विभाग अकरावा : काव्य - खतें
केसरीय— बिहार-ओरिसांतील चंपारण जिल्ह्यांतील एक खेडें. १९०१ सालीं या खेड्याची लोकसंख्या ४४६६ होती. या खेड्यांत १४०० फूट परिघाची एक मोठी विटांची भिंत असून, त्यावर ६२ फूट उंच व ६८ फूट व्यासांचा एक विटांचा स्तूप आहे. बुद्धानें जीं अवतारकृत्यें केलीं त्यांपैकीं एका कृत्याच्या स्मरणार्थ हा स्तूप बांधला गेला असावां असें कनिंगहॅमनें म्हटलें आहे. हा स्तूप सन २००-७०० याच्या दरम्यान केव्हांतरी बांधला गेला असावा. पण भिंत मात्र बरीच जुनी असावी असें दिसतें. ही भिंत चक्रवर्ति राजा वेन याने बांधिली अशी दंतकथा आहे.