय आले आहेत.
एकुणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत पदार्थविज्ञान शास्त्रांत जी प्रगति झाली तिचें श्रेय कांहीं अंशीं लॉर्ड केल्व्हिन यास दिलें पाहिजे, कारण त्याच्या संबंधांत जे विद्यार्थी आणि होतकरू गृहस्थ आले त्यांस त्यानें योग्य प्रोत्साहन दिलें व त्याचा उत्तम परिणाम झाला.
या शास्त्रज्ञाचें पहिलें लग्न १८५२ सालीं व दुसरें १८७४ सालीं झालें. अटलांटिक महासागरांत तार घातल्याबद्दल त्याला सर ही पदवी मिळाली. १८९२ सालीं त्याला बॅरन केल्व्हिन ऑफ लॉर्जस ही पदवी मळून तो लॉर्ड झाला. सन १८९० सालीं त्याला रॉयल सोसायटीचें अध्यक्ष करण्यांत आलें. सन १८९६ त याला प्रोफेसरची जागा मिळाल्याबद्दल ज्युबिली करण्यांत आली. व त्यावेळेस त्याला "ग्रँड क्रास ऑफ धी रॉयल व्हिक्टोरिअन ऑर्डर" ही पदवी देण्यांत आली व १९०२ सालीं ऑर्डर ऑफ मेरिट ही पदवी त्यास अर्पण करण्यांत आली. १८९६ सालीं त्याच्या आचार्य पदाच्या ज्युबिलीबद्दल जो समारंभ करण्यांत आला त्याचें अल्पसें शब्द-चित्र पुढें दिल्याप्रमाणें आहे:- त्या वर्षाच्या जून १५।१६ आणि १७ तारखेस शास्त्रांत प्रवीण असे गृहस्थ आणि मोठमोठे पदवीधर यांचें जें मोठें संमेलन ग्लास्गो शहरीं झालें तसें संमेलन तत्पूर्वी त्या ठिकाणी कधींहि झालें नाहीं. तेथील विश्वविद्यालय आणि त्या शहराचें अधिकारी पुरुष यांनीं आपल्या शहराच्या प्रसिद्ध नागरिकाचा सन्मान करण्यांत भाग घेतला. सुमारें २५०० पाहुण्यांची विश्वविद्यालयाच्या इमारतींत उतरण्याची सोय लावण्यांत आली होती. त्याच विश्वविद्यालयाच्या प्रयोगशाळेंत एक प्रदर्शन उघडलें होतें. त्या प्रदर्शनांत लॉर्ड केल्व्हिननें तयार केलेलीं यंत्रें ठेविलीं होतीं. तेथेंच रांगेनें पदवीदानपत्रकें, मानपत्रें, पदकें इत्यादि लावून ठेविलें होतें. ईस्टन कंपनी, अँग्लो-अमेरिकन कंपनी आणि कमर्शल कंपनी या तीन सामुद्रिक तारायंत्र कम्पन्यांनीं या समारंभांत भाग घेतला. विश्वविद्यालयाच्या प्रयोगशाळेंतून एक संदेश पाठविण्यांत आला; तो न्यूफाउंडलंड, न्यूयार्क, चिकागो, सेन्फ्रान्सिसको, लासअंगेलीज, न्यू आरलिअन्स, फ्लारिडा आणि वाशिंग्टन या मार्गानें जाऊन लार्ड केल्व्हिनच्या हातात पडण्याला अवघीं साडेसात मिनिटें लागलीं; या सर्व संदेश-मार्गाची लांबी सुमारें २०,००० मैल होती. हा संदेश अटलांटिक महासागरांतून दोन वेळां गेला. यानंतर तीन वर्षांनीं त्यानें आपल्या प्रोफेसरच्या जागेचा राजीनामा दिला. १९०४ सालीं त्याला त्या विश्वविद्यालयाचें चान्सेलर नेमण्यांत आलें. प्रोफेसरची जागा सोडल्यापासून त्याचें जें बहुतांशीं एकान्तवासांत आयुष्य गेलें त्या काळांत त्यानें शास्त्रीय विषयांशीं अगदीं पूर्णपणें संबंध ठेविला; त्यांतला बराचसा काल बाल्टिमोर येथील जॉन्स हाफकिन नांवाचा विश्वविद्यालयांत प्रकाशाच्या लहरीविषयक सिद्धान्तावर दिलेलीं व्याख्यानें दुरुस्त करण्यांत गेला; हीं व्याख्यानें दुरुस्त होऊन सन १९०४ मध्यें प्रसिद्ध करण्यांत आलीं. त्याचा मृत्यु होण्यास अगदीं अल्प काल राहिला होता तो त्यानें शास्त्रीय संशोधनांत भाग घेतला. हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ आपल्या वयाच्या ८३ व्या वर्षी मरण पावला. [अंड्रू गे (१९०८) व एस. पी. थॉमसन (१९१०) यांनीं केल्व्हिनचीं चरित्रें लिहिलीं आहेत; त्यांत केल्व्हिनच्या ग्रंथकर्तृत्वाचा समग्र आढावा घेतला आहे.]